'सगळ्या वयोगटातील लोकांना खिळवून ठेवणाऱ्या "टॉम अँड जेरी" ची मजेशीर जन्मकथा वाचाच

सगळ्या वयोगटातील लोकांना खिळवून ठेवणाऱ्या “टॉम अँड जेरी” ची मजेशीर जन्मकथा वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्या मराठीत बऱ्याच लेखकांनी म्हटलं आहे की ‘काळ बालपणीचा सुखाचा..’ बालपणीच्या आठवणी, तणावमुक्त जीवन मोठं झाल्यानंतर हवंहवंसं वाटतंच.

बालपणीच्या काही सुंदर आठवणी जस की भावंडांसोबत केलेली मस्ती, त्या वेळी येणारे टीव्ही वरचे कार्यक्रम,जाहिराती! अजून ही ते आपल्या बालपणीचे कार्यक्रम लागले की मन आपसूकच ओढ घेतं!

आपल्या पैकी बऱ्याच जणांच्या बालपणी कार्टून पाहणे हा नित्याचा कार्यक्रम असायचा! भारतात कार्टून रुजायला ९० चं दशक उजाडाव लागलं. मोगली, टॉम-जेरी, पोपॉय, डक टेल्स सारखे कार्टून लहानपणी न आवडणारा विरळाच असेल!

यातील टॉम अँड जेरी तर चिरतरुण कार्यक्रम! आपल्यापैकी बरेच जण आज ही हा शो पाहत असतील!

 

tom jerrry inmarathi 1

 

एक मांजर अन उंदराच्या मस्तीचे धमाल किस्से, कुठल्याही संभाषणाविना फक्त आपल्या चाळ्यानी लोकांना एका जागी खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य असलेला हा शो. कितीही वेळा पहा अगदी नवीनच वाटतो!

पण तुम्हाला माहितीये ‘टॉम अँड जेरी ‘ सगळ्यात जुन्या कार्टून्स पैकी एक आहेत. अगदी ५० पेक्षा जास्त वर्ष जुने! जाणून घेऊयात या जगप्रसिद्ध कार्टून शो बद्दल!

१९४०-५० च्या दशकात हॉलिवूड मधे सिनेमा सुरू होण्यापूर्वी एक राखाडी रंगाची मांजर अन चॉकलेटी रंगाचा उंदीर पडद्यावर येऊन धुमाकूळ घालायचे!

अगदी काही मिनिटांच्या कालावधीसाठी दाखवण्यात येणाऱ्या कार्टून मध्ये हे दोन प्राणी एकमेकांचा जीव घेण्याइतपत भांडण करायचे ..कारण एकच ते म्हणजे टॉम मांजर-बोका होता आणि जेरी उंदीर!

चित्रपट सुरू होण्यापूर्वी दाखवण्यात येणारं हे कार्टून पाहायला लोकं वेळेच्या अगोदरच हॉल वर गर्दी करू लागले., परंतु टीव्ही वर दिसणारं ‘टॉम अँड जेरी ‘ आणि ४०-५० च्या दशकातील कार्टून यात बराच फरक होता.

असं झालं टॉम- जेरी च बारसं!

विसाव्या शतकात विल्यम याना आणि जोसेफ बार्बेरा या दोघांनी या उंदीर- मांजर जोडीची निर्मिती केली. सुरवातीला चित्रपटगृहात फक्त यांच्या करामती दाखवल्या जायच्या तेव्हा.

 

tom jerrry inmarathi 2
bt.com

 

म्हणजे घरात हे बोका उंदराचा पाठलाग करत आहे आणि त्या दरम्यान घडणाऱ्या मजेशीर गोष्टी! यांना नाव ठेवण्यात आलं नव्हतं. १९४० ला जेव्हा यावर एक संपूर्ण कार्टून – “Puss Gets the Boot,” बनलं तेव्हा यातल्या मांजराचं नाव होतं जॅस्पर अन उंदीर होता जिंक्स!

याना आणि बार्बेरा यांनी नावावर फार विचार नव्हता केला. या नंतर सुद्धा या प्राण्याचं काय नाव ठेवावं याबद्दल ते ओळखीच्या लोकांना विचारत. प्रसिद्ध व्यंगचित्रकार जॉन कार यांनी शेवटी ‘टॉम – जेरी’ नाव सुचवलं!

परंतु जॉन यांनी ही जोडनावे प्रचलित केली नव्हती .१८२१ ला ब्रिटिश लेखक इगन यांनी ‘लाइफ इन लंडन’ नावाचा कथा संग्रह लिहिला. यात लंडन मध्ये राहणाऱ्या एका जोडप्याची गोष्ट होती आणि त्यांचं नाव होतं टॉम आणि जेरी!

