' कोरोनाबद्दल या एका अघोरी उपायाने शेकडो लोक मृत्युमुखी पडलेत; स्वतःला वाचवा!

कोरोनाबद्दल या एका अघोरी उपायाने शेकडो लोक मृत्युमुखी पडलेत; स्वतःला वाचवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या कोरोना व्हायरसने माणसे प्रचंड भयभीत आहेत. जगभरात कोरोनाबाधितांचे वाढते आकडे आणि होणारे मृत्यू यामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. घाबरलेले आहेत.

त्यातच सोशल मिडियावर उलटसुलट उपाय सुचवले जातात. त्यांत वैद्यकीय तथ्य काहीच नसते. या उपायांमध्ये घरगुती उपायांपासून अघोरी उपायांपर्यंत अक्षरशः काहीही प्रकार पसरवले जातात.

असे प्रकार आता कोरोनाकाळातच होतात असे नाही. प्रत्येक घटनाप्रसंगाच्या निमित्ताने असे आचरट, निरर्थक आणि कधी कधी तर घातक असे उपाय व्हाट्सअप युनिव्हर्सिटीतून प्रसारित होत असतात.

याबद्दल अनेक वेळा सावध केले गेले असूनही लोक या प्रकाराला बळी पडतच राहतात.

सोशल मेडियावरील अशाच एका प्रचंड चुकीच्या माहितीमुळे इराण मधील तिनशे लोक मृत्युमुखी पडले तर जवळपास हजाराच्या वर लोक अत्यवस्थ झाले आहेत.

 

corona italy featured inmarathi

हे ही वाचा – पेट्रोलचे दर का वाढत आहेत? सामान्यांना पडलेल्या प्रश्नाचं अभ्यासपूर्ण उत्तर

दुसऱ्या अहवालात हा आकडा पाचशेच्या जवळपास असल्याचा दावा केला गेलाय आणि जवळपास तिनेक हजार लोक याने आजारी आहेत.

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका भडक दर्जाच्या नियतकालिकात माहिती छापून आली होती की, शिक्षक असलेल्या एका ब्रिटीश माणसाने स्वतःला झालेल्या कोरोनाचा संसर्ग व्हिस्कीमध्ये मध मिसळून पिऊन दूर केला.

याच बातमीच्या सुमारास काहींचा असाही विश्वास होता की सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असल्याने हातावरील कोरोनाचे विषाणू जर सॅनिटायझरने मरत असतील, तर अल्कोहोल प्यायल्याने पोटात गेलेला कोरोनाचा विषाणू देखील मरून जाईल आणि आपण बरे होऊ.

इराणमधील आरोग्य मंत्रालयात सल्लागार म्हणून कार्यरत असलेले डॉ. हुसेन हसनियत म्हणतात, “इतर देशांत एकच समस्या आहे, आणि ती म्हणजे कोरोनाचे उपचार कसे करावेत. पण आमच्याकडे दोन प्रकारच्या आघाड्यांवर लढत आहोत.

एक म्हणजे कोरोनावर उपचार करणे, आणि दुसरा म्हणजे अल्कोहोल पिऊन झालेल्या विषबाधेवर उपचार करणे.”

इराण हा मुस्लिम धर्माधारित देश असल्याने तिथे अल्कोहोलवर, म्हणजेच दारू पिण्यावर बंदी आहे. तिथल्या मिथॅनॉलच्या उत्पादकांवर देखील लोकांना कळावे म्हणून मिथेनॉलमध्ये कृत्रिम रंग टाकणे बंधनकारक केलेले आहे.

 

iran death inmarathi 2

 

परंतु सध्या अल्कोहोलची बेकायदेशीर मागणी वाढल्याने याचा बेकायदेशीर धंदा करणारे लोक यात ब्लिच पावडर टाकून यातील रंग हलका करून टाकतात आणि इथॅनॉल ऐवजी मिथेनॉल विकतात.

हे मिथेनॉल अर्थातच विषारी आणि घातक आहे.

इराणमध्ये एकीकडे शेकडो लोक कोरोना विषाणूच्या संसर्गाने मरत आहेत. मात्र त्यापेक्षाही जास्त लोक हे विषारी अल्कोहोल पिऊन मरत आहेत किंवा आजारी पडत आहेत.

त्यांच्यावर उपचार करणं ही एक वेगळीच डोकेदुखी होऊन बसलेली आहे. लोक अज्ञानामुळे काहीही आचरट उपाय करून पाहात आहेत.

अल्कोहोल प्यायल्याने कोरोनाचा विषाणू मरतो या अफवेमुळे या महिन्याच्या सुरुवातीला इराणमध्ये ४४ लोक असा विषारी घातक मिथेनॉल अल्कोहोल समजून प्यायल्याने मेले आहेत.

 

iran death inmarathi 1

हे ही वाचा – इराणने अमेरिकेचं ड्रोन पाडलं आणि ट्रम्प तात्या भडकले!

तर शेकडो लोक यामुळे विषबाधित होऊन हॉस्पिटल्समध्ये दाखल झालेले आहेत. इराण येथील साऊथवेस्ट प्रांतातील खुजेस्तान येथून बेकायदेशीर मिथेनॉल विकणाऱ्या सात चोरट्यांना आतापर्यंत पकडण्यात आले आहे.

