' दत्तक घेण्यासारख्या आदर्श गोष्टींत ही सरकार “असा” त्रास देत असेल तर कसं चालेल? – InMarathi

दत्तक घेण्यासारख्या आदर्श गोष्टींत ही सरकार “असा” त्रास देत असेल तर कसं चालेल?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न! आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचार चक्र सुरु झाले.

आम्ही आमची एकुलती एक मुलगी दत्तकच घेतली आहे आणि त्या सगळ्या सरकारी प्रक्रियेतून जाताना अनेक अनुभव आले, अनेक लोक भेटले त्यांच्या प्रतिक्रिया, अनुभव (बऱ्याचदा अननुभव), न मागता दिलेले सल्ले आणि मत, ह्या क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारी लोकांचा तुच्छ आणि बेदरकार असा attitude, सगळ्याचा यथेच्छ अनुभव घेतला आणि मूल दत्तक घेण हा एक मूर्खपणा आहे असं काही काळ मलाही वाटू लागलं होतं.

(अर्थात वसूच्या पेशंटला काही ही अशी खुदाई खिन्नता नव्हती आली! त्याच्या दत्तक घेतलेल्या मुलामध्ये आणि त्याच्या मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि तो हे मूल जैविकदृष्ट्या आपलं नाही म्हणतो. असं झालय म्हणून मूल दत्तक घेणे मूर्ख पणा असतो का? असे विचारत होता.)

याबाबतीतला आमचा सरकार/ कोर्ट विषयीचा अनुभव दिव्य आहे. एकतर ह्यातला भ्रष्टाचार भयानक आहे. मला आश्चर्य वाटले, पण पुण्यात मुलगा दत्तक हवा असेल तर ३-४ लाख रुपये मोजावे लागतात आणि मूल जर १ वर्षापेक्षा कमी वयाचे असेल तर ही रक्कम वाढते. नाहीतर ३ ते ५ वर्षाची प्रतीक्षा करावी लागते.

मुलीला दत्तक घ्यायचे असेल तर काही पैसे लागत नाहीत. मुलगा असो मुलगी आम्हाला काही फरक पडत नव्हता आणि आम्ही पैसे मोजून काही मूल दत्तक घेणार नव्हतो म्हणून मग अहमदनगरच्या स्नेहालय या प्रसिद्ध अनाथालयाचे गिरीश कुलकर्णी (हीच ती आमीर खानच्या सत्यमेव जयते मध्ये दाखवली गेलेली संस्था-त्यावेळी त्यांच्याकडे एकही लहान मुल नव्हते) यांनी सल्ला दिला की,

तुम्ही एक युनिवर्सल असा अर्ज तयार करून सगळ्या महाराष्ट्रात जिथे तुम्हाला माहिती मिळेल तिथल्या अनाथाश्रमात नेऊन द्या. तिथल्या कोर्टात वारंवार जायची तयारी ठेवा. मी देखील माझ्या ओळखी मध्ये सांगून ठेवतो पण सगळी सरकारी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल त्यात काही पळवाट/ लाच देऊन काम करून हवे असेल तर माझी मदत अपेक्षु नका.

झालं, मग आमची धावपळ सुरु झाली. पहिलं म्हणजे दोघांच्या चारित्र्याचा दाखला तो पोलिसांकडून घ्यायचा त्याकरता पुण्याच्या कामिशनर हाफिसात खेट्या मारल्या. मग तिथून आम्ही जिथ राहत आहोत तिथल्या पोलीस ठाण्यापर्यंत वाऱ्या केल्या. २ महिन्यांनी माझा दाखला आला पण बायकोचा नाही, कारण ती मुळची नगरची!

