' "ब्युटीक्वीन"चा मुकुट काढून ती उतरलीय कोरोनाच्या युद्धात; या रणरागिणीचा निर्णय प्रेरणादायक आहे

“ब्युटीक्वीन”चा मुकुट काढून ती उतरलीय कोरोनाच्या युद्धात; या रणरागिणीचा निर्णय प्रेरणादायक आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भाषा मुखर्जी. ही मागच्याच वर्षी मिस इंग्लंड हा किताब जिंकलीये. पण मागच्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात डोक्यावर चढवलेला हा ताज तिने आता उतरवून ठेवलाय.

आपल्या देशासाठी. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी. तिथल्या लोकांसाठी. का? कारण भाषा ही डॉक्टर आहे. आता सध्या ब्युटी क्वीन म्हणून मिरवण्यापेक्षा तिला आपल्या डॉक्टर सहकाऱ्यांसोबत कोरोना व्हायरसशी दोन हात करायचे आहेत.

 

bhasha mukharjee inmarathi
the national

 

शाळकरी वयात दबून, घाबरून राहणारी ही मुलगी पुढे जाऊन मिस इंग्लंड झाली.

ती नऊ वर्षांची असताना तिचे वडील कोलकात्याहून इंग्लंडला शिफ्ट झाले. डर्बी नावाच्या शहरात ते राहत होते. तिथे भाषाचे वडील शेफ म्हणून काम करत होते तर आई एक दुकान चालवत होती.

तिथे आपला जम बसवायला त्यांना बराच काळ लागला. बराच संघर्ष करावा लागला.

मिरर या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत भाषा म्हणते,

“आम्ही इंग्लंडला आलो तो काळ वेगळा होता. पैशांची तंगी होती. आमचं सगळं कुटुंब एकाच खोलीत झोपत असे. त्या घरात आमच्या सोबत दुसरी कुटुंबे पण राहत होती.

चॅरीटी शॉपमधून आम्ही कपडे खरेदी करत असू. गरीबीमुळे शाळेत पण मला ओरडा बसायचा.

मला आजही आठवतंय की एकदा शाळेत जागतिक पुस्तक दिवस होता. त्या दिवशी शाळेचा गणवेष न घालता आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या लोकप्रिय-महान व्यक्तींची नक्कल करणारे कपडे घालून यायचे असे.

परंतु असे विशेष कपडे खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने मी माझ्या नेहमीच्या कपड्यांतच शाळेत गेले. तेव्हा एका मुलाने मला हिणवले होते. माझ्यावर टिप्पणी केली होती.

या सगळ्यांच्या टिकेपासून स्वतःला वाचवण्यासाठी मी लायब्ररीचा आधार घेतला होता. मी तिथेच बसून दिवसभर अभ्यास करत असे. माझा प्रयत्न असे, की जास्तीत जास्त अभ्यास करून निदान चांगले मार्क्स मिळवले तर शिक्षक आपल्यावर खुश राहतील.”

अभ्यासात ती हुशार असल्याने तिला शाळेत चांगले मार्क्स मिळाले. त्यामुळे नॉटींगहॅम युनिव्हर्सिटीत तिला प्रवेश मिळाला. तिथे वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊन ती डॉक्टर झाली. शल्यविशारद झाली.

 

bhasha mukharjee inmarathi 1

 

परंतु कॉलेजचे ते दिवस देखील तिच्यासाठी फार चांगले नव्हते. त्या काळात ती डिप्रेशनमध्येही गेली होती. या डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी तिने काही काळ मॉडेलिंग सुरू केले होते.

चॅरीटीसाठीही तिने काम केलं आणि एका बाजूला ती आपले वैद्यकीय शिक्षणही घेत राहीली.

आता ती डॉक्टर झाली आहे. तिला पाच भाषा बोलता येतात. शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना ती परिस्थितीमुळे ज्या डिप्रेशनमध्ये जात होती त्या डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करणं आवश्यक आहे असं तिला वाटत होतं.

त्यासाठी पुढे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काहीतरी स्पेशलाईजेशन करण्याची तिची इच्छा आहे. मिस इंग्लंड बनल्यानतर देखील तिने अनेक चॅरीटी संस्थाशी स्वतःला जोडून ठेवले होते.

