' भारतातला लोकप्रिय शो “शक्तिमान”अचानक बंद का झाला होता? – InMarathi

भारतातला लोकप्रिय शो “शक्तिमान”अचानक बंद का झाला होता?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

१९९७ साली सुरू झालेली आणि लोकप्रिय ठरलेली, विशेषतः लहान मुलांमध्ये अधिक लोकप्रिय झालेली ‘शक्तिमान’ ही मालिका देखील पुन्हा सुरू झालेली आहे.

सध्या जुन्या लोकप्रिय मालिकांमध्ये दोन महत्त्वाच्या मालिकांमध्ये मुकेश खन्ना या अभिनेत्याच्या महत्त्वाच्या भुमिका आहेत. एक म्हणजे ‘महाभारत’ आणि दुसरी ‘शक्तिमान’.

 

shaktiman inmarathi

 

परंतु १९९७ मध्ये सुरू झालेली ही मालिका कोणताच नेमका शेवट न दाखवता सन २००५ मध्ये अचानक बंद करून गुंडाळण्यात आली होती. सध्या त्या मालिकेच्या पुनःप्रसारणाच्या निमित्ताने मुकेश खन्नाचे अनेक ठिकाणी इंटर्व्यू छापून येत आहेत.

त्या मुलाखतींमध्ये मुकेश खन्ना यांनी या मालिकेला मध्येच कोणताही शेवट न दाखवता का संपवावं लागलं याचं कारण सांगितलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

या मालिकेच्या आठवणी सांगताना त्यांनी सांगितलं, की या मालिकेच्या प्रत्येक भागाचं शुटींग मोठ्या मुश्किलीने होत होतं. त्यांच्या टिमजवळ या मालिकेच्या शुटींगसाठी पुरेसे पैसेच नसायचे.

इकडून तिकडून पंधरा-वीस हजार मुश्किलीने जमवून ते शक्तिमानच्या प्रत्येक एपिसोडचे शुटींग करत असत. नंतर लोकांचे घेतलेले पैसे परत करून टाकत.

अशा रीतीने प्रत्येक एपिसोडच्या बाबतीत होत होते. परंतु त्या छोट्या बजेटमध्ये देखील शक्तिमानचं शुटींग होऊन शक्तिमान मालिका ही चालू राहिली याचं कारण म्हणजे ती मालिका तोपर्यंत लहान-थोरांमध्ये लोकप्रिय झाली होती.

 

shaktiman inmarathi 1

 

सुरुवातीला या मालिकेला प्रसारणासाठी टिव्हीवर छोटा स्लॉट मिळाला होता. प्राईम टाईमचा स्लॉट मिळाला नव्हता. प्राईम टाईम म्हणजे अधिकाधिक लोक ज्या वेळेला टिव्ही चालू करण्याची आणि मालिका बघण्याची वेळ असते ती.

म्हणजे साधारण रात्री ८ ते १० ची वेळ ही प्राईम टाईम स्लॉट म्हणून ओळखली जाते.

तशी लोकप्रिय वेळ या मालिकेला मिळाली नव्हती. परंतु जी वेळ मिळाली होती त्या वेळेची फी देखील त्या काळात तीन लाख ८० हजार रुपये होती. परंतु या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमुळे लवकरच त्याला प्राईम टाईम स्लॉट मिळाला.

शक्तिमानच्या प्रसारणात येणाऱ्या अडचणींवर मुकेश खन्ना म्हणतात –

“नंतर आम्हाला सांगण्यात आलं की शक्तिमानसाठी तुम्ही रविवारची वेळ घ्या. त्यावर आम्ही ती घ्यायला तयारही झालो. पण अडचणी तिथूनच सुरू झाल्या.

आधी आम्हाला रविवारच्या वेळेची किंमत ७ लाख ५० हजार सांगण्यात आली. १०४ भागांचे प्रसारण झाल्यानंतर त्या वेळेची किंमत वाढवून आम्हाला ती १० लाख ५० हजार सांगण्यात आली.

