' वयाच्या ९८ व्या वर्षी अंधुक दृष्टीवर मात करून ही माऊली समाजासाठी देतेय कोरोनाविरोधात लढा – InMarathi

वयाच्या ९८ व्या वर्षी अंधुक दृष्टीवर मात करून ही माऊली समाजासाठी देतेय कोरोनाविरोधात लढा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कोरोना व्हायरसची चर्चा सुरू आहे. फारच गंभीर आणि भयंकर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे माणसाला! सर्वत्र भयाचंच वातावरण आहे.

लोकं जीव मुठीत घेऊन जगतायत ते पण घरात! बाहेर पडलं तर ह्या जीवघेण्या व्हायरसचा धोका आहे.

साधारण मार्च महिन्याच्या सुरुवातीला हा व्हायरस भारतात पसरू लागला. म्हणजे तेव्हा लागण झाल्याचं कळू लागलं, सरकारने ताबडतोब शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिली.

तेव्हा परिस्थिती एवढी गंभीर नव्हती किंवा इतक्या झटपट हा व्हायरस पसरून बळी घेईल ह्यची कल्पना नव्हती कोणालाच! पण साधारण १५ मार्च नंतर खूपच गंभीर आणि चिंताजनक परिस्थिती होऊ लागली होती.

 

corona home test kit inmarathi 3
business standard

 

सरकारने २२ मार्चला १ दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला.

मग, एकंदरीतच जीवघेणी परिस्थिती लक्षात घेऊन हा लॉकडाऊन १४ एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला. सगळं म्हणजे सगळं बंद. खाजगी, सरकारी वाहने अगदी रेल्वे सुद्धा.

दुकाने, लहान मोठे व्यवसाय, खजगी कंपन्या सगळं बंद! ह्या कोरोना व्हायरसची साक्गळी तोडायची हाच मुख्य उद्देश होता आता!

पण लोकांच्या निष्काळजीपणा मुळे म्हणा किंवा अन्य काही कारणां मुळे म्हणा, परिस्थिती अटोक्यात येण्याऐवजी हाताबाहेर जाऊ लागली. त्याचा असा गंभीर परिणाम झाला की, हा संसर्ग झपाट्याने वाढला आणि लोकं हजारोंच्या संख्येने मृत्युमुखी पडू लागले.

परिणामतः सरकारने लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला.

लोकांना वारंवार जाहिरातींच्या माध्यमातून, विविध प्रसार माध्यमातून ह्या व्हायरसशी लढाई म्हणजे सोशल डिस्टंसिंग पाळणे, स्वच्छता राखणे ह्या सूचना दिल्या जात आहेत.

 

corona in kerla inmarathi
loksatta

 

कारण, एक तर ह्याचा संसर्ग झालेला लवकर कळत नाही, ते लक्षात येतं १३ किंवा १४ दिवसांनंतर! त्यानंतर उपचार सुरू होणार… बरं ठोस औषधं, लस काहीही उपलब्ध नव्हतं.

एवढं सगळं अचानक घडलं होतं आणि अकल्पित होतं सगळं! त्यामुळे संसर्ग होऊ नये ह्याची काळजी घेणं हेच हातात आहे.

आजपर्यंत अनेक नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटांना मानवाने तोंड दिल आहे. अनेक संकटातून सावरून त्याने परिस्थिती पूर्ववत केली आहे. पण, तिथे ज्याच्याशी लढायचं आहे ते दिसायचं समोर, कशाशी लढाई आहे हे समजायचं तरी!

जसं भूकंप, पूर, दुष्काळ किंवा दहशतवादी हल्ले असो, माणूस प्रत्येकातून सावरून पुढे जात राहिला. पण हे संकट तर अदृश्य आहे, व्हायरस दिसत नाहीये पण, झपाट्याने माणासांचे बळी घ्यायला सुरुवात केली ह्याने.

काही समजायच्या आत लाखो लोकं संक्रमित झाली, तेवढीचं बळी पडली. बरं ज्याला संसर्ग झालाय त्याचे तर हाल विचारूच नका!

 

corona virus in lab feature InMarathi

 

कोणालाच त्याला भेटायची परवानगी नसते. आप्तेष्ट दुरूनच बघणार (बऱ्याचदा व्हिडिओ कॉलवरच!).

बरं मृत्युनंतर देखील त्याची परवड सुरूच! कारण मृतदेह नातेवाईकांना दिला जात नाही, त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून! परस्पर अंत्यविधी केले जातात.

ह्यातूनही माणूस सावरला, कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी सज्ज झाला. सगळी लोकं घरीच थांबली २४ तास! फक्त पोलिस, डॉक्टर्स्, नर्सेस् आणि स्वच्छता अधिकारी हे २४ तास ऑन ड्युटी!

ह्या लोकांनी इतर लोकांना प्रेरणा दिली. माणसाच्या रूपात जणू काही देवदूतच हे! ह्यांनी लोकांना धीर दिला, लढण्यासाठी प्रेरणा दिली. प्रत्येक माणसाने त्यांचे आपापल्या परीने आभार मानायला सुरूवात केली.

कोणी खाण्या-पिण्याची मदत केली, कोणी कविता, लेखांच्या माध्यमातून त्यांचे आभार मानायला सुरुवात केली तर कोणी चित्रांच्या माध्यमातून व्यक्त झाले.

 

corona attack
business standard

 

एवढेच नव्हे तर सामान्य माणसे एकमेकांना देखील निःस्वार्थी पणे सर्वतोपरी मदत करायला लागली आहेत. कोणाच्या घरातले काही सामान संपले असेल तर ते शेजारच्या घरातून येते. एकमेकांना मानसिक आधार दिला जात आहे.

लोकं निःसंकोचपणे मदत मागत आहेत आणि स्वतःहून देखील एकमेकांना मदत करत आहेत.

आज आपण अशाच एका अद्भूत व्यक्तीविषयी ह्या लेखातून जाणून घेऊया जी इतरांना मदत करतेय, पण तिचं वय माहितेय? ९८ वर्षे! होय, ९८ वर्षांच्या आजींची गोष्ट बघूया आज!

ही गोष्ट आहे पंजाब मधील मोगा या शहरातील गुरदेव कौर ह्यांची! कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी सगळ्यांनी फेस मास्क लावा असे आवाहन सरकार, डॉक्टर्स् वगैरे वारंवार करत आहेत.

पण सगळेच जण हा मास्क विकत घेऊ शकत नाहीत. ज्यांचे पोट रोजंदारीवर आहे, ज्यांची रोजची कमाई बंद झाली आहे, त्यांची तर खाण्या पिण्याची सुद्धा आबाळ होत आहे. ते काय मास्क वगैरे घेऊ शकतील!

 

gurudev kaur inmarathi
the quint

 

तर अशांच्या मदतीला धावून आल्या ह्या ९८ वर्षांच्या जिगरबाज आजी! नुकताच त्यांचा १ व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात त्या सांगत आहेत, की मी फेस मास्क बनवते आणि वाटसरूंना मोफत वाटते.

वास्तविक एवढे वय झाल्यावर शरीर साथ देत नाही. सगळे अवयव थकलेले असतात. ताकद, शक्ती कमी झाली असते. ह्या आजींची पण दृष्टी कमजोर झाली आहे. तरीही त्यांच्या कामाच्या आड हे येत नाही.

सकाळी उठल्यावर त्यांचे प्रार्थना वगैरे आटोपल्यावर त्या मास्क शिवण्याच्या कामाला सुरुवात करतात. जेवढे शक्य आहे तेवढे तास त्या काम करतात (बऱ्याचदा सकाळी ८:०० ते संध्याकाळी ४, हाही वेळ खूप आहे त्यांच्या दृष्टीने).

ह्या कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क घालणे आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी ह्या कौतुकास्पद कामाला सुरुवात केली आणि त्यांचे कुटुंबीय देखील ह्या कामात आजींना हातभार लावतात.

 

gurudev kaur inmarathi 1
job vacancy

 

ह्या आजींनी व्हिडिओच्या माध्यमातून असेही आवाहन केले की, सरकारने जे सोशल डिस्टंसिंग, टोटल लॉक डाऊन आणि इतर काही ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे पालन करणे गरजेचे आहे.

ते आपल्याच हिताचे आहे, त्याने आपणच सुरक्षित राहणार आहोत, ह्या साथीच्या रोगाला थांबवू शकणार आहोत, असे त्या म्हणाल्या.

त्यांचे हे काम पंजाबच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत- अमरिंदर सिंग ह्यांच्या पर्यंत पोहोचले आणि त्यांनी ह्या आजींचे खूप कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग ह्यांनी गुरदेव कौर म्हणजे सगळ्यात बलवान योद्धा आणि “strongest corona worker” अशा शब्दांत स्तुती केली आहे.

आणि पुढे ते म्हणतात, की असे बलवान योद्धे असल्यामुळेच आपण कोरोना विरूद्धची लढाई नक्कीच जिंकू शकणार आहोत.

खरंच अशा लोकांमुळेच आपण सगळ्या संकटांना तोंड देऊ शकतो आणि त्या संकटांतून आपण नक्कीच मुक्त होऊ शकतो.

ह्या आजींना आणि ह्यांच्यासारख्या अनेक सकारात्मक प्रेरणा देणाऱ्या लोकांमुळेच आपल्याला देखील आत्ताच्या ह्या कोरोना व्हायरसला हरविण्याचा आत्मविश्वास येतो.

खरंच! ह्या आजींना मानाचा मुजरा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?