' फळं विकून दिवसाकाठी १५० रु. कमवत, शाळेची इमारत बांधली; हेच खरे हिरो – InMarathi

फळं विकून दिवसाकाठी १५० रु. कमवत, शाळेची इमारत बांधली; हेच खरे हिरो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

२६ जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन. २६ जानेवारी हा दिवस विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला असतो. यात आणखी वेगळेपण असलेला कार्यक्रम म्हणजे पद्म पुरस्कारांचे वितरण.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २५ जानेवारीला पद्म पुरस्कारांची घोषणा होते. भारतातील विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी केलेल्या नागरिकांना पद्म पुरस्कार दिले जातात.

खरंतर पद्म पुरस्कार ‘भारतरत्न’ नंतर दिले जाणारे दुसरे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. त्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाऊ शकते. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण.

 

padma award inmarathi

 

यासाठी एक नामांकन समिती स्थापन केली जाते जी समिती पंतप्रधानांनी स्थापन केलेली असते आणि त्याद्वारे योग्य  त्या व्यक्तींची निवड  करून त्यांच्या नावाची घोषणा केली जाते.

यावर्षी सुद्धा अशा लोकांची निवड करून त्यांना पद्म पुरस्कार दिले गेले. त्यात सुरेश वाडकर, झहीर खान या व अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे मात्र त्यासोबतच काही अशा व्यक्तींचा समावेश आहे जे प्रसिद्धीपासून फार दूर आहेत मात्र त्यांनी केलेलं काम हे खूप मोलाचं आहे.

या वर्षी ११६ लोकांना पद्मश्री पुरस्कार दिला गेला आहे मात्र त्यात एक अशा अवलियाचं नाव आहे जो साधा फळवाला आहे मात्र त्याचं कार्य फार महान आहे.

हरेकाला हजाब्बा असे या महान माणसाचे नाव आहे. हे कर्नाटक मधील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या रोजच्या कमाईतून एक शाळा आणि एक माध्यमिक शाळा चालू केली आहे.

एखाद्या राजकारणी किंवा पैसे असणाऱ्या माणसाने शाळा चालू करणे आणि एखाद्या हातावर पोट असणाऱ्या माणसाने शाळा चालू करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तसेच ही शाळा चालू करण्याचे कारण सुद्धा हजाब्बा स्वतः आहेत.

 

harekala hajabba inmarathi

हे ही वाचा – पुण्याच्या या आयआयटीयन व्यक्तीने हॉलीवूड अॅनिमेशनचा चेहरामोहरा बदलून टाकलाय!

फळविक्रीचा व्यवसाय असल्याने हजाब्बा यांना प्रत्येक वेळी भाषेची गरज ही असतेच. असंच एकदा फळविक्री करताना हजाब्बा यांच्याकडे एक परदेशी माणूस खरेदीसाठी आला मात्र भाषेच्या अडचणीमुळे हजाब्बा यांना त्याला किंमत सांगता आली नाही आणि त्यामुळे विक्री झाली नाही.

विक्री झाली नाही यापेक्षा आपण इंग्लिश मधून संभाषण करू शकलो नाही, याचा त्रास हजाब्बा यांना झाला आणि यातूनच शाळा स्थापन करण्याची कल्पना आकारास येऊ लागली.

“जी अडचण मला संभाषण करताना आली ती अडचण माझ्या गावातील मुलांना येऊ नये” असे त्यांच्या मनाला वाटून गेले आणि त्यामुळे हजाब्बा यांनी शाळा स्थापन करण्याचे निश्चित केले.

खरंतर ज्या माणसाला उद्या किती कमाई होईल हे माहीत नाही, तो माणूस शाळा सुरू करायचं म्हणतो, त्याच्या जिद्दीला सलाम करण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरत नाही.

 

harekala hajaba inmarathi

 

ज्या गावात शाळा नव्हती त्या गावात रोज १५० रुपये मिळवणाऱ्या माणसाने शाळा सुरू केली. २००० सालापर्यंत साधारणतः शाळा उभी राहील इतपत पैसे हजाब्बा यांनी साठवले होते.

आणि त्यातूनच त्या गावात पहिली शाळा सुरू झाली ज्यात २८ मुलांनी आपले नाव नोंदवले होते. ही शाळा त्यांनी गावातील एका मदरसे मध्ये सुरू केली होती.

