' आम्ही दीप प्रज्वलन करूच...पण मोदींनी या संकटाशी सामना करण्याचं एक "व्हिजन" समोर ठेवायला हवं होतं...

आम्ही दीप प्रज्वलन करूच…पण मोदींनी या संकटाशी सामना करण्याचं एक “व्हिजन” समोर ठेवायला हवं होतं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : चिन्मय भावे

===

परवा उत्सुकतेने माननीय पंतप्रधान काय म्हणतात हे ऐकायला टीव्ही लावला आणि त्यांनी दीप प्रज्वलन करण्याचं आवाहन केलेलं पाहिलं. एकत्र मिळून काहीतरी सकारात्मक करू या कल्पनेचा आदर करून मी नक्की यात सहभागी होईन. पण हे एवढंच सांगून त्यांनी हा संदेश संपवला यामुळे खचितच थोडी निराशा झाली.

आज भारतात हा एकमेव नेता आहे ज्याच्या शब्दाला मान देऊन लोक समर्पण भावनेने स्वतःला झोकून देतात. मोदीजींची ही क्षमता कोरोनाविरुद्धच्या लढाईत लोकांना अधिक खंबीरपणे स्वयंशिस्तीने वागण्यासाठी उपयोगी पडली तर जास्त बरं होईल असं वाटतं.

सगळ्या गोष्टी सखोल तपशील देऊन भाषणात सांगितल्या जाऊ शकत नाहीत हे मान्य केलं तरीही या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने एक व्हिजन तरी लोकांसमोर मांडली पाहिजे.

narendra modi corona inmarathi

आपल्या समोर हे दुहेरी आव्हान आहे. संसर्ग थांबवायला जितका कडक लॉकडाऊन होईल तितकं अर्थव्यवस्था, नोकऱ्या, उद्योग यांचं नुकसान होणार आहे. ते होऊ नये म्हणून जर सगळं काही खुलं पूर्ववत केलं तर संसर्ग देशभर पसरून आरोग्य व्यवस्थेला ही परिस्थिती सांभाळणे अशक्य होईल इतक्या टोकाला जाऊ शकते त्यामुळे ही वाढ आटोक्यात ठेवणं आणि संसर्गाची गती कमी करून तयारीसाठी अधिकाधिक वेळ मिळवणं हेच आपल्या हातात आहे. हे करणं सरळ सोपं काम नाही.

ही अभूतपूर्व परिस्थिती आहे.

अशा वेळेला देशाला मार्गदर्शनाची गरज आहे. विविध गोष्टी सुरु आहेत. त्याबद्दल पंतप्रधान ट्विट वगैरे करतातच पण यातील काही महत्त्वाच्या गोष्टी जनतेशी थेट संवादातून मांडणं गरजेचं आहे.

१) वैद्यकीय सेवकांना मिळणाऱ्या संरक्षक उपकरणांची स्थिती काय, कमतरता किती आहे, किती वाढेल याचे अंदाज हवेत. सरकारला उत्पादनात कशी मदत करता येईल हे समजलं तर लोक योगदान देऊ शकतील. आत्ता कारखाने बंद आहेत त्यामुळे जसं सरकारने घरी मास्क कसा बनवावा हे सांगितलं तसेच छोटे उद्योजक वैद्यकीय संरक्षण साधने कशी बनवू शकतील याची काही डिझाईन आणि उत्पादन संहिता लोकांना देणं गरजेचे आहे.

२) व्हेंटिलेटर वगैरेंचे अनेक प्रोटोटाइप बनवले गेले आहेत. इतक्या कमी वेळात प्रॉडक्ट प्रोटोटाइप बनवणे खरंच कौतुकास्पद आहेच. परंतु त्याची मोठ्या संख्येने निर्मिती करण्यासाठी राष्ट्रीय. नियोजन हवे. २-३ डिझाईन मान्यता मिळवू उत्पादन, वितरणाची सोय कशी असेल याचं नियोजन करावं लागेल.