लग्न होऊन २-३ वर्षच झालेली, मग इथल्या पोलिसांना कसे कळणार की ती कोणी डांबिस गुन्हेगार वगैरे तर नाही ना! मग पुणे ते नगर अन नगर ते पुणे अशा खेट्या झाल्या. अखेरीस तो दाखला मिळाला. मग केस पेपर, आम्ही दोघांनी “मला मुल दत्तक का घ्यायचे आहे” हे सविस्तर सांगणारा वेगवेगळा लिहिलेला निबंध वजा शपथनामा, आमचे वैद्यकीय अहवाल (फक्त ससून च्या डॉक्टरांनी सही केलेलेच, का? हा प्रश्न विचारायची सोय नाही) उत्पन्नाचे दाखले, मालमत्ता, कर्ज, विमा, गुंतवणुकीची कागदपत्र वगैरे सोपस्कार झाले.

बायकोच्या आणि माझ्या ओळखीच्या दोघा मित्रांचे (म्हणजे वेगवेगळ्या हां, नवरा बायकोला ओळखणारा समान मित्र असला की त्याची विश्वासार्हता संपते). आम्ही चांगले लोक असल्याची नोटरी समोर दिलेली ग्वाही ( मग पोलिसांचे character certificate कशाला?..सुरळी करून…जाऊ दे…) माझ्या आणि फक्त माझ्याच एका नातेवाईकाने- मी आणि माझी बायको दोघेही गचकलो तर तो आमच्या दत्तक मुलीला सांभाळेल अशी दिलेली ग्वाही( प्रतिज्ञापत्र )!

आता आम्ही दोघेही गचकलो..! आणि त्याने नाही सांभाळले तर? त्याला काय आत टाकणार का कोर्ट? काय पण मागतात? हे सगळं सगळं पूर्ण केलं. तो चांगला २०० पानी दस्तऐवज तयार करून मुंबई, नाशिक, पुणे, नगर, नांदेड इथल्या अनाथाश्रमात दिला.

कर्मधर्म संयोगाने नांदेडच्या नरसाबाई अनाथालयात  एक ३ महिन्याची मुलगी दाखल झाली होती. त्यांनी फोन केला म्हणून धावत गेलो. बायकोची मावशी तिकडे राहते त्यांनीच सगळी माहिती काढली होती. तिथल्या राठोड नावाच्या समाजसेवकाने  सांगितले की

मुलगी दत्तक मिळेल पण प्रक्रिया पूर्ण करायाला २-३ वर्ष जातात. पण मधल्या काळात फोस्टर केअर(यशोदा-नंदासारख) म्हणून मुलगी तुमच्याकडे देऊ पण काही घोळ झाला तर मुलगी काढून घेऊ (जशी हप्ते नीट भरले नाहीत की गाडी उचलून नेतात तसे.)

शिवाय त्याची अपेक्षा होती की त्याच्या अनाथालयाला आम्ही काही तरी देणगी द्यावी. नसती दिली तर समाज सेवकाचा सर्च रिपोर्ट आणि न हरकतीचा दाखला त्याने अडकवला असता हे सांगणे नकोच (अनाथालय नांदेडच्या एका रिटायर्ड नायब तहसिलदाराच्या मुलीचे होते हेही इथे मुद्दाम सांगायाला हवे).

मी म्हटलं, “देतो, पण चेकने देणार आणि रीतसर पावती घेणार”, तो आढेवेढे घेऊन तयार झाला…हे काय चेकने दिलेले पैसे लंपास करू शकत नाहीत की काय? आमची आपली मनाची एक समजूत झाली अन काय! मग देणगी दिल्यावर त्याने बाकी सगळी शहानिशा करून, घरी पुण्याला भेट वगैरे देऊन त्याचे रिपोर्ट तयार केले आणि मग फोस्टर केअर अग्रीमेंट नांदेडला करून मुलगी आमच्या हाती सुपूर्द केली.

ती तारीख होती ८ मार्च २०११- जागतिक महिला दिन, पण हा मात्र खरोखर एक योगायोग होता. राठोड ने त्याचे काम बरोबर दीड महिन्यात पूर्ण केले.

