' भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘उपेक्षित’ अभिनय सम्राट! – InMarathi

भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘उपेक्षित’ अभिनय सम्राट!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अभिनय सम्राट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अमिताभ, दिलीप कुमार, राजकपूर, नर्गिस, मीनाकुमारी अशी मोठी मोठी नाव उभी राहतात. (ह्यांच्यात देव आनंदचं नाव नाही म्हणून कुणाला राग येईल, पण माझा नाईलाज आहे. देव आनंदचा पडद्यावरचा वावर कितीही जरी मोहक वाटत असला तरीही तो अभिनय नव्हता)

या आणि ह्यांच्या सारख्या अभिनयाचे महामेरू म्हणून गाजलेल्या लोकांचे अभिनय जबरदस्तच! पण बऱ्याचदा तुलनेने कमी नावाजलेले किंवा वर्षानुवर्ष दुय्यम भूमिका करणारे नट अनेकदा छोट्या छोट्या प्रसंगातून तरल हळुवार अभिनयाचे असे प्रसंग दाखवून जातात की अख्ख्या चित्रपटात फक्त तेच लक्षात राहतात. विशेषतः जर नायक विश्वजीत, प्रदीप कुंभार (चुकून कुमार ऐवजी कुंभार नाही लिहिलेलं, तो होताच मडक्यासारखा, म्हणूनच माझी आई त्याचा असा उल्लेख आवर्जून करायची.) मनोज कुंभार, राजेंद्र कुंभार किंवा तत्सम कुणी असेल तर असं नक्कीच व्हायचं.

 

pradeep-kumar-marathipizza

स्रोत

माझ्या वडलांना, देशपांड्यांना चित्रपट पाहायचा फार षौक.

(आमचं मूळचं आडनाव देशपांडे, पण त्यांनी मी दुसरीत असताना ते बदलून कोरडे केलं. त्यांना म्हणे बाबासाहेब पुरंदऱ्यांनी सांगितलं की आमचे पूर्वज रघुनाथ पंत कोरडे हे शिवाजी महाराजांच्या पदरी वकील होते आणि आग्र्याहून महाराज निसटताना हे मागे राहिले होते ते नेमके सापडले. त्यांचा औरंगजेबाने खूप छळ केला पण त्यांनी महाराज कोणत्या वाटेने महाराष्ट्रात परतणार ह्याचा थांग पत्ता काही मोगलांना लागू दिला नाही.

पुढे ते (म्हणजे आमचे पूर्वज कोरडे) सुटले तेव्हा त्यांच्या ह्या स्वामीभक्ती साठी शिवाजी महाराजांनी म्हणे त्यांना नाशिक जवळचे वतन (देशपांडे वतन) दिले. त्यामुळे म्हणे आम्ही मूळ कोरडे होतो त्याचे देशपांडे झालो. त्यामुळे भारावून जाऊन वडलांनी स्वतःचे आडनाव परत कोरडे केले. (आता खरेतर ह्या लॉजिक नुसार शिवाजी महाराजांनी दिलेले वतन, जे आता नाही राहिले, त्याचे निशाणी म्हणून देशपांडे हे नाव अभिमानाने मिरवायला हवे होते…असो! )

मला हे भिकारडे कोरडे आडनाव अजिबात आवडले नव्हते, आजही आवडत नाही. पण मी तेव्हा लहान होतो आणि माझं मत कुणी विचारलं नाही. माझ्या आईचाही नाव बदलण्याला विरोध होता. पण तो म्हणजे असली कामं नीट पूर्ण होत नाहीत काहीतरी कुठे तरी राहते अन मग ऐन वेळेला त्यामुळे महत्वाची कामं अडतात असा technical कारणासाठी होता.

जो आजही खरा आहे-म्हणूनच आवडत नसूनही मीमाझं आडनाव परत देशपांडे केलं नाही. पण पुढे मी बाबांना ओ, देशपांडे! अशीच हाक मारत असे. अजूनही त्यांचा उल्लेख मी देशपांडे असाच करतो. – आपला एक छोटासा सूड म्हणा हवा तर याला…पण ते एक असो!)

तर पुन्हा मूळ मुद्द्याकडे वळू – देशपांड्यांना चित्रपट पाहायचा फार षौक. विशेषतः जुन्या काळ्या पांढऱ्या जमान्यातले सिनेमे, त्यातली गाणी त्यांना फार आवडत. त्यांच्यामुळे मलासुद्धा जुन्या चित्रपटांची, गाण्यांची आवड निर्माण झाली आणि त्यातली बऱ्यापैकी माहितीही झाली.

