'करोना व्हायरस : "क्वारंटाइन" म्हणजे नेमकं काय रे भाऊ?

करोना व्हायरस : “क्वारंटाइन” म्हणजे नेमकं काय रे भाऊ?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : डॉ. चंद्रशेखर दाभाडकर
राष्ट्रीय उपाध्यक्ष, बाल आरोग्य संघटना

===

कोरोना या विषाणूची साथ आल्यापासून पॅनडेमीक, इंक्युबेशन पिरियड, आयसोलेशन, क्वारंटाइन हे शब्द वारंवार ऐकू येत आहेत. या मेडिकल टर्म्स मुळे सामान्य माणूस गोंधळून गेला आहे.

विशेषतः क्वारंटाइन हा शब्द दहशतीसारखा वाटतो आहे. पण कुठलीही साथ आटोक्यात आणण्याकरीता क्वारंटाइन सारखा उत्तम पर्याय नाही याबद्द्ल दुमत असू नये.

या शब्दामागची भीती, दहशत कमी करणे अत्यंत आवश्यक आहे.

 

corona virus inmarathi 2
business insider

 

“क्वारंटाइन” म्हणजे नेमके काय?

मराठीत या शब्दाकरिता ‘विलगीकरण’ हा शब्द वापरला जातो. विलगीकरण याचा साधा सोपा अर्थ ‘विलग करणे’.

याचाच अर्थ ज्या व्यक्तीपासून कुठलाही संसर्गजन्य आजार समाजात पसरला जाण्याची शक्यता आहे त्यांना विशिष्ट काळापुरते समाजापासून विलग करून ठेवणे , जेणेकरून हा आजार समाजात पसरणार नाही.

आयसोलेशन (isolaton) व क्वारंटाइन (quarantine) हे दोन वेगळे शब्द असले तरी बरेचदा ते एकाच अर्थाने वापरले जातात, हे चुकीचे आहे.  (क्वारंटाइनला विलगीकरण म्हणतात तर आयसोलेशन ला अलगीकरण म्हणता येईल का?)

आयसोलेशन हे ज्यांना आजार झाला आहे , निदान निश्चित झाले आहे त्यांचे करतात व त्यांना रुग्णालयात ऍडमिट करून उपचार चालू केले जातात.

या उलट विलगीकरण म्हणजे ज्यांना हा आजार नाही, ते रुग्ण नाहीत पण रुग्णाच्या संपर्कात ज्या काही निरोगी व्यक्ती येतात, कदाचित त्यांच्यामुळे समाजात हा आजार पसरण्याची शक्यता असते.

 

home inmarathi
the economic times

 

अशा निरोगी व्यक्तींना आजाराचे लक्षण नसतानाही समाजापासून विशिष्ट काळाकरीता विलग करण्यात येते त्याला “क्वारंटाइन” म्हणतात.

क्वारंटाइन हा मूळ इटालियन शब्द असून त्याचा अर्थ ‘चाळीस दिवस’ असा आहे.

क्वारंटाइन – उत्पत्ती व इतिहास:

क्वारंटाइन हा शब्द जरी तेव्हा उपलब्ध नव्हता तरी अत्यंत प्राचीन काळी आजार पसरू नये म्हणून क्वारंटाइन केल्याचे दाखले वैद्यकीय इतिहासात आहेत.

इ. स. ७०० साली काही चर्चेसने असे विलगीकरण केल्याचा इतिहास आहे. त्या दरम्यानच कुष्ठरोग्यांकरिता असे विलगीकरण केल्याची नोंद आढळते.

अर्वाचीन काळात इ.स.१३०० मध्ये “ब्लॅक डेथ” नावाच्या आजाराकरिता (ज्याने युरोप व आशिया खंडात ३० % लोकसंख्या दगावली होती असे म्हणतात) हे विलगिकरण केले होते.

 

black death inmarathi

 

तर गेल्या एक दोन दशकात यलो फेवर करीता (फिलडेल्फिया) प्लेग या आजाराकरिता ( होनोलुलु , सॅनफ्रान्सिस्को ) या पद्धतीचा वापर झाला.

आत्ताच्या या कोरोना व्हायरस च्या साथीत आधी चीनने व नंतर इटलीने या पद्धतीचा अत्यंत काटेकोरपणे अवलंब केला व आता भारताबरोबरच अनेक देशात या आजाराचा फैलाव थांबविण्याकरिता आपण क्वारंटाइन (विलगीकरण) करीत आहोत.

क्वारंटाइन किती काळाकरिता आवश्यक आहे?

कुठल्याही आजाराच्या जंतूंचा शरीरात शिरकाव झाला की लगेच त्या आजाराची लक्षणे दिसत नाहीत तर ही लक्षणे दिसण्या करीता काही काळाचा कालावधी जावा लागतो .

या कालावधीला इंक्युबेशन पिरियड म्हणतात. या कोविड-१९ आजारात ही लक्षणे जंतूंचा शिरकाव झाल्या पासून सरासरी २ ते १४ दिवसापर्यंत दिसून येतात.

 

corona

 

त्यामुळे कोविड-१९ या आजाराकरिता १४ दिवस विलगीकरण करतात.

प्रत्येक संसर्गजन्य आजारात हा इंक्युबेशन पिरियड वेगवेगळा असतो व त्यामुळे विलगिकरणाचा कालावधी पण वेगवेगळा असतो.

आपण भारताचे नागरिक या बाबतीत गंभीर आहोत का ?

अत्यंत दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर “नाही” असे आहे.

शासकीय सेवेतले आणि खासगी व्यवसायातले अनेक डॉक्टर्स,नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी, पोलीस,सर्व सरकारी यंत्रणा, शासनकर्ते स्वतःचा जीव धोक्यात घालून युध्दपातळीवर या आजारांचा सामना करताहेत.

पण दुर्दैवाने आम्हाला ना या प्रश्नांची गंभीरता कळली ना महत्व.

आज अमेरिका,ब्रिटन, फ्रांस, इटली यासारखे वैद्यकीय क्षेत्रात अग्रगण्य असलेले विकसित देशही हतबल झाले आहेत. आपल्या देशात तर वैद्यकीय उपकरणांची तीव्र वानवा आहे.

जर आजाराचा उद्रेक झाला आणि केवळ ३% लोकांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागले तर आपल्याला पावणेतीन कोटी व्हेंटिलेटर्स लागतील. आहेत का आपल्या देशात एव्हढे व्हेंटिलेटर्स?

 

corona inmarathi
says.com

 

आत्ताच एका वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता असलेल्या डॉ. कानन येळेकर यांचा एक मेसेज आला. मेसेज कसला,अत्यंत उद्दिग्न मनस्थितीत त्यांनी भारतीयांच्या मानसिकतेचं या आजाराच्या संदर्भात केलेलं ते लिखाण आहे.

शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत असताना, झुंज देत असताना एक विद्वान महाशय म्हणतात, “ही लोकशाही आहे, सरकारला आम्हाला घरी बसवण्याचा काय अधिकार?” त्यांचं पत्र वाचताना मन विषण्ण झालं.

आजही या विलगिकरण केंद्रातून लोक पळून जाताहेत आणि हजारो, लाखो लोकांना कोरोनाचा प्रसाद वाटताहेत. शासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची ही वेळ आहे.

राज्यकर्ते टाहो फोडून सांगताहेत ते त्यांच्या स्वार्थकरिता नाही तर या क्षेत्रातील शास्त्रज्ञानी दिलेले नियम आपल्याला समजावून सांगत आहेत. लाखो लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे, हे मान्य आहे पण आता करोडो लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे.

जेव्हा हे करोडो लोक ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे किडामुंगी सारखे मरायला लागतील तेव्हा फार वेळ झाला असेल.
नागरिकांनो, आत्ताच जागे व्हा. 

या आजाराच्या रुग्णाच्या संपर्कात तुम्ही आलात तर त्वरित शासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती द्या आणि विलगीकरण केंद्रात दाखल व्हा.

 

corona virus 10 inmarathi

 

 

काही व्यक्ती विलगिकरण केंद्रातून पळून आल्या असतील तर त्यांना परत तेथे पाठवा. घरात बसून रहा, वृद्धांची काळजी घ्या. सुट्टी दिली आहे, प्रवास स्वस्त झालाय म्हणून पिकनिकला जाऊ नका.

पचापचा थुंकायची आणि सर्वांसमोर शिंका द्यावची खोकलायची सवय मोडून टाका, शासनाचे (व पर्यायाने शास्त्रज्ञाचे) नियम काटेकोरपणे पाळा.

इटली सारख्या टीचभर देशाची लोकसंख्या किती कमी आहे आणि साधनांची समृद्धी किती? पण कुणाला जगवायचं आणि कुणाला मरू द्यायचं हे निर्णय तिथल्या शासनकर्त्याला घ्यावे लागत आहे.

आपला पुढचा टप्पा हाच आहे. तेव्हा आजच सावध व्हा!

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?