आणखी काही वर्षांनंतर आपला व्यवसाय सांभाळत, पैसे जमवत आणि कर्ज काढत हजाब्बा यांनी शाळेसाठी जमीन घेतली आणि त्यावर शाळेची इमारत बांधली. कोणतीही राजकीय शक्ती आणि सरकारी मदत नसताना हजाब्बा यांनी केलेला हा प्रयत्न खरंच वाखाणण्याजोगा आहे.

आता प्राथमिक शाळेनंतर हजाब्बा यांना वेध लागले माध्यमिक विद्यालय सुरू करण्याचे. यासाठी सुद्धा त्यांनी दक्षिण कन्नड या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन, तेथील सरकारी अधिकाऱ्यांना भेटून माध्यमिक शाळेच्या प्रस्ताव ठेवला आणि २००८ मध्ये त्या गावात माध्यमिक विद्यालय सुरू झाले.

 

harekala hajaba 2 inmarathi

 

आपल्याला जे मिळालं नाही ते गावातल्या लोकांना मिळावं या एकमेव हेतूने हजाब्बा ही खटपट करत होते.

एवढं करूनही हजाब्बा थांबले नाहीत. ते स्वतः शाळेच्या परिसराची साफसफाई करत. मुलांसाठी उकळलेल्या पिण्याच्या पाण्याची सोय करत. ज्या काही सोयी सुविधा शाळेसाठी कमी पडत होत्या त्या सर्व उपलब्ध करून देण्याचा हजाब्बा यांचा प्रयत्न होता.

यामागे त्यांचा एकच हेतू होता. गावातील मुले शिकून मोठी व्हावीत.

शाळा झाली, माध्यमिक विद्यालय झाले आता हजाब्बा यांचा गावात एक मोठे महाविद्यालय आणि मग युनिव्हर्सिटी सुरू करण्याचा मानस आहे. आपल्या गावातच मुलांना दर्जेदार उच्चशिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात आणि कोणाला बाहेर जायला लागू नये असा त्यांचा प्रयत्न आहे.

 

 

harekala hajaba 2 inmarathi

 

तसेच गावात सरकारी कॉलेज चालू झाल्यास कमी फी मध्ये शिक्षण उपलब्ध होईल असा त्यांचा विचार आहे.

खरंतर २०१५ मध्येच हजाब्बा यांचे नाव पद्म पुरस्कारासाठी केंद्रात पाठवले गेले होते मात्र काही कारणास्तव त्याची कार्यवाही होऊ शकली नाही. या वर्षी मात्र हजाब्बा यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

ज्या वेळी पुरस्कार घोषित झाले आणि हजाब्बा यांना गृहमंत्रालयातून फोन आला तेव्हा हिंदी भाषेची अडचण असल्याने त्यांना काय निरोप आहे हे समजले नाही. मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका माणसाने त्यांना पुरस्कार मिळाल्याचे सांगितले तेव्हा त्यांना फार आनंद झाला.

“या गोष्टीचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता मात्र मी आनंदी आहे” अशी त्यांची प्रतिक्रिया  होती.

जर माणूस एखादे काम निःस्वार्थ भावनेने करत असेल तर कुठेतरी त्याची परतफेड होतेच. अर्थात  हजाब्बा यांचं कार्य कोणत्याही पुरस्कारापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आणि मोठं आहे. मात्र यामुळे हजाब्बा यांचे कार्य आज देशभर पोचले आहे.

 

harekala hajaba 3 inmarathi

 

माणसाची इच्छाशक्ती तीव्र असली आणि हेतू शुद्ध असला की तो कोणतेही काम तडीस नेऊ शकतो याचे हजाब्बा हे मूर्तिमंत उदाहरण आहेत आणि आजही हा ६८ वर्षांचा माणूस हे कार्य अजूनही करत आहे. ते आपल्या सर्वांना प्रेरणादायी आहे हे निश्चित.

हरेकाला हजाब्बा तुम्ही खरंच महान आहात….सलाम तुमच्या या महान कार्याला!!!

===

हे ही वाचा – मराठवाड्याचा मांझी! या पठ्ठ्याने जे केलं ते थक्क करणारं आहे…

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?