'इतिहासाचा हा आढावा घेतल्याशिवाय "भारतीय प्रजासत्ताक" नेमकं काय आहे हे कळणं अशक्यच!

इतिहासाचा हा आढावा घेतल्याशिवाय “भारतीय प्रजासत्ताक” नेमकं काय आहे हे कळणं अशक्यच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम |

===

लेखक: शैलेंद्र कवाडे

===

भारतीय प्रजासत्ताक – एका आशेचा प्रवा

भारताला स्वातंत्र्य मिळून आता ७२ वर्ष उलटली, आणि भारत हा प्रजासत्ताक होऊन आज ७० वर्ष झाली. काळाच्या पट्टीवर ७० वर्ष ही काही फार मोठी खूण नाही. पण मागच्या अर्धशतकातील काळाचा वेग पाहिल्यास ही फार लहान रेषाही नाही.

 

india inmarathi
freepik

 

भारतीय प्रजासत्ताक, त्याचे संविधान, समजून घेताना, त्याच्या जन्माची हकीकत लक्षात घ्यावी लागते, त्याने ज्या भारत सरकार कायदा (Government of India act) ह्या कायद्याला बदलले, त्याबद्दल जाणून घ्यायला हवं कारण भारत आज जसा दिसतोय त्याचं बीज या कायद्यात आहे.

खासकरून ह्या कायद्यातील तीन चार गोष्टींकडे लक्ष वेधतो.

पहिली गोष्ट, ब्रिटिशांनी बर्मा किंवा आजचा ब्रह्मदेश या कायद्यान्वये भारतापासून वेगळा केला.

थोडक्यात आपण जिंकलेल्या या प्रदेशात आता जास्त काळ राज्य करणे फायद्याचे नाही, तेंव्हा टप्प्याटप्प्याने माघार घ्यायची हे ब्रिटिशांना कळून चुकले होते त्यामुळे शक्य होईल तितके तुकडे करून एक एक पाऊल मागे घ्यायचे हे ब्रिटिशांचे धोरण होते. (दुसऱ्या महायुद्धाने हे सगळंच बदललं तो वेगळा भाग) तसंच आफ्रिकेतील एडनसुद्धा याचं कायद्यान्वये (ब्रिटिश) भारतापासून वेगळं केलं गेलं.

दुसरं, मुंबई प्रांतातून सिंध वेगळा केला, म्हणजे धार्मिक आधारावर फाळणी करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले गेले.

याच कायद्यात, भारतीय संघराज्य तयार करण्याची शिफारस होती, म्हणजे भारताच्या मुख्य भूमीवर असलेल्या ब्रिटिश शासित प्रदेशाचे आणि संस्थानिक प्रदेशाचे एकत्रीकरण करणे.

हा एक मोठा निर्णय होता. थेट निवडणुका घेण्याचे सूतोवाचही याच कायद्यात होते, ज्याने जास्तीत जास्त भारतीयांना राज्यकारभारात प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता निर्माण झाली.

थोडक्यात आपण आज ज्याला भारतीय राष्ट्र म्हणतो, त्याची रूपरेषा त्या कायद्यात रेखली गेली. भारतीयांची राष्ट्रीय भावना मात्र त्याहून बरीच जुनी आणि बरीच कॉम्प्लेक्स होती.

 

India map 1 inmarathi
times knowledge

भारतीय संविधानात काय लिहिलंय ते सांगण्यात मला रस नाही, मात्र मला या प्रजासत्ताकाचा आणि भारतीय राष्ट्रीय भावनेचा प्रवास फार मनोरंजक वाटतो.

हा प्रवास सुरु होतो भारताच्या फाळणीपासून. भारत हा फार पूर्वीपासूनच अनेक धर्मीयांचा, अनेक वंशांचा, अनेक भाषांचा प्रदेश. त्या सगळ्यांना जोडणारा धागा म्हटलं तर होता म्हटलं तर नव्हता. ह्या धाग्याची वीण आपल्याला इतिहासात वेगवेगळ्या क्षणी, घट्ट आणि सैल झालेली जाणवते.

अत्यंत सुपीक असलेल्या या प्रदेशात अनेक वंशाचे लोक येऊन वसले. अनेक धर्म बाहेरून आले, काही इथे जन्म घेऊन जगभर पसरले.

