''व्हॅलेंटाईन डे' चा विरोध करणाऱ्या संस्कृती प्रेमींनी विचार करावा असं काहीतरी...

‘व्हॅलेंटाईन डे’ चा विरोध करणाऱ्या संस्कृती प्रेमींनी विचार करावा असं काहीतरी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक: सारंग लेले, आगाशी.

===

केवळ पैसे कमावण्याच्या हेतूने जगभरात पसरवलेल्या ‘व्हॅलेन्टाईन डे’चं फॅड भारतात येऊनही आता काही वर्षं झाली आहेत.

पाश्चिमात्य संस्कृती, त्यांचा धर्म आणि त्यातले संबंधित उत्सव हे विपणनासाठी (मार्केटिंग) असून त्यातून पैसे कमावणे हा उद्देश असतो, हेही लोकांना आता समजू लागलं आहे.

इतकं असूनही सोशल मीडिया किंवा अन्यत्र तरुणांमध्ये व्हॅलेन्टाईन डे सेलिब्रेशनला उत्साह दिसतो.

 

proposal inmarathi

 

व्हॅलेंटाईनसारखे दिवस साजरे करणाऱ्या प्रत्येकालाच व्हॅलेन्टाईनचा इतिहास, त्याच्याशी संबंधित धार्मिक संकल्पना थोपवण्याचा प्रकार ह्याच्याशी काही देणंघेणं असतं, अशातला भाग नाहीये.

पण तरीही तरुण पिढीमध्ये व्हॅलेन्टाईन डे हा आवश्यक झालाय.

 

amir khan inmarathi

 

सर्वसाधारणपणे दरवर्षी व्हॅलेन्टाईन दिवस आला की, सोशल मीडियावर त्या दिवशी विरोधकांच्या बाजूने कृती आणि प्रचार चालू होतो. कृतीमधली थेट मारहाण आता कमी झाली आहे, पण प्रचार मात्र दरवर्षी होत असतो.

विरोधकांचा आक्षेप हा ह्या दिवसाशी संबंधित धार्मिक कारणांना असतो. जो संयुक्तिकही आहे.

मात्र ह्या विरोधाच्या बाजूने जेव्हा देशावरचं प्रेम किंवा शिवाजींच्या मावळ्यांचं राष्ट्रासाठी समर्पण हे विषय जोडले जातात तेव्हा विरोधाची दिशा भरकटलेली असल्याची वाटते.

 

bajarang dal inmarathi
yesspress.info

 

एका व्यक्तीचं त्याच्या/तिच्या प्रिय व्यक्तीसाठी असलेलं शाश्वत प्रेम, त्यांचा एकमेकांवर असलेला विश्वास, एकमेकांसाठी त्यांनी केलेलं समर्पण, त्यांनी व्यक्तिगत आयुष्यात केलेली तडजोड, बऱ्यावाईट प्रसंगी दिलेली साथ ह्या सर्वाला देशप्रेम किंवा राष्ट्रप्रेम हा पर्याय दिला जातो तेव्हा थोडी गल्लत होते.

समाज हा कायम बहुपेडी असल्याचं आपण नेहमी मान्य करत असतो. समाजात आणि व्यक्तिगत आयुष्यातही वेगवेगळे स्तर असतात.

प्रत्येक व्यक्ती एकाच वेळी ह्या वेगळ्या स्तरांवर त्यातला एकही स्तर बिघडू न देता सहज वावरत असते, ही वस्तुस्थिती आहे.

मात्र व्यक्तिगत आयुष्यातील प्रेम ह्याला देश धर्म हे पर्याय देऊन सर्वमान्य बहुपेडीत्व आपण एकाच स्तरावर आणून ठेवतो आणि मग तिकडे संघर्ष चालू होतो.

एकीकडे खजुराहोसारखी आत्ताच्या भारतातही पचू न शकणारी बोल्ड शिल्प आपल्याकडे असल्याचा आणि ती संस्कृती असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो तर, दुसरीकडे विशुद्ध प्रेम जाहीररीत्या व्यक्त करण्यासाठी आपण आपल्या संस्कृतीतलाच पर्याय नवीन पिढीला देत नाही, हा विरोधाभास आहे.

 

khajuraho-lovemaking-inmarathi
fineartamerica.com

 

दुसरी गंमत म्हणजे ‘एकतर हे किंवा ते’ (either this or that) ही विचारसरणी आजकाल फार दृढ होताना दिसते.

‘व्यक्तीगत प्रेम किंवा देशप्रेम’ हा एकच विषय नाही, इतरही अनेक बाबतीत हा विचार मांडलेला दिसतो.

‘देवळांत दान करा किंवा गरिबांना मदत करा’ हे त्याचं एक उदाहरण आहे. मात्र दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकतात (coexistence) हे आपण समजून घ्यायला हवं.

एखाद्याने आपलं वैयक्तिक प्रेम जाहीर केलं तर त्याच्यात देशप्रेमाचा, धर्माभिमानाचा ऱ्हास होतो, अश्या निष्कर्षाला पोहोचणे चुकीचे ठरेल.

 

bajarang dal inmarathi1

 

Coexistence शक्य आहे हे लक्षात घ्यायला हवं.

व्यक्तिगत पातळीवरच्या प्रेमाला निम्न दर्जा देण्याचा खटाटोप करत राहण्यापेक्षा त्याला साजेसा आपल्या संस्कृतीतला पर्याय उपलब्ध करून देणं, ही महत्वाचं आहे.

ही संकल्पना आजच्या घडीला पचवण्यासाठी कठीण वाटली तरी ती काळाची गरज आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?