मग आमच्या कोर्टाच्या वाऱ्या सुरु झाल्या. विशेष गोष्ट म्हणजे कोर्टात ही केस म्हणून उभी राहते. कौटुंबिक न्यायालय वगैरे नाही, आपलं (आपलं कसलं डोम्बलाच..!)  नेहमीचं सत्र न्यायालय. तिथे मी, सासू, सासरे, बायको, तिची मावशी, मावशीचे यजमान दीपक काका आणि ३ महिन्याची ही पोरगी घेऊन आम्ही उभे. न्यायाधीशाला पुरावा म्हणून जिवंत पोर दाखवायला नको?

शेजारी हातकड्या घातलेले गुन्हेगार येजा करतायत, त्यातले कोणी आमच्या शेजारी येऊन बसतात (आपली काय हिम्मत? त्यांना इथे बाई माणसाच्या शेजारी बसू नका म्हणायची!). संडास लघवी करायची सोय तर दिव्यच. वकील म्हटला,

सकाळी ११ वाजता कोर्ट सुरु होते तुम्ही १०.३० ला या. पहिली तुमचीच केस घेऊ १० मिनिटात सोडतो.

म्हटलं,

१०.३० का १०.०० वाजता येतो पण लवकर मोकळं करा.

पण  न्यायाधीश महाराजांना काय सुरसुरी आली काय माहित? आमच्या ऐवजी त्याने त्याच्या मनानेच एक दरोड्याची केस पहिली घेतली. मग दुसरी असं करत तिथे बाहेरच ४.०० वाजले. तिथे आम्ही १० ते ४.०० काहीही न खाता पिता ( म्हणजे चहा आणि बिस्कीट फक्त! आणि मी आणि दीपक काका मध्ये मध्ये खाली जाऊन सिगारेटी ओढून यायचो तेवढंच) उभे. आपण कुठे गेलो आणि आपल्याला पुकारले तर? नकोच ते म्हणून. शेवटी माझा संयम तुटला, वकिलाला म्हणालो,

३ महीन्याच लहान पोर घेऊन हे इथे आम्ही असे ६-६ तास उभे राहतो तुम्हाला काही लाज वाटत नाही ?

वकील शांतपणे म्हणाला,

माझ्यासमोर काय चिडायचं ते चिडा आत जाऊन काही बोलू नका. माझा एक अशील होता. म्हणजे आहे अजून, त्याने अशीच मुलगी दत्तक घेतली आणि त्याची बदली झाली मद्रासला. खेट्या घालाव्या लागतात म्हणून जज समोर किरकिर केली. माझं ऐकलं नाही, आज ७ वर्ष झाली ७ वर्षाच्या मुलीला घेऊन दर ६ महिन्यांनी येतो. त्या मुलीला काय वाटत असेल? पण कोर्टाला त्याच्याशी घेणं देणं नाही. बघा बुवा!

झालं, आपण गार. सगळी हवाच निघून गेली. शेवटी बेलीफाने ४.३० ला आत घेतले. तिथे मागे उभे राहिलो. अशीच काहीतरी दोन भावांच्या भांडणाची केस चालू होती. मी आता आजचा दिवस गेलाच आहे, आता जरा ही मजा ऐकून मनोरंजन तरी होईल. अशी मनाची समजावणी करून केस ऐकायला लागलो. जजचं  काही आमच्याकडे लक्ष नव्हत. पण अचानक मिहीकाने (आमची मुलगी) आईच्या गळ्यातले मंगळसूत्र ओढले.

(माझी बायको मंगळसूत्र घालत नाही पण वकील म्हणाला, “तुमचे पुढारलेले विचार घरी ठेवा पुण्याला आणि नवऱ्याकरता नाही तर जज करता म्हणून मंगळसूत्र घाला”)  म्हणून बायकोने ते सोडवून घेतलं तसं तिने जोरात भोकाड पसरलं. आता जजच काय, अख्ख्या कोर्टाचं लक्ष गेलं आणि जजने आम्हाला पुढे बोलावलं म्हणाले,

अरे यांची केस तर आजची पहिलीच होती ना, मग हे वेळेवर आले नाहीत का? घ्या आता कमाल झाली पण मी काही बोललो नाही कसनुसं हसलो फक्त.

