' …तर काँग्रेसने गांधींना तुरुंगात टाकलं असतं…अन गोडसे “गांधीवादी” झाले असते! – InMarathi

…तर काँग्रेसने गांधींना तुरुंगात टाकलं असतं…अन गोडसे “गांधीवादी” झाले असते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : श्रीकांत उमरीकर

===

हिंदी नाटककार असगर वजाहत यांचे “गोडसे@गांधी.कॉम” हे हिंदी नाटक चर्चेत होते.

या नाटकाचा मराठी अनुवाद झाला असून हे नाटक मंचावर सादर झाले होते. असगर वजाहत यांनी गांधी विचारांबाबत अतिशय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून सर्वांनाच अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे.

नाटकाची कल्पना अशी आहे :

गांधींना गोळी लागते पण त्यांचा मृत्यू होत नाही. या गोळीबारातून गांधी वाचतात.

गोडसेला तुरूंगात टाकले जाते. खटला उभा राहतो तेंव्हा गांधी गोडसेच्या विरोधात कुठलीही साक्ष न देता त्याला माफ करून टाकतात. आणि इथूनच मोठी पंचाईत सुरू होते.

 

godse-gandhi-marathipizza

 

गांधी आपले समाजसेवेचे व्रत बिहारमधील एका छोट्या गावात चालु करतात. गांधींच्या कामाने नेहरूंचे सरकार अडचणीत येते.

ज्या परिसरात गांधींचा हा आश्रम आहे त्या परिसरातील लोक एकत्र येवून श्रमदान करतात, आपली कामे आपणच करतात.

सरकार नावाची दिल्लीत बसलेली यंत्रणा नाकारतात. त्यांचा हस्तक्षेप नको म्हणतात. इतकेच काय निवडणुका न घेता आपले प्रतिनिधी आपणच बिनविरोध निवडून देतात.

सरकारशाही बळकट करण्यात गुंंतलेल्या नेहरू-पटेल-आझाद आदींना धक्का असतो. निवडणुकात गांधींनी कॉंग्रेसला पाठिंबा द्यावा असा त्यांचा आग्रह असतो. गांधी तर कॉंग्रेसच बरखास्त करा असा आग्रह धरतात.

गांधी कॉंग्रेसचा त्याग करतात. शेवटी सरकार विरोधी कारवाया केल्या म्हणून गांधींना अटक करण्यात येते…!

 

gandhi in prison inmarathi
twitter.com

 

सरकार “किमान” असावे असा गांधींचा आग्रह होता. ही बाब नेमकी नेहरूनीतीच्या विरोधात जाणारी आहे. आज गांधी आणि नेहरू यांच्यात मतभेद होते असं म्हटलं तर कोणी कबुल करत नाही.

गांधींना गोडसेने मारले तेंव्हा गोडसेला सावरकरांना भाजप मोदीला संघाला शिव्या देणे सोपे असते.

आपण मात्र गांधी विचारांचे पालन करत नाहीत. उलट त्यांच्या काहीसे विरोधीच आहोत हे इतर सर्व विचारसरणीचे लोक लपवून ठेवतात.

असगर वजाहत यांनी पुढे आणलेला हा “किमान सरकार”चा मुद्दा आज तपासून पाहिला तर असे लक्षात येईल की

गांधींचा उदो उदो करणार्‍या नेहरू आणि पुढे इंदिरा गांधी, राजीव गांधी ते अगदी अलिकडे सोनिया गांधी प्रणीत मनमोहन सिंग या सर्वांनी गांधी विचारांना हरताळ फासलेला आहे.

(मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींनी आपल्या लोकशाहीला अप्रत्यक्ष अधिकारशाही कसं केलं होतं, हे इथे वाचू शकता.)

