' एव्हरेस्ट चढणाऱ्या तब्बल ८ गिर्यारोहकांचा या दिवशी असा भयानक मृत्यू झाला होता! – InMarathi

एव्हरेस्ट चढणाऱ्या तब्बल ८ गिर्यारोहकांचा या दिवशी असा भयानक मृत्यू झाला होता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

१० मे !

काही तारखा लक्षात राहण्यासाठी खास प्रयत्न करावे लागत नाहीत. काही आठवणी पुसल्या जात नाहीत. म्हणूनच आज तेवीस वर्षे उलटून देखील १० मे १९९६ मध्ये घडून गेलेली एक घटना साहसाची आवड असणाऱ्या कोणत्याही गिर्यारोहणप्रेमीच्या मनात इथून पुढेही तशीच ताजी असणार आहे.

एका भयंकर दुर्दैवी घटनेचे उमटलेले पडसाद इतक्या वर्षानंतर देखील कायम आहेत.

माउंट एवरेस्ट शिखराच्या माथ्यापाशी पोचणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. या स्वप्नाचा पाठपुरावा करत चार संघ शिखरमाथ्याच्या दिशेने निघाले.

इतिहासाच्या पानावर आपल्या कर्तृत्वाचे पोवाडे गाणारे लेख लिहिले जातील या अपेक्षेने मोहिमेला सुरुवात करणाऱ्या या गिर्यारोहकांच्या गावीही नव्हते की इतिहास नोंद ठेवणार आहे त्यांच्या मृत्यूची, त्यांच्या अपयशाची, त्यांच्या पराभूत झुंजीची!

या मोहिमेत सामील असलेल्या चार संघापैकी एका संघाचे नेतृत्व अॅडव्हेन्चर कन्सल्टंट चा रॉब हॉल याने केले, तर माउंटन मॅडनेसचा स्कॉट फिशर दुसऱ्या संघाचे नेतृत्व करत होता. उरलेल्यांपैकी एक मोहीम इंडो तिबेटन बॉर्डर पोलीसने आयोजित केली होती तर चौथी टीम तैवानीज होती.

 

mount everest inmarathi
Encyclopedia Britannica

या दुर्दैवी घटनेमागच्या कारणांचा शोध घेतला तर अनेक गोष्टींवर प्रकाश पडतो. अनुभवी आणि तज्ञ मंडळी सोबत असतानाही असे का घडले याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत.

जॉन क्राकुअरच्या म्हणण्यानुसार त्या दरम्यान एव्हरेस्टवर गिर्यारोहकांच्या टीम्सची गर्दी झाली होती. तैवान, अमेरिका, न्यूझीलंड, साउथ आफ्रिका आणि अजून काही देशांचे गिर्यारोहक तिथे जमा झाले होते.

एवरेस्ट सर करणे हे स्वप्न होते? की टोकाची महत्वाकांक्षा? भरपूर प्रसिद्धी मिळवण्याचा एक मार्ग म्हणून या मोहिमेकडे बघितले जाऊ लागले होते का? काही असो, पण त्या दिवशी घडलेल्या दुर्दैवी घटनेचे हेही एक कारण सांगितले जाते.

दुसरे कारण म्हणजे टीममध्ये एकवाक्यता नसणे. स्कॉट फिशर आणि रॉब हॉल या दोघांनी एकत्र मोहीम फत्ते करायचे ठरवले होते. प्रत्येक टीम मधील एक शेरपा दोरांच्या सहाय्याने इतरांना शिखरापर्यंत पोहचण्यास मदत करेल असे ठरले होते.

 

mount everest1 inmarathi
Mountain Madness

प्रत्यक्षात लॉपसंग जंगबू याने अँग दोर्जेला अपेक्षित सहकार्य केले नाही. आणि दोरजेने एकट्याने जबाबदारी घेण्यास नकार दिला. ठरलेल्या नियोजनात बदल का केला अशी क्राकुअरने विचारणा केल्यावर त्याने सांगितले की फिशरसाठी पिटमनने शिखरमाथा गाठणे महत्वाचे होते कारण त्यामुळे त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली असती.

दोरांचा योग्य वापर न झाल्याने शिखरमाथ्याकडे पोहोचू पाहणारांच्या चित्राला ट्रॅफिकजामचे स्वरूप आले. ज्यामुळे वर जाण्याची गतीदेखील कमी झाली. याच दरम्यान वादळाला सुरुवात झाली.

वादळ थांबण्याची वाट पाहण्याऐवजी मार्गदर्शकांनी पुढे कूच करत राहण्याचे ठरवले आणि तीच त्यांची महत्वाची चूक ठरली.

