' मुंबईच्या वेश्याव्यवसायाला वळण लावत, नेहरूंनाही निरुत्तर करणाऱ्या लेडी डॉनची कथा...

मुंबईच्या वेश्याव्यवसायाला वळण लावत, नेहरूंनाही निरुत्तर करणाऱ्या लेडी डॉनची कथा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शिर्षक वाचून चक्रावलात ना?

नेमका कोणता डॉन? डी कंपनीचा की अन्य कोणता? मग कामाठीपुराचा काय संबंध? असे अनेक प्रश्न पडले असतील ना?

गोष्ट म्हटली की आपल्याला आठवते ती राजकन्या आणि तिला संकटातून वाचवणारा तिचा राजकुमार. पण आपण आज अशी गोष्ट जाणून घेऊया जिथे राजकुमारच राजकन्येला अंधाराच्या खाईत ढकलतो आणि त्यातून जन्माला येते ती एक निर्भीड स्री आणि नंतर पसरतं ते तिचं राज्य!

आता याच निर्भीड स्त्रीच्या आयुष्यावर सिनेमा येत आहे ज्यात आलिया भट मुख्य भूमिकेत दिसत आहे तर अजय देवगण विजयराज सारखे कलाकार आहेत, नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे, चला तर मग खऱ्या आयुष्यातील गंगुबाई बद्दल जाणून घेऊयात…

 

अर्थातच जाणून घेऊया ‘कामाठीपुराची डॉन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगा हरजीवनदास काठियावाडी उर्फ गंगुबाईंबद्दल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

इसवीसन १९४० दरम्यानची ही गोष्ट. त्याकाळात एखाद्या सर्वसामान्य मुलीच असतं तसं गंगेच आयुष्य होतं. घरात वकिली आणि शिक्षणाचं वातावरण असल्यामुळे गंगेचे वडील तिच्या शिक्षणासाठी आग्रही होते. गुजरातमधल्या काठियावाडीसारख्या ग्रामीण भागात हा पुढारलेलाच विचार म्हणावा लागेल.

 

 

तर अशा या घरात प्रवेश झाला तो म्हणजे रमणिकलाल ह्या वीसवर्षीय पात्राचा. अकाउंटंट म्हणून तो गंगेच्या वडिलांच्या हाताखाली रुजू झाला होता. तारुण्यसुलभ वयात एखाद्या मुलीच्या मनात जशा भावना निर्माण व्हाव्यात तसंच काहीसं गंगेचं झालं .

सुरुवातीला नुसतीच ओळख, मैत्री, मग काही ना काही कारण काढून भेटणं आणि मग चक्कं प्रेमात पडणं.!

 

शिक्षणात गंगूला फार रस नव्हता. सर्वांना आपल्या मायाजालात यायला खुणावणारी मायानगरी मुंबई गंगूलाही खुणावत होती. सिनेतारकांच्या चमचमत्या जगात तिला स्थान मिळवायचं होतं. खरंतर ते तिचं एकमात्र स्वप्न होतं.

आणि अशातच रामणिकने मदतीचा हात पुढे केल्यावर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. लग्नाला अर्थातच घरून विरोध असणार हे अध्याहृत होतं. म्हणून गुपचूप मंदीरात लग्न करून ह्या प्रेमी युगुलाने मुंबईस प्रस्थान केलं.

 

 

गंगेला हे अगदी स्वप्नवतच वाटत होतं. पहिले काही दिवस सुखात चालले होते. अचानक तिच्या सुखाला जणू ग्रहण लागलं. “काही दिवस माझ्या मावशीकडे राहायला जा” असं सांगून चक्क तिच्या नवऱ्याने तिची फसवणूक केली होती आणि तिला ५०० रुपयांसाठी दलालाला विकलं होतं.

ही गोष्ट समजताच गंगेला काही कळेनासं झालं. अगदी मन बंड करून उठलं. पण आता वाली कोणीच नव्हता आणि मागे फिरणंही जवळजवळ अशक्यच होतं . तिच्या परीने तिने विनवण्याही करून पहिल्या पण तेही प्रयत्न निष्फळ ठरले.

 

 

आता वेळ आली होती ती सत्य स्वीकारण्याची. घरी गेलं तरी घरच्यांनी तिला उभं केलं नसतं आणि इतर बहिणींची लग्नसुद्धा अजून व्हायची होती. त्यामुळे आता हेच आपलं घर आणि आयुष्य हे तिनं मनाशी घट्ट केलं.

गंगू तिच्या कामात उत्तम होतीच. इतकंच नव्हे तर कामाच्या योग्य मोबदलाही ती मिळवत होती. तिचं रुप आणि हिंमत यांमुळे एव्हाना तिची ख्याती कामाठीपुऱ्यात पसरू लागली होती. असेच एके दिवशी एक पठाण ग्राहक म्हणून तिच्याकडे येऊ घातला. माणूस कसला ,तो तर एखाद्या रानटी जनावरापेक्षाही अमानुष होता.

 

त्याच्या पाशवी अत्याचारांमुळेच परिणामी गंगेला इस्पितळात भरती व्हावं लागलं. स्री ही जणू उपभोगायची वस्तूच असावी अशी वागणूक तिला मिळाली होती अन त्याच्या ह्या निर्दयी कृत्यामुळे तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती.

