'अल्लाउद्दिन खिलजीची वासनांधता - राणी पद्मिनीचा अग्निप्रवेश

अल्लाउद्दिन खिलजीची वासनांधता – राणी पद्मिनीचा अग्निप्रवेश

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मराठी संस्कृतीमध्ये काही इतिहासकालीन व्यक्ती या कायमस्वरूपी काही मनुष्य गुणविशेशांच्या प्रतिक बनून राहिल्या आहेत. नाना फडणवीस हे मुत्सद्दीपणाचे, बाजीप्रभू देशपांडे हे स्वामी निष्ठेचे, आनंदीबाई हे अवसानघातकीपणाचे आणि अल्लाउद्दिन खिलजी हे क्रौर्याचे प्रतिक आहेत. मराठी संस्कृतीची मराठी माणसाइतकीच जाण असणाऱ्या संजय लीला भन्साळीना याची कल्पना नसावी यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. एरव्ही त्यांना एकीकडे मूर्तिमंत सौंदर्य, पावित्र्य आणि पतिव्रतेच रूप असलेली राणी पद्मिनी आणि दुसरीकडे तेवढंच मूर्तिमंत क्रौर्य, निर्दयीपणाचे प्रतिक असलेल्या खिलजी ची “प्रेमकथा” बनवायची अफलातून कल्पना सुचायचं कारण नव्हतं.

अर्थात या परंपरेची पायाभरणी भन्साळींनी त्यांच्या याधीच्या बाजीराव-मस्तानी मध्ये केली होती. आत्तापर्यंत ऐतिहासिक व्यक्तिरेखा जिवंत करणारा अभिनय साकारणे हे अभिनेत्यांसाठी सर्वोच्च आव्हान आणि तो पाहायला मिळणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असायची. प्रभाकर पणशीकरांचा औरंगझेब, बाळ धुरींचा संभाजी किंवा नव्या पिढीला माहिती असलेला डॉं अमोल कोल्ह्यांचा शिवाजी पाहताना भक्त आणि भगवंत एकरूप झाल्याप्रमाणे ते पात्र आणि अभिनेता एकजीव होऊन जात असत. मराठी नाटकांची उंची गाठावी एवढ्या उच्च दर्जाची अपेक्षा तर बॉलीवूड कडून नव्हतीच; पण निदान पात्रांचा खेळखंडोबा होऊ नये एवढे किमान भान `बॉली-दिग्दर्शक ठेवत. मात्र बाजीराव-मस्तानी मध्ये तोही विधिनिषेध भन्साळींनी बाळगला नाही.

रणवीर-दीपका-प्रियांकाचे सगळे हट्ट पुरवण्याच्या नादात त्यांनी बाजीराव-मस्तानी-काशीबाई च्या व्यक्तिरेखांना थेट हात घातला.

रणवीर ला डान्स पाहिजेच म्हंटल्यावर भन्साळींनी बाजीरावालाच अटक-मटक-चवळी-चटक नाचायला लावले. प्रियांकाला आपल्या भूमिकेची लांबी दीपिकाएवढी पाहिजे तर त्यांनी काशीबाई च्या भूमिकेत भरपूर पाणी घालून डायरेक्ट लव्ह-स्टोरी चा लव्ह-त्रांगल करून टाकला. इकडे दीपिकाला मस्तानी बनून फक्त छान-छान दिसण्यात इंटरेस्ट नव्हता म्हणून की काय म्हणून तिला अक्शन सिन्स वगैरे करायला दिले.

मस्तानी ही युद्धकलाप्रवीण होती ही गोष्ट खरी आहे, पण म्हणून काय छत्रसाल राजा शत्रूच्या गराड्यात अडकेला असताना आपल्या मुलीला संदेश घेऊन बाजीरावाकडे पाठवेल? शिवाजी महाराजांना पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडताना जी यातायात करावी लागली त्यातून पुढे इतिहास तयार झाला…आणि इकडे भन्साळींची मस्तानी मात्र फाटक उघडून यावं-जावं तशी वेढ्याच्या आतबाहेर करत होती! हे भोग एवढ्यावरच संपले नाहीत – मस्तानीचं – पक्षी दीपिकाचं – तलवार नैपुण्य आपल्याला दिसावेत म्हणून चिमाजीअप्पा ला मस्तानीवर आणि आपल्या पुतण्यावर – तान्ह्या समशेरबहाद्दरावर – मोगली पद्धतीने मारेकरी घालावे लागले ( आपण उगीचच राघोबादादाला “काका मला वाचवा” साठी दुषणे देतो )… आणि बसल्याजागी दिल्ली पर्यंतची बित्तंबातमी काढणाऱ्या बाजीरावाला पुण्यातच आपल्या बायको-मुलावर हल्ला होत आहे हे पुण्यात असून पण समजलं नाही!

