' कोरोनाच्या संकटात भारत उजळून निघतोय – वाचा, भारतीय मानवतेची अभिमानास्पद उदाहरणं – InMarathi

कोरोनाच्या संकटात भारत उजळून निघतोय – वाचा, भारतीय मानवतेची अभिमानास्पद उदाहरणं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या जगभरात कोरोनाचा प्रभाव वाढतोय, मोठ्या प्रमाणावर दररोज रुग्णांच्या आकड्यात वाढ होतेय. भारतातही तीच परिस्थिती असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आदर्शवत उदाहरणं देशात तयार होत आहेत.

देशभरात ठिकठिकाणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सामान्यांनी मदतीसाठी हात पुढे सरसावले आहेत.

 

social help inmarathi

 

केवळ आर्थिक मदतच नाही तर देशभरात सामाजिक संस्था, तरुण पिढी आणि वेगवेगळ्या ग्रुप्सने पुढे येऊन पडेल ते काम करण्याची तयारी दाखवली आहे.

आपापल्या परीने या संकटात लोकांना मदत करण्याचा एक प्रयत्न केला जात आहे. यामुळे जगासमोर मानवतेचे आदर्शवत उदाहरणच आपण ठेवले आहे.

अशाच काही आदर्श मंडळींचा घेतलेला हा आढावा

पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाची समस्या दिसून येते आहे. पुण्यात ज्येष्ठ नागरिकांना डायलिसीसमध्ये रुग्णालयात जाण्यासाठी तेथील तरुण मंडळी मदत करत आहेत.

याचबरोबर या मंडळींनी जीवनावश्यक वस्तू घरोघरी पोचविण्यासाठीसुद्धा मदत केली आहे.

 

social help inmarathi 2
theprint

 

सोनाली रसाळ या तरुणीने तिच्या ८ मित्रांसह एका ग्रुपच्या माध्यमातून याची सुरुवात केली आणि ५ दिवसात या ग्रुपमध्ये २२० सदस्य झाले होते. याद्वारे मोलाची मदत पुण्यात करण्यात येत आहे.

या ग्रुपच्या माध्यमातून प्रामुख्याने गरजू ज्येष्ठ नागरिकांना मदत केली जात आहे. त्याचबरोबर इतर वयोगटातील लोकांनाही त्यांच्या अडचणी जाणून घेऊन मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ही मदत केली जात असताना आपला विभाग सोडून जाऊन कोणीही काम करत नाही, तर लॉकडाऊनचे पालन करून प्रत्येक विभागानुसार मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जीवनावश्यक वस्तू घरोघरी उपलब्ध करून देत असतानाच त्यासाठी कोणतेही शुल्क, डिलिव्हरी चार्जेस ग्रुपच्या वतीने आकारले जात नाहीत.

 

social help inmarathi 3

 

याच धर्तीवर अनेक ग्रुप्स पुण्यात सक्रिय आहेत. मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा प्रयत्नसुद्धा केला जात आहे. गुरू गौतम चॅरिटेबल ट्रस्ट, वंदे मातरम संघटना यांसारख्या विविध संस्थांच्या माध्यमातून उपक्रम हाती घेतले जात आहेत.

पोलिस, पालिका कर्मचारी, डॉक्टर यांना मोफत अत्यावश्यक सेवा आणि जेवणाची व्यवस्था यांच्या वतीने केली जात आहे.

हॉस्पिटलमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेक डॉक्टर पुढे आले आहेत. वैद्यकीय सेवा घरी जाऊन तसेच फोनवर देण्याचा प्रयत्न हे डॉक्टर करत आहेत.

हैदराबादमध्ये सामान्य मदतीसाठी एकत्र

सैनिकपुरी हा हैदराबादमधील मुख्य विभाग. येथे सैनिकपुरी गार्डन क्लबच्या माध्यमातून सामान्य नागरिक एकत्र आले आहेत. कामगार, रस्त्यावर राहणारे, मजूर, भिकारी आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी लोकांचे प्रयत्न सुरू आहेत.

संपूर्ण शहरात जवळपास ५००० लोकांना आत्तापर्यंत दररोज अन्न उपलब्ध करून दिले जात आहे. याचबरोबर १५ दिवस पुरेल इतका अन्नसाठा पॅकेट्सच्या रुपात घरोघरी पोचवला जात आहे.

याचबरोबर या उपक्रमाच्या माध्यमातून फळे, भाजीपाला यांची ऑर्डर फोनवर घेऊन घरपोच या गोष्टी दररोज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी हा खटाटोप चालला असल्याचे सदस्य सांगतात.

