' तुम्हाला तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी असेल तर ‘या’ चुका करू नका! – InMarathi

तुम्हाला तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी असेल तर ‘या’ चुका करू नका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका: डॉ अश्विनी तारे, नाशिक

===

दुपारची वेळ होती. क्लिनिकमध्ये मी बसले होते. इतक्यात मला रस्त्यावर स्कूल बस थांबलेली दिसली.

सहा ते सात वर्षांची मुलगी भले मोठे दप्तर पाठीशी टांगून गाडीतून उतरली. फार फार ती १०-१५ पावले चालली असेल. मग थांबली व दप्तर खाली ठेवून थोडा वेळ थांबली. पाच मिनिटांनी ते दप्तराचे गाठोडे उचलले व परत निघाली. परत तेच… १०-१५ पावले चालायचे… मग थांबायचे… दप्तर खाली ठेवायचे… पुन्हा उचलायचे आणि निघायचे.

मी बघत होते, मी बाहेर आले व तिला विचारले, अगं काही होत आहे का तुला?

तर ती म्हणाली, ‘अहो, हे दप्तराचे वजन खूप! पाठ दुखते.’

मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला.

‘अंगापेक्षा बोंगा  मोठा’ ही म्हण का म्हणतात व ती कशी यथार्थ आहे हे कळाले.

 

school-bag-marathipizza

स्रोत

हे झाले एक उदाहरण. आता दुसरे…

एक आई आपल्या सात ते आठ वर्षांच्या मुलाला घेऊन क्लिनिकमध्ये आली. तिची तक्रार होती की, मुलगा नीट जेवत नाही व अभ्यास पण करत नाही. मी तिचे सर्व ऐकून घेतले व मग माझ्या नियमाने औषधे देण्यापूर्वी मी रुग्णाला दिनचर्या विचारते, तशीच या आईला विचारले की याचा रोजचा दिनक्रम कसा आहे? किती वाजता उठतो, काय खातो वगैरे…

आईने सांगितले की, सकाळी ९ ला शाळा असते. पण, शाळा बरीच लांब असल्याने व इतर मुलांनाही घ्यायला लागत असल्याने स्कुल बस ७.३० लाच आमच्या गेटजवळ येते. दुपारी २ पर्यंत शाळा असते. परंतु, नंतर लगेच शाळेतून आमच्या भागात यायला बस नसते. ती ४ वाजता असते.

मग दुपारी दोन तास तो शाळेत खेळतो व ४ च्या बसने ६ वाजेपर्यंत घरी येतो.

आला की कधी खातो, तर कधी खात नाही लगेच ट्यूशनला जातो. रात्री ८ वाजता रात्रीचे जेवण… थोडा वेळा टी.व्ही. व मग मोबाइल व मग झोप असे रुटीन. मी मुलाकडे बघितले. तब्येतीने अशक्त, डोळ्यांची सतत हालचाल करत असलेला.

हे सर्व ऐकून मी पहिला प्रश्न विचारला की, याला एवढं या लांब शाळेत का टाकले? तर आईचे उत्तर –

अहो, शहरातील नावाजलेली शाळा आहे. खूप जणांचा नंबर लागत नाही. पण, आम्हाला लगेच मिळला प्रवेश.

वास्तविक पाहाता, डॉक्टर या नात्याने तो कुठे का जाईना शाळेत, याच्याशी डॉक्टरचा काय संबंध असे खूप जणांना वाटणे साहजिकच आहे. पण खरी मेख तेथेच आहे.

हा लहान मुलगा आत्ताच फुलटाईम जॉबसारखा चक्रात व्यस्त आहे. कुठेय त्याचे अल्लड बालपण, भरपूर आहार, पुरेशी झोप? सर्वच प्रश्न अनुत्तरित! फक्त मुलगा खूप सुशिक्षित झाला पाहिजे…!

आता तिसरे उदाहरण…

एक सहावीत शिकत असलेली मुलगी आईबरोबर आली होती. आई सांगत होती,

‘डॉक्टर हिचे खांदे, मान, हात, पाठ, फार दुखते.’

तसेच, आई सांगत होती की, रोज त्यांना घरी आल्यावर निबंध लिखाण, प्रश्न-उत्तरे अशी लिहावी लागतात. शाळेतून आल्यापासून सारखी लिहीतच असते.’ ही अशी आणि कित्येक मुले-मुली माझ्याकडे येतात व मग मला प्रश्न पडतो की, या सगळ्यांना डॉक्टरची, गोळ्या, इंजेक्शनची गरज आहे की, आरोग्य जागृतीची?

माणूस प्रगत होत चालला आहे. नवनवीन शोध लावत आहे व जुने जे आपले आहे ते विसरत जाऊन स्वत:च्या आरोग्यावरच हल्ला करत आहे. असा एक Autoimmune Disease (स्वयं प्रतीकार रोग) सर्व समाजात दिसून येत आहे. हे कोठे तरी थांबले पाहिजे, असे मला रोज वाटते. त्यामुळे हा लेख लिहिण्याचे प्रयोजन…

मग काय केले पाहिजे? हे एका मिनिटात बदलेल का? हा बदल होण्यासाठी नुसती औषधे घेणे, निरनिराळी आरोग्यावरील व्याख्याने ऐकणे किंवा एका दिवसासाठी रॅली काढून शक्य नाही. आरोग्यास हितकर गोष्टी रोज आपण नित्यनियमाने अंगीकारल्या पाहिजेत.

यासाठी सरकारचे, पालकांचे, शाळांचे धोरण बदलणेदेखील गरजेचे आहे.