Bajirao Mastani end scene marathipizza

मला खरं वाईट वाटलं ते एवढ्या सगळ्या विद्रुपीकरणातून लोकांना वाद घालायला विषय काय मिळाला तर पेशव्यांची पत्नी पिंगा घालेल की नाही एवढाच!

इतिहास स्वत:च्या सोयीने मांडू पाहणाऱ्या लोकांसाठी हा एक कायम स्मरणात राहावा असा धडा आहे – मुख्य विषयाची येथेच्छ तोडमोड करून मग सोबत एखादा क्षुल्लक विषय सोबत वादाला दिला की लोक बहुधा त्या क्षुल्लक विवादावर आपली शक्ती खर्च करतात! भन्साळींना आपण खिलजी ला नवीन रुपात आणण्याचे धाडस करू शकतो हा विश्वास यातूनच आला असेल कदाचित.

आजवर बॉलीवूडने अनेक मुघल राजांच पुनर्वसन केलं आहे. आता खिलजी देखील पद्मिनी चा प्रेमी म्हणून परत येऊ पाहतो आहे. या “प्रेमिकाने” यापूर्वीच गुजराथ च्या वाघेला राजाची पत्नी कमलकुमारी आणि महाराष्ट्राचा यादव राजा – देवगिरीचा रामदेवराय – याची राजकन्या यांच्याशी निकाह लावला होता. कमलकुमारीची कथा एवढ्यावरच संपत नाही… खिलजी ने पुढे तिच्याच मुलीला – म्हणजे गुजराथचीच राजकन्या देवलदेवी – तिला शोधून पकडून आणायचे आदेश आपल्या सेनाधीकार्यांसाठी दिले होते!!! (स्वत:साठी की आपल्या मुलासाठी हे निश्चित माहित नाही) तत्कालीन कवी अमीर खुस्रो ने या देवलदेवी आणि खिलजी चा मुलगा यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते अशा अर्थाचे ‘आशिका..’ नावाचे काव्य रचले आहे.

Khizr-Khan-Deval-Devi marathipizza
आमिर खुसरो ने रचलेली प्रेम कविता

तेंव्हा पद्मिनी च्या पूर्वी देखील अल्लाउद्दिन चे प्रेम गुजरात-महाराष्ट्रापर्यंत पोहोचले होते. तरीदेखील लोकांनी खिलजीचं प्रतिमा संवर्धन कदाचित सहन केलं असतं, पण मुद्दा फक्त तेवढ्यावर संपत नाही. खरा मुद्दा आहे ते या निमित्ताने जे पद्मिनी सारख्या वंदनीय स्त्रीचे करंटे चारित्र्यहनन सुरु होत आहे त्याचा!

पद्मिनीच्या सौंदर्याची ख्याती तेंव्हा सर्वदूर पसरली होती. त्या काळातील, पुढच्या एक-दोन शतकातील नोंदी पहिल्या तर तेंव्हा पद्मिनी या शब्दाचा अर्थ “सौंदर्यशास्त्रानुसार स्त्रीसौंदर्याचे चार प्रमुख प्रकार पडतात, त्यापैकी सर्वात श्रेष्ठ सौंदर्यप्रकार” असा बनलेला आहे (१)!!! पद्मिनीची कीर्ती त्या काळात एवढी शिगेला पोहोचली होती. याच पद्मिनीची आता काही इतिहासकार “काल्पनिक पात्र” म्हणून बोळवण करू पहात आहेत.

allauddin khilji tweet marathipizza

 

allauddin khilji tweet reply marathipizza

तेंव्हा अशा सौंदर्यवती पद्मिनीच्या रुपाची ख्याती ऐकून अल्लाउद्दिन वेडापिसा झाला नसेल तर नवलच! त्याने पद्मिनीच्या राज्यावर – चित्तोडगढवर – हल्ला केला. चित्तोडगढ बुलंद होता…खिलजीने केलेल्या माऱ्याला त्याने सहाएक महिने दाद दिली नाही. पण एके दिवशी चित्तोड चा राजा, पद्मिनीचा पती, राणा रतनसिंग च लढाईत जखमी होऊन खिलजी च्या तावडीत सापडला. खिलजी ने त्याला कैद करून त्याच्या कडे थेट त्याच्या बायकोचीच मागणी केली.

