' भूकंपात १०८ तास ढिगा-याखाली अडकलेल्या या `मिरॅकल बेबी’ची गोष्ट वाचून तुम्हीही थक्क व्हाल…! – InMarathi

भूकंपात १०८ तास ढिगा-याखाली अडकलेल्या या `मिरॅकल बेबी’ची गोष्ट वाचून तुम्हीही थक्क व्हाल…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आयुष्य हा तीन अक्षरी शब्द असला तरीही त्याचा गाभा मोठा आहे. आयुष्य हे केवळ जगणं नाही, तर त्या संपूर्ण प्रवासात घेतलेले अनुभव, जोडलेली माणसं, केलेलं कार्य अशा अनेकविविध अंगांनी युक्त आहे.

अशा ह्या आयुष्यात वेळप्रसंगी काही चांगले वाईट अनुभव आपल्याला मिळतातच पण काही अविस्मरणीय आणि चमत्कारिक अनुभवांचीही त्याला जोड मिळते. अशीच एक हृदय हेलावून टाकणारी आणि प्रसंगी अप्रुप वाटेल अशी सत्यघटना आपण जाणून घेऊया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

३० ऑक्टोबर १९९३ ला पहाटे ३वा ५६ मिनिटांनी ६.४ रिश्टर इतक्या प्रचंड मोठ्या भूकंपाने लातूर आणि उस्मानाबादात हलकल्लोळ निर्माण केला. अगदी एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे सर्व इमारती क्षणार्धात जमीनदोस्त झाल्या आणि सगळीकडे पसरला तो एकच आक्रोश.

घरदार तर गेलंच पण निदान आपली हक्काची, रक्ताची माणसं तरी त्या ढिगाऱ्यात मिळतील अशा आशेने लोक इकडे तिकडे सैरावैरा पळत होते,आप्तस्वकीयांना शोधत होते. आशेला मरण नाही हेच खरं…!

 

latur earthquake inmarathi
the financial express

अर्थातच अशा ह्या भीषण परिस्थितीत मदतीला धावून आलं ते आपलं भारतीय सैन्य. सैनिक अपार कष्ट करून अक्षरशः शक्य होईल तितक्या माणसांना ढिगाऱ्याखालून वाचवण्याचा प्रयास करत होते. इतकंच काय तर अगदी मृत व्यक्ती, जनावरे इत्यादींनाही बाहेर काढून त्याचे योग्य विभागीकरण करत होते.

हळूहळू मृतदेहांच्या विघटन प्रक्रियेला सुरुवात होऊ लागली होती आणि त्यामुळेच त्याची दुर्गंधी आसमंतात पसरली होती. अशा ह्या सुन्न करणाऱ्या परिस्थितीत आकाशात घिरट्या मारणाऱ्या गिधाडांमुळे सगळंच खूप भयाण वाटत होतं.

एकीकडे बचाव कार्य सुरूच होतं, मृतदेहही बाहेर काढले जात होते मात्र त्यासाठी योग्य त्या सोयी आणि सामग्री यायला अवकाश होता. शेवटी उघड्या हातांनी कसलीही पर्वा न करता सर्व सैनिक कामात जुंपले होते. केवढी ती जिद्द आणि कार्याप्रती निष्ठा!

लेफ्टनंट कर्नल सुमीत बक्षी हेही ह्या कार्यातील महत्वाचं व्यक्तिमत्व होतं. साधारण २ दिवस प्रवास करून ते घटनास्थळी पोचले. समोर दिसणारं छिन्नविछिन्न चित्र हे अस्वस्थ करणारं होतं पण कमजोर पडतील ते सैनिक कसले. त्यादरम्यान जे अकल्पित घडलं ते मात्र एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीए.

लेफ्टनंट कर्नल बक्षी हे एकदा जेवत असताना एक मध्यमवयीन जोडपं त्यांना भेटायला आलं. टेकडीजवळ त्यांचं घर होतं आणि भूकंपामुळे ७ घरं आणि एक मंदिर इतका भला मोठा ऐवज त्यांच्या घरावर पडला होता.

त्यातून ते कसेबसले निसटले, मात्र आपल्या १८ महिन्यांच्या लाडक्या लेकीला बाहेर आणण्यास ते अयशस्वी ठरले. ५ टीम्स येऊनसुद्धा त्या पिल्लाचा काहीच शोध लागला नव्हता आणि म्हणूनच निदान तिचा मृतदेह मिळवायला बक्षींनी मदत करावी अशी त्यांची इच्छा होती.

त्या जोडप्याच्या मनातली घालमेल आणि डोळ्यात दिसणारा बक्षींवरील विश्वास, ह्यामुळे लेफ्टनंट लगेच मार्गस्थ झाले.

घटनास्थळी पोहोचल्यावर सर्वप्रथम त्यांनी लोखंडी कॉटचा शोध घेण्यास सुरुवात केली जिथे ते जोडपं झोपलं होतं आणि त्याखाली ते १८ महिन्यांचं पिल्लू. अर्थातच पिनी. त्या प्रचंड ढिगाऱ्याखाली लेफ्टनंट बक्षींना कॉटचा एक पाय दिसून आला. त्यांनी लगेच तिथे छिद्र तयार करायला सुरुवात केली.

 

miracle baby inmarathi
pune mirror

 

मानवी शीर सहज आत जाऊ शकेल ह्या आकाराचं ते छिद्र तयार झालं खरं परंतु त्यांच्या चमूपैकी कोणालाही त्यातुन पूर्णपणे आत जाणं शक्य होत नव्हतं. बक्षी २० वर्षांचे आणि शरीराने सडपातळ असल्यामुळे त्यांनी स्वतःहून आत जाण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू सरकत सरकत ते आत शिरू लागले.

