' विचित्र वाटेल, पण घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलांना हे मंदिर देतं आश्रय....!!

विचित्र वाटेल, पण घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलांना हे मंदिर देतं आश्रय….!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. ‘प्रेम म्हटलं की ह्या ओळी आठवल्यावाचून राहत नाहीत. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला निराळी भासते मात्र सर्वांना हवीहवीशी असते.

काहीजण आपल्या कलेतून, लिखाणातून प्रेमासंबंधी व्यक्त होतात तर काही जणं दुसऱ्या एखाद्या मार्गाने. मात्र प्रेम हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रेम हे अनेक रूपांत आपल्याला पाहायला मिळतं.

रोजच्या जीवनातील लहान सहान गोष्टींमधूनही प्रेमाची जाणीव होत असते. प्रेमात खूप ताकद असते. प्रेमाच्या जोरावर काय तर म्हणे जग जिंकता येतं.

 

amir khan inmarathi

 

अर्थात जग जिंकणं म्हणजे काही खरोखर युद्ध करणं नव्हे पण अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवणं. आणि म्हणूनच प्रेमाच्या अस्तित्वाला फार महत्व दिलं गेलं आहे.

प्रेम सेम असतं असं म्हटलं तरी प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. काहींचं आयुष्य बरंच सुरळीत पार पडतं मात्र काहींच्या आयुष्यात प्रेमामुळे चटके सहन करायची वेळ येते.

बऱ्याच विरोधाला सामोरं जावं लागतं. पण शेवटी प्रेमाचा विजय होतो. काहींच्या घरून स्वीकार केला जातो तर काहींना विरोधाला सामोरं जावं लागतं. काही जणं वेगळं होण्याचा निर्णय घेतात.

(इथे घरच्यांप्रती प्रेम जिंकतं) तर काही जणं आपल्या प्रिय व्यक्ती बरोबर पळून जाणं पसंत करतात.

 

sairat-InMarathi

हे ही वाचा – केवळ प्रेम, हँडसम लुक्स यापेक्षा या ९ गोष्टींच्या शोधात असतात मुली!

आपल्याबरोबर आपल्या प्रेमाची, लाडाची व्यक्ती असेल तरी पुढचा मार्ग हा पळून गेल्यामुळे खडतर असतोच. अनेक प्रकारच्या धोक्यांचं, संकटांचं सावट त्यांच्या भोवती घिरट्या घालत असतं.

मात्र जसं आपल्या मार्गावर ऊन आपल्याला चटके देतं आणि त्याच वेळी झाडं आपल्याला सावली देत त्या चटक्यांपासून वाचवतात ;अगदी तसंच आपल्या सभोवतालीसुद्धा आपल्याला सुरक्षित वाटेल अशी सोय होत असते.

प्रश्न पडतोय ? काळजी नसावी. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराविषयी सांगणार आहोत जिथे पळून आलेल्या प्रेमी युगुलांना आसरा मिळतो.

हिमाचल प्रदेश हा जेवढा त्याच्या निसर्गसौंदर्यासाठी ओळखला जातो तितकाच तो तेथील रूढी परंपरांसाठी! कुल्लू मधील एका गावातील शंगचूल देवाच्या मंदिरात पळून आलेल्या प्रेमी युगुलांना आसरा दिला जातो.

 

shangchul temple inmarathi 1

 

पांडवकालीन शांघड गावात अनेक वास्तू होत्या आणि त्यातलंच एक म्हणजे हे मंदिर. डलहौसी मधील खज्जियार सारखं इथे ग्रीन फिल्ड आहे. शंगचूल महादेव मंदिराच्या सीमेत कोणत्याही जातीचं प्रेमी युगुल आलं तरी त्यांना अभय मिळतं.

व जोपर्यंत ते ह्या सीमेमध्ये आहेत तोपर्यंत त्यांचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाहीत. इतकंच काय तर त्या जोडप्याचे आप्तस्वकीयसुद्धा त्यांना काही बोलू शकत नाहीत व त्यांच्या केसालाही धक्का पोहचवू शकत नाहीत.

