' इरफान पठाणच्या निवृत्तीची 'दखल' घेणं विसलेल्या लोकांसाठी...

इरफान पठाणच्या निवृत्तीची ‘दखल’ घेणं विसलेल्या लोकांसाठी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक: सौरभ गणपत्ये

===

इरफान पठाणाची निवृत्ती दखल घ्यावी अशी नाही याचीच दखल घेण्याची मोठी गरज आहे.

मानसिक गोंधळ म्हणजे काय? आणि तो होऊ नये म्हणून कशी वैचारिक स्पष्टता हवी? तरीही जर गोंधळ उडाला तर काय करावं या प्रश्नांचा सामना अनेकांना करावा लागत असतो. नव्हे तो प्रत्येकाने करावा.

आपण काय आहोत आपण काय करतोय, आपल्याला काय जमेल? जे करायला जाणार आहोत, ते साध्य होणार आहे का? जर साध्य करण्याची आपली शारीरिक आणि मानसिक कुवत असेल तर आपली आर्थिक कुवत आणि कौटुंबिक कुवत आहे का (कारण अनेक मोठ्या निर्णयांच्या व्यावसायिक लढाया या कौटुंबिकही असतात).

असा विचार करायची वेळ येणं हीच मोठी गोष्ट. तो विचार करून त्यात उतरणं हे पुढचं मोठं काम आणि त्यात यशस्वी होणं हे खराखुरा मुकुट. पैकी पहिल्या दोनात इरफान पठाण दखल घ्यावी असा ठरला, पण तो जर यशस्वी झाला असता तर शाळेतल्या मुलांना पुस्तकात धडा असावा इतका मोठा तो झाला असता.

एक मोठा आयकॉन होता होता इरफान राहून गेला आणि त्याला सर्वस्वी तोच जबाबदार आहे कारण त्याने या सगळ्याची उत्तरं शोधूनही त्यावर अंमल नाही केला.

इरफान पठाणबद्दल सांगायची वेळ आली कारण गोंधळलेल्या मानसिकतेचा तो बळी ठरला. भारतीय क्रिकेटला दिलेले काही चमकदार क्षण यापलीकडे इरफान जाऊ शकला असता, पण त्याने ते नाही केलं.

 

irfan pathan inmarathi
hindustan times

 

इरफान पठाण ही अतिशय प्रेरणादायी कथा आहे हे मानावं लागतं. १९ वर्षांचा असताना हा मुलगा भारतीय संघात आला. तो राहणारा बडोद्याचा आणि ते साल होतं २००४.

गुजरात दंगलींनी देशाच्या मानसिकतेवर अनेक वर्ष राज्य केलं आणि ते इतकं घाणेरड्या पद्धतीने केलं की देशभरात आत्तापर्यंत कुठेही दंगल घडलीच नाही अश्या अविर्भावात त्याचं वार्तांकन झालं.

दंगलींच्या कहाण्या शंभर टक्के खऱ्या होत्या पण त्याच्या सततच्या माऱ्यातून दोन गोष्टी घडल्या, एकतर अनेक खटले मार्गी लागले आणि दुसरं म्हणजे दंगलींच्या वार्तांकनातून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला नको तेवढं छळलं जाऊन पुढे एका मगरीचा डायनासॉर झाला.

या पार्श्वभूमीवर ‘इरफान पठाण’ नावाचा एक तरतरीत मुलगा भारतीय संघात येतो वर डाव्या हाताने बऱ्यापैकी वेगात बॉल टाकतो ही गोष्टच प्रचंड दिलासादायी होती.

२००३-०४ च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात इरफानने गोलंदाजी सुरु केली. सिडनीला त्याने चौथ्या डावात अतिशय सुंदर पद्धतीने पॉंटिंगला पॅव्हेलियनमध्ये धाडलं. त्यादिवशी जर स्टीव्ह बकनोर आणि बिली बावडेन जर भांग प्यायल्यासारखे उभे नसते राहिले तर २००४ चा दौराच आपण २-१ ने मारून आलो असतो.

 

irfan pathan 2 inmarathi
crictracker

 

पुढे एकदिवसीय सामन्यात त्याचा बॉल मार्क मार्व्ह्यूलान नावाच्या फलंदाजाच्या हेल्मेटमध्ये बेमुर्वतखोरपणे घुसला, आणि फलंदाज कोसळला. आजपर्यंत हे फक्त जवागल श्रीनाथला जमलं होतं (मेरिक प्रिंगल, सनाथ जयसूर्या).