आम्ही घरी VCR घेण्यापूर्वी जुने सिनेमे पाहण्याची सोय म्हणजे दूरदर्शन. कारण नेमके आपल्याला हवे असलेले जुने चित्रपट थेटरात कसे लागलेले असणार? मला आठवतं त्याप्रमाणे दूरदर्शन तेव्हा निरनिराळ्या कारणाने जुने चित्रपट दाखवत असे.

गुरुदत्तच्या मृत्यूला २५ वर्ष झाली तेव्हा गुरुदत्तचे सगळे चित्रपट दाखवले होते किंवा  १९८८ मध्ये राज कपूर गेला तेव्हा दूरदर्शनने सलग अनेक शनिवार राजकपूरचे सगळे चित्रपट रात्री दाखवले होते आणि देशपांड्यांनी मला ते सगळे बघायला लावले होते. (हल्ली हल्ली देवआनंद किंवा राजेश खन्ना गेला तेव्हा असं काही होईल असं वाटलं होतं पण एव्हढे चानेल असून एकानेही एक सुद्धा चित्रपट दाखवला नाही…शी! काही उपयोग नाही यांचा!) हे चित्रपट रात्री ९.३० ला सुरु होत ते चांगले १२.३० – १.०० पर्यंत चालत.

मला झोप यायची म्हणून देशपांडे माझ्याशी गप्पा मारत, निरनिराळ्या अवांतर माहित्या देत, आई वैतागायची, पोराला रात्री जागून सिनेमे पाहायला लावायची सवय लावणे तिला बहुधा पटत नसावे. (आता बायकोला पटत नाही…!)

 

bollywood-hand-painted-posters-martahipizza

स्रोत

सिनेमे बघायची किंवा नाटकं, गाण्याची आवड असणं हे काही त्याकाळी फार चांगलं मानलं जात नसे. पण देशपांड्यांनी (आणि मी सुद्धा) तिच्या नापसंतीकडे साफ दुर्लक्ष केले. त्याकाळात मी आणि देशपांड्यांनी मिळून एक से एक सुंदर चित्रपट पाहिले. राजकपूरचा आग, आवारा, किंवा दिलीपकुमारचा मेला, कोहिनूर, तराना, मधुमती, देव आनंदचा बात एक रात कि, काला पानी, सोलहवा साल, राजेंद्रकुमार-नंदाचा कानून, गुरुदत्तचे सगळे सिनेमे. वगैरे वगैरे!

नंतर VCR आणल्यावर तर मजाच मजा! दर शनिवारच्या रात्री आणि रविवारी दुपारी सिनेमे आणून आम्ही बघायचो. रात्री मी देशपांडे आणि पिंटू (आमचा कुत्रा) मस्त TV समोर ठाण मांडून बसायचो आणि गप्पा मारत मारत सिनेमे बघायचो. सिनेमा संपला की मी लगेच पांघरुणात शिरायचो, नाहीतर VIDEO CASSETTE REWIND करून बाहेर काढून ठेवायची जबाबदारी माझ्यावर यायची.

देशपांडे बाहेर जाऊन बहुधा एक सिगारेट ओढून यायचे आणि मग मला झोपलेला पाहून सगळं आवरून झोपायचे. पिंटू मात्र सदैव आमच्या बरोबर जागा असायचा. थंडीच्या दिवसात पांघरूण अंगावर घेऊन आणि पिंट्याला पांघरुणात घेऊन सिनेमे बघायला एकदम मस्त वाटायचं. जागी असेल तर आई गरम गरम कॉफी करून द्यायची आणि देवानंदचा किंवा शम्मी कपूरचा सिनेमा असला तर ती जागी असायाचीच.

तो काळच फार मस्त होता.

नोव्हेंबर डिसेंबरच्या थंडीत, निरव शांत रात्री, हातात गरम कॉफी आणि मांडीवर पिंटूला घेऊन तलत मेहमूद – देवआनंदच्या तोंडून “जाये तो जाये कहा…” म्हणताना ऐकण्यातली मजा शब्दात सांगण अशक्य आहे.  तो VCR मी अजून जपून ठेवलाय- त्या काळाची, देशपांड्यांची (मी काही हे सोडणार नाही) आठवण म्हणून आणि तो अजून चालूही आहे. फक्त तो मी फारसा वापरत नाही, खराब होईल अशी भीती वाटते आणि आता खराब झाला तर दुरुस्त कोण करणार?