३) अनेक ठिकाणी लोकांना आवश्यक गोष्टी मिळत नाहीएत. किराणा दुकानांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत आता काही गोष्टींची चणचण दिसू लागली आहे, त्यामुळे ऑनलाईन परवाने किंवा इतर माध्यमातून जर आवश्यक सामान कुठेही अडकत असेल तर मोकळे करावे लागेल.

४) औषध निर्मिती सुरु ठेवायची आहे, त्याचा कच्चा माल अडकू नये, तिथं काम करणारे कामगार घरी अडकून पडू नयेत यासाठी सुद्धा नियोजन करावे लागेल.

५) सरकारने आरोग्य सेतू सारखे एक चांगले app बनवले आहे. त्याचा प्रसार व्हायला हवा.

६) टेस्टिंग कमी आहे या टीकेला/ प्रचाराला उत्तर द्यावे लागेल आणि आता टेस्टिंग वाढवण्याचे कोणते धोरण आहे, ते अंमलात कसे येणार, किती संख्येने टेस्टिंग वाढणार हे लोकांना सांगावं लागेल.

७) छोट्या उद्योजकांचा विचार करा. देशातील उत्पादन, नोकऱ्या हे सगळं सुरळित ठेवण्यासाठी छोटे उद्योजक तरणे महत्त्वाचे आहे. काही लोकांची स्थिती अशी आहे की पुढील २-३ महिने कर्मचाऱ्यांना पगार देता येईल, त्यापलीकडे ते कोलमडून पडतील. त्यांच्यासाठी काहीतरी ठोस धोरण जाहीर करावे लागेल.

८) करोना हे केवळ आरोग्य संकट नाही, फार मोठे आर्थिक संकट आहे. गेल्या घोषणेत गरीबांना गोष्टी सुसह्य व्हाव्यात यासाठी काही पावले उचलली गेली ते स्तुत्य आहेच पण याबद्दल जी टास्क फोर्स घोषित केली गेली ती अंमलात आणणे आवश्यक आहे, भारतासारख्या देशाकडे साधने मर्यादित असतात. त्यामुळे धोरणात्मक पातळीवर काय करून हा झटका सुसह्य करता येईल हे ठरवून ती दिशा द्यावी लागेल. हे धोरण मांडलं नाही तर अनिश्चितता वाढून घबराट उडते. सगळं एकदम सांगितलं जाऊ शकत नाही, ठरवलं जाऊ शकत नाही हे समजू शकतो. पण थोड्या थोड्या डोसने हे द्यावं लागेल.

९) सतत नकारात्मक, मरगळ आणणारे narrative काही लोकांकडून निर्माण केले जात आहे. त्याला उत्तर हे परिणामकारक संवाद धोरणातूनच दिले जाऊ शकते. संवाद साधणे ही मोदींचे बलस्थान होते. आजही लोक प्रतिसाद देतातच. पण पंतप्रधान म्हणून देशाला आपण यातून बाहेर काढायला काय धोरण बनवलं आहे हे लोकांना सांगितलं तर लोक अधिक विश्वासाने आणि जोमाने साथ देतील.

१०) एकही चूक न घडता सगळं काही सुरळीत होईल अशी खात्री सामान्य, सुज्ञ माणूस अशा प्रसंगी सरकारकडून मागत नसतो. किमान महाराष्ट्रात तरी राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन लोक प्रतिसाद देत आहेत. देशभक्ती, जिद्द, नियोजन, सामूहिक शिस्त आणि विज्ञान यांच्या मदतीने आपण या संकटाला पराभूत करूच या निर्धाराने आपण सामोरे जायचं आहे. सरकारच्या नियोजनावर बोट ठेवणारे लोक घरी फ्रिज असून चारचार वेळा भाजा घ्यायला गर्दी करतात, सहकुटुंब सहपरिवार वाणसामान घ्यायला बाहेर पडतात, सुशिक्षित लोक विलगीकरण टाळून हुंदडतात ही आपली मानसिकता आहे. त्यामुळे सरकारला एक पाऊल पुढे राहून लॉकडाऊन लोकांनी अयशस्वी केले तर काय गंभीर परिणाम होतील हे सतत सांगत राहावे लागेल.

