' "वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट करणे थांबवा!" फराह खानची सेलिब्रिटींना धमकीवजा 'विनंती'

“वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट करणे थांबवा!” फराह खानची सेलिब्रिटींना धमकीवजा ‘विनंती’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

बॉलिवूड म्हंटलं की असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व असलेलं एक गाव! त्यात स्पर्धा एवढी की काय सांगावे. वरवर मैत्री आहे असे भासवणारे कितीतरी सेलेब्स एकमेकांवर खार खाऊन असतात, हे वेगळं सांगायला नको.

तरीही एकमेकांसमोर आल्यावर सहसा कुणीच मनातला आकस दाखवत नाही! एकमेकांच्या गालांची चुंबने घेऊन किती प्रेम आहे हेच दर्शवतात!

परंतु, यावेळेस बॉलिवूडग्रामची एक नामांकित व्यक्ती काही विशिष्ट सेलेब्सवर फार फार वैतागली आहे, का? ते जाणून घेऊया!

 

bollywood celeb inmarathi
businessworld

 

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने सद्यस्थितीत २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला असल्याने प्रत्येकाकडे घरी बसण्याशिवाय कुठलाच पर्याय नाही आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर लाईव्ह येण्याचा, व्हिडिओ टाकण्याचा उत आला आहे. संपूर्ण दशकात नव्हती तेवढी कल्पकता आता दिसून येत आहे. प्रत्येकाला आपण कसे बिझी आहोत हे दाखवायचे आहे.

त्यात बॉलिवूड कसे मागे राहील? कुणी भांडी घासत असल्याचा व्हिडिओ शेअर करत आहे, तर कुणी बायकोची कशी सेवा करतो हे दाखवत आहे.

सरकारने घरी बसा सांगितले असले तरी काही सेलेब्स मात्र घरी बसण्यापेक्षा स्वतःच्या घरी सुसज्ज असलेल्या जिममध्ये ट्रेडमिलवर पळत आहेत, काही फिटनेससाठी व्यायाम करत आहे!

आणि नुसतेच धावत पळत नसून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

 

bollywood celeb lockdown inmarathi
femina.in

 

आणि या सगळ्यांमुळे वैतागली आहे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका, दिग्दर्शिका आणि रिऍलिटी शो परीक्षक – फराह खान!

कुणाचेही नाव न घेता त्या तमाम सेलेब्सवर फराह खानने इन्स्टाग्रामवर ‘एका व्हिडिओद्वारे’ टीका केली आहे!

फराह खान त्या व्हिडीओत म्हणते आहे –

“जसे सगळे जण व्हिडिओ पोस्ट करत आहेत, तर मी पण विचार केला की मी पण एक व्हिडिओ पोस्ट करते.

माझ्या व्हिडिओद्वारे मी हे सांगू इच्छिते की सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या हितासाठी, सगळ्या ‘स्टार्स’ आणि ‘सेलेब्स’ना ही माझी नम्र विनंती आहे कृपया, कृपया, कृपया आपले वर्कआउट व्हिडिओ पोस्ट करू नका!

कृपया आमच्यावर सुरू असलेला हा भडिमार थांबवा!”

या व्हिडिओमध्ये फराह खान सततच्या वर्कआऊट व्हिडिओजमुळे त्रस्त झालेली दिसते आहे. आणि तिने टिपिकल फराह खान शैलीत उपरोध व्यक्त केला आहे. पुढे ती म्हणते –

 

farah khan inmarathi
peepingmoon.com

 

“मला याची कल्पना आहे की तुम्ही सगळी सुखवस्तू, भाग्यवान माणसे आहात आणि या जागतिक महामारीच्या काळात स्वतःची फिगर मेंटेन करण्याव्यतिरिक्त तुम्हाला इतर कोणतीही चिंता सतावत नाही आहे.

पण आमच्यासारखे काही जण, आमच्यापैकी बरेच जण हा ‘करोना व्हायरस प्रादुर्भाव’ कसा रोखता येईल यासाठी खूप चिंतेत आहेत!”

आणि व्हिडीओमधल्या यानंतरच्या वक्तव्यात तर फराह खानने पहिले विनवणी केली आहे आणि नंतर सरळ सरळ धमकी दिलेली आहे, ती म्हणते –

“म्हणून, कृपया आमच्यावर दया करा आणि आपले वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट करणे थांबवा.

आणि, जर आपण थांबवू शकत नसाल तर “मी आपणा सगळ्यांना अनफॉलो केल्यास, कृपया त्याचे वाईट वाटू देऊ नका!”

फराह खानने जरी कोणत्याही विशिष्ट नावांचा उल्लेख केलेला नसला तरी त्या त्या व्यक्तीवर नेम अचूक साधला गेला आहे.

जगातील करोना व्हायरस उद्रेकाच्या या गंभीर काळात बॉलिवूड सेलिब्रिटींनी सामाजिक बांधिलकी विसरून वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल तिची नाराजी, या व्हिडिओ पोस्टद्वारे सहज स्पष्ट होते.

 

katrina kaif inmarathi
new nation

 

या व्हिडिओवर काहीच वेळात असंख्य प्रतिक्रिया आल्यात, काही नेटीजन्स हसले तर काहींनी फराहला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. बॉलिवूडच्या सेलेब्सनेही तिथे कमेंटसाठी वर्णी लावली

अभिनेत्री तब्बूनेही “बेस्ट फराह! #नॉटगिल्टीफॉरनॉटवर्किंगआऊट ” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तर दिग्दर्शक झोया अख्तरने “तू सर्वोत्कृष्ट आहेस!” अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

यांच्यासोबतच, करण जोहर, सोनम कपूर, शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, रोहित शेट्टी, रविना टंडन, श्वेता बच्चन, अर्जुन कपूर, प्रीती झिंटा, मनीष पॉल, सानिया मिर्झा इ. सेलेब्रिटींनी अत्यंत खेळीमेळीच्या कमेंट्स फराह खानच्या व्हिडीओवर केल्या आहेत.

 

tabu zoya reacts inmarathi
instagram

 

एकीकडे, जरी फराह खानने व्हिडिओमध्ये थेट कोणाचा उल्लेख केला नसला,

तरीही हे स्पष्ट आहे की ती आपल्या या सामाजिक बांधिलकी न समजणाऱ्या ‘सहकाऱ्यांच्या’ वर्कआऊट व्हिडिओजच्या भडिमाराने नक्कीच आनंदी नाही आहे.

तर दुसरीकडे कतरिना कैफ, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिज, सारा अली खान, मलायका अरोरा, रकुल प्रीत सिंग आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक नामवंत सेलेब्स,

लॉकडाऊनच्या काळात घरात अडकलेल्या सामान्य माणसांचे धैर्य वाढवण्यासाठी व त्यांचा ताण कमी करण्याच्या हेतूने सोशल मीडियावर त्यांचे वर्कआउट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत.

 

malaika arora khan inmarathi

 

आता कोण बरोबर कोण चूक, हे तर सांगता येणार नाही, परंतु, बिंदास वूमन फराह खान तिला हवं ते बोलून मोकळी झाली!

आणि कितीही रागावली असली तरी व्हिडिओच्या शेवटी आपल्या सहकाऱ्यांना ती हे म्हणायला विसरली नाही…

“सुरक्षित रहा, बाय-बाय, जय हिंद!”

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?