जज  म्हणाला,

हा, घ्या ह्यांचे पेपर्स…काय करता तुम्ही?

मी म्हणालो,

टाटा मोटर्स मध्ये नोकरी करतो सर, पुण्याला.

जजने विचारले,

टाटा मोटर्स ते काय आहे?

(अहाहा ! काय विद्वान, बहुश्रुत माणूस जज बनतो. – हे आम्ही मनात)

सर आम्ही गाड्या बनवतो इंडिका वगैरे

 

त्यांनी विचारलं – बरं बरं. मुलीला सांभाळणार ना नक्की. टाकणार तर नाही ना?

(वा काय प्रश्न आहे!)

नाही सर, नीट सांभाळू.- मी

 

अहो पण नाही सांभाळले तर, आम्ही काय करणार?

आता याच काय उत्तर देणार!  मी कसनुसा चेहरा करून म्हटलं,

नाही नाही , नीट सांभाळू.

जज ने विचारलं – पण टाकली तिला तर, तिने काय करायचं? काही पैसे ठेवले का तिच्या नावाने?

हे असे काही असतं हे आम्हाला काही माहित नव्हतं? म्हटलं,

नाही ठेवले

मग ठेवले पाहिजेत की नाही? किती ठेवाल? – जज म्हणाला ( sorry म्हणाले)

म्हटले माझी साधारण ३-४ लाख ठेवायची तयारी आहे

जज म्हणाले,

ठीक आहे. १८ वर्षांसाठी १ लाखाची  FD करा तिच्या नावाने, पावती जमा करा कोर्टात आणि मग ६ महिन्यांनी कोर्ट ऑर्डर घेऊन जा.( का? ६ महिन्याने का ? मनात… मनात, सगळं मनात!)  आता प्रोविजनल ऑर्डर द्या ह्यांना.

(हुश्श!) आश्चर्य म्हणजे वसुधा म्हणजे जी बाई मिहीकाची आई होणार होती तिच्याकडे मिहीकाच्या काळजीने प्रश्न विचारणाऱ्या जजने ढुंकूनही पाहिले नाही.

आता ही FD फक्त सरकारी बँकेतलीच लागते बरं का! खाजगी किंवा सहकारी बँकेतली चालत नाही. मग पुण्याला आलो आणि SBI मध्ये गेलो FD करायला, तर ते म्हणाले जास्ती जास्त ८ वर्षांची FD होते. त्यांना कोर्टाची ऑर्डर दाखवली पण ते सुद्धा  सरकारी कर्मचारीच, नाही म्हणजे नाहीच बधले. मग महाराष्ट्र बँकेत गेलो. तिथे माझी ओळख होती. तिथले ओळखीचे काका म्हणाले.

FD १८ वर्षाची होणार नाही पण मी त्यावर शिक्का मारून शेरा देतो कि PAYABLE TO THE RECEIPT HOLDER ON OR AFTER HER 18TH BIRTHDAY’ आणि तू एक बाहेरून नोटराइज्ड प्रतिज्ञापत्र करून घे. बँक १८ वर्षाची FD देत नाही म्हणून असा शेरा घेतला आहे, त्यावर मी सही शिक्का देतो.

मग मी तसे करून ती FDघेऊन कोर्टात (नांदेडला) गेलो आणि त्यानंतर परत ६ महिन्यानंतर जाऊन ऑर्डर घेतली. तुम्हाला वाटेल झालं सगळ, गंगेत घोडं न्हालं एकदाचं, पण नाही आता तिचा जन्म दाखला! तो काढायचा आणि बाप म्हणून माझे नाव लावायला गेलो, तर नांदेड महानगर पालिका म्हणते तिचा जन्म दाखला कांचन राठोड ह्या नावाने आधीच बनला आहे.

