न करावी चिंता । भय धरावे सर्वथा ।। – जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ४

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ३

===

आबाने एकूण प्रकार पाहिला. तुकोबाच नव्हे तर तुकोबांच्या घरची सारीच मंडळी प्रेमळ आहेत, माया करणारी आहेत, त्यांचे “राहा” असे म्हणणे हे अत्यंत सहज स्वाभाविक आहे हे त्याच्या लक्षात आले. आपण काही प्रश्न मनात घेऊन आलो होतो. आधी तुकोबांच्या दर्शनाने शब्द फुटला नाही, मग देवळातील वातावरणाने भारावून गेलो. झाले हे बरेच झाले असे आता वाटत आहे. प्रश्न विचारला असता आणि उत्तर मिळाले असते तर तुकोबांच्या सहवासाची ही संधी आली नसती! पांडुरंगाच्या इच्छेने आलो म्हणावे आणि पांडुरंग म्हणेल तोवर राहावे असा निश्चय मग त्याने केला.

असे सोपे ठरवल्यावर मग संकोच गेला. भीड गेली. आपलेच घर. आनंदाने राहावे. दिसेल ते काम करावे. आंगण झाडावे. झाडांना पाणी घालावे. हे आणि ते. आबा रमला. घरात वायफळ गप्पा चालत नव्हत्या. तुकोबा कामाचं पण मोजकं बोलत. कान्होबांचे सर्वत्र लक्ष असे. आवलीबाई सर्वांचे सारख्या मायेने करीत. आपण त्यांना जड वाटतो आहोत अशी भावनाही आबाला स्पर्शेना.

हे सगळे छान झाले पण मुख्य विषयाची उकल होई ना. जात्यावरच्या आणि कांडणाच्या अभंगांचा अर्थ अजिबात लागेना. तुकोबांची काही वचने कानावरून गेली होती. ती सोपी, सुगम, अर्थवाही, आकर्षक वाटली होती. किंबहुना, तशी वचने ऐकूनच देहूला येण्याची ओढ लागली होती. आपल्या गावात आबा शेर होता. गावकऱ्यांच्या अशा शंका तो सहज सोडवी. कुणी फार बोलू लागला की त्याला चटकन गप्प करी. दाखले तोंडावर असत. कथा चुटक्यांची कमी नव्हती. त्याच्या गावात त्याचे खूप कौतुक असे. असे असले तरी आबा चढून जाणाऱ्यांपैकी नव्हता. इतरांच्या शंका सोडवल्या तर त्याच्याही मनात शंका उभ्या राहात. त्या सोडविणारा भेटत नव्हता. तुकोबांचे नाव अशात सारखे कानावर येत असे. ते आपल्या शंका नक्की सोडवतील असे वाटले म्हणून हा देहूचा रस्ता धरला होता. अनेक ज्येष्ठांनीही तसेच सुचविले होते.

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

तुकोबा भेटल्याचा आनंद आबाच्या मनात मावत नव्हता. इतका की साक्षात त्यांच्या घरी राहायला मिळते आहे ह्या आनंदाला मावायला अजून जागा नव्हती! पण त्या आनंदात चूर होऊन आपले मूळ काम विसरणाऱ्यांपैकी आबा नव्हता. झाले इतकेच होते की मूळ प्रश्न बाजूला राहिला होता आणि आपल्याला भाषा कळते असे जे थोडेफार वाटत होते त्या भावनेलाच तडा गेला होता.

जात्यावरचा अभंग ऐकताना तुकोबा सोपे नाहीत हे कळले होते, त्याची खात्रीच कान्होबांनी कांडणावरचा अभंग ऐकवून करून दिली होती. आपले आपण सोडवू असे हे प्रकरण नाही ह्याची आबाला मग खात्री पटली आणि त्याने पुन्हा कान्होबांचेच पाय धरले.

आबा कान्होबांना म्हणाला, “कान्होबा, ह्ये माजं माला उमगायचं न्हाय. तुमी शिकवा मला.”

कान्होबा म्हणाले, ” अहो, असा धीर सोडू नका. मी कसा शिकवू? मला तरी तशी सवय कुठे आहे?” आबा म्हणाला, “आसं नका म्हनू. येक येक ओळ सांगा. मी अर्थ सांगतु. तुमी चूक सांगा. पन, सुरवातीस थोडं सोपं सांगा.” कान्होबांनी ओळखले, हा काही सोडणार नाही.

ते म्हणाले, “आपण असं करू, तुम्ही म्हणता तर मी एका अभंगाची सुरुवात सांगतो. तिचा अर्थ तुम्ही लावा.”

न करावी चिंता । भय धरावे सर्वथा ।।

आबा विचार करू लागला. हे काय तुकोबांचे सांगणे? चिंता सोडा आणि कायमचे भयात राहा? असे कसे सांगतात? असे कसे सांगतील? छे! अशी एक एक ओळ घेऊन उपयोग नाही. पुरा अभंग पाहिला पाहिजे.

तो कान्होबांना म्हणाला, “येक ओळ न्हाई पुरत. समदा अभंगच सांगा, त्येच बरं.”

कान्होबा हसले, घ्या म्हणाले.

न करावी चिंता । भय धरावे सर्वथा ।।
दासां साहे नारायण । होय रक्षिता आपण ।।
न लगे परिहार । कांही योजावे उत्तर ।।
न धरावी शंका । नये बोलों ह्मणे तुका ।।

अभंग सांगून झाल्यावर कान्होबा म्हणतात, “आबा, सुरू करा आता अर्थ लावण्यास.”