हा कथासंग्रह इतका प्रसिद्ध झाला की त्या वर स्टेज-शो, नाटकं होऊ लागले.तेव्हा पासूनच ‘टॉम-जेरी’ जोडगोळी ने इंग्रजी विश्वात स्थान मिळवलं होतं.

कार्टून चा सिनेमा

१९४०- ५० च्या दशकात कार्टून सिनेमा हॉल मधे झळकायचे पण मुख्य सिनेमा चालू होण्यापूर्वी काही मिनिटे! अर्थात नंतर त्याचे स्वतंत्र कार्टून शो बनत गेले. पण ‘टॉम-जेरी’ चा स्वतंत्र सिनेमा आला नव्हता.

या वर्षी वॉर्नर ऍनिमेशन ‘टॉम अँड जेरी ‘ सिनेमा आणणार आहेत पण अगोदर सुद्धा १९९२ ला याच नावाचा सिनेमा आला होता. पण तिकीट बारी वर तो सपशेल आपटला!

 

tom jerrry inmarathi 3
dailymotion

 

एक तर यात टॉम आणि जेरी पात्रांना पूर्णच वेगळ्या स्वरूपात दाखवण्यात आलं होतं. या पूर्वी च्या कार्टून शो मध्ये टॉम आणि जेरी च्या तोंडी कुठलेही संवाद नसायचे सगळा मुकपट!

पण या पहिल्या सिनेमात या दोघांना चक्क गळ्यात गळे घालून फिरताना, नाचताना, गाताना दाखवलं. हे दोघे मिळून जगाचा मुकाबला करतात असं दाखवलं.

या दोघांना चक्क मित्र दाखवलं होतं! आणि हे दोघे एक गरीब मुलीची मदत करतात वैगेरे. फार थोडा काळ हा सिनेमा थिएटर मधे राहिला आणि कमाई झाली केवळ ३५ लाख डॉलर!

‘टॉम अँड जेरी’एक अत्यंत प्रभावशाली कलाकृती

१९४० च्या दशकात सुरू झालेला हा खेळ पुढे प्रचंड लोकप्रिय होत गेला. कुठलाही रक्तपात न करता सुद्धा मारामारी करता येऊ शकते !आणि ती परत- परत वेगवेगळ्या मजेशीर प्रकारे दाखवून.

 

tom jerrry inmarathi 4
amazon.com

 

सर्व वयोगटातील प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची किमया ही साधता येते, हे या कार्टून ने जगाला दाखवून दिलं. लहान मूल किंवा तरुण, प्रौढ, वृद्ध -टॉम अँड जेरी ने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं!

या कलाकृती ने बऱ्याच कार्टून निर्मात्यांना प्रेरित केलं.अगदी ४० च्या दशकात बनून सुद्धा आजही ही कार्टून्स अजिबात जुनी वाटतं नाहीत!

ऑस्कर वारी

टॉम अँड जेरी म्हणजे लहान मुलांचा कार्यक्रम जो कार्टून चॅनेल किंवा लोकल चॅनेल वर सतत चालू असतो अश्या समजुतीत जर तुम्ही असाल तर ही माहिती वाचाच!

या जोडगोळीची झेप बऱ्याच उंची वर गेलेली आहे.

पूर्वी जेव्हा हॉल मध्ये सिनेमा सुरू होण्यापूर्वी ही कार्टून दाखवण्यात यायची तेव्हा ती’ शॉर्ट-फिल्म’ स्वरूपात होती. त्यामुळेच टॉम अँड जेरी ला अकॅडमी अवॉर्ड च्या शर्यतीत ‘शॉर्ट- फिल्म’ प्रकारात सामील करून घेतलं.

 

tom jerrry inmarathi 5
netflix

 

१९४०-१९५४ दरम्यान ‘टॉम अँड जेरी’ च्या १३ शॉर्ट फिल्म्स ना ऑस्कर चे नामांकन मिळाले होते!

सलग सात वेळा या शो ला अकॅडमी अवॉर्ड मिळाला! त्यातही सलग चार वर्षे पुरस्कार मिळवण्याचा विक्रम सुद्धा यांच्या नावावर आहे (१९४३-४६)!
टॉम अँड जेरी इतके पुरस्कार दुसऱ्या कुठल्याच कार्टून शो ला आजतागायत मिळाले नाहीत!

टिकेचे सुद्धा धनी

टीम अँड जेरी वर प्रेक्षकांनी जेवढं प्रेम,कौतुक केलं तेवढीच टीका समीक्षकांनी या शो वर केली.

काही टिकाकारांचं म्हणणं होतं की या कार्टून ने हाणामारी ला एक ‘चलता है’ दृष्टिकोन दिला. लहान मुलांसमोर ही भयंकर मारामारी दाखवणं म्हणजे त्यांना खोड्या करण्यासाठी नवनवीन कल्पना दिल्यासारखच!