जे अगोदर पोहचले होते त्यांनी उतरायला सुरुवात केली होती. वर चढणारांना ओलांडून ते खाली उतरले, आणि उरलेली टीम वादळाच्या दिशेने मार्ग आक्रमत राहिली.

 

mount everest4 inmarathi
The New Daily

स्कॉट फिशर बरोबर काम करून बोक्रीवची मते त्याच्यासारखीच कठोर झाली होती. त्याच्या मते गाईड म्हणजे लहान बाळांची काळजी घेणाऱ्या दाया नव्हे. पर्वतमाथ्यावर पोहचण्याचे स्वप्न बाळगणारांना स्वतःची काळजी घेणे जमले पाहिजे असे त्याचे म्हणणे होते.

त्यामुळे टीमला त्यांच्या नशिबावर सोडून तो एकटाच माथ्यावर पोहचला नि परतला देखील. ‘मुख्य मार्गदर्शक’ असून देखील त्याने योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न केल्याने संघ योग्य निर्णय घेऊ शकला नाही आणि वादळाला तोंड देत पुढे निघाला.

पुरेशा ऑक्सिजन पुरवठ्यासह बोक्रीव बाकीच्या टीमसोबत थांबून त्यांना कॅम्पवर घेऊन आला असता तर वादळाने उग्र रूप धारण करण्यापूर्वी सारे सुरक्षित स्थळी पोहोचले असते.

बोक्रीवने नंतर त्याच्या समर्थनार्थ असे सांगितले की लवकरात लवकर कॅम्पवर पोहचून फ्रेश होणे त्याला गरजेचे वाटले. गरज पडल्यावर सहकाऱ्यांच्या सुटकेसाठी जाता यावे म्हणून आधी विश्रांती मिळणे त्याला आवश्यक वाटले.

त्या दृष्टीने विचार केला तर ते योग्यही वाटते कारण तो एकमेव असा होता ज्याच्यामध्ये वादळात अडकलेल्या सहकाऱ्यांना सोडवण्यासाठी हवी असणारी उर्जा शिल्लक होती.

 

Mount-Everest-Base-Camp inmarathi
Stunning Adventure

चार वाजण्याच्या दरम्यान डग हॅनसेन रॉब हॉलच्या मदतीने पर्वतमाथ्यावर पोहोचला. पण थोड्याच वेळात कोसळला. त्याला तसेच सोडून जाणे रॉब हॉलला योग्य वाटले नाही आणि दोघे त्या पर्वताच्या दक्षिण माथ्यावर वादळात सापडले.

खालच्या उरलेल्या सहकाऱ्यांना देखील वादळाने गाठले होते. ते तेव्हा जवळच्या कॅम्प पासून ६०० फूट दूर होते. त्या वेळी नील बेडलमन याने दाखवलेल्या चिकाटी आणि साहसामुळे ते बरेच अंतर उतरू शकले.

आपल्या थकलेल्या, दमलेल्या मेम्बर्सना त्याने शब्दशः ओढत खाली आणले.

एम एम टीमचे सँडी पिटमन, शॅरलॉट फॉक्स आणि टीम मॅडसन आणि एसी टीमचे यासुको नाम्बा आणि बेक वेदर्स या पाच जणांना त्याने सुरक्षित ठिकाणी आणून मगच कॅम्प चारच्या दिशेने मदतीच्या शोधात रवाना झाला. वाढत चाललेल्या रात्रीबरोबर वादळाचा जोर देखील वाढत चालला.

बोक्रीवने स्वतःच्या टीमचे सँडी पिटमन, शॅरलॉट फॉक्स आणि टीम मॅडसन यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि एसी टीमचे यासुको नाम्बा आणि बेक वेदर्स हे वाचवण्याच्या अवस्थेत नाहीत असे घोषित केले.

आपल्या ‘लेफ्ट फॉर डेड’ या पुस्तकात बेक वेदर्सने याचे सविस्तर कथन केले आहे.

 

mount everest5 inmarathi
Amazon.com

डग हॅनसेनची वादळाशी झुंज थांबली, त्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशी मार्गदर्शक अँडी हॅरीसदेखील ऑक्सिजन अभावी मरण पावला. रॉब हॉल सर्व गिर्यारोहाकांमध्ये मरण पावणारा शेवटचा व्यक्ती होता.

दोन रात्री आणि तिसऱ्या दिवसाचे काही तास रॉब मृत्यूशी चिकाटीने झुंज देत राहिला. आता आपण जास्त काळ लढू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्याला त्याच्या गर्भवती पत्नीची आठवण आली.

तिचा शेवटचा निरोप घेता यावा म्हणून सॅटेलाईट फोनद्वारे त्याने तिच्याशी संपर्क साधला. त्याच्या सुदैवाने फोनची यंत्रणा चांगल्या अवस्थेत होती नि काम करत होती.