 

मदर इंडिया हा असाच विसिआरवर पाहिलेला सिनेमा. मी तेव्हा साधारण १३-१४ वर्षांचा असेन. काही शब्दांचे अर्थ तसे आपल्याला माहिती असतात पण अचानक काही माणस जणू मूर्तिमंत ते शब्दच होऊन समोर येतात आणि मग पुढे तो शब्द आणि ती माणसं किंवा घटना यांची पक्की गाठ मनात बसते तसं ‘हलकट, नीच’ या शब्दांच्या बाबतीत माझं झालं.

मदर इंडियातला सावकार सुखीलाल (नट कन्हैयालाल) याला पाहिल्यावर हलकट आणि नीच या शिवाय दुसर विशेषणच मला सुचलं नाही. ओल्या दुष्काळात सर्वस्व गमावलेल्या, ३-४ दिवस उपाशी असलेल्या कच्च्याबच्यांच्या भुकेकडे पाहून मदतीसाठी पदर पसरायला आलेल्या राधाला मुठभर हरभरे देऊन, त्या बदल्यात तिच्या अब्रूवर झडप घालायचा तो प्रयत्न करतो. तेव्हा मूर्तिमंत हलकटपणा, नीचपणाच आपल्यासमोर उभा आहे असं वाटतं.

दुष्ट, क्रूर या शब्दात एक घमेंड, ताकदीचा माज वगैरे आहे. म्हणजे गब्बर हा क्रूर आहे किंवा प्राण चा खलनायक दुष्ट असतो – पण नीचपण, हलकटपण हे भेकड, दुर्बल आणि विकृत मानसिकतेतून जन्माला येते असं आपल्याला कन्हैयालालकडे बघून वाटू लागतं. त्याचं व्यक्तिमत्व बिन इस्त्रीच्या कपड्यासारख, अजागळ आणि अनाकर्षक, काया कृश, खुजी पण आवाजात, नजरेत, चेहऱ्यात कमालीचा विखार भरलेलं! नागासारखा भव्य दिव्य नाही तर गोमे सारखा कपटाने कानात जाऊन मेंदू खाणारा. परिस्थितीवश हा कदाचित असा झाला असेल असं चुकून सुद्धा वाटत नाही.

 

kanhaiyalal-villain-marathipizza

स्रोत

कन्हैयालालने विनोदी आणि चरित्र भूमिकाही केल्यात पण त्याच्या लक्षात राहतात त्या खलनायकी भूमिका आणि मला वाटतं हिंदी चित्रपटातला तो आज पर्यंत झालेल्या खलनायकांत सर्वात चांगला( कि वाईट) खलनायक होता.

आता ओम प्रकाशचं घ्या. हा त्याच्या विनोदी भूमिकांबद्दल प्रसिद्ध, पण त्याचं अभिनय सामर्थ्य वादातीत होत. फक्त त्याच्या गाजलेल्या विनोदी अभिनेता ह्या बिरुदावली पुढे ते झाकोळून गेलं. (तसेही आपण अभिनय सामर्थ्याचे राजमुकुट फक्त नायक नायिकांना भाळी चढवण्याची परवानगी देतो त्यामुळे ह्यांचे लखलखते अभिनय अनभिषिक्त राहतात.)

‘दिल अपना और प्रीत पराई’ मधला त्याचा कॅन्सरग्रस्त पेशंट गिरिधारीलाल कोण विसरू शकेल?! मीनाकुमारीसारख्या दिग्गज अभिनेत्रीचा सहज सुंदर अभिनय असताना सुद्धा तो लक्षात राहतो यात सगळ आलं. (आता ह्याच चित्रपटात राजकुमार नावाच्या वल्लीचा अभिनय का काहीतरी आहे म्हणे तो पण माझ्या लक्षात राहिला आहे.

 

कारण ‘मेरा दिल अब तेरा ओ सजना….’ हे त्याच्या स्वप्नामधले गाणं ह्या चित्रपटात आहे. त्यात नाचाच्या नावाखाली राजकुमार गाडीच्या दरवाजाच्या मुठीशी जी काही आचरट झटापट करतो ती पाहून आपण सोडा, ती मोटार सुद्धा शहरली असेल. ह्याच गाण्यात प्रत्येक कडव्याच्या शेवटी मीनाकुमारी ‘तपानीला.’ असं काहीतरी किंचाळते. का कुणास ठाऊक?) ह्याच चित्रपटात ‘ अजीब दास्ता है ये …’ या गाण्यात पोटात मुरडा आल्यासारखा चेहरा घेऊन राजकुमार बसतो. तेही खरंच बघण्यासारख आहे. पण कथेशी मुख्य असे काही संबंध नसलेलं पात्र ते सुद्धा छोटेखानी रंगवताना ओम प्रकाशाने कमाल केली आहे.