रतन सिंग सारखा स्वाभिमानी राजपूत अशी मागणी मान्य करणे शक्यच नव्हते. त्याने परिणामांची पर्वा न करता नकार दिला. पण अल्लाउद्दिन ला रतनसिंगचा जीव घेण्यापेक्षा पद्मिनी प्राप्त करायची होती, त्याने नवीन प्रस्ताव मांडला:

जर अल्लाउद्दिन ला फक्त एकदा पद्मिनी ला समक्ष बघायला मिळाले तरी तो रतनसिंग ला जिवंत सोडेल

असे त्याने वचन दिले. राजपूत लोक म्हणजे भावनाप्रधान आणि दिल्या शब्दाला जगणारे… त्यामुळे त्यांनी खिलजी च्या शब्दावर विश्वास ठेवला असावा. या वेळी बहुधा रतनसिंगचे वृद्ध वडील मोजक्या लोकांसोबत किल्ला लढवत होते… त्यांना किल्यात निरोप धाडला गेला.

chittorgardh marathipizza

स्रोत

नवऱ्याच्या जीवासाठी पद्मिनी हे करायला तयार झाली – अट एकच… अल्लाउद्दिन ला पद्मिनीचे थेट दर्शन घेता येणार नाही. एका आरशात अल्लाउद्दिन ला पद्मिनीचे प्रतिबिंब पाहायला मिळेल आणि ते देखील दूर अंतरावरून.

चित्तोडगडाचा दिंडीदरवाजा खिलजी साठी उघडला गेला… रजपुतांच्याच घरात घुसून, रजपुतांच्याच नाकावर टिच्चून, राजपुतांच्या कुलशीलाचे दर्शन अल्लाउद्दिनने घेतले. मात्र पद्मिनीच्या सौंदर्याचे साक्षात दर्शन झाल्यावर अल्लाउद्दिनची कामवासना उलट भडकली… रतनसिंगला दिलेला शब्द कुठल्या कुठे उडून गेला…आणि पद्मिनीला कुठल्याही किंमतीवर मिळवायचे या निर्धाराने खिलजी ने आपले सैन्य पुन्हा एकदा चित्तोड च्या तटाला भिडवले.

नवरा शत्रूच्या त्याब्यात, गडावर फार थोडके लोक शिल्लक राहिलेले, शत्रू कोणत्या क्षणी किल्ल्यात घुसेल याचा भरोसा नाही … अशा परिस्थितीत पद्मिनी समोर फार थोडे मार्ग शिल्लक होते. तिने शत्रूच्या हातात जिवंत पडायचे नाही असे ठरवले. असहाय अवस्थेत, कदाचित द्रौपदी-सीतेप्रमाणे ज्या सौंदर्याने हा अनर्थ ओढवला त्या सौंदर्याला दोष देत, पद्मिनीने आणि इतर राजपूत स्त्रियांनी शीलरक्षणार्थ अग्निप्रवेश करायचा निर्णय घेतला.

jauhar_padmini marathipizza

ऐनवेळी ज्वाळांच्या समोर धैर्य गळून जायला नको म्हणून त्यांनी सैनिकांना बाहेरून दरवाजे बंद करायला सांगितले…आणि मग खोलीच्या मध्ये आग प्रज्वलित करून त्या आगीला मुक्तपणे सगळीकडून लपेटू दिले…

खिलजी सैनिकांबरोबर दरवाजे तोडून आत घुसला तेंव्हा त्याला पद्मिनीच्या राखरांगोळी खेरीज काय हाती लागले नाही. हिंदुस्थानच्या सुलतानाचा एका अबला स्त्रीने पराभव केला!

आज आठशे वर्ष झाली तरी पद्मिनीच्या कथेचं गारुड संपत नाही…

शील रक्षणासाठी अग्निप्रवेश करणे ह्याला “जौहर” म्हणतात. पद्मिनीने केलेला जौहर हा पहिला जौहर मानला जातो. चित्तोड चा किल्ला फिरताना, पद्मिनीचा महाल पाहताना, त्या वातावरणात तिच्या “जौहारा”ची कथा ऐकताना, आजही लोक अश्रू आवरू शकत नाहीत! एवढ्या करुण-उत्कट कथेला, खिलजी ची प्रेमकथा बनवून तीच वांगे करायची काय बुद्धी भन्साळीना झाली, समजत नाही. कदाचित बॉलीवूडच्या त्या लिव्ह-इन, ब्रेक-अप, रेव्ह पार्टीज आणि वन-नाईट-स्टेंडस ने भरलेल्या जगात…पद्मिनी च्या शील, सत्व सारख्या गोष्टी आउट-ऑफ-सिल्याबस प्रश्नाप्रमाणे भन्साळी आणि कंपूच्या कक्षेपलीकडून गेल्या असाव्यात.