इराणच्या दक्षिणेकडील याज्द, करज आणि सिराज या शहरांमध्ये हे विषारी मिथेनॉल पिणाऱ्यांची उदाहरणे अधिक आहेत.

वुहाननंतर कोरोना विषाणुने बाधित झालेला सर्वात मोठा देश हा इराण आहे. एका अहवालाप्रमाणे तेथे जवळपास ३२ हजारांच्यावर लोक या विषाणुने आजारी पडलेत आणि २३०० च्या वर लोक मृत्युमुखी पडले आहेत.

या लोकांच्या दफनासाठी इराणमधील बेहेश्त-ए मासूमेह संकुलात १०० मीटर्स लांबीचे दोन खंदक खणण्यात आले आहेत. हे खंदक स्पेसमधून देखील दृष्टीस पडतात.

तेहरानपासून १३० किमी. दूर असलेल्या कोम नावाच्या शहरात कोरोनाबाधित लोकांच्या विलगीकरणासाठी २१ फेब्रुवारीसाठीच जागा तयार करण्यास सुरूवात झाली होती.

परंतु मृत्युचे वाढते आकडे बघता हे काम अजून वाढवावे लागत आहे.

अल्कोहोलच्या सेवनाने कोरोना बरा होतो या अंधसमजूतीमुळे किंवा अफवेमुळे लोक बेकायदेशीरपणे का होईना अल्कोहोल मिळवण्यासाठी धडपड करत आहेत.

इराणमध्ये अल्कोहोलवर बंदी असल्याने ते मिळत नाही. याचा फायदा दोन नंबरचा धंदा करणारे चोरटे उचलू लागले आणि ते अल्कोहोलच्या नावावर इथेनॉलऐवजी घातक, विषारी मिथेनॉलच अशा लोकांना विकू लागले.

 

methanol inmarathi

 

हे मिथेनॉल स्पष्ट ओळखू यावे यासाठी त्यात रंग टाकण्यात यावा असे स्पष्ट आदेश तिथल्या सरकारने या मिथेनॉल उत्पादकांना दिलेला आहे.

परंतु हे चोरटे आपले डोके वापरून ब्लिचींग साधनांच्या साहाय्याने या मिथेनॉलमधला रंग घालवून त्याला रंगविरहीत करून लोकांना विकतात.

तेथील लोक अल्कोहोलच्या नावाखाली हे मिथेनॉल स्वतःच पितात असं नाही, तर आपल्या लहान मुलांनाही पाजतात.

एका इराणी वाहिनीवर आणि नेटवर देखील तेथील एक पाच वर्षाचा मुलगा त्याच्या आईबाबांनी त्याला मिथेनॉल पाजल्याने अंध झाल्याचा आणि त्याच्या श्वासमार्गाला इजा झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

त्यामुळे सोशल मिडियाचे जितके फायदे आहेत तितकेच त्याचे तोटे देखील आहेत हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे आणि ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.

व्हाट्सअप सारख्या माध्यमातून अनेकदा चुकीचे, खोटे, वाईट मेसेज देखील अशा खुबीने पसरवले जातात की सर्वसामान्य भोळ्या जनतेला ते खरे वाटतात.

आणि ते लगेच त्यातील कृती आजमावून बघतात. त्याचाच घातक परिणाम आपल्याला इराणच्या या घटनेवरून दिसून आलेला आहे.

 

iran death inmarathi

 

त्यामुळे सोशल मिडीयावर प्रसारीत होणारी प्रत्येक माहिती किंवा बातमी खरी मानून चालायचे नसते. आधी त्याची तज्ज्ञ लोकांकडून शहानिशा करून घ्यावी. नंतरच पावलं उचलावीत. ही बाब कटाक्षाने पाळायला हवी.

सोशल मिडियावरून अशा अफवा केवळ औषध किंवा उपचाराच्या संदर्भातच येतात आणि आत्ता कोरोना काळातच येतात असं नाही, तर आपण गेली काही वर्षे याचा अनुभव अनेकदा घेत आलोय.

या माध्यमांचा गैरफायदा घेऊन लोक आपले स्वार्थी राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, आर्थिक हेतू साध्य करून घेऊ पाहात असतात. अनेकदा केवळ गंमत म्हणूनही असे मेसेज व्हायरल होतात.

परंतु त्याचे परीणाम अतिशय गंभीर होऊ शकतात. म्हणून सोशल मिडीयावर आला मेसेज की कर त्याची अंमलबजावणी असे कृपा करून यापुढे करू नका.

 

social media platforms inmarathi

 

कधी कधी त्यात काही थेट नुकसान दिसत नसले, तरी लोकांच्या भावनांवर नियंत्रण मिळवायचे, त्यांना आपल्या सांगण्यावरून कठपुतलीसारखं नाचायला लावायचे असे सुप्त, छुपे हेतूही असतात.

आपला वेळ अशा मुर्ख कृती करण्यात घालवण्यापेक्षा काही चांगल्या कार्यात जाईल याची काळजी घ्यायला हवी. आज इराण मध्ये जे घडले ते आणि तसे आपल्याकडे घडू नये यासाठी आपण सावध असणं फार गरजेचं आहे.

===

हे ही वाचा – चहा आणि बन मस्का – आजही जीभेवर रेंगाळणारी चव देणाऱ्या इराणी कॅफेचा इतिहास…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?