 

manmohan singh and sonia gandhi inmarathi
businessleague.in

 

गोडसेने तर गांधींची शारीरिक हत्या केली. या सर्वांनी गांधी विचारांची राजरोस हत्या केली आहे. सरकार नावाची प्रचंड यंत्रणा उभी केली जी की एकुण उत्पन्नाच्या ७० टक्के इतका वाटा अधिकृतरित्या पगाराच्या रूपाने खावून टाकते.

याचा परिणाम आज काय झाला? आज जेंव्हा शासन पुर्णपणे कर्जबाजारी बनले आहे तेंव्हा शासनाने हात झटकायला सुरवात केली आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान सुरू केले.

याचा अर्थ काय होतो?

आम्ही निर्माण केलेली न्यायदानाची यंत्रणा अपुरी, कुचकामी वेळखावू ठरली आहे. तेंव्हा आता लोकांनी पुढे येवून आपआपसातले भांडण-तंटे मिटवून घ्यावेत. शासनाकडे येवू नये.

मग गांधी तरी काय सांगत होते. आमच्या गावात आमचे सरकार हेच तर गांधींचे म्हणणे होते.

गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान – याचा अर्थ असा की आम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या आहेत. त्या तूमच्या गावाची/शहराची स्वच्छता करण्यास असमर्थ आहे.

तेंव्हा आता तूम्ही तूमची स्वच्छता तूमच्याच पैशाने करून घ्या. मग गांधी काय म्हणत होते. आमचे गाव आम्हीच स्वच्छ करणार. ६५ वर्षानंतर आपण परत गांधींपाशीच येवून पोचलो आहोत.

 

gandhi swach bharat inmarathi
pibindia.wordpress.com

 

गांधीं हे अ-सरकारवादी होते. पण आजचे सगळे डावे समाजवादी सरकारी हस्तक्षेपाची वारंवार मागणी करतात. महात्मा गांधींच्या नावाने मनरेगा योजना सरकारने काढली.

या योजनेत एका मजुराला एका दिवसाला मिळाणारा रोजगार हा १८० रूपयांच्या आसपास आहे.

खुल्या बाजारात कुठल्याही जिल्ह्याच्या गावी सकाळी मजुरांचा बाजार भरतो तिथे कुठल्याही मजुराला किमान २५० रूपये रोजाने रोजगार उपलब्ध आहे.

मग आता सामान्य लोकांवर विश्वास ठेवणारा गांधीविचार यशस्वी ठरला की डाव्या समाजवाद्यांचा सरकारी हस्तक्षेप यशस्वी ठरला?

या नाटकात महात्मा गांधींना सरकार विरोधी हालचालींसाठी तुरूंगात टाकल्यावर ते गोडसेच्याच बराकीत राहण्याचा आग्रह धरतात. पुढे गांधी आणि गोडसे यांचा संवाद चालत राहतो.

गांधी गोडसेला मुलभूत प्रश्न विचारतात. तूम्ही हिंदू आहात का? अर्थातच गोडसे उत्तर देतात हो. मग गांधी विचारतात तूम्हाला आत्मा अमर आहे हे मंजूर आहे का? यालाही गोडसे होकार देतात.

मग गांधी विचारतात माझ्या आत्म्याची हत्या न करता तूम्ही माझ्या शरीराची हत्या करून काय साधणार होता?

 

godse@gandhi.com inmarathi
youtube.com

 

या प्रश्नावर गोडसे निरूत्तर होतात.

अखंड भारत प्रश्नावर गांधींनी गोडसेची घेतलेली फिरकी तर अफलातून आहे.

गांधी गोडसेला विचारतात, तूमचे अखंड भरतावर प्रेम आहे मग तूम्ही हा अखंड भारत फिरून बघितला आहे का? माझ्या गुरूंनी मला भारत फिरण्यास सांगितले होते तेंव्हा मी तो फिरून बघितला आहे.

गोडसेला यावर उत्तर देता येत नाही.

मग अखंड भारताचा गोडसेचा नकाशा पाहून गांधी विचारतात, तूमचा हा भारत तर अशोकाच्या भारतापेक्षाही लहान आहे.