त्याच मालिकेत उभा आडवा मॅथ्यू हेडन नावाचा दैत्य सरळ चार पावलं (म्हणजे जवळपास अडीच मीटर) त्याला फेकून द्यायला लागला तेव्हा त्याने १४० पेक्षा अधिक वेगाने बॉल टाकत हेडनला मागे कॅच द्यायला भाग पाडलं. त्याक्षणी त्याने चेहऱ्यावर जी आक्रमकता दाखवली आणि दात ओठ खाऊन उंच उडी मारली ती अंगावर अक्षरशः शहारा आणून गेली होती.

एक भारतीय गोलंदाज असं काही करू शकतो हेच अविश्वसनीय होतं,आणि त्याहीपलिकडे भारतासाठी हे करून दाखवणारा मुलगा दंगलीत होरपळलेल्या भागातून आला आहे ही भावना अत्यंत दिलासादायक होती. एका मुलाखतीत त्याने अतिशय अडखळत ‘माझे वडील मशिदीत साधी कामं करायचे’ असं सांगितलं होत.

 

irfan pathan 3 inmarathi

 

पुढचा पाकिस्तान दौराही त्याने व्यवस्थित गाजवला. पण त्या दौऱ्यात एक वाईट गोष्ट शिरली जिने पुढे घात केला. दुसऱ्या कसोटी सामन्यात इरफान फलंदाजीला आला तेव्हा स्कोरबोर्ड अक्षरशः केविलवाणा होता. उमर गुलने व्यवस्थित अब्रू लुटली होती. त्यासमोर फक्त युवराजसिंग उभा होता.

इरफान पठाणने पहिली धाव काढायला किती चेंडू घेतले ठाऊक आहे? १० नाही २० नाही तर तब्बल ४९. अक्षरशः मान खाली घालून प्रचंड एकाग्र चित्ताने त्याने डावखुरा राहुल द्रविड असल्यासारखी फलंदाजी केली.

तो सामना पाहायला त्याचे आई-वडील आले होते. मुलाबद्दलचा अभिमान वडिलांच्या चेहऱ्यावरून अक्षरशः ओसंडून वाहत होता.

अचानक स्फोट व्हावा तसा इरफान ४९ वर बाद झाला. त्यावेळी बसलेला धक्का आणि लागोपाठची निराशा वडिल्यांच्या चेहऱ्यावर पसरली इतकी की त्यांनी चेहरा अर्धा झाकून घेतला.

झाला तेवढा प्रकारही काही कमी नव्हता. जिगरबाज खेळाडू म्हणून इरफानबद्दल बोललं जाऊ लागलं. एकदा एका पत्रकाराने त्याचा उल्लेख पठाण म्हणून केला. तेव्हा ‘त्याचं नाव इरफान पठाण नव्हे तर इरफान खान पठाण आहे’, असं त्याची आई त्याच्याबद्दल अभिमानाने सांगत होती.

पण आधी नमूद केल्यामुळे घातपाताला सुरुवात झाली होती. ग्रेग चॅपेलचा काळ आला आणि कारकिर्दीच्या त्या टप्प्यावर इरफान फलंदाजीतही रस घेऊ लागला. ग्रेग चॅपेलने भारतीय संघाबरोबर उंदरांवर करतात तसे प्रयोग केले.

त्याने इरफानला वनडेत तिसऱ्या नंबरवर पाठवायला सुरुवात केली. इरफान फलंदाजीचा आनंद लुटू लागला. एका सामन्यात साक्षात सचिन तेंडुलकरला त्याने समोर उभा करून ठेवला. म्हणजे सचिन ६१ चा ६८ वर येईपर्यंत यानेच साठी ओलांडली.

 

irfan pathan 4 inmarathi

 

क्रिकेट हा गेली काही दशके विकृत खेळ आहे. आता अधिक प्रेक्षक यावेत म्हणून मैदानाचा आकार लहान होतो. त्यातून चौकार षटकार अधिक बसतात. बॅट्सचा दर्जा प्रचंड बदलला आहे. त्यामुळे त्यात भर पडली आहे.