भन्साळीना मारहाण झाली, त्याचा काहींनी मनापासून, काहींनी कर्तव्यबुद्धीने निषेध केला. मला स्वत:ला देखील कधी मारहाणीचे समर्थन करावेसे वाटले नाही – पण हा मुद्दा तेवढ्यावरच संपत नाही. यासंदर्भात खिलाजीच्याच कारकिर्दीतील एक उदाहरण देऊन विषय संपवतो.

खिलजी ने जेंव्हा महाराष्ट्रावर – देवगिरीच्या रामदेवरायावर – आक्रमण केलं तेंव्हा महाराष्ट्र वैभवाच्या शिखरावर होता. राजाच्या दरबारात काव्य, शास्त्र, विनोद, कला, व्याकरण अशा तऱ्हेतऱ्हेच्या विषयांवर चर्चा होई. पण अशा उदात्त गुणांनी भरलेल्या लोकांमध्ये बऱ्याच वेळा वस्तुस्थितीची जाणीव होत नाही. रामदेवरायाच्या काळात उत्तर भारत परकीयांची आक्रमणे सुरु होऊन २०० वर्षे झाली होती, तरी दक्षिण भारत गुंगीतच होता. खिलजी विन्ध्य ओलांडून यादव राज्यात घुसला, तेंव्हा राजाच्या महामंत्र्यानी – हेमाद्रपंडितांनी – व्रतवैकल्याविषयी ग्रंथ पुरा करत आणला होता… सैन्य तीर्थयात्रेला गेले होते!!! (२).

देवगिरीचा किल्ला – भारतातल्या सर्वोच्च ५ किल्ल्यांमध्ये सहज समाविष्ट होईल असा दुर्धर किल्ला – हाताशी असूनपण खिलजी ने देवगिरीला वेढा घातला, तेंव्हा राजाकडे संरक्षणाची तयारी फारच अपुरी होती.

यादव फार प्रयत्न न करताच अलगद शरण आले. ५०० वर्षांपासून चालू असलेले यादवांचे राज्य १५ दिवसांत संपुष्टात आले. उदात्त गुणांनी भारावून जाताना वस्तुस्थिती चे आकलन सुटले, तर कशी दारूण परिस्थिती उद्भवते याचे हे बोलके उदाहरण.

आत्ताचे भन्साळी प्रकरण, त्यांना झालेली मारहाण यामध्ये जे लोक फेसबुक-ट्विटर वर आपल्या विचारांना-भावनांना वाट करून देऊ शकत नाहीत, ते अजूनही ‘इतर मार्गांचा’ वापर करत राहणार – या वस्तुस्थिती कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

या सगळ्या मागे राजकारण होते किंवा नाही, राजकीय लाभ आहेत की नाही हे मला माहित नाही. पण ते राजकीय आहेत म्हणून सरसकट सगळेच प्रकरण मोडीत काढणे म्हणजे शहामृगासारखे वाळूत तोंड खुपसायचा प्रकार आहे. आपण आपला रामदेवराय करून घ्यायचा कि नाही ते ज्याचे त्याने ठरवायचे आहे!

स्रोत:

१ – Hughes, a dictionary of Islam – Padmini is name of the woman who is most excellent of the four classes in which women are divided.
२. – राजा शिवछत्रपती (पूर्वार्ध) – बाबासाहेब पुरंदरे

 

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

One thought on “अल्लाउद्दिन खिलजीची वासनांधता – राणी पद्मिनीचा अग्निप्रवेश

  • March 18, 2017 at 10:58 pm
    Permalink

    तो काय करणार? . त्याचा सावकार कोण आहे ते गंगा मैली मुळे कळलेच आहे. हे slow poisoning आहे. हिंदू च्या सर्व आदरस्थानांवर हल्ला करण्याचे. त्यामुळे इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा हेच योग्य
    लातोंके भूत बातोंसे नही मनाते

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?