मी त्यालाही तयार झालो. पण पुढे ही किंमत वाढतच गेली. असं करता करता आमचे जेव्हा ३५० भाग झाले तेव्हा ते लोक अजून किंमत वाढवून सांगत होते.

त्यामुळे मला असं वाटत होतं की मी ती वेळ विकत घेत नसून माझ्या यशाची किंमत मोजत आहे. यावर मी त्यांच्याशी चर्चा केली परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही.

शेवटी मी ती मालिका मध्येच सोडून दिली. सगळे तेव्हा मला सांगत होते की शक्तिमान या एका सफल मालिकेला तुम्ही असं मधूनच बंद करायला नको होती. परंतु मी तरी काय करणार होतो? माझ्या हातात काही नव्हतं.”

shaktiman inmarathi 2

 

थोडक्यात, मुकेश खन्ना यांच्या सांगण्याप्रमाणे भारतातील सर्वात पहिला सुपरपॉवरचा यशस्वी झालेला कार्यक्रम ‘शक्तिमान’ हा केवळ पैशाच्या अभावी बंद करावा लागला होता.

ही मालिका १३ सप्टेंबर १९९७ ला सुरू होऊन २७ मार्च २००५ पर्यंत दुरदर्शनवर चालू होती. त्यानंतर तिला स्टार उत्सव आणि दंगल सारख्या वाहिन्यांवरून पुन्हा प्रसारीत करण्यात आले होते.

आणि आता कोरोना लॉकडाऊनच्या काळात १ एप्रिल २०२० पासून पुन्हा दुरदर्शनवरून शक्तिमान ही मालिका प्रसारीत होत आहे.
म्हणजेच ही मालिका आता तिसऱ्यांदा प्रसारीत होत आहे.

यातील मुख्य पात्राची भुमिका स्वतः मुकेश खन्ना यांनी केली होती. या मालिकेतील टिव्ही रिपोर्टर गीता विश्वासच्या भुमिकेत वैष्णवी महंत हिने काम केलं होतं तर खलनायक तमराज किलविशची भुमिका सुरेंद्र पाल यांनी साकारली होती.

काही असलं तरी ही मालिका लोकांच्या स्मरणांत बराच काळ राहील. त्या काळात देखील तीन ते पंधरा वर्षे वयांच्या लहान मुलांमध्ये भारतातील ही पहिलीच सुपरपॉवर दाखवणारी मालिका खूप आवडती झाली होती.

 

shaktiman inmarathi 3
dailyhunt

 

त्यातील ‘सॉरी शक्तिमान’ हा वाक्प्रचार अजूनही अनेक मिम्स आणि विनोदांमध्ये वापरला जातो.

यातील गंगाधर आणि शक्तिमान या दोन्ही भुमिका मुकेश खन्नाने केल्या होत्या. गंगाधर हा सामान्य माणूस तर शक्तिमान हा सुपरपॉवर असलेला, दुष्टांचे निर्दालन करणारा, दुष्ट लोकांचा तपास लावून त्यांना धडा शिकवणारा नायक अशी ती मांडणी होती.

‘क्या गंगाधरही शक्तिमान है?’ हे आताच्या ‘कटप्पाने बाहुबली को क्यूं मारा?’ प्रमाणेच विचारला जाणारा प्रश्न होता.

याच्या शेवटच्या भागात शक्तिमान खलनायक किलविशला ठार मारतो आणि आपली शक्ती या जगाला त्याच्यानंतर वाईट आणि दुष्ट शक्तींपासून वाचवण्यासाठी एका लहान मुलाच्या हातात सोपवून निघून जातो असे दाखवले होते.

आता पुन्हा नव्याने प्रसारित होणारी ही मालिका आताच्या मुलांचे मन किती जिंकून घेते ते पाहू या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?