त्याच बाजूला चेंडूचा दर्जा गोलंदाजांविरुद्ध जात आहे. शिवाय वनडेत आता दोन्ही साईडने बॉल नवीन असल्याने तो जुनाच होत नाही तेव्हा बॉलर्सचा अन्नदाता असणारा जुन्या बॉलचा रिव्हर्स स्विंग वनडेत मरून गेला आहे.

४३८ चा पाठलाग आफ्रिकेने केला ती फलंदाजांची दिवाळी आणि गोलंदाजांची प्रेतयात्राच होती. पण याबद्दल कोणी काही बोललं नाही. अजूनही गोलंदाज तयार होतायत त्या मुलांच्या भलेपणाची गोष्ट आहे.

आपल्याकडे सेहवाग निवृत्त झाल्यावर जवळपास सगळ्यांनी अग्रलेख लिहून मानवंदना दिली आणि कपिलदेवनंतर आपला सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज असणारा झहीर खान चारच दिवसांनी निवृत्त झाला हे कोणाच्याही गावी नव्हतं. कारण बॅट्समन धावांची भीक मागतोय असा सामनाच लोकांना आवडत नाही.

बॅट्समन म्हणून मिळणारी कीर्ती इरफानच्या डोक्यात गेली आणि तो तिथून ढेपाळला. त्याचा एकेकाळी १३५ पुढे असणारा वेग ११२-११६ वर आला. तो आला की विकेटकिपर स्टम्पला येऊन चिकटायला लागला.

एकदा त्यानेच वैतागून विचारलं, मी गोष्टी नक्की किती करायच्या? बॅटिंगही करायची फिल्डिंगही आणि १४० ने बॉलही टाकायचा काय? मलाही मर्यादा असतात. २००६ च्या पाकिस्तान दौऱ्यात पहिल्या दोन कसोटीत त्याचा बॉल पोहोचतही नव्हता. आफ्रिदीने त्याला सरळ सलग चारदा बाहेर भिरकावून दिला होता.

वेळ इतकी वाईट आली की, आफ्रिदीचा स्वतःचा सहा पावलं धावत येऊन टाकलेला फास्टरवन (भले तो फेकी होता) हा इरफानच्या वीस पावलांच्या रन अपने टाकलेल्या चेंडूपेक्षा वेगात येत असे. शेवटच्या कसोटीत त्याने पहिल्या डावात हॅट्रिक घेतली. त्या दौऱ्यात पुढे तो बऱ्यापैकी चमकला.

सप्टेंबर २००७ ते जानेवारी २००८ हा त्याचा खराखुरा श्रावण भाद्रपद. २००७ च्या टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. अंतिम सामन्यात तो सामनावीर होता.

 

t20 inmarathi

 

पुढे ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ कसोटीत दोन्ही डावात मिळूत पाच बळी (रुद्रप्रताप सिंग ७ बळी) आणि दोन्ही डावात उत्तम बॅटिंग यामुळे भारताने अक्षरशः इतिहास घडवला. हा खेळाडू सामनावीर झाला.

त्यांनतर त्याला शोधावा लागतो. कारण आपल्याकडे सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे अजस्त्र फलंदाज असताना आणि वेळीवखतीला अनिल कुंबळे किंवा हरभजनसिंग कमी येत असताना आपली मुख्य गरज एका टेरिफिक गोलंदाजाची होती.

त्या बॅटिंग लाईनमध्ये इरफान पठाण कुठेच बसत नव्हता आणि गोलंदाजीत तो मागे पडायला लागला.

पुढे तो अधूनमधून येत राहिला आणि बाहेर जात राहिला. २०१३ साली सचिनने १०० वं शतक केलं त्या सामन्यात बांगलादेशने सर्वात जास्त यालाच मारला आणि मॅच काढून नेली. पडलेले खांदे, उतरलेला चेहेरा पाहवत नव्हता.

 

irfan pathan ipl inmarathi
firstpost

 

आयपीएलमध्ये तो खेळत राहिला… खेळत राहिला. एकदाचा तो संपला आणि बाहेर पडला. एका अतिशय भन्नाट पद्धतीने सुरु झालेल्या कहाणीचा असा अंत झाला. कुवत असूनही तो झहीरची बरोबरी नाही करू शकला. वेळेत लग्न होणं हे खेळाडूसाठी अतिशय महत्वाचं असतं. याने त्यालाही उशीर केला.

ज्याच्यावर पुस्तकात धडा सोडा सिनेमा निघू शकला असता त्याची कोणी दखलही नाही घेतली.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?