जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ३

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा: भाग २

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

स्रोत

कीर्तनाहून घरी परतताना तुकोबा म्हणाले,

आबा, जपून हो. रस्ता आमच्या पायाखालचा आहे, तुम्हाला नवीन.

आबा म्हणाला,

आपल्या मागं मागं चालत ऱ्हातो मंजी झालं !

तुकोबांबरोबर त्यांचे टाळकरी, गावकरी होतेच. कुणाच्या हाती एखादी दिवटी, कुणाकडे टाळाची पिशवी तर कुणाच्या हातात वीणा. ते म्हणू लागले,

आम्ही तुकोबांच्या मागे मागेच जात असतो! तेच आमचं जीवन!

आबा म्हणाला,

तुमी लई भाग्यवान. गावात गुरु मिळाले तुम्हास्नी.

हे ऐकून एक लगेच उद्गारला,

खरं, खरं! आम्ही खरंच लई भाग्यवान. सांगा असे बोल कुणाचे ऐकले हैत का तुम्ही? आमच्या तुकोबांसारखे बोल आहेत का जगात कुनाचे?

दुसरा म्हणाला,

एकदा आमच्या महाराजांचं ऐकलं की कुनाचंही नाही ऐकवत आता.

तिसरा म्हणाला,

धा जन्म घेतले तरी आम्हाला जमायचं नाही असं बोलनं!

चौथा म्हणाला,

ह्ये बी खरंच हाय, तुकोबांनी बोलावं आनि आम्ही ऐकावं.

बराच वेळ हे असं चालणं बोलणं ऐकून तुकोबा म्हणाले,

तुम्ही माझं इतकं कौतुक चालवलंय ते बरं नाही. तुमचं बोलणं ऐकून कुणाला खरं वाटेल. पण नेमकं काय आहे ते आता मी तुम्हाला सांगतो. बरं का मंडळी,

नव्हती माझे बोल । अवघे करितो विठ्ठल ।।
काही न करावी खंती । हित होईल धरा चित्ती ।
खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगता ।
ज्याचे तो चि जाणे । मी मापाडें तुका ह्मणे ।

“मंडळी, मला बोलता येतं आणि तुम्हाला येत नाही हा विचार तुम्ही मनातून काढूनच टाका! मी बोलणारा आणि तुम्ही ऐकणारे हा भेद कशासाठी? आपल्याला बोलता येत नाही ही खंत धरताच कशाला? मला नाही वाटत की मी बोलतो! आपलं तोंड म्हणून आपण बोलतो, आपले कान म्हणून आपण ऐकतो हा विचार सोडा! बोलणाराही विठ्ठल आणि ऐकणाराही विठ्ठल हे मनात धरा, त्यातच हित आहे! आपण बोलावे आणि लोकांनी ऐकावे हा अहंकार झाला. पूर्वीपासून थोर लोक हे सांगत आले आहेत. पूर्वी कुणी सांगितलेला हा विचार मी ऐकला आणि ती वाट टाकून दिली!”

“मंडळी, पुन्हा सांगतो, बोलणारा आहे तोच ऐकणारा आहे आणि म्हणून जो ऐकणारा आहे तो बोलणारा आहे! तुम्ही म्हणता, आम्ही ऐकतो! ऐकणारे असाल तर मग तुम्हालाही बोलता आलेच पाहिजे! मी बोलतो हा अहंकार आहे तसा मी ऐकतो हा ही अहंकारच आहे! विचारांची ती वाट टाकली की विठ्ठल बोलतो हा अनुभव तुम्हालाही येईल. त्याला काय करायचे ते करू द्या. त्याला बोलायचे तर बोलू द्या. त्याला ऐकायचे तर ऐकू द्या.”

“मी बोलतो म्हणून तुम्हाला कळते हे खरे नाही. अहो, ज्याला त्याला कळतच असते! आपण कोण सांगणारे? आपण कोण शिकविणारे? वाण्याच्या दुकानात उभे राहून मापे भरायला शिकलं की आपण लोकांना खाऊ घातलं असं होतं काय? देणारा कोण, घेणारा कोण आणि आपण कोण हे आपल्याला कळलं पाहिजे! बरं का, आपण फक्त वाण्याच्या दुकानातले मापाडे असू शकतो! मी माझ्याबाबतीत तसेच जाणतो! ”

गावकऱ्यांना असे ऐकायची सवय होती. आबाला सारे नवीन होते. चालता चालता त्याची तंद्री लागली. घर आलं. गावकरी पुढे गेले. तुकोबा आबाला घेऊन घरी आले. त्याचं अंथरूण घातलं, उशाला दिलं आणि म्हणाले,

आबा, निजा आता. आता विचार सोडा. विठ्ठल तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल.