ह्या मंदिराचं सीमाक्षेत्र तब्बल १०० बिघा इतका मैदानी प्रदेश आहे. ह्या सीमारेषेच्या आलेलं जोडपं देवाला शरण गेलं असं मानलं जातं. हे मंदिर एकदा जळलं होतं व नंतर ते पुन्हा बांधण्यात आलं.

आपल्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेचं पालन करणाऱ्या ह्या गावात पोलिसांना यायलाही मज्जाव आहे. तसेच इथे मद्य, सिगारेट, तसेच चामड्याच्या वस्तू आणण्यालाही बंदी आहे.

 

shangchul temple inmarathi 2

 

एकमेकांशी मोठ्याने ओरडून भांडण्यालाही इथे परवानगी नाही. जे काही असेल ते हळू आवाजात बोलण्यास प्राधान्य आहे आणि इथे देवाचाच निर्णय अंतिम मानला जातो.

जोडप्यांच्या आयुष्यातील संकटांचं निवारण होत नाही, त्यांची त्यातून सुटका होत नाही तोवर त्यांची काळजी घेत त्यांची खातीरदारी केली जाते.

गावात असं म्हटलं जातं की, अज्ञातवासात असताना पांडवांनी इथे आसरा घेतला होता. कौरव पांडवांना शोधत इथवर येऊन पोहोचले मात्र ”माझ्या अखत्यारीत असलेल्यांचं, मला शरण गेलेल्यांचं तुम्ही काही वाकडं करू शकत नाही.

‘तुम्ही निघून जा’असं शांगचूल महादेवाने निक्षून संगितलं. त्याच्या भीतीने कौरव माघारी फिरले.

अगदी तेव्हापासून आजपर्यंत समाजाने, नातेवाईकांनी नाकारलेल्या, दूर केलेल्या प्रत्येकाला ह्या ठिकाणी आसरा दिला जातो व त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते.

 

shangchul temple inmarathi 3

 

आजकाल समाजात आपण अनेक घटना बघत आलो आहोत, जिथे जातीयवादामुळे जोडप्यांना हिंसाचाराला बळी पडावं लागतं. नुसते अशिक्षितच नाही तर शिक्षितांच्या बाबतीतही अशा गोष्टी घडताना दिसतात.

आणि ह्या राजकारणात नको त्या निरागस जीवांचा मृत्यू होतो. अगदी सैराट सारख्या सामाजिक स्थितीचं दर्शन घडवणाऱ्या चित्रपटांतूनही आपल्याला ही बाब दिसून येते. इशकजादे, रामलीला ह्यातही आपल्याला अशाच प्रकारचा हिंसाचार दिसून आला.

 

ishaqzaade inmarathi

 

हे तिन्ही चित्रपट थोड्याफार फरकाने सारख्याच धाटणीचे होते. काही गोष्टी सिनेमात बघून सोडण्यासारख्या नसतात कारण त्यात काही प्रमाणात सत्य असतंच. समाजात घडणाऱ्या गोष्टींचं ते जणू एक प्रतिबिंबच असतं.

मग अशा ह्या भीषण परिस्थितीत तग धरता येणं नेहेमीच शक्य असतं असं नाही. आणि म्हणूनच अशा लोकांसाठी समाजाने खंबीर साथ देत त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं.

शंगचूल महादेव मंदिर हे जे करतंय ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आपण कदाचित इतकं मोठं कार्य हाती घेऊ शकू असं नाही मात्र आपण एक जबाबदार सुजाण नागरिक म्हणून आपल्या परीने काय करता येईल ह्याचा विचार करायला हवा.

एखाद्याचे प्रश्न सोडवता आले नाहीत तरीही चालेल मात्र आपल्यामुळे कोणाच्याही आयुष्यात प्रश्न निर्माण होऊ देऊ नका. समाजाला घातक असं कोणाचं कृत्य असल्यास त्याला जरूर विरोध करायचा प्रयत्न करा.

जसं आपल्याला सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार असतो तसाच इतरांनी असतो आणि म्हणूनच तो हिरावून घेऊ नका. दोस्तांनो जगा आणि जगू द्या..!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?