'आता तरी पुढे हा चि उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ॥ - जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ६

आता तरी पुढे हा चि उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ॥ – जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ६

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ५

===

आता तरी पुढे हा चि उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ॥
सकळाच्या पाया माझे दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥
हित ते करावे देवाचे चिंतन । करूनिया मन एकविध ।।
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥

देहूचे विठ्ठल मंदिर तुकोबांचे कीर्तन असल्याने नेहमीप्रमाणे ओसंडून वाहात होते आणि तुकोबांच्या तोंडून कळकळीचे असे शब्द निघत होते. ते सांगत होते,

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

 

मागे मी म्हटले होतेच आणि आज पुन्हा म्हणतो की

ज्याचे तो चि जाणे । मी मापाडें तुका ह्मणे ।

असे असले तरी मला राहावत नाही म्हणून सर्वांच्या पायी आधी दंडवत घालतो आणि सांगतो की आपल्या हिताचे काय ते जाणून घ्या आणि तसे वागा. देव म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितले आहे. आपल्या जीवाला देव म्हणतात, तो जसा शुद्ध तसे तुमचे चित्त शुद्ध होईल असे पाहा. त्यासाठी मन एकाग्र करावे लागेल. मन एकाग्र करण्यासाठी शुद्ध त्या देवाचे सतत चिंतन करावे लागेल. ते करा. आयुष्यात आपल्या लाभाचे काय याचा विचार करा आणि आपल्या मनाचा जो व्यापार चालत असतो तो मी सांगतो आहे तसा करा. अजून मी तुम्हाला काय सांगू, अजून काय शिकवू? आयुष्याचा नाश करू नका हेच माझे सांगणे, हाच उपदेश. चित्त शुद्ध करीत न्या, तोच व्यापार लाभाचा हे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे, ते यापुढे तरी ऐका.

देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ।।
ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥
देवाची जतन। तया बाधूं न शके अग्न ॥
तुका ह्मणे हरी । प्रल्हादासि यत्न करी ॥

मंडळी, आता मी जे सांगितले ते लक्षात ठेवा बरं. देवाचे चिंतन अखंड चालू ठेवा. देवाचे चिंतन करणे म्हणजे चित्त शुद्ध करीत नेणे. शुद्ध तोचि देव असे म्हणा हवे तर. तो देव जर सखा झाला तर काय होईल ते प्रल्हादाची गोष्ट सांगते. त्याच्यावर केवढा प्रसंग आला! पण त्याने मनात देवासारखे शुद्धत्व राखून देवाला सखाच केले होते. असा जो मनुष्य असतो त्यावर अवघे जग कृपा करते. प्रल्हादाला तसा अनुभव आला. असा की, अग्नीची बाधाही त्याला होऊ शकली नाही. अहो, अवघे जग ज्याच्या मागे त्याला कशाची भीती? त्याची काळजी करणारा हरी म्हणजेच जनता जनार्दन हे विसरू नका. प्रल्हाद संकटांतून जसा पार झाला तसे तुम्हीही व्हाल. हे सारे माहीत असून अनेक जण कासावीस होत असतात! ते का बरोबर आहे? हा तुका तुम्हाला सांगतो आहे की तुम्हीही त्यासाठी प्रयत्न करा. देवाचे, हरिचे चिंतन अविरत करून चित्त शुद्ध करणे हा व्यापार सोडू नका!

लोकहो, मी हे जे सांगतो आहे त्याला हसणारे आहेत, त्याला चूक म्हणणारे आहेत. असू देत. आपण तसे असू नका. अहो,

आंधळ्यासी जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळें दृष्टी नाहीं ॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥
तुका ह्मणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥

दुसऱ्याला डोळे अाहेत हे आंधळ्याला कसे कळावे? त्याच्यासाठी सारे जन दृष्टिहीनच ना? तसे आपले होते. प्रल्हादाची गोष्ट कुणाला माहीत नाही? पण हवा तो बोध होत नाही. असे का? आपल्याला डोळे आहेत पण दृष्टी नाही हे त्याचे कारण.