भारतीयांना नवीन धर्म/पंथ या गोष्टीचे अप्रूप अजिबात नव्हते. किंबहुना जुन्या भारतीय भूमीत धर्म ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट होती. जुन्या भारतात राजसत्तेने धर्मसंस्थेला आश्रय जरूर दिला पण त्यासाठी युद्ध केल्याचे उदाहरण मात्र अगदीच विरळ असेल.

इस्लामचे भारतातील आगमन हे त्यादृष्टीने संपूर्ण वेगळे होते.

काही शतके हे नक्की काय घडतेय ते भारतीयांना कळलंच नाही. उत्तरेकडून दक्षिणेकडे झालेला या राजकीय धर्माचा भारतातील प्रवास उणापुरा आठ नऊ शतकांचा आहे. त्या काळात जे राजे इस्लामी/अरबी आक्रमकांशी लढले ते ना भारतीय म्हणून लढले ना हिंदू म्हणून. हे सगळे आपापले राज्य वाचवायला लढत होते आणि सरस युद्धतंत्र असलेल्या आक्रमकांकडून हरत होते.

तरीही भारतात इस्लाम रुजला खरा, पण जगातील इतर प्रदेशात जसा मूळच्या संस्कृतीला संपूर्ण नष्ट करून एकमेव धर्म म्हणून प्रस्थापित होऊ शकला तसं भारतात काही शतकांच्या राजकीय वर्चस्वाच्या काळातही होऊ शकलं नाही.

 

Jihad-in-Islam-inmarathi
urdumania.net

ह्याचे श्रेय जसे भारतीयांच्या प्रतिकाराला आहे तसेच अगदी घट्ट मूळ असलेल्या येथील संस्कृतीलाही आहे (यात जातीव्यवस्थाही आली).

जेव्हा भारत स्वतंत्र होणार हे नक्की झालं, तेंव्हा इस्लामी नैतृत्वाने स्वतःसाठी वेगळी भूमी तोडून मागितली. माझ्या मते इस्लामी नैतृत्वाची ही दुसरी सगळ्यात मोठी चूक होती. (पहिली चूक अर्थातच इस्लाम जसा होता तसाच स्वीकारणे आणि ठेवणे ही होती.) फाळणीने इस्लामी कट्टरवादापासून उर्वरित भारतीय समाजाची सुटका झाली आणि त्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त झाला.

फाळणी स्वीकारणे हा भारताच्या शांततामय भविष्याचा श्रीगणेशा होता.

पण खरं आव्हान तिथे सुरू होतं होते. जगाच्या लोकसंख्येचा मोठा भाग असलेला भारत स्वतंत्र झाला तेव्हा संपूर्ण युरोप किंवा संपूर्ण आफ्रिकेइतकाच सारखा किंवा वेगळा होता.

जर्मनी, फ्रांस, स्पेन आणि ब्रिटनमध्ये जितकं साम्य किंवा फरक आहे, तितकाच पंजाब, बंगाल, महाराष्ट्र आणि तामिळनाडूत होता.

काहीशे भाषा, हजार बोली, आठ दहा मोठे धर्म पंथ, शेकडो जाती यांत विभागलेले हे कडबोळे टिकेल, असं जगातील बहुसंख्य नेत्यांना वाटत नव्हतं.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या, इतिहासाने कलाटणी घेण्याच्या काळात जन्माला आलेली ही तात्पुरती व्यवस्था आहे आणि थोड्याच काळात हा देश फुटून वेगळी व्यवस्था निर्माण होईल असा अनेकांचा अंदाज होता. या देशाला ना खायला पोटभर अन्न होतं ना सीमेवर उभं राहायला पुरेसं सैन्य होतं.

आपली त्यावेळची परिस्थिती आफ्रिकेपेक्षा जास्त वेगळी नव्हती.

हा नवा देश, अजून फक्त प्रदेश होता. स्वातंत्र्य चळवळीत जागी झालेली राष्ट्रीय भावना हा बुडबुडा आहे की सत्य आहे हे अजून ठरायचे होते.

सुदैवाने भारतीय समाजाने त्यावेळी अत्यंत शहाणपणा दाखवला, जो बहुदा हा समाज शतकानूशतके दाखवतोय.

त्यानंतर घडलेली सगळ्यात मोठी क्रांती म्हणजे सशक्त भारतीय मध्यमवर्गाची निर्मिती. सरकारी धोरणं आणि नोकऱ्या यातून हा मध्यमवर्ग हळूहळू आकार घेत गेला. हा मध्यमवर्ग जसा आर्थिक परिस्थितीने मध्यम होता तसाच विचारांनीही मध्यममार्गी होता. क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर विश्वास ठेवणारा, होता होईल तितके मूल्यव्यवस्थेला घट्ट चिकटून असलेला पण त्याचबरोबर, हळूहळू का होईना मूल्यव्यवस्थेचे परीक्षण करू शकणारा सहिष्णू, अनाग्रही, प्रागतिक मध्यमवर्ग हा भारतीय प्रजासत्ताकाचा कणा ठरला.