आबा बोलेना. त्याला काही सुचेना. एका ओळीचा अर्थ लागला नाही म्हणून पुरा अभंग मागितला पण त्याने काहीच फरक पडला नाही. आता काय करावे?

आबाची घालमेल पाहिली आणि कान्होबा म्हणाले, “आबा, असे नाराज नका होऊ. दादांची म्हणून एक शैली आहे. ती कळायला थोडा वेळ लागेल. आम्हालाही काही एका दिवसात लक्षात आली नाही ती. आणि आजही एकादे वेळेस अडतंच. एक एक अभंग करीत गेलात की होईल सराव.

तुम्हाला पडलेला प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. ‘न करावी चिंता’ हे सहज कळते पण ‘भय धरावे सर्वथा’ हे कळले तरी पटत नाही! आबा, यांतील ‘न’ हा शब्द दोन्ही चरणांसाठी आहे! न करावी चिंता, ‘न’ भय धरावे सर्वथा असे आहे ते.

तुकोबांनी आपल्या चाहत्यांना एकदा केलेला उपदेश आहे हा. तुकोबांनी कुठे काही सांगितले की गावातली काही मंडळी त्याचा कीस काढू लागत, टिंगल करू लागत. दादांच्या भक्तांना राग येई. ते वाद घालू लागत. शब्दाने शब्द वाढे. एकदा हे प्रकरण फार माजले आणि तिकडच्या पक्षाने जाहीर वादाचे आमंत्रण दिले. हा वाद म्हणजे काही शास्त्रार्थ व्हायचा नव्हता! हे लक्षात आल्यावर दादांची माणसे दादांकडे येऊन प्रत्युतर कसे द्यावे हे विचारू लागली. तेव्हा दादा काय म्हणाले ते त्या अभंगात आहे.

दादांचे म्हणणे असे की, तुम्ही त्यांना भिऊ नका आणि चिंताही करू नका. तुम्ही भगवंताचे दास म्हणविता ना? मग तुमचा सांभाळ करणारा भगवंत आहे हे तुम्ही पक्के मनात धरा. तो स्वतः आपले रक्षण करील ही भावना सोडू नका.

आबा, पहिल्या कडव्यात दोन चरणांना ‘न’ सामायिक होता तर तिसऱ्या कडव्यात ‘न लगे’ हे दोन शब्द सामायिक आहेत! ‘न लगे’ परिहार, ‘न लगे’ काही योजावे उत्तर.

परिहार म्हणजे वादांत घेतले जाणारे आक्षेप आणि त्याचे होणारे निराकरण. तुकोबा म्हणतात, भार घेणारा भगवंत आहे हे एकदा मनात पक्के धरले की आक्षेप घेणे आणि उत्तर देणे हे काहीच करावे लागायचे नाही! किंबहुना, मी तुम्हाला जे सांगतो आहे त्यावर शंका घेऊ नका आणि काही बोलूच नका!

वादावादीची वाट सोडा हे सांगण्यासाठी, आबा, तुकोबांनी अशी रचना केली. आता कळली ना तुम्हाला?”

आबाने मान हलवली आणि एका क्षणाने म्हणाला, ” कान्होबा, तरी येक इचारतो. आपल्यास्नी कळावं म्हनून ‘न करावी चिंता । न भय धरावे सर्वथा ।।’ असे आपन करून घेऊ या का? सोपं हुईल. सर्वांस्नी कळेल.”

हे ऐकताच कान्होबांचा आवाज जरासा मोठा झाला आणि क्षणात ते उत्तरले:

“नाही, नाही! असे करायचे नाही! अहो, ही कवीच्या कामात ढवळाढवळ झाली! ती करणारे आपण कोण? आणि, असे केल्याने एक अभंग सुटेल पण कवी कळायचा राहील! मग बाकी अनेक अभंग अडतील! आता पाहा, असाच एक दुसरा अभंग आहे:

संतसंगती न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती ।।
मग तया दोषा नाही परिहार । होय अपहार सुकृताचा ।।
तुका ह्मणे नमस्कारावे दुरून । अंतरी धरून राहें रूप ।।

आबा, ह्यांतील पहिला चरण भाषेकडून बघा आणि अर्थ लावा. इथेही ‘न’ सामायिक आहे. संतांची संगत न करावी, संतांचा सहवास करू नये असे ज्याला वाटते तो कितीही सावध असला तरी एखादा गुणदोष त्याच्या अंगाला चिकटायचाच. तसे होऊ नये असे तुकोबांचे सांगणे आहे. गुणदोष हा शब्द येथे दोष ह्या अर्थीच आहे हे पुढील कडवे पाहिले की कळेल. तुकोबा म्हणतात संतसहवास टाळल्याने जो दोष लागेल त्याचा परिहार, म्हणजे निराकरण तर व्हायचे नाहीच पण आधी काही चांगले केल्याने जे जोडले असेल त्याचाही अपहार होईल, ते नष्ट होईल.

सर्वांनाच संतसंगती लाभेल असे नाही तेव्हा संतांची, भगवंताची प्रतिमा मनात धरावी आणि दुरून का होईना नमस्कार करावा. अर्थात, नम्र राहावे आणि दोष अंगाला लागणार नाहीत असे पाहावे.”

कान्होबांचे विवरण ऐकून आबाला समाधान झाले आणि तो आनंदाने गुणगुणू लागला…

न करावी चिंता । भय धरावे सर्वथा ।।

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?