आबाला तुकोबांच्या पाहुणचाराचा संकोच झाला. पण उपाय नव्हता. आडवं झाल्यावर त्याच्या मनात आलं, “तुकोबांचं बोलनं म्होरं न्यायचं तर प्रश्न ईचारनारा ईठ्ठल आन् उत्तर देनारा बी इठ्ठलच की!” हा विचार मनात येताच त्याला खुदकन हसू आलं आणि झोपेनं घेरलं!
_______

पहाटे कुणी जात्यावर गाऊ लागलं तशी आबाला जाग आली. घरच्या स्त्रिया गात होत्या:

शुद्ध दळणाचे सुख सांगू काई । मानवित सईबाई तुज ।।
शुद्ध ते वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ।
शुद्ध हे जेवितां तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ।
शुद्ध त्याचा पाक सुचित चांगला । अवीट तयाला नाश नाही ।
तुका ह्मणे शुद्ध आवडे सकळां । भ्रतार वेगळा न करी जीवे ।

आबाने आवरलं. आतून दूध आलं. न्याहारी आली. तुकोबा दिसेनात पण त्यांचे धाकले बंधु कान्होबा सोबत होते. आबा म्हणू लागला,

तुकोबा बोलत्यात त्ये सोपं वाटतुया पन तसं नसतं म्हनायचं

कान्होबांनी स्मित केले. आबा पुढे म्हणाला,

आज उठता उठता कानावर आलं, त्ये आधी लय साधं वाटलं पन शेवटाला येगळंच आलं काही! भ्रतार येगळा न करी जीवे म्हणजे काय? त्याचा दळनापिठाशी संबंध काय? पह्यलं वाटलं, चांगलं धान्य घ्यावं म्हणजे चांगलं पीठ हुतं, चांगलं पीठ आसलं की स्वयंपाक चांगला हुतो, चांगला पचतो बी. मग त्ये साऱ्यांना आवडतं बी! तर शेवट असा येगळाच झाला! मग म्हनलं, चांगल्या इचाराचं दळन करा म्हणत आसतील. तरी पुरं जुळं ना. तुमा लोकांना कळत म्हनता की ह्ये सारं?

कान्होबा म्हणाले,

आमचे वडील बंधु म्हणून दादा आम्हाला जवळचे खरे पण हे असं रोज ऐकतो तरी जड जातं अनेकदा. मी कधी विचारतो कधी विचार करीत राहतो. तुम्हाला जसं सोयीचं होईल तसं करा. पण दादा म्हणतात, विचार करा! विचार करा! तोच मार्ग! एक जुना अभंग सांगतो तुम्हाला. ऐकलात तो दळणावर होता. हा कांडण्यावर आहे! बघा लागतो का.

कान्होबा गाऊ लागले :

सिद्ध करूनिया ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धि गे ।।
आठव हा धरी मज जागे करी । मागिले पाहारी सेवटिचा ।
सम तुके घाव घाली वो साजणी । मी तुजमिळणी जंव मिळें ।
एक कशी पाखडी दुसरी कशी निवडी । निःशेष तिसडी ओज करी ।
सरलें कांडण पाकसिद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचे ।
उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ।
तुका ह्मणे मज माहेरीं आवडी । ह्मणोनि तांतडी मूळ केले ।

आबाचं डोकं गरगरलं! म्हणाला,

लय ऐकून व्हतो! आलो, पाह्यलं. आधी ग्वाड वाटलं, आता जड वाटतुया! काय घीऊन मनात आलो त्ये लांबच राह्यलं, ह्ये नवंच ऐकाया आलं! कान्होबा, सुचंना झालं बगा आता.

कान्होबा म्हणाले,

आलाय तसं मोकळेपणानं राहा काही दिस. मन शांत होईल. मग जा.

आबा म्हणाला,

अासं किती दिस ऱ्हायचं? त्ये बरं का? संकोच वाटतुया!

कान्होबा हसून म्हणाले,

आहो, विठ्ठलाने पाठवलं म्हणून विठ्ठलाकडेच तर आला तुम्ही. विठ्ठल म्हणेल तेव्हा जायचं. विचार नका करू!

हे ऐकून आबा सुखावला, हसला आणि दोघांनी एकमेकांना टाळी दिली, खूण पटल्याची.

(क्रमशः)

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?