हाताने आसपासच्या गोष्टींचा अंदाज घेत चाचपडू लागले. तेवढ्यात त्यांच्या हाताला थंड शरीराचा स्पर्श झाला आणि एक अनामिक भीती क्षणभर दाटली. खरंतर पिनी जिवंत असण्याची आशा एकालाही अगदी तिच्या जन्मदात्यांनाही नव्हती, पण काय आश्चर्य.

बक्षींनी त्या देहाला हातानी वर खेचण्याचा प्रयत्न करताच त्या तान्हुलीचं खोकणं त्यांच्या कानी आलं अन् त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्यांनी त्वरित तिला जवळ घेत ऊब दिली. तब्बल १०८ तास ते १८ महिन्यांचं बाळ ७ घरांच्या ढिगाऱ्याखाली फक्त त्या कॉटमुळे वाचलं होत.

“बच्चा जिंदा है” हेच उद्गार त्यांच्या तोंडून निघाले आणि आणि हि बातमी वाऱ्याच्या वेगाने गावभर पसरली आणि मग काय विचारता. ह्या चमत्काराला बघायला बघता बघता गाव गोळा झालं अन् संकटात अजून वाढच झाली. इतक्या प्रचंड संख्येने गोळा झालेल्या जमावामुळे बक्षी आणि त्यांचे अन्य दोन साथी आणखी आत सारले गेले.

शेवटी पोलीस बटालियननी परिस्थतीवर ताबा मिळवत त्या २ जवानांना बाहेर यशस्वीरीत्या बाहेर काढलं. जेव्हा बक्षींना बाहेर काढायची वेळ अली तेव्हा बक्षी मात्र ठाम होते. मुलीसकटच बाहेर येण्याचा त्यांचा निर्णय पक्का होता.

miracle baby 2 inmarathi
the better india

 

शेवटी दोघंही सुखरूप बाहेर आले. बाहेर येताच बक्षींनी पिनीला तिच्या आईच्या हातात सुपूर्त केलं आणि सर्वांचेच अश्रू दाटून आले अन् पावसाच्या धारांप्रमाणे सर्वांच्या अश्रुधारा वाहू लागल्या. पिनीला वाचवणारे बक्षी जरी असले तरी त्यावर नक्कीच एक दैवी शक्ती असून बक्षी फक्त माध्यम होते असं ह्या रक्षणकर्त्याचं मत होतं.

ह्या मिरॅकल बेबीला दत्तक घ्यायला अनेक परदेशी जोडपी इतकंच नव्हे तर खुद्द बक्षीही तयार होते. बक्षींनी तिला प्रियांका हे नाव दिलं आणि ते त्यांच्या पुढील प्रवासाला लागले. कामानिमित्त त्यांच्या दर दोन वर्षांनी बदल्या होत असत आणि तरीही पात्रांद्वारे त्यांचा ह्या कुटुंबाशी जवळजवळ ४ वर्ष संपर्क होता.

प्रियांकाचे आईबाबाही त्यांना तिची क्षेमकुशलता कळवत आणि फोटो पाठवत असत. हळू हळू दिवस लोटू लागले आणि तीचं कुटुंब पुनर्वसनात व्यस्त होत होतं आणि सततच्या बदल्यांमुळे बक्षींचाही संपर्क खंडित झाला होता. दरम्यान बक्षींचंही लग्न झालं.

 

miracle baby 1 inmarathi

 

पुढे तब्बल २५ वर्षांनी म्हणजेच २०१६ ला पुण्यात दाखल झाल्यावर त्यांच्या पत्नीने त्यांना, ”प्रियंकाला का शोधत नाही?” असा प्रश्न केला आणि तो प्रश्न त्यांच्या डोक्यात स्थायिक झाला, परंतु कामाच्या व्यापात हे कुठेतरी मागेच राहिलं.

एकदा त्यांचं त्यांच्या सहकार्याशी बोलणं होत असता त्याला लातूर मध्ये घर घायचंय आणि तो तामिळनाडूचा असल्याचं बक्षींना कळलं आणि त्याला प्रियांका म्हणजेच मिरॅकल बेबी बद्दल काही माहिती आहे का अशी विचारणा केली.

त्याने त्वरितच तिच्याशी संपर्क करत बक्षी भेटल्याचं कळवलं आणि तिला वाचवणारा तो देव म्हणजे आपले साहेबच आहेत हे ऐकून तो चकित झाला. “तू ज्या माणसाला अनेक वर्ष शोधतेयस ते माझे साहेब आहेत आणि त्यांनाही तुला भेटायचंय” असा निरोप त्याने तिला दिला.

२५ वर्षांनी एकमेकांना भेटल्यावर कोणाच्याच तोंडून शब्द फुटत नव्हते. ओघळत होते ते फक्त अश्रू. १८ महिन्यांचं बाळ ते आता २५ वर्षांची विवाहिता असा हा तिचा प्रवास बक्षींना विस्मयकारक होता.

 

miracle baby 3 inmarathi
the better india

 

तिचे वडील काही महिन्यांपूर्वी देवाला प्रिय झाल्याचेही त्यांना समजले आणि सध्या प्रियांका गावच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याचं कळल्यावर त्यांना तिचा अभिमान वाटला.

२५ वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगांमुळे त्यांच्यात अतूट नातं निर्माण झालं जे त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना महत्वाचं आणि प्रिय असणार होतं. ती त्यांची पहिली कन्याच होती जणू…..

असा एखादा प्रसंग अनुभवणं हे खरंच शब्दबद्ध करण्यापलीकडचं असतं , ते फक्त अनुभवताच येतं, नाही?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?