तूम्ही हिंदूत्वाला इतके संकुचित का करता? गांधींच्या या प्रश्नावरही गोडसेला काही उत्तर सापडत नाही.

नाटकाचा शेवट असगर वजाहत यांनी अप्रतिमरितीने केला आहे.

गांधी आणि गोडसे या दोघांचीही तुरूंगातून एकाच दिवशी सुटका होते. दोघे जेलच्या दारातून बाहेर पडून दोन दिशांनी चालायला सुरवात करतात. दोघांचीही एकमेकांकडे पाठ आहे.

अचानक गांधी थांबतात. गोडसेही थांबातात. मागे वळून न पाहता गांधी हात मागे करतात. गोडसे वळून गांधीकडे येण्यास निघालेला असतो…!

 

gandhi and godse featured inmarathi
hindi.thequint.com

 

सगळ्यांना परत गांधी विचारांकडेच परतावे लागते असा एक संदेश असगर वजाहत यांनी दिला आहे.

या नाटकाचा शेवट बदलून एक संहिता नुकतीच औरंगाबाद येथे सादर झाली. या बदललेल्या नाटकात शेवटी गोडसे गांधीवर गोळ्या घालतो व त्यांना मारतो असे दाखवले आहे.

आता जर हेच दाखवायचे तर नाटक संभवतच नाही, कारण मूळात गांधींना गोळ्या घातल्या गेल्या व त्यात त्यांचा मृत्यू झाला हे सत्य आहे.

यावर चर्चा करताना दिग्दर्शकाने मुद्दा उपस्थित केला होता की आज दाभोळकर-पानसरे-कलबुर्गी यांची हत्या केल्या गेली तो संदर्भ मला जोडावा वाटला.

त्याला प्रश्न विचारला गेला की दाभोळकर, कलबुर्गी हे ठीक आहेत पण ज्यांनी हिंसेचे समर्थन केले, ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्या कम्युनिस्ट चळवळीतल्या गोविंद पानसरे यांना गांधीविचारांच्या रांगेत कसे उभे करायचे?

आणि असे असेल तर हाही एक प्रकारे गांधी विचारांचा डाव्यांवर मिळवलेला विजय म्हणावा लागेल.

 

pansare dabholkar inmarathi
newindianexpress.com

 

असगर वजाहत यांच्या या नाटकाने तथाकथित डाव्या आणि उजव्या दोघांचीही गोची करून ठेवली आहे.

गरिबांसाठी काय करायला पाहिजे, असे विचारले असता गांधीजी म्हणाले होते, ‘गरीबांचे भले करण्याच्या नावाखाली त्यांच्या छातीवर तूम्ही बसला आहात. ते आधी उठा.’

आज विविध योजनांच्या नावाने गरीबांच्या छातीवर बसून आपला फायदा करण्यात नोकरशाही, डावे समाजवादी एनजीओ वाले आणि आता भाजपवालेही पुढे आहेत.

अमेरिकेत फेसबुकच्या कार्यालयास भेट दिल्यावर त्यांच्या भिंतीवर भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गांधींच्या अहिंसेचा विचार लिहावा लागला हाही एक काळाने उगवलेला सुडच म्हणावा लागेल.

दुष्यंतकुमार या हिंदी कविच्या ओळी फार सुंदर आहेत.

कल नुमाईश मे मिला वो चिथडे पहने हुए
मैने पुछा के नाम तो बोला के हिंदुस्थान है

सामान कुछ नही है फटेहाल है मगर
झोले मे उसके पास कोई संविधान है

एक बुढा आदमी है मुल्क मे या यु कहो
इस अंधेरी कोठरी मे एक रोशनदान है

अंधार्‍या खोलीत एक दिवा असावा असे महात्मा गांधी.

(हा लेख – उरूस, पुण्यनगरी मध्ये ४ ऑक्टोबर २०१५ – प्रकाशित झालेला आहे.)

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?