लोकल इंडिकेटरवर कर्जतसाठी ‘S’ आणि कसाऱ्यासाठी ‘N’ लिहिण्यामागे असलेली रंजक कथा आवर्जून वाचण्यासारखी आहे..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचे आकर्षण कोणाला नाही? गेली अनेक वर्षे अनेकांना या मायानगरीने आपल्यात सामावून घेतले आहे. जसजशी लोकं येत गेली तशी मुंबई वाढत गेली. मुंबईच्या या प्रगतीला अनेकांचा हातभार लागला.

परिणामी, मुंबई आणि उपनगरे लोकांनी फुगत गेली आणि यातूनच आकाराला आली मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवा म्हणजेच सर्वांचीच परिचित लोकल…! लोकल्सची १४७ स्थानकं असून एकूण ४६५ किलोमीटर असलेली रेल्वे लाईन आहे. जवळजवळ दररोज ७५ लाख लोकं या लोकलने प्रवास करतात.

यासाठी लोकलच्या दररोज तब्बल २३४२ फेऱ्या होतात. जगातील सर्वात बिझी रेल्वे मार्ग म्हणून हा रेल्वे मार्ग ओळखला जातो. शिवाय, या लोकल्स अखंड प्रवास करत असतात.

२४ तासांच्या वेळेत अवघे ९० मिनिटं लोकल रुळावर धावत नसतात. या लोकलच्या गर्दीचा त्रास सर्वसामान्य लोकांना नक्कीच होतो मात्र या लोकल रेल्वेचा मुंबईकरांना तेवढाच अभिमान सुद्धा आहे.

मुंबईतच असलेलं बॉलीवूड सुद्धा लोकल विषयी असणारी आस्था दाखवतांना दिसतं.

 

local train inmarathi
free press journal

 

मुंबईची ओळख म्हणा किंवा वैशिष्ट्य म्हणा, लोकल अनेकदा मोठ्या पडद्यावर झळकलेली दिसते. अनेक कथा या लोकलच्या अवतीभोवती गुंफलेल्या दिसतात… 

अशी ही लोकल अजून एका कारणासाठी ओळखली जाते. ते म्हणजे लोकल आणि डब्बेवाला यांचं असलेलं नातं..! मुंबईचा पूर्व पश्चिम विस्तार तसा कमीच आहे. त्यामुळे कार्यालयं दक्षिण मुंबईत आणि लोकं उपनगरांमध्ये राहतात. त्यासाठी जशी लोकल आली तशी तसे मुंबईकरांचे पोट भरण्यासाठी डब्बेवाले आले.

मुंबईकरांना घरचं जेवण मिळण्याचं श्रेय जसं डब्बेवाल्यांचं आहे तसं डबेवाल्यांच्या कामात मुंबई लोकलचा खूप मोठा वाटा आहे.

दररोज लाखो प्रवासी वाहून नेणारी ही लोकल गर्दीमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेक उपाययोजना केल्या तरी गर्दी काही कमी होतांना दिसत नाही. कारण मुंबईकरांसाठी प्रवासाचं प्राथमिक साधन लोकल हेच आहे. मात्र एवढ्या लोकांना वाहून नेणाऱ्या या लोकलचं काम चालतं तरी कसं? याची अनेक लोकांना उत्सुकता असते.

 

mumbai local inmarathi

 

खरं तर इतका मोठा पसारा आणि गुंतागुंत असलेला लोकलचा सारा मामला कळणे अवघडच आहे. पण हे प्रवासी कुठल्या फलाटावर कुठली लोकल येणार आहे, यासाठी इंडिकेटर वर असणारे कोड बघत असतात. हे कोड आहेत तरी काय आणि नवीन प्रवासी कसा गोंधळतो?….

कल्याण असेल तर K , दादर असेल तर D असे स्टेशन्सचे कोड ठरलेले आहेत. प्रवासी देखील त्याला सरावलेले असतात. पण जेव्हा कल्याणचा K असतो तर मग कुर्ला, खोपोली, कसारा, कर्जत असे एकच आद्याक्षर असणारी स्टेशन्स असली मग नवीन प्रवासी जरा गोंधळतोच.

मग यांचे कोड कसे ठरवले गेले? रेल्वे कर्मचारी सांगतात की, खोपोली स्टेशन कल्याण नंतर तयार झालं आणि त्याला KP असा कोड ठरला. साहजिक आहे, एकच आद्याक्षर असलं की, अजून एक अक्षर घेतलं की प्रश्न सुटला. पण ते इतकं सोपं पण नाही.

 

kurla inmarathi

 

आता कुर्ला स्टेशनचा कोड आहे C. आता हा C आला कसा, तर कुर्ला हे ब्रिटिश काळातच उभं राहिलेलं स्टेशन आहे. गोरा साहेब कुर्ला ‘Coorla’ असं स्पेलिंग लिहीत. तिथून C हा कोड कुर्ला साठी वापरला गेला.

 

Kurla_railway_station inmarathi
wikipedia

 

असंच, कर्जत आणि कसारा ही मुंबई लोकलची दोन शेवटची स्टेशन्स आहेत. लोकल केवळ मुंबई आणि उपनगरांना जोडत नाही तर त्यापुढे अनेक गावांना मुंबईशी जोडत असते.

मुंबई आणि पुण्याच्या मध्यावर असलेलं कर्जत स्टेशन इतर भागाला मुंबईशी जोडणारं महत्वाचं स्टेशन आहे. शिवाय वडापावसाठी तर खवय्यांना ते नक्कीच माहिती असेल.

याचप्रमाणे मुंबई आणि नाशिक यांच्या मध्यावर कसारा हे स्टेशन आहे. इथून आजूबाजूची गावे तसेच नाशिकला जाण्यासाठी या स्टेशनचा वापर करतात. अशा या दोन महत्वाच्या स्टेशनपैकी कर्जत साठी S आणि कसारा साठी N हा कोड वापरला जातो.

याला कारण म्हणजे, कल्याण जंक्शन पासून दक्षिणेला (साऊथ) असलेलं कर्जत आणि उत्तरेला (नॉर्थ) असलेलं कसारा यावरून हे अनुक्रमे S आणि N हे कोड वापरले जातात. मात्र एवढंच कारण पुरेसं नाही आहे.

 

karjat inmarathi

 

याबद्दल रेल्वे इतिहासकार राजेंद्र अकलेकर हे सांगतात की, आधी केवळ नॉर्थ-साऊथ या दिशांच्या नावाने देखील गोंधळ होत असे.

“आजच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये प्रवेश करणाऱ्या लोकल्स नक्की कुठून आल्या आहेत यावरून नियंत्रण कक्षात प्रचंड गोंधळ होईल. बऱ्याच लांब पल्ल्याच्या गाड्या देखील शहरात येत असल्याने, त्या कोणत्या दिशेने आल्या आहेत यावर आधारित कोड देणे जरा त्रासदायकच बनले होते.

म्हणूनच, हे बदलण्यासाठी एन साठी ‘नारायण’ आणि एस साठी ‘शंकर’ असे शब्द आले.

आज जर तुम्ही नियंत्रण कक्षात गेला, तर “कर्जत आणि कसारा या गाड्यांचा संदