' कोरोना : "भाजीमार्केटमध्ये स्पायडरमॅन काय करतोय?" हा प्रश्न पडला असेल तर हे वाचाच.

कोरोना : “भाजीमार्केटमध्ये स्पायडरमॅन काय करतोय?” हा प्रश्न पडला असेल तर हे वाचाच.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

“पंछी बनू उडती फिरू” हे गाणं लॉक डाऊन सुरू झालं तेव्हापासून लोकांच्या मनात घोळत असेल. कारण सध्या लोक घरात आहेत आणि पक्षी बाहेर मस्त विहार करत आहेत.

घरी बसलेल्या लोकांना आता इतका कंटाळा आला आहे की, बाहेर फिरण्यासाठी कुणाला मिस्टर इंडियातलं घड्याळ हवं आहे तर कोण, ‘लॉक डाऊन उठल्यावर चार दिवस घरी येणार नाही’ असं म्हणत आहे.

सध्या लॉकडाऊन मुळे दूरदर्शनने देखील आपल्या जुन्या सिरीयल टीव्हीवर आणल्या आहेत. लोकांनी घरीच बसावं हा त्यामागचा उद्देश आहे. रामायण, महाभारत याबरोबरच शक्तिमान सुद्धा टीव्हीवर अवतरला आहे.

 

ramayana inamarathi 3
scroll.in

 

शक्तिमान वरून आठवलं दूरदर्शन वर स्पायडरमॅन ही अॅनिमेटेड सिरीज पाहिली जायची. आणि स्पायडरमॅनचे सिनेमेसुद्धा बऱ्याच लोकांनी पाहिले असतील.

स्पायडरमॅन माहीत नसेल असं कुणी नसेलच. स्पायडरमॅन कसा एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर लोंबकळत जायचा, लोकांना मदत करायचा, लोकांवरची संकट दूर करायचा.

आताही ह्या कोरोनाला घालवण्यासाठी, कोरोनाला संपवण्यासाठी एका अशाच सुपरहिरोची आवश्यकता आहे असेही वाटू शकेल!!

कोरोनाव्हायरस कशामुळे जाईल किंवा कधी जाईल अजून पर्यंत तरी काहीच सांगू शकत नाही. परंतु कोरोनामुळे लोकांचे जनजीवन मात्र विस्कळीत झालंय हे नक्की.

 

corona community inmarathi
INretail

 

कायमच मनात एक प्रकारची भीती घेऊन सध्या लोक जगत आहेत. आणि काही काही लोक अत्यंत बेफिकीरीही दाखवत आहेत.

आपण पाहतोच आहोत की महाराष्ट्रात मुंबईत, पुण्यात कोरोनाव्हायरसचे रुग्ण वाढत असताना देखील लोक भाजी घेण्यासाठी वेड्यासारखी गर्दी करत आहेत.

त्यात सोशल डिस्टन्ससिंगचे तीन तेरा वाजत आहेत. म्हणून मग सरकार काही काही भाग सील करत आहे. जिकडे कोणालाही येण्याला जाण्याला बंदी असेल.

या सगळ्यात जास्त त्रास जर कोणाला होत असेल तर तो ज्येष्ठ नागरिकांना.

कारण या लोकांना बाहेर पडायची भीती आहे कारण बाहेर पडलं तर कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आणि घरामध्ये आवश्यक त्या गोष्टी आणण्यासाठी कोणीच नाही अशी अवस्था आहे.

ही समस्या फक्त काही भारतापुरतीच मर्यादित नाहीये तर जगभरातच प्रत्येक देशात ही समस्या भेडसावते आहे. सगळीकडेच आजकाल ज्येष्ठ नागरिक एकेकटे राहताना दिसतात.

सध्या अनेक सोयीसुविधा असल्यामुळे आत्तापर्यंत कोणताही प्रश्न, तसा परदेशातल्या ज्येष्ठ नागरिकांना तरी जाणवत नव्हता. कारण तिकडे ज्येष्ठांसाठी विशिष्ट सेवा दिल्या जातात.

परंतु कोरोनामुळे आता त्या सेवा देण्यावरही मर्यादा आल्या आहेत. मग अशा वयोवृद्ध लोकांच्या मदतीसाठी स्पायडरमॅन आला तर!! तसाच उडत-उडत येऊन त्याने हव्या त्या गोष्टी दिल्या तर!!

 

avengers-spiderman-inmarathi
wccftech.com

 

खरंच असं होईल का?

हे केवळ जर-तर नसून खरोखर घडलेली घटना आहे. खरोखरच स्पायडरमॅन अशा भाजी मार्केटमध्ये येतोय आणि भाजी घेऊन तो ज्येष्ठ नागरिकांच्या घरात नेऊन देतोय.

हा स्पायडरमॅन पृथ्वीवर अवतरला आहे तो ‘टर्की’ या देशामध्ये.

टर्की मध्ये राहणारा ” बुराक सोयलू ” हा स्पायडरमॅन बनून आसपासच्या वृद्ध लोकांना मदत करीत आहे. तिथल्या सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत.

त्याची ही माहिती पहिल्यांदा सोशल मीडियावर आणली ती ती गुडडेबल या व्यक्तीने. त्याने ट्विटरवर याविषयी सांगताना म्हटलं आहे की,

“बुराक सोयलू हा सध्या स्पायडरमॅनचा पोशाख घालून आसपासच्या गल्ल्यांमध्ये, घरामध्ये राहणाऱ्या वृद्ध जोडप्यांना किंवा एकट्या राहणाऱ्या व्यक्तींना दूध आणि खाण्याच्या वस्तू आपल्या बीटल कार मधून नेऊन देऊन मदत करत आहे.

वृद्धांना कोरोनाचा धोका अधिक असल्यामुळे त्यांना अशा मदतीची गरज असते.”

 

spiderman turkey inmarathi 1
dunia rmol

 

गुडडेबलने आपल्या ट्विटर अकाऊंटवर वर बुराक सोयलू याचे स्पायडरमॅनच्या पोशाखातील फोटोज आणि व्हीडिओज शेअर केले आहेत.

ज्यामध्ये बुराक सोयलू हा सुपर मार्केट मधून भाजी खरेदी करताना दिसत आहे. तसेच तो वृद्ध व्यक्तींना, जोडप्यांना त्यांच्या घरात बाल्कनीतून भाजी देतानाही दिसत आहे.

कोणाला काय हवे आहे याची चौकशी करतानाही तो दिसत आहे. त्याच्या बीटल कारमधून सामान घेऊन जातानाही दिसत आहे.

याविषयी बुराक सोयलू यांना बद्दल जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्याचं म्हणणं आहे की,

“माझी सुपर पॉवर जर माझ्या शेजार्‍यांच्या उपयोगी पडत असेल तर त्याच्या इतकी आनंदाची गोष्ट काय असेल!” याच्यापेक्षा जास्त तो बोलत नाही, पण आपलं काम चोख करतो.

स्पायडरमॅन सारखा पोशाख केल्यामुळे तो अधिकच चर्चेत आला. असा पोशाख असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर मास्क असतो आणि हातात ग्लोव्हज पण असतात.

 

spiderman turkey inmarathi

 

म्हणजे हा पोशाख घालून तो स्वतःचाही कोरोना पासून बचाव करतोय. तरीही आडचणीतील लोकांना मदत करयोय. त्याची भावना ही स्पायडरमॅन सारखीच आहे, म्हणजे संकट समयी लोकांना मदत करणे.

टर्की मध्ये आत्तापर्यंत 86306 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 2017 लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच कोरोनचं संकट मोठं झालेलं आहे.

अशावेळेस ज्येष्ठ नागरिकांना त्यांना हव्या असणाऱ्या दूध, भाजी आणि जीवनावश्यक गोष्टी त्यांच्या दारापर्यंत नेऊन देणारा स्पायडरमॅन त्या लोकांना हवाहवासा वाटतोय.

बुराक सोयलू याची ही गोष्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. असे लोकच खऱ्या अर्थाने समाजातील ‘सुपरहिरो’ आहेत असे गौरवोद्गार काढले जात आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?