आश्चर्य म्हणजे मध्य-पूर्वे कडचे काही टीका कार त्यांच्या देशांत वाढलेल्या हिंसाचाराचं खापर टॉम अँड जेरी च्या माथ्यावर फोडतात.

 

tom jerrry inmarathi 6
looper

 

त्यांचं म्हणणं असतं की नवीन पिढीत कार्टून मधल्या हिंसक कृत्याने नेमका संदेश जात असेल अन त्यानेच ही पिढी इतकी आक्रस्ताळी आणि हिंसक झाली आहे!

टीव्ही युगात प्रवेश

कार्टून व्यवसायातील ‘टॉम अँड जेरी’ हा पहिलाच ब्रँड! १९६७ पर्यंत ते शॉर्ट-फिल्म स्वरूपात दाखवले जायचे. नंतर या फिल्म्स चे २०० भागात रूपांतरण करण्यात आलं.

नंतर बरीच दशकं टीव्ही वर हे भाग अगणित वेळा दाखवण्यात आले.

१९७५ ला ABC चॅनेल च्या शनिवार सकाळच्या वेळी ‘द न्यू टॉम अँड जेरी शो’ दाखवला जायचा. ही पूर्णतः नवीन, केवळ टीव्ही साठी बनवलेली कथा होती.

यात टॉम -जेरी ला घरभर एकमेकांचा पाठलाग करण्या ऐवजी जिगरी मित्र दाखवलं होतं!हे मित्र जगभर फिरतात, खेळ खेळतात, समुद्र सफारी, सर्कस मध्ये धमाल करतात, मोठी रहस्ये सोडवतात वगैरे दाखवलं होतं.

 

tom jerrry inmarathi 8
empire

 

पण हे कथानक लोकांना फारसं भावलं नाही आणि केवळ १६ भागातच शो गुंडाळावा लागला!

९० च्या दशकात ‘फॉक्स किड्स’ चा ‘टॉम अँड जेरी किड्स शो’ मात्र वेगळा होता. यात टॉम अँड जेरी यांच्यातलं ‘शत्रुत्व’ कायम होतं! फरक होता तो म्हणजे या दोघांच बालरूप दाखवण्यात आलं होतं. म्हणजे ते घरभर धिंगाणा घालत होते पण तेवढया हिंसक पद्धतीने नाही!

टॉम अँड जेरी आत्महत्या करतात?

सगळ्याच प्रेक्षकांना उत्सुकता असतेच की टॉम अँड जेरी च्या शेवटच्या भागात काय दाखवलं असेल! तुम्ही जर इंटरनेट वर शोधलतं तर त्यात तुम्हाला सापडेल की शेवटच्या भागात ही दोन्ही पात्रे रेल्वे खाली आत्महत्या करतात!

परंतु हे पूर्ण सत्य नाही. १९५६ साली आलेल्या ‘ब्लु कॅट ब्लुस’ या कार्टून मधे दाखवण्यात आलंय की टॉम बोक्याची मांजर मैत्रीण त्याला सोडून दुसऱ्या बोक्याचा हात धरते.

आणि टॉम बिचारा देवदास होऊन जातो. जेरी त्याला या निराशेतून बाहेर काढायचा प्रयत्न करतो पण त्याच वेळी त्याची उंदरीन(मैत्रीण) सुद्धा त्याला सोडून जाते.

 

tom jerrry inmarathi 7
snopes.com

 

शेवटी हे प्रेमात भाजलेले दोन जीव रेल्वे रुळांवर जाऊन बसतात. समोरून ट्रेन येताना दाखवली जाते आणि भाग तिथेच संपतो! म्हणजेच या भागात त्यांचा मृत्यू प्रत्यक्ष दाखवण्यात आला नव्हताच.

कारण यानंतर सुद्धा ‘टॉम अँड जेरी’ कार्टून चे बरेच भाग आले होते.

टॉम आणि जेरी एकमेकांच्या जीवावर उठलेले, बंड धसमुसळे मांजर- उंदराचे पात्र. लढाईत कधी जेरी जिंकतो तर कधी टॉम! पण तरीही कार्टून पाहताना निसर्गाच्या अन्नसाखळीतील हे दोन घटक मात्र एकमेकांसोबत चालताना दिसतात!

‘टॉम अँड जेरी’ आणि ‘पोपाय ‘चे दिग्दर्शक जिनी डीच यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं. त्यांनी १९६१ -६२ दरम्यान टॉम अँड जेरी चे १३ भाग दिग्दर्शित केले होते.

गेल्या काही आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी टॉम अँड जेरी च्या टीम ला अनेक अनेक धन्यवाद!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?