===

(काय असतं, हे अनाथाश्रमवाले मुलांची काही नावं ठेवून त्यांचे दाखले आधीच काढून ठेवतात. त्यांचा दोष नाही.) मग पुन्हा निरनिराळी कागदपत्र, ना हरकत दाखले, नांदेडच्या तहसीलदाराचे न हरकत प्रमाणपत्र, आता ते आणि कशाकरता  लागतं?असले प्रश्न विचारायचे नाहीत (नायब तहसील दाराने तर आम्ही खरेच मुलगी दत्तक घेतली आहे का ते सुद्धा विचारले नाही.)

हे अन ते असले सगळे सोपस्कार केले. त्याकरता नांदेडला ७-८ दिवस राहिलो. मे महिन्याच्या चांदण्यात फिरलो आणि ते काम केले.

सगळे सोपस्कार  होऊन तो जन्मदाखला हातात घेतला तर त्या जन्ममृत्यु नोंदणी कार्यालयातली बाई म्हणते कशी, घ्या “झालं सगळ तुमचं काम. आता नीट काळजी घ्या मुलीची?” जसं काही ह्या बाईनेच चपलेच्या टाचा झिजवल्या होत्या, सरकारी कार्यालयात खेट्या घालून. एरवी मी चिडलो असतो.

काहीतरी खारट तुरट बोललो असतो. पण मी इतक्या कष्टानंतर मिळालेलं ते मिहिकांचं birth certificate डोळे भरून बघण्यातच गुंगलो होतो.

जाता जाता आणखी एक असच जाणवलं म्हणून, कोर्टात भिंतीवर दिशा लिहितात. तिथे उत्तरच्या ऐवजी डोंगराकडे, पूर्वेच्या ऐवजी रानाकडे, पश्चिमच्या ऐवजी नदीकडे आणि दक्षिणच्या ऐवजी समुद्राकडे असे लिहिल होतं. म्हणजे नांदेडच्या कोर्टात लिहिलं होतं.

बाकीच्या ठिकाणचं माहिती नाही. त्याऐवजी तुरुंगाकडे, फाशीघराकडे, अंदमानकडे, असे काहीतरी लिहायला हवं होतं नाही का ?

मूल दत्तक घेणे हा एक मूर्खपणा खरंतर नाही. पण तयारी नसताना मूल दत्तक घेणे हा ठार मूर्खपणा आहे. म्हणजे समुद्रात पोहायला जाणे हा मूर्खपणा नाही पण पोहायला येत नसताना पोहायला जाणे हा नक्कीच मूर्खपणा आहे.

 

mihika-marathipizza

आमच्या आयुष्यात मिहिका आल्यापासून ती आमची जैविक (कसला भंगार शब्द आहे हा – biological child जरा तरी बरं आहे.) मुलगी नाही हे जणू विसरूनच गेलो आहोत. म्हणजे पहिल्या रात्री, सासुबाईंनी जुन्या साडीची झोळी करून त्यात तिला झोपव म्हणून सांगितले, तसे आम्ही तिला झोळीत घातले तेव्हा तिने रडून हलकल्लोळ केला होता.

शेवटी तिला झोळीतून काढून दोघांच्या मध्ये घेतले तेव्हा ती तिच्या नव्या आईच्या कुशीत शिरून एकदम शांतपणे झोपली, जणू जन्मल्यापासून ती आईच्या कुशीतच झोपत आली आहे. त्यानंतर आजतागायत ती आईच्या कुशीतच झोपत आली आहे. आता ६ वर्षांची झालीये, वेगळा बेड, वेगळी खोली केली, तरी रात्री कधीतरी झोपेत उठून माझ्या किंवा आईच्या कुशीत शिरते, बरं वाटतं!

तिची आई वसू तिच्याशी कधीमधी बोलताना, तुला ९ महिने पोटात वाढवलंय …वगैरे बोलुन जाते, तेव्हा मला जरा तिला जमिनीवर आणावं लागतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?