 

social help inmarathi 4

 

खास बाब म्हणजे यासाठी या ग्रुपमधील सदस्यांनी स्वतः शेतात किंवा घराजवळ भाजी आणि फळांची लागवड केलेली आहे. त्यातूनच ही फळे आणि भाजीपाला लोकांना दिला जातो.

असे वेगवेगळे सदस्य स्वतःहून या ग्रुपचा भाग झाले आहेत. फणस, नारळ, मिर्ची, टोमॅटो अशा वेगवेगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.

यासाठी फेसबुकच्या माध्यमातून स्वयंसेवकांचे जाळे तयार करण्यात आले आहे. स्वयंसेवकांच्या माध्यमातून औषधे, जीवनावश्यक वस्तू , वैद्यकीय सेवा घरोघरी पोचवल्या जात आहेत.

याचबरोबर निधी संकलन करून घरोघरी मदत केली जात आहे.

भोपाळमध्येही तरुण एकत्र

भोपाळ शहरामध्ये तरुणांनी गरजूंना औषध आणि जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दररोज जवळपास ६०-७० लोकांना घरपोच औषध आणि वैद्यकीय सेवा येथील तरुणांच्या ग्रुपद्वारे दिल्या जात आहेत.

यासाठी स्वच्छतेची पूर्ण काळजीसुद्धा घेतली जाते. याचबरोबर तरुणांनी एकत्र येऊन किचन सेटअप तयार केला असून येथे येऊन विविध स्वयंसेवक भोजन तयार करतात.

गरजू आणि वयोवृद्ध लोकांना हे जेवण मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात या दृष्टीने प्रयत्न केले जातात. संभावना मेडिकल ट्रस्टच्या वतीने वैद्यकिय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोशल मीडियाद्वारे प्रयत्न केले जात आहेत.

याचबरोबर शहरात लॉकडाऊनबद्दल जमजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

curfew inmarathi 6
livemint

 

याचबरोबर शहरातील युथक्वेक या संस्थेच्या वतीने १०० तरुण मंडळी एकत्र आले आहेत. गरिब वस्तीमध्ये आणि घरोघरी सर्वांना जीवनावश्यक वस्तू आणि औषधे पोचविण्याचे मोलाचे कार्य त्यांच्या वतीने केले जात आहे.

मजूर, बांधकाम कामगार, भिकारी या सगळ्यांना उत्पन्न ठप्प असताना आर्थिक सहकार्यसुद्धा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तसेच यांना कोरोनाबद्दल माहिती व्हावी आणि जनजागृती व्हावी यासाठीसुद्धा प्रयत्न सदस्य करत आहेत.

बँगलोरमध्ये निधीसंकलन

बँगलोर म्हणजे आयटी हब. आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि विविध लोकांनी एकत्र येऊन निधी संकलन करून कोरोनाच्या या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत.

बँगलोरमधील लॅव्हल रोड भागातील १०० लोकांनी एकत्रित येऊन निधी संकलनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रस्त्यावर राहणारे , वेठबिगारी करणारे तसेच गरीब वस्तीतील लोकांना मदत करण्यासाठी हे सर्व लोक एकत्र सरसावले आहेत.

 

social help inmarathi 5
global giving

 

ज्या व्यक्तींचे उत्पन्न दैनंदिन कामावर अवलंबून आहे अशा सर्वांसाठी एकत्रित प्रयत्न केले जात आहेत. सोशल मीडिया आणि आपल्या संप्रकातून जास्तीत जास्त निधी गोळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यामध्ये फुल विक्रेते, फळ विक्रेते, भाजीवाले आणि तत्सम लोकांना प्रत्येकी ६००० रुपयांची मदत करण्यात येत आहे.

भटक्या प्राण्यांना अन्नदान

रस्त्यावरील कुत्रे, मांजरी तसेच इतर प्राण्यांना उपासमारीचा त्रास होऊ नये यासाठी हेड्स अप फॉर टेल्सच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. या प्राण्यांसाठी फूड पॅकेट्स आणि काही औषधे तयार करून ती वेगवेगळ्या भागात पोचविण्याचे काम संस्थेच्या वतीने केले जात आहे.

अशाप्रकारे देशाच्या वेगवेगळ्या भागात सामाजिक बांधिलकी जपत प्रयत्न केले जात आहेत.

कोरोनाविरुद्ध संपूर्ण देश लढत असताना सामान्यांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून विविध संस्था, संघटना आणि व्यक्ती जीवाचे रान करून प्रयत्न करत आहेत.

यामुळे सामाजिक बांधिलकीचे आदर्श रूप जगासमोर उभे राहिले आहे.

===

टीप : फोटो प्रातिनिधिक आहेत

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?