बरीच माहिती काढल्यावर त्या कुख्यात गुंडांचे अब्दुल करीम खान उर्फ करीम लाला ह्या गॅंगस्टरशी लागेबांधे असल्याचं तिला समजलं आणि ती थेट जाऊन त्यांना भेटली.

 

 

गुंड असला तरीही स्त्रियांबाबत त्याची वागणूक बरी होती. घडलेला प्रकार गंगेने त्याच्या कानी घातला आणि त्याच्याकडून अभय मिळवलं. आज पहिल्यांदा तिला एखाद्या पुरुषामध्ये “माणूस” दिसला होता.

क्षणाचाही विलंब न करता , त्या रक्षणकर्त्याला तिने राखी बांधली आणि ती बनली साक्षात करीम लालाची बहीण. आता काय कोणाची बिशाद होती तिला त्रास द्यायची.!

 

 

हळूहळू ह्या नात्यामुळे तिचं वर्चस्व निर्माण झालं. एक दरारा निर्माण होऊ लागला. आपल्याला हातात आलेले अधिकार कसे वापरावेत हे माणसाच्या मनोवृत्तीवर असतं. आपल्या गंगेने त्याचा जमेल तितका चांगला वापर केला.

तिच्यासारख्या मनाविरुद्ध ह्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या स्रीयांना तिने अभय देत मुक्त केलं. मात्र स्वेच्छेने ह्यात अर्थार्जन करणाऱ्यांना नेहमीच पाठिंबा देऊन त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली.

वेश्याव्यवसायाविरोधात चळवळी उभ्या राहिल्या तेव्हा त्याच्या निषेधासही गंगुबाई ठामपणे उभ्या ठाकल्या आणि आपली बाजू स्पष्टपणे मांडली.

 

 

खरंतर स्री ही फक्त उपभोगायचे वस्तू नाही तर तिलाही मान-सन्मान आहे तसेच आज जशी समाजात इतरांना समान वागणूक मिळते तशी ह्यांनाही ओळख आणि मानाची वागणूक मिळावी ह्याबाबत त्या आग्रही होत्या.

आज ह्या स्त्रियांमुळे नाही म्हटलं तरी काही प्रमाणात बाहेर स्त्रियांवर होणारे अत्याचार कमी होतात असा त्यांचा परखड मत होतं.

वेश्या व्यवसायातल्या ह्या खंबीर स्रीने पं.जवाहरलाल नेहरुंची भेट घेत विक्रम नोंदविल्याचा उल्लेख “Mafia Queens of Mumbai ” ह्या हुसेन झैदी ह्यांच्या पुस्तकात मिळतो.

भेटीदरम्यान नेहरूंनी गंगुबाईंना सहज विचारलं, “तुम्ही ह्या व्यवसायाऐवजी एखादी चांगली नोकरी किंवा नवरा का नाही शोधलात?” त्यावर त्या पटकन म्हणाल्या, ” तुम्ही तयार असाल तर मी लग्नाला तयार आहे.” ह्यावर नेहरु वैतागले पण गंगुबाई विनम्रपणे उत्तरल्या ; ”एखादी गोष्ट बोलायला जितकी सोपी तितकीच करायला कठीण . ”

 

 

खरंच.. त्या एका वाक्यात त्या बरंच काही सांगून गेल्या होत्या. आज आपल्या देशात वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक जणी आहेत. काही स्वतःहून आलेल्या तर काही नाईलाजाने . परंतु समाजाची त्यांच्याकडे बघण्याची नजर मात्र आज एकविसाव्या शतकातही किळसवाणी आहे.

त्यांचं काम कदाचित आपल्या मूल्यांना धरून नसेलही , म्हणून इतर माणसांना जी वागणूक मिळते तीही आपण त्यांना देऊ नये? खरंतर अंतर्मुख करायला लावणारं असं हे भीषण सत्य आपण समोरून पाहूनही नजरेआड करतो.

ही परिस्थिती बघितली की मन विषण्ण होतं. पण अशा महिलांसाठी, त्यांच्या निरागस मुलांसाठी काम करणाऱ्या समाजसेवकांना पाहिलं की माणुसकी जिवंत असल्याची जाणीव होते.

अगदी गंगुबाईंनीसुद्धा अशा अनेक अनाथ मुलांचा सांभाळ केल्याचा म्हटलं जातं . म्हणूनच कामाठीपुऱ्यातल्या घरोघरी त्यांना देवासम मानलं जातं आणि घरा-घरांत त्यांची तसबीर दिसून येते.

गंगुबाईंमध्ये काही दोष असतीलही,  काहीही असलं तरीही त्या कोठ्यांच्या मालकीण होत्या.. तिथल्या मॅडम होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्वाला, अस्तित्वाला एक राखाडी बाजू नक्कीच होती.  गुन्हेगारी विश्वातील अनेकांशी त्यांचा असलेला संबंध नेहमीच वादाच्या भोव-यात सापडला.

माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातल्या अनेक चित्तथरारक घटना वाचल्या की गंगुबाई या हिरो आहेत की व्हिलन याचं उत्तर अजूनही सापडलेलं नाही, असंच म्हणावं लागेल. आलियाच्या गंगुबाईमध्ये नेमकं काय असेल हे सिनेमा रिलीज झाला कि समजेलच…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?