११) आपल्याकडे अनेकदा समस्यांचे स्वरूप हे संसाधने आहेत पण कुठं पोहोचवायची हे ठाऊक नाही अशा प्रकारचे असते. यासाठी माहिती तंत्रज्ञान उपयोगी पडणार आहे. डिझाईन उपयोगी पडणार आहे. आरोग्य सेतूने तुम्हाला संसर्ग असलेल्या ठिकाणापासून दूर राहण्याचे मार्गदर्शन मिळते हे. तसेच गरीब मजूर, एकटेदुकटे राहणारे वरिष्ठ नागरिक, रोजंदारी गमावलेले लोक यांना थेट मदत द्यायला विविध app चा उपयोग होऊ शकतो. आपल्याकडे शहरी भागात स्मार्टफोन वापर चांगला विस्तारला आहे आणि हे सगळं घरी बसूनही उत्पादन केलं जाऊ शकतं

१२) ओला वाले, झोमॅटो वाले रोजगार नाही म्हणून रिकामे आहेत आणि लोक भाज्या, औषधे घ्यायला हिंडत आहेत. असं नको. शहरी भागात संसर्गाचा प्रादुर्भाव आहे. तिथं या लोकांना कामही मिळेल आणि झुंड बाहेर उतरणारही नाही असा समन्वय साधता येईल. आमच्या संकुलात फोन केला की भाजीवाला दारात पिशवी आणून ठेवतोय. इथं १२०० फ्लॅट आहेत म्हणून हे सहज शक्य झालं पण वस्तीवस्तीत हेच करायला लागणार आहे आणि पुन्हा त्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागेल. इथं माणूस नाही म्हणून कामे अडकली आहेत आणि कौशल्य असलेला माणूस रोजगार नाही म्हणून उपाशी मरेल आणि तरीही गर्दी रस्त्यावर उतरते आहे असं व्हायला नको. किंवा लोकांना पर्याय दिले तर त्यांच्याकडून कठोर शिस्तीची अपेक्षा बाळगणं सोपं होईल.

आपल्या देशातील आजच्या पिढीने दाराच्या उंबरठ्यावर आलेलं युद्ध अनुभवलं नाहीए. युरोप, अमेरिका अशा ठिकाणी काय परिस्थिती आहे आपण पाहतोय. तिथं साधने किती इथं किती हेही आपल्याला माहिती आहे. उष्णतेने वगैरे फायदा होईल हे एकतर पूर्णतः सिद्ध झालेलं नाही आणि ते आपल्या हातात नाही त्यामुळे अशा गोष्टींवर, ग्रहस्थिती आणि कसल्यातरी काल्पनिक व्हायब्रेशन्स ना काहीतरी करून आपण करोनाला हरवू शकणार नाही. आपल्या समाजाला कर्माची शिस्त लावणाऱ्या गाडगे महाराजांपेक्षा सहज चमत्कारी उपाय करणाऱ्या महात्म्यांचे आकर्षण अधिक.

कर्म कर आणि त्याच्या फळाची आसक्ती धरू नकोस ती माझ्यावर सोड हे सांगणाऱ्या मनोबल भक्कम करणाऱ्या कृष्णापेक्षा पूजा केल्याने फळ मिळेल अशी आकर्षक ऑफर देणाऱ्या विष्णू रूपाची लोकप्रियता आपल्याकडे जास्त आहे…यावर आत्मपरीक्षण करणाऱ्याची वेळ आहे.

श्रद्धेबद्दल आदर आहेच. पण त्या ऊर्जेने कर्म करायला प्रवृत्त होऊया, इतरांनाही प्रवृत्त करूया.

आपल्या देशाकडे मोठी लोकसंख्या आणि भौगोलिक डेप्थ आहे. तिचा वापर करून आपण आपण संसर्ग रोखणे आणि अर्थव्यवस्थेतील निर्मितीक्षमता यांचं संतुलन राखू शकतो असं मला वाटतं.

हर हर महादेव!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?