‘सगीना’ मध्ये म्हातारा थकलेला ‘गुरु’ त्याने छान रंगवला होता. गोरा मालक त्याला लाथानी तुडवताना/ मारताना बाकीचे कामगार गप्प बसून पाहतात तेव्हा “अरे देखो! सब तमाशा देखो.” म्हणून त्याने फोडलेला टाहो थरकाप उडवून जातो. त्याचा ‘शराबी’ कोण विसरेल? ह्या सिनेमात अमिताभ नंतर लक्षात राहणारे दोन जण म्हणजे मुकरीचा नत्थुलाल, आणि ओमप्रकाश चा मुन्शीजी. ते कशाला, ‘कानून’ मध्ये त्याने साकारलेला लोभी धनीराम,काहीच क्षणांची छोटीशी भूमिका पण तो पडद्यावर काही मिनिटातच भाव खाऊन गेला.

 

omprakash-marathipizza

स्रोत

जसं ओमप्रकाशाचं तसच याकुब ह्या नटाचं. हा तर कदाचित आजच्या पिढीतल्या कुणाला माहितीही नसेल. रूप रंग काहीही धड नसलेल्या ह्या माणसाने जवळपास ३०० चित्रपटातून अविस्मरणीय भूमिका केल्यात. मदर इंडिया सगळ्यांना माहिती असतो पण मेहबूब खानने  औरत ह्या त्याच्याच १९४० मध्ये आलेल्या आणि अत्यंत गाजलेल्या चित्रपटावरून मदर इंडिया ची पुनर्निर्मिती केली होती.

या औरत मधला याकुबने साकारलेला बिरजू पुढे मदर इंडिया मध्ये सुनील दत्तने साकारला होता. ह्या भूमिकेमुळे याकुब त्याकाळी इतका लोकप्रिय झाला होता की पुढे हलचल(१९५१) ह्या सिनेमाच्या सुरुवातीला नावं देताना दिलीप कुमार, नर्गिस अशी मातब्बर नाव झाल्यावर याकुबचे नाव यायच्या आधी “…आणि तुमचा लाडका याकुब!” (…and your favourite Yakub’) असे दिले गेले होते. नव्हे तसे ते दिले जात असे. ह्याचा मला सगळ्यात भावलेला चित्रपट म्हणजे ‘पेइंग गेस्ट’! यात त्याने नूतनच्या मोठ्या बहिणीच्या हलकट नवऱ्याची भूमिका फार छान केली होती. तोच तो, येता जाता ‘हाय गजब’ म्हणणारा, कपटी आणि लंपट प्रकाश.

यात एक प्रसंग आहे. माहेरी आलेल्या बहिणीला नूतन घरात येताना नूतन बघते आणि धावत येऊन मिठी मारते तेव्हा हा याकुब “सिर्फ बेहेनसे गले मिलोगी? बेहनोईसे नही?” हे अशा प्रकारे विचारतो. तेव्हा आपल्याला चीड आल्याशिवाय राहवत नाही. एवढासा लहान प्रसंग पण त्याने संस्मरणीय करून ठेवला आहे. ‘झीनत’ ह्या चित्रपटातील त्याचं ‘रहे नाम अल्ला का’ हे पालुपद इतकं गाजलं की ते त्याच्या कबरी वर खोदलं गेलंय आणि खरोखर आज त्याच नाव नाहीच माहित लोकांना, अल्लाचच नाव राहिलंय.

 

yakub-marathipizza

स्रोत

याच ‘कानून’ चित्रपटात भुरटी चोरी करायला आलेल्या आणि धनीरामच्या खुनाच्या आरोपात हकनाक गोवल्या गेलेल्या चोराची भूमिका करणारा नाना पळशीकर हा नट! आगतिक गरीब म्हाताऱ्या माणसाची भूमिका त्याने फारच जबरदस्त रंगवली आहे. १९६० साली जेव्हा गाणी ही चित्रपटांचा अविभाज्य घटक असतं त्याकाळी, एकही गाणं नसलेला तरीही सुपर हिट झालेल्या बी. आर. चोप्राच्या ह्या ‘कानून’ मधले सगळे जण त्यांच्या अप्रतिम कामांमुळे लक्षात राहतात अगदी मेहमूद सुद्धा. (फक्त राजेंद्रकुमार सोडून.)

कन्हैयालाल, जीवन, आगा, गोप, अन्वर हुसेन (नर्गिसचा भाऊ), जयंत (आपल्या गब्बर सिंग अमजद खान चा बाप- एरवी रांगड्या क्रूर खलनायकाच्या भूमिका करणाऱ्या जयंतचा मधुमती मधला पोरीच्या दु:खाने सैरभैर झालेला बाप चटका लावून गेला.) ललीता पवार, दुर्गा खोटे, हे असेच अभिनयाचे महामेरू होते पण त्यांच तेव्हढ कौतुक झालं नाही.