जणू मृत्युने त्याच्या चिकाटीचे, धैर्याचे नि निर्भयतेचे कौतुक वाटून त्याला खास सवलत दिली होती. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याचे तिच्यासाठी अखेरचे शब्द होते,’ शांत झोप प्रिये, जास्त काळजी करू नको’. हा अखेरचा निरोप आहे हे तिला देखील समजले.

 

mount everest6 inmarathi
TV Ate My Wardrobe

सात महिन्यांच्या गर्भवती स्त्रीने तो धक्का तितक्याच संयमाने पचवला. अँडी हॅरीस व डग हॅनसेन यांची मृत शरीरे देखील आढळली नाहीत. शेर्पा लॉपसंग जंगबु याने स्कॉट फिशरचे मृत शरीर पर्वताशी बांधून ठेवले, जे नंतर ताब्यात घेण्यात आले.

काही काळ शिखरमाथ्यावर राहून रॉब हॉलचे शरीर १२००० फुट खाली पर्वताच्या पायथ्याशी कोसळले. ९७ मध्ये अॅनातोली बोक्रीवला यासुको नाम्बाचे मृत शरीर सापडले.

पक्ष्यांनी तिचे शरीर खाऊ नये म्हणून त्याने तिच्या शरीराभोवती दगडांची रास रचली नंतर यासुकोच्या पतीने काही वर्षानंतर मोहिमेसाठी निधी गोळा करून तिचे शरीर पर्वतावरून खाली आणले.

 

mount everest7 inmarathi
All That’s Interesting

बेक वेदर्स चमत्कारिकरित्या वाचला आणि त्याने त्याच्या ‘ लेफ्ट फॉर डेड’ या पुस्तकात त्याला तीन वेळा पर्वतावर मरण्यासाठी कसे सोडून देण्यात आले आणि त्याने जिद्दीने सर्व संकटांवर कशी मात केली याचे वर्णन केले आहे.

त्याची पत्नी पीच हिने अतुलनीय धैर्य दाखवत त्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू मिशनचे आयोजन करून कॅम्पवर हेलीकॉप्टर उतरवले.

बेकेने या झुंजीत त्याचे नाक आणि डाव्या हाताची पाचही बोटे गमावली. तर उजव्या हाताचा काही भाग फ्रॉस्ट बाईटमुळे गमवावा लागला.

बाकीचे गिर्यारोहक त्सेवांग संमनला, दोरजे मोरप आणि त्सेवांग पल्जोर यांनी देखील फार काळ टिकाव धरला नाही आणि ती त्यांची अखेरची मोहीम ठरली. पल्जोर याने मरण्यापूर्वी एका छोट्याशा गुहेत आश्रय घेतला होता.

 

mount everest3 inmarathi
basecampmagazine.com

त्या वेळी त्याच्या पायात हिरवे बूट होते. ते ठिकाण नंतर खूण म्हणून ‘ ग्रीन बूट्स’ या नावाने ओळखले जाऊ लागले. बरोबर दहा वर्षांनी, १५ मे २००६ ला इंग्लिश गिर्यारोहक डेव्हिड शार्प हा देखील त्याच गुहेत मरण पावला.

जॉन क्राकावूरने सर्व घटनांचे इत्यंभूत वर्णन त्याच्या ‘इनटू थिन एअर’ या पुस्तकात केले आहे. बोक्रीवने देखील ‘द क्लाईम’ नावाच्या पुस्तकात या घटनेचे कथन केले आहे.

बोक्रीव आणि नील बेडलमन यांना त्यांच्या साहसी वृत्तीबद्दल योग्य श्रेय देऊन गौरवण्यात आले. निसर्गाचे क्रूर थैमान समोर सुरु असताना चित्त विचलित होऊ न देता जबाबदारीचे भान ठेवून त्यांनी काही प्राण वाचवले होते.

 

mount everest2 inmarathi
basecampmagazine.com

यावरून एक लक्षात येते, आजचा दिवस आपला शेवटचा दिवस असू शकतो हे सत्य स्वीकारले की अशा मोहिमा त्यातील धोक्यांसह स्वीकारणे शक्य होते.

मृत्यू हेच चिरंतन सत्य आहे जे ज्यांना माहित आहे ते त्याला भीत नाहीत, पण सहजासहजी त्याला आपला ताबाही घेऊ देत नाहीत.

साहसप्रेमी गिर्यारोहकांच्या काळजावर १० मे या दिवसाची आठवण अशी न भरून येणाऱ्या जखमेसारखी कोरून ठेवली आहे मृत्यूने जी ते पदकाप्रमाणे मिरवत आहेत !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?