‘धुरळा’ थिएटरमध्ये बघायलाच हवा..! पण का? वाचा…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : अमोल मंगेश उदगीरकर

===

आम्हाला राज्यशास्त्र शिकवणाऱ्या एका सरांची एक फार इंटरेस्टिंग थिअरी होती.

ते म्हणायचे, ‘आपल्या प्रत्येक कृतीमागे राजकारण असतं. आपण किचनमध्ये गेल्यावर माठातलं पाणी प्यायचं किंवा फ्रिजमधलं असा विचार करून माठातलंच पाणी पितो. त्या कृतीमागेही राजकारण असतं.’

राजकारण म्हणजे दरवेळी सत्ता मिळवण्यासाठीचं साधन असंच नसतं. हवीहवीशी प्रत्येक गोष्ट- बंगला, गाडी किंवा कुठलीही भौतिक सुखं असो, इतकंच काय हाडामासाचा माणूस मिळवण्यासाठीही आपण राजकारण एक साधन म्हणून वापरतो.

थोडक्यात काय, राजकारण हे सर्वव्यापी आहे. माणूस म्हणून जन्माला आलो, तेव्हाच राजकारण आपल्या पाचवीला पूजतं आणि त्या अर्थानं आपण सगळेच राजकारणी. मायक्रो राजकारण खेळणारे राजकारणी.

 

dhurala inmarathi
youtube, rajashri marathi

 

‘धुरळा’ राजकारणाच्या वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही पीचवर फ्रंटफूटवर बॅटिंग करतो. एका राजकारणी घराण्यात सरपंचपदाच्या निवडणुकीमुळं उठलेलं वादळ आणि त्यात पूर्ण गाव गुरफुटून जाणं ही सिनेमाची सेंट्रल थीम.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना जे एक ग्लॅमर आहे, ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना नसतं.

पण ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हापरिषद या निवडणुका विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुकांपेक्षा (राजकीय डावपेच आणि भाऊबंदकीमुळे) या अनेक पटींनी रंगतदार आणि रोचक असतात.

 

dhurala inmarathi 4
the times of India

 

सध्या जिल्हापरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा हंगाम चालू आहे. डोळे उघडे ठेऊन वर्तमानपत्र वाचलं तरी त्यात कसले भन्नाट डावपेच वापरले जातात हे कळतं. ‘धुरळा’ मध्ये लेखक- दिग्दर्शकांनी ग्रामपंचायत निवडणुकीचं पिच निवडून लै भन्नाट काम केलं आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पाण्यासारखा वाहिला जाणारा पैसा, बायकांचा ढाल किंवा मुखवटा म्हणून केला जाणारा सर्रास वापर, गावातल्या निवडणुकांमध्ये ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ चा झालेला चंचुप्रवेश, स्थानिक बाबांचा स्थानिक मतदारांवर आणि पर्यायाने राजकारणावर असणारा प्रभाव, राजकारण्यांच्या वळचणीला जाऊन बसलेली नोकरशाही हे सगळे घटक सिनेमात फार प्रभावीपणाने आलेले आहेत.

 

dhurala inmarathi 1
esakal

 

अनेक चांगले होतील अशी शक्यता असणारे सिनेमे सेकंड हाफ कर्सला बळी पडताना ‘धुरळा’ चा सेकंड हाफ हा काही सर्वोत्कृष्ट सेकंड हाफ पैकी एक आहे.

सर्वांची कामं चांगली झाली असली तरी मला सिद्धार्थ जाधवचं काम प्रचंड आवडलं. राजकीय घराण्यात मिसफिट असणारा, फारसं कर्तृत्व अंगी नसलेला पण मनाने निर्मळ असणारा रेमडोक्या हनुमंत सिद्धार्थने फार सुंदर रंगवला आहे.

 

dhurala inmarathi 3
zee5

 

लेखक क्षितिज पटवर्धन आणि दिग्दर्शक समीर यांना त्यांच्या कामाचे शंभरपैकी नव्याणव मार्क्स. फर्स्ट हाफ जर अजून बांधून ठेवणारा असता तर हा सिनेमा आपल्या देशातला सर्वोत्कृष्ट राजकीय चित्रपट बनू शकला असता.

‘धुरळा’ मधलंच एक पात्र म्हणत तसं “पोटेन्शियल नसण्यापेक्षा , पोटेन्शियल असून ते वाया जाणं जास्त वाईट.” पण अतिशय घट्ट, प्रवाही आणि सर्वच पात्रांना यथोचित न्याय देणारा सेकंड हाफ सगळी कसर भरून काढतो.

‘धुरळा’ नक्की बघा मोठ्या पडद्यावर.  हा सिनेमा चुकवणं रसिक प्रेक्षक म्हणून परवडणार नाही. 

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?