अशोक कुमार हा खरंतर शामळू पुचाट नायक होता. हुमायून मध्ये युद्ध करताना पाहून आपल्यालाच लाज वाटते. त्याचे आणि देविकारानीचे चित्रपट देविकाराणीच्या आक्रमक सौंदर्यामुळे आणि गाण्यामुळे चालले. ही देविकारानी म्हणजे त्याकाळातील सनसनाटी पात्र होतं.

प्रत्यक्ष नेहरू तिचे फ्यान होते आणि त्यांनी तिला फ्यान लेटर लिहिलं होतं म्हणतात. पण अशोक कुमार चरित्र भूमिकांकडे वळला आणि त्याने कात टाकली. कानून, आशीर्वाद, अनुराग, खट्टा मीठा, अशा चित्रपटातल्या व्यक्तिरेखा त्याला डोळ्यासमोर ठेऊन लिहिल्या जाऊ लागल्या.

 

ashok kumar inmarathi

 

या खट्टा मीठा मध्ये श्रीमंत प्रदीप कुमार त्याला नोकरीवरून काढतो, वजन वापरून घरातून काढतो कारण त्याची मुलगी अशोक कुमारच्या मुलावर प्रेम करत असते. तेव्हा अशोक कुमार त्याला भेटायला जातो आणि आपल्या मुलाच्या व त्याच्या मुलीच्या मध्ये न पडण्याबद्दल समज देताना त्याने हाताची आणि चेहऱ्याची आणि आवाजाची  जी अस्वस्थ हालचाल केली आहे ती पाहून आपला ही थरकाप उडतो.

मधुबाला ही तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध त्यामुळे तिच्या अभिनयाकडे कुणाच फारस लक्ष गेल नाही. नाहीतर मुघल इ आजम मध्ये ती पृथ्वीराज कपूरच्या तोडीस तोड अभिनय करते. तिचे अमर, तराना, हे चित्रपट पाहिले असतील तरी  तिच्या अभिनयासाठी म्हणून परत एकदा बघा.

 

madhubala-marathipizza

स्रोत

अशी गोष्ट सांगतात की एका प्रसिद्ध अभिनेता-निर्मात्याचा एक चित्रपट रिलीज झाला होता. प्रीमियर शोला तुफान गर्दी होती. वर बॉक्समध्ये तो निर्माता आणि इतर मान्यवर बसले होते. त्याने पहिले की त्याच्या शेजारच्या ओळीत २-३ सीट सोडून एक माणूस अगदी डोळे मिटून शांत बसला होता. पिक्चर सुरु झाले तरी तो माणूस शांत डोळे मिटूनच होता. जागा होता की झोपला होता कुणास ठावूक.

या कलावंत निर्मात्याला मोठा अपमान वाटला आणि मध्यंतरात तो त्याच्या जवळ गेला त्याला तिकिटाचे पैसे परत देऊन थेटरातून बाहेर काढायला पण जवळ गेल्यावर त्याच्या लक्षात आलं कि तो माणूस आंधळा होता आणि केवळ त्याचा आवाज ऐकायला तो थेटरात आला होता…!

तो अभिनेता-निर्माता होता मिनर्व्हा मूवीटोनचा सोहराब मोदी, साल होतं १९४१ आणि पिक्चर होता सिकंदर!

यातला पृथ्वीराज कपूर (हा राज कपूर चा बाप, आजच्या पिढीला हे मुद्दाम सांगायला पाहिजे. आता राज कपूर कोण? हे प्लीज विचारू नका…) चा सिकंदर आणि सोहराब मोदी चा पोरस खूप गाजला.

 

soh inmarathi

सोहराब मोदी आज अनेक जणांना आठवत नसेल. पण तो एक ग्रेट अभिनेता होता. अर्थात त्याचं व्यक्तिमत्व त्याच्या अभिनयापेक्षा जास्त भारदस्त होतं. त्याचा एकंदर अवतार आणि आवाज पाहून ऐकून मला सिंहाची आठवण होते. सिंहाला संस्कृत मध्ये केसरी म्हणतात लहानपणी मला  सोहराब मोदीचे खरे नाव केसरी असेल असेच वाटायचे….!

असो! एकूण काय तर अभिनय हा बऱ्याचदा असा उपेक्षितच राहतो, आणि बहुतेक वेळेला महान अभिनेता सुद्धा….

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?