 

bhasha mukharjee inmarathi 4
viral bake

 

 

ऑगस्ट २०१९ मध्ये मिस इंग्लंड हा किताब जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशीती पिलग्रिम हॉस्पिटलमध्ये आपल्या ड्युटीवर गेली होती.

डिसेंबर २०१९ मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेत इंग्लंडची प्रतिनीधी म्हणून भाषा गेली होती. मार्चमध्ये ती भारतात आली होती. महिनाभरासाठी. इथे देखील ती चॅरीटीचे काम करण्यासाठीच आली होती.

 

bhasha mukharjee inmarathi 2
new asian post

 

परंतु ती इथे पोचली तेव्हापासून तिला इंग्लंडमधून मेसेज येत होते. तिचे सहकारी डॉक्टर तिला तिथल्या कोरोनामुळे दिवसेंदिवस वाईट होत चाललेल्या परिस्थितीची माहिती देत होते.

ते ऐकून तिने ती ज्या हॉस्पिटलमध्ये आधी काम करत होती त्यांच्याशी संपर्क साधला. आणि आपल्याला पुन्हा तिथे कामावर रुजू व्हायचे असल्याचे कळवले.

सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत भाषाने म्हणाली, सध्याच्या या काळात डोक्यावर ताज ठेवून मिरवणं मला योग्य वाटत नाही.

जरी मी आता करत असलेले कामही मानवतेचे आणि चॅरिटीचे असले, तरी सध्या जग कोरोनाच्या महामारीतून वाचण्यासाठी संघर्ष करत असताना, रुग्णांना वाचवण्यासाठी माझे सहकारी डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करत असताना मी इथे डोक्यावर ताज ठेवून मिरवू शकत नाही.

तुम्ही जेव्हा सौंदर्य सुंदरी म्हणून कुठल्याही देशात जाता तेव्हा लोक तुमच्याकडून सुंदर, छान छान दिसण्याची अपेक्षा ठेवतातच. पण सध्या तसं दिसण्याचा नि मिरवण्याचा काळ नाही.

मला माझ्या घरी परत जायचं होतं. मला वाटत होतं की याच दिवसांसाठी तर मी वैद्यकीय पदवी घेतली आहे. मग वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची हीच तर खरी संधी आहे. आणि लोकांना माझी गरज आहे.

 

bhasha mukharjee inmarathi 3
storytrender

 

आज जग डॉक्टरांची स्तुती करतंय आणि त्यांच्याकडे आशेने डोळे लावून बसलंय, तेव्हा मी देखील एक डॉक्टर असताना या क्षणी मला माझं तेच काम करणं अधिक गरजेचं आहे.

भाषा आता यु.केला परत गेली आहे. ब्रिटीश हाय कमिशनने तिच्या परत जाण्याची व्यवस्था करून तिला भारतातून इंग्लंडला पाठवले. जर्मनाच्या फ्रॅंकफर्टवरून ती लंडनला पोचली.

आता सध्या ती सेल्फ आयसोल्यूशनमध्ये म्हणजे स्व-विलगीकरण अवस्थेत आहे. विलगीकरणाचा हा अवधी संपताच ती आपला डॉक्टरचा रोल पार पाडायला तयार असणार आहे.

जॉन हाफकिन्स युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार यु.के मध्ये आतापर्यंत कोरोनाच्या ४८ हजार केसेस समोर आलेल्या आहेत. जवळपास पाच हजार रुग्णांचा मृत्यु झालेला आहे.

 

corona vaccine inmarathi 5
abc news

 

तिथले पंतप्रधान बोरीस जॉनसन देखील कोरोना पॉझिटीव्ह ठरले आहेत आणि ते रुग्णालयांत भर्ती झाले आहेत.

अशा वेळी मूळ भारतीय असलेल्या भाषाचे हे पाऊल कौतुकास्पद आहे. आपल्या सुरक्षेची पर्वा न करता ती आपण जिथे राहतो त्या देशाच्या सेवेसाठी अशा परिस्थितीतही धावून गेली आहे.

भारतीय या नात्याने प्रत्येक भारतीयाला तिचा अभिमानच वाटेल यात शंका नाही.

=== 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?