' ३ दिवस जंगलात एकत्र रहा, नंतर लग्नाचा निर्णय घ्या: भारतातील एक अशीही प्रथा! – InMarathi

३ दिवस जंगलात एकत्र रहा, नंतर लग्नाचा निर्णय घ्या: भारतातील एक अशीही प्रथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखिका : रमा अतुल नाडगौडा

===

निसर्गानं एक नर आणि एक मादी, इतक्याच दोन जाती निर्माण केल्या. त्यांनी एकत्र यायचं आणि आपल्यासारखेच जीव जन्माला घालून साखळी अव्याहत सुरू ठेवायची की झालं. इतकं सोपं..!

बाकी सगळे प्राणी पक्षी किडे मुकाट आपापलं काम करतात. माणसाला नसते उद्योग फार असल्यानं त्यानं ह्या सोप्या कामाच्या प्रचंड गुंतागुंतीच्या, क्लिष्ट प्रक्रिया निर्माण केल्या. कायकू झक माऱ्या? असं वाटावं, इतपत वैताग आणू शकतील असे नीतीनियम.

अर्थात त्यामागे काही विचार असतोच, परंतु सामाजिक नियम हा एक ढगळ मापाचा अंगरखा असतो. त्याला भरपूर ‘माया’ असते. प्रत्येकाच्या मापाचा कुठून आणायचा? ज्यानं त्यानं स्वतःला हवा तसा टाचून लहान करावा किंवा उसवून मोठा करावा.

लग्न करण्याचे हिंदूधर्ममान्य असे आठ प्रकार आहेत. गांधर्व, राक्षस इत्यादी. नुकतंच एका नवीन प्रकाराबद्दल समजलं. Marriage by elopement. रंजक माहिती आहे.

भारताच्या ईशान्यपूर्वेला मणिपूर येथील एका आदिवासी जमातीत एक विशिष्ट रिवाज आहे. ज्या दोन प्रेमी जीवांना लग्न करायचे आहे, त्यांनी गावातून, सांगून पळून जायचं आणि जंगलात लपून रहायचं. या तीन दिवसात त्यांनी एकमेकांच्या सगळ्या गरजा पुरवायच्या, भागवायच्या.

 

ddlj inmarathi

 

अन्न, निवारा, जंगली जनावरं, माणसं यांच्यापासून संरक्षण, तसेच शारीरिक मानसिक पातळीवर अपेक्षापूर्ती व जुळणी; हे करायचे. याच वेळी गावकरी त्यांच्या शोधार्थ त्यांच्या मागावर निघतात. त्यांच्यापासूनही लपून रहायचे.

त्यांना सापडले तर लग्न मोडतं. नाही सापडले, तर तीन दिवसांनी त्यांनी स्वतःच, गावात परत यायचं. यानंतरही त्यांना लग्न करावंसं वाटलं, तर सगळे मिळून त्यांचं वाजतगाजत लग्न लावून देतात.

यातले काही मुद्दे लोभस आहेत.

१) फक्त दोघांना मुक्तपणे एकत्र राहून एकमेकांबरोबरची जुळणी तपासता येते. हे विशेष कौतुकास्पद आहे.

आजकाल Marriage compatibility या विषयावर, विवाहपूर्व चाचण्या घेण्यादेण्यावर जो जोर दिला जातो आहे, त्या दृष्टिकोनातून बघता; ज्यांना आपण जंगली म्हणतो त्यांनी दाखवलेली ही समज खास आहे.

२) यात शरीर संबंध येतोच. समजा काही कारणानं हे लग्न झालं नाही, तर त्यांना पुन्हा इतरांसोबत हेच करण्याची परवानगी असते. पाटी ‘कोरी’ नाही म्हणून कुणी हरकत घेत नाही.

चारित्र्यावर डाग वगैरे मानले जात नाहीत. मुलगी व्हर्जिन हवीच, यासाठी हल्ली जो आग्रह धरला जातो; त्या मुद्द्याने हे औदार्यपूर्ण आहे.

३) अगदी ठरवून विवाह करायचा झाला तरी हे करणे समूहनियमाने अनिवार्य असते. समजा त्यांना लग्न करायचे आहे पण या तीन दिवसात ते गावकऱ्यांना सापडले तर काय करतात, या नियमाबाबत निश्चित माहिती समजली नाही.

बहुतेक पुन्हा संधी देत असतील.

जमातीचं नाव मला समजलेलं नाही. आदिवासी जाती जमाती यांची स्वतःची एक विशेष संस्कृती असते. त्यांची नैसर्गिक गरज, उपलब्धता, भौगोलिक परिस्थिती, पर्यावरण आणि त्यांचा पिढ्यान  पिढयांचा अनुभव; या सगळ्यांच्या मंथनमिश्रणातून त्यांच्या संस्कृतीचे अजब रसायन तयार होते.

 

tribal tradition inmarathi
youth ki awaaz

 

त्यांच्यापुरती ही जीवनपद्धती आदर्श, उपयुक्त आणि पुरेशी असते. ज्याला आपण सोकॉल्ड शहरी, आधुनिक, प्रगत व सुधारित जीवनपद्धती म्हणतो; ती त्यांना गरजेची किंवा उपयोगी नसतेच मुळी.

एकेका पद्धतीमागे त्यांचा स्वतःचा काही विचार असतो. आपली संस्कृती त्यांच्यावर लादणं खरंच गरजेचं असतं का? विचार व्हावा.

अर्थात सगळंच शंभर टक्के योग्य असतं, असं ठामपणे म्हणता येत नाही. पण तसं ते कुठं असतं म्हणा? प्रत्येक संस्कृतीचे स्वतःचे असे मापदंड असतात. एकाच्या फुटपट्टीने दुसरी मोजू जाता, ती तोकडी वा थिटी पडू शकते किंवा ऐसपैस विस्तारू शकते.

नुसतंच चहापोहे कार्यक्रमांनी ठरवलेल्या पूर्वीच्या लग्नपद्धतीवर (जी लग्नं ‘टिकवली’ गेली म्हणून यशस्वी म्हणायची असतात) आजकाल फार प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे.

या पार्श्वभूमीवर संपूर्ण तीन दिवस एकमेकांची सर्वथैव जबाबदारी घेण्याची परीक्षा ही अधिक उत्तम कसोटी वाटते. ती संधी देऊ करणारे विचारी नाहीत, असं कसं म्हणावं?

मग, त्यांना रानटी म्हणायला जीव धजावत नाहीत.

सुचरिता

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?