या मध्यमवर्गाने भारतीय राष्ट्राची संकल्पना आपल्या पिढीत आणि पुढच्या पिढीत घट्ट रुजवली. सुरवातीला फक्त नागरी असलेला हा मध्यमवर्ग हळूहळू निमशहरी आणि ग्रामीण भागात पसरत गेला. सिनेमा आणि क्रिकेट बघत बघत भारत हळूहळू एकजिनसी होतं गेला.

आज भारतीय राष्ट्र हे एक शक्तिशाली वास्तव आहे. कोणत्याही राष्ट्राला/समाजाला असतील तितक्या सगळ्या समस्या याही राष्ट्राला आहेत. पण त्या समस्यांवर आपण मात करू, हा फार कमी राष्ट्रांकडे असलेला आशावाद भारतीय समाजात आहे.

आपल्या भाषिक, धार्मिक, वांशिक अस्मिता कुरवाळत असतानाच, भारतीय ही राष्ट्रीय अस्मिता सर्वोच्च आहे हे जवळपास सगळ्यांनीच मान्य केलंय. संघराज्य म्हणून राहत असताना आपापल्या प्रादेशिक अस्मिता जपण्याचे स्वातंत्र्य सरकारनेच दिल्याने त्या मिरवणे यांत काही नावीन्य राहिलेलं नाही आणि त्यामुळे अपवाद वगळता त्या राष्ट्रीय भावनेच्या आडही येतं नाहीत.

भारतीय समाजाची भौतिक प्रगती ही दैदिप्यमान नक्कीच नाही पण जिथून सुरवात केली होती, आणि जितक्या लोकसंख्येचा बोजा वाहायचा होता ते बघता वाईटही नाही.

ज्या देशात दोन पिढ्यांपूर्वी मिलो खावी लागायची, साखर रेशनवर मिळायची, घासलेट पुरवून वापरावं लागायचं, दूध सरकारी केंद्रात कार्ड दाखवून घ्यावं लागायचं तिथे आज दिसणारं चित्र नक्कीच सुखावह आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाच्या अंगणात हे प्रगतीचे वारे पोहचलेय असा दावा कुणीही करणार नाही, पण ते कधीतरी पोहचेल अशी शक्यता निर्माण करण्यात आपण नक्कीच यशस्वी ठरलोय.

जगातील सगळ्यात मोठी लोकशाही, अवाढव्य लोकसंख्येला काबूत ठेवू शकणारी, न्याय देण्याचा किमान आभास तरी तयार करू शकणारी प्रशासकीय यंत्रणा, एकमेकांत पाय अडकवून बसलेल्या आणि त्यामुळेच कुणालाही बेबंद होऊ न देणाऱ्या घटनात्मक व्यवस्था, अर्धवट विकली गेलेली पण कधीतरी चमक दाखवणारी प्रसारमाध्यमे आणि त्यांची खिल्ली उडवणारी मुक्त आंतरजालावरची मतमतांतरे ह्या आणि अशा अनेक घटकांचा ताळमेळ साधत भारतीय समाज आपल्या प्रजासत्ताकाच्या माध्यमातून एका आशादायी भविष्याकडे वाटचाल करतोय.

काळाच्या ओघात या प्रजासत्ताकाचा चेहरा बदलेलही. पण तो बदल चांगलाच असेल अशी आशा बाळगावी, असं चित्र सध्यातरी आहे.

शेवटी राष्ट्र ही एक संकल्पना आहे. घटना आणि कायदे ह्याही काल्पनिक संकल्पनाच आहेत. पण त्या संकल्पनांना “आपलं” म्हणतात ती हाडामासाची लोकं खरी आहेत. ह्या कल्पनांच्या साच्यात ज्या समाजाला बसवलं जातं तो समाज हे वास्तव आहे.

भारतीय समाजाच्या सामूहिक शहाणपणावर प्रचंड विश्वास असल्याने ह्या राष्ट्राचे भविष्य उज्वलच असेल असं आजतरी वाटतंय. या आशेसह एक एक पाऊल पुढे टाकतं राहणे हाच आजचा संकल्प असावा.

जय हिंद.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?