सरकारने सर्व शाळांचा syllabus एकच ठेवला पाहिजे. सर्व शाळांमध्ये परीक्षा पद्धत ही सारखीच असली पाहिजे. शाळेला खेळण्यासाठी पटांगण असेल तरच शाळेला मान्यता द्यावी. आजकाल खुराड्यासारख्या किती शाळा आहेत! याचा काही उपयोग नाही.

पालक हा विद्याथ्र्यांचा सर्वांत प्रथम मार्गदर्शक असतो. त्यामुळे पालकांना आधी आरोग्याचे महत्त्व कळणे महत्त्वाचे आहे.

माझे मूल कुठे जास्त आनंदी राहू शकते, हे त्यालाच जास्त माहीत असते. आनंदी मुलांचा आत्मविश्वास हीच यशाची खरी पायरी असते. आनंदी मन हेच आत्मविश्वासाचे मूळ होय व नेमके आजच्या पिढीत हे हरवलेले आहे. बहुतेक मुलांकडे सर्व सुखे हात जोडून उभी असतात, पण तरी ७० टक्के मुले ही बोअर होतंय, म्हणून सांगतात.

single child family structure marathipizza

स्रोत

या “बोअर” होण्यामागे नेमके काय रहस्य आहे? तर ही मुले यांत्रिक आयुष्यात जास्त गुंतली गेली आहेत. बोलून होणारी देवाणघेवाण ही जणू विसरलीच आहेत. त्यांना बोलायची इच्छा असेल, तर विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरी कोणीच नसते. हेच बदलायला पाहिजे. कारण –

माणूस माणसात असल्यावर हरवत नाही; पण एकटा असल्यावर हरवतो.

म्हणून सुदृढ मैत्री/निकोप मैत्री, विचारांची देवाणघेवाण यात मुलाचे व्यक्तिमत्त्व वाढण्यासाठी आईवडिलांनी प्रयत्न करावेत. मुलांसाठी पुरेसा वेळ द्यावा. अगदी आणीबाणीची आर्थिक परिस्थिती असेल तरच दोघांनी नोकरी करावी. कारण पैसा हा कितीही कमावला तरी पुरत नसतो, हे सत्य आहे.

रोज मुलाचा एक तास तरी शारीरिक व्यायाम व एक तास त्याच्या स्वत:च्या आवडता विषयात वेळ घालवण्यास राखून ठेवावा.

निसर्गाबरोबर राहण्याची कला मुलांना शिकवावी. निसर्ग हा अनेक समस्यांचे उत्तर चुटकीसरशी देतो. कोणीही प्राणी कोणत्या शाळेत, दवाखान्यात जात नाही पण कधी काय करावे याचे ज्ञान होतेच ना! मुलांना यंत्र म्हणून वाढविण्यापेक्षा माणूस म्हणून वाढविण्यात जास्त कला आहेत व नक्कीच श्रमही आहेत.

शाळा ही विद्यार्थ्यांची दुसरी मार्गदर्शक असते. मुलांना सर्व विषय हसतखेळत शिकवावे व आजच्या प्रगत तंत्राचा उपयोग करून किचकट, रटाळ वाटणारे विषय – जसे इतिहास, भौतिकशास्त्र हे चित्रांनी, प्रत्यक्ष प्रयोग करून शिकवले म्हणजे मुले त्यात रस घेतील.

 

childrens studying inmarathi

जो दैनंदिन अभ्यास असेल, तो शाळेतच करून घ्यावा. घरी फक्त त्याची उजळणी करण्यास सांगावे. म्हणजे आई-वडिलांबरोबर घरी आल्यावर मुलांना वेळ देता येईल.

बहुतेक शाळेत फास्ट फूड घातक परिणाम शिकविले जातात. पण याच शाळेत स्नेहसंमेलनात विद्याथ्र्यांकडून फास्ट फूडचे स्टॉल लावले जातात…! मुले तुमच्या सांगण्यावर कमी, पण तुमच्या अनुकरणावर जास्त लक्ष देतात.

या ऐवजी आपल्या भारतात इतक्या निरनिराळ्या संस्कृती आहेत – जसे गुजराथी, जैन, ब्राह्मण, मराठा इ. या प्रत्येकामध्ये पारंपरिक, आरोग्यास हितकर किती पदार्थ आहेत त्याविषयी मुलांना माहिती द्यावी.

काहींना कदाचित हेच वाटले असेल की, आरोगयाविषयी ना एखादी गोष्ट सांगितली, ना एखादा पदार्थ सांगितला व हा एवढा फापटपसारा!

हो.

कारण आरोग्य बिघडू नये म्हणून याच गोष्टीचे पालन करणे गरजेचे आहे व ते सहज जमू शकते. पण, आजकाल लोकांना डॉक्टरांकडे जाणे जास्त सोपे वाटत आहे, असे दिसते.

जग झपाट्याने बदलत आहे व लोकांना त्याच गतीने बदलायचे आहे. पण, झपाट्याने बदलणे हा निसर्गाचा नियम नाही. जेव्हा निसर्गाकडून अशी झपाट्याने एखादी प्रक्रिया होते तेव्हा आपण त्याला त्सुनामी म्हणतो व अशी त्सुनामी घातकच असते. तसेच, माणसाने केलेला हा झपाट्याने विकास त्याच्याच आरोग्याला घातक ठरत आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीतही सुदृढ आरोग्याचा तूमच्या यशस्वी जीवनावर किती परिणाम होतो, याचे दाखले आहेत. म्हणूनच श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सहाव्या अध्यायात अर्जुनाला योग्य आहार-विहार व योगाचे महत्त्व सांगितले आहे.

म्हणूनच झेप घ्या… उंच उडा… पण आरोग्याचे भान ठेवा. कारण ‘सर सलामत तो पगडी पचास

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?