रोगी माणसाला मिष्टान्न नकोसे वाटते कारण त्याच्या तोंडाची चवच गेलेली असते. मी सांगतो त्या विषयाचे असेच होते. ज्याचा मनोव्यापार शुद्ध नाही त्याला मी सांगतो हा विचार पटेल कसा? देहाचा रोग मिष्टान्न नाकारतो आणि मनाचा रोग योग्य विचार नाकारतो! अशुद्ध मनाच्या व्यक्तीला आपल्यासारखेच जग खोटे वाटते त्याला काय करणार?

लोकहो, अशा लोकांपासून तुम्ही सावध असा. कारण,

देव होईजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया ।।
दोहीकडे दोन्ही वाहतील वाटा । करितील सांठा आपुलाला ।।
दाखविले परी नाही वर्जिजेता । आला तो तो चित्ता भाग भरा ।।
तुका म्हणे अंगी आवडीचे बळ । उपदेश मूळ बीजमात्र ।।

देवाबरोबर राहा, देवासारखे व्हा हे मी सारखे सांगत आहे. ज्या जगात आपण वावरतो त्याचा मोह धराल तर त्या जगासारखे पतित व्हाल. ज्याचे चित्त मलीन तो पतित. तसे होऊ नका. एक मार्ग आहे, शुद्धत्वाकडे जाणारा. दुसरा मार्ग आहे, मलीन करणारा. हे दोन्ही मार्ग आपापल्या परीने वाटचाल चालू ठेवू देणारे आहेत. दोन्ही मार्गांची काही फळे आहेत आणि जो मार्ग आपण निवडू त्याप्रमाणे त्या फळांचा साठा करू देणारे आहेत.

यातील योग्य मार्ग कोणता ते मी तुम्हाला सांगितले आहे. आता निर्णय तुम्ही करायचा आहे. शेवटी आपल्या मनात जो विचार भरेल त्यावरच आपण कशाचा साठा करतो आहोत ते ठरणार आहे. शुद्धतेचा आंतरिक मार्ग सोडून बाहेरील जगात रमणाऱ्या माणसाला चांगला मार्ग दाखवला तरी धरलेल्या मार्गाचा त्याग करवत नाही! शेवटी ज्याच्या त्याच्या आवडीचे बळ हेच खरे! शुद्ध व्हा, शुद्ध बना असा आणि इतकाच मूळ उपदेश आहे! बीजासारखा छोटा आहे! हा तुकाराम तुम्हाला तेच पुन्हा पुन्हा सांगत आहे. देवाची संगत करून देवासारखे व्हा, जगाच्या पंगती बसून अधःपतित होऊन नका हेच काय ते सांगणे आहे!

मंडळी, वास्तविक ह्या दोन मार्गांत योग्य अयोग्य ठरविणे इतके जड का बरे जावे? पण आपण ह्या जगात जगतो ना! तेथे बुद्धिभेद करणारे खूप असतात! मी जे सांगत आलो त्याला हसणारे, चूक म्हणणारे, टिंगल करणारे असे तुम्हाला भेटतात. भेटू देत. मात्र, अशा वेळी तुम्ही सावध असले पाहिजे आणि मनाशी म्हटले पाहिजे :

भुंकती तीं द्यावी भुंकों । आपण त्यांचे नये शिकों ।।
भाविकांनी दुर्जनांचें । मानूं नये कांही साचें ॥
होईल तैसें बळ । फजित करावे ते खळ ॥
तुका म्हणे त्यांचें । पाप नाही ताडणाचें ॥

दुसऱ्यांना चांगल्या मार्गाला लागू न देणारे लोक केवळ दुष्ट होत. दुर्जन होत. अशांचे ते बोलणे कसले? ते भुंकणेच. त्यांना भुंकू द्यावे! आपण त्यांचे खरे मानू नये आणि त्यांच्याकडून काहीही शिकू नये.

इतकेच काय, मी म्हणतो, अशा दुष्टांची आपल्याला जमेल तशी फजिती करावी! अहो, अशांना तुम्ही आपले बळ पाहून, आपल्याला झेपेल ते शासनच केले पाहिजे!

अशांना चोपल्याने आपल्याला काही दोष लागत नाही, पाप लागत नाही हे हा तुका तुम्हाला जाहीर सांगतो आहे!

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

2 thoughts on “आता तरी पुढे हा चि उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ॥ – जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?