ही युक्ती वापरलीत तर केवळ २ तासांत तुम्ही २४० पानांचं पुस्तक वाचू शकता! करताय ना ट्राय?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
पुस्तकं आणि वाचन ही प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे. वाचाल तर वाचाल हा आपल्याकडे वाक्प्रचारच आहे. वाचनाने तुम्ही जगाशी अपडेट राहता.
तुमचे आयुष्य अनुभवसमृद्ध होते. पुस्तकं आपल्याला बरंच काही शिकवतात. ज्ञान देतात. जीवनाचे अनुभव देतात. आपलं व्यक्तिमत्व समृद्ध करतात.
वाचणारा माणूस विचारांनी प्रगल्भ होतो. आणि त्याचा समाजालाही उपयोग होतो.
परंतु जगात पुस्तकांचं भांडार खूप आहे. एक आयुष्य कमी पडेल वाचायला इतकं वाचण्यासारखं आहे. त्यात आपल्या उपयोगाचं किती?

आपल्या आवडीचं किती? एवढाच विचार करून वाचायचं ठरवलं तरी एक आयुष्य पुरं पडायचं नाही इतके वाचनसाहित्य उपलब्ध आहे. काहींना वाचायची खूप आवड असते, परंतु वेळ मिळत नाही.
आपला दैनंदिन वेळ आपला नोकरी व्यवसाय, कुटुंब, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आणि इतर गोष्टीत विभागलेला असतो.
त्यातून फार कमी वेळ वाचण्यासाठी उरतो आणि त्या वेळातही जर तुमच्या वाचनाचा वेग जलद नसेल, तर फारसं वाचून होत नाही.
जर तुम्हाला खूप पुस्तकं कमीत कमी वेळात वाचायची असतील तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या वाचनाचा वेग वाढवावा लागेल.
दोन तासांत २४० पानांचं पुस्तक वाचता यायला हवं. तर तुमच्या वाचनाचा वेग उत्तम आहे असं म्हणता येईल.

कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पुस्तकं कशी वाचायची हे जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला पुढील गोष्टी बघाव्या लागतील. –
• सरासरी वाचनवेग किती असतो
• आपला वाचनवेग कसा तपासायचा
• १०० पाने वाचायला किती वेळ लागेल
• २०० पाने वाचायला किती वेळ लागेल
• ३०० पाने वाचायला किती वेळ लागेल
• पुस्तक वाचायला घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात?
• २४० पानांचं पुस्तक २ तासात वाचण्यासाठी कोणत्या चार पायऱ्या लक्षात घ्याव्या?
• तुमचा वेग वाढवायला हवा का?

• अशा पद्धतीने कोणती पुस्तकं वाचता येतात आणि कोणती नाही?
काही काही पुस्तकं खूप मोठी असतात. ती वेळखाऊही असतात.
सर्वसाधारणपणे सरासरी वाचनवेग पुढीलप्रमाणे असतो –
• सर्वसाधारण कॉलेज विद्यार्थी – ४५०
• सर्वसाधारण उच्चपदस्थ अधिकारी – ५७५
• सर्वसाधारण कॉलेज प्रोफेसर – ६७५
• जलदगती वाचक – १,५००
• विश्वविजेता जलदगती वाचक – ४,७००
सर्वसाधारण माणसाचा चांगला वाचनवेग हा मिनिटाला साधारणपणे ३०० शब्द वाचता येणे हा आहे. जर तुम्ही मिनिटाला ३०० शब्द वाचू शकत असाल, तर तुम्ही साधारण ४९ ते ६० सेकंदात एक पान वाचू शकता.

अशारीतीने शंभर पानांचं २५ ते ३० हजार शब्दांचं एक पुस्तक वाचायला तुम्हाला ८३ ते १०० मिनिटं लागतील.
दोनशे पानांचं म्हणजे साधारण ५० ते ६० हजार शब्दांचं एक पुस्तक वाचायला १६६ ते २०० मिनिटे लागतील.
३०० पानांचं म्हणजे साधारण ७५ ते ९० हजार शब्दांचं एक पुस्तक वाचायला २५० ते ३०० मिनिटे लागतील.
आपल्या वाचनाचा वेग तपासायचा असेल, तर पुढीलप्रमाणे चाचणी घ्या –
एक नेहमीचं पुस्तक घ्या. (पण डीक्श्नरीसारखं नको) त्याचा कुठलाही एक परिच्छेद वाचण्यासाठी घ्या. त्यावेळी टायमर लावा. एका मिनिटात तुम्ही किती ओळी वाचू शकता ते पाहा.
वाचताना सारखं टायमरकडे मध्ये मध्ये बघू नका. तुमच्या नेहमीच्या गतीने परिच्छेद वाचायला घ्या. वेळ संपल्यावर थांबा. आता तुम्ही वाचलेल्या परीच्छेदातील पहिल्या चार ओळी घ्या.
त्या चार ओळीत किती शब्द आहेत ते मोजा. उदा. जर त्या पहिल्या चार ओळीत ४४ शब्द असतील, तर त्याला चारने भागा. म्हणजे ११ येतील. एका ओळीत अकरा शब्द सरासरीने झाले.

आता तुम्ही जितक्या ओळी वाचल्यात त्या अकराने गुणून घ्या. उदा. जर तुम्ही ४४ ओळी वाचल्यात असं धरून ४४ गुणिले ११ केलंत तर ४८४ येतंय.
म्हणजे तुमचा वाचनवेग हा मिनिटाला ४८४ शब्द इतका आहे समजा.
ही चाचणी दोन-तीन वेळा करून पाहा. त्यामुळे सरासरी निघून तुम्हाला तुमचा नेमका वाचनवेग कळेल.
जर तुमचा वाचनवेग वर दिलेल्या सरासरींप्रमाणे समाधानकारक नसला तर काळजी करू नका
पुस्तक जलद गतीने कसं वाचावं याच्या काही ट्रिक्स आहेत. तुम्ही कोणतं पुस्तक वाचताय आणि ते पुस्तक वाचण्याचा तुमचा नेमका हेतू काय आहे यावर तुमच्या वाचनाचा वेग अवलंबून राहील.
आणि तुमचे ते पुस्तक जलद वाचून होईल.
उदा. तुम्ही एखाद्या विषयावरचं पुस्तक वाचायला घेतलंत, तर त्या पुस्तकात सर्वसाधारणपणे लेखकाची प्रस्तावना किंवा मनोगत, मुख्य विश्लेषण आणि समारोप असे तीन भाग असतात.
काही प्रकारच्या पुस्तकांचा ढाचा ठरलेला असतो. यात तुम्ही समारोप टाळू शकता.
प्रस्तावनेतील पहिला परीच्छेद आणि शेवटचा परीच्छेद वाचल्यास एकूण प्रस्तावनेची आणि मनोगताची कल्पना येऊ शकते.

लेखकाने या पुस्तकात काय सांगितले आहे, याची कल्पना थोडक्यात सारांशरुपाने त्याच्या मनोगतात किंवा प्रस्तावनेत आलेली असते.
त्यानंतर त्या पुस्तकात लेखकाने प्रकरणं दिलेली असतात. या प्रकरणांची यादी देखील पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेली असते.
प्रकरणांच्याही सुरुवातीचा परीच्छेद आणि अखेरचा परीच्छेद तुम्हाला त्या प्रकरणात प्रामुख्याने काय आहे ते सांगण्यास मदत करेल. त्यासाठी सगळं प्रकरण वाचणं गरजेचं राहणार नाही.
अशाप्रकारे तुम्हाला हवं असलेलं सार तुम्ही या पुस्तकातून मिळवू शकता.
परीक्षांच्या काळात तुम्हाला एक पुस्तक कमीत कमी वेळात पूर्ण वाचून काढायचं असतं.
अशा वेळी चार पायऱ्यांमध्ये २५० पानांचं पुस्तक कसं वाचून काढायचं ते बघा. –
१. सर्वप्रथम ते पुस्तक कशाबद्दल आहे त्याचं वर्णन सुरुवातीला असतं. ते वर्णन वाचून काढा. त्यातच तुम्हाला त्या पुस्तकाचे सार कळेल.
२. त्या विषयाच्या किंवा त्या पुस्तकाच्या संदर्भाने तुमचा हेतू नक्की काय आहे? त्या पुस्तकातली नेमकी कोणती प्रकरणं तुमच्या परीक्षेकरता मह्त्त्वाची आहेत?
ते निश्चित करा. कोणतेही पुस्तक वाचताना त्याच्यात चार गोष्टी महत्त्वाच्या असतात ते लक्षात घ्या.
• सुरुवात, विषयाची प्राथमिक मांडणी
• तपासणी
• विश्लेषण
• आणि सारभूत मुद्दे.
३. पुस्तकाची रचना लक्षात घ्या. लेखकाने वेगवेगळी प्रकरणे दिलेली आहेत का ती प्रकरणे एकमेकांशी संबंधित आहेत का? पुस्तकाची रचना प्रस्तावना, माहिती आणि समारोप अशी आहे का?
हे पाहून त्याप्रमाणे त्यातलं नेमकं काय महत्त्वाचं आहे आणि किती वाचायला हवं ते ठरवा.
४. प्रत्येक प्रकरणाला वेळ वाटून द्या तुम्हाला २५० पानांचं पुस्तक दोन तासांत वाचायचं आहे. तर तुम्हाला वेळेचं नियोजनही करावं लागेल. प्रत्येक प्रकरणाला किती वेळ द्यायचा ते ठरवावं लागेल.
सगळी पुस्तकं अशाप्रकारे वाचता येणार नाहीत! अर्थात वरीलप्रमाणे सगळीच पुस्तकं वाचता येणार नाहीत.

अभ्यासाची, माहितीची, ठराविक विषयांची पुस्तकं तुम्ही अशाप्रकारे कमी वेळात वाचून काढू शकाल. त्यातले हवे तेवढेच मुद्दे लक्षात घेऊन तेवढेच वाचू शकाल.
मात्र इतर प्रकारची पुस्तके उदा. एखादी कादंबरी, एखादा धार्मिक ग्रंथ, एखादे कवितांचे पुस्तक, अशी पुस्तके त्यातून थोडीच प्रकरणे वाचून कळणार नाहीत.
ती तुम्हाला पूर्णच वाचावी लागतील. त्यासाठी निश्चित वेळ द्यावाच लागेल. तेथे जलदगतीने वाचून चालणार नाही.
मात्र माहितीपूर्ण पुस्तके, आयुष्यातील वेगवेगळ्या अनुभवांचे कथन करणारी पुस्तके, प्रवासवर्णने इत्यादी पुस्तके तुम्ही या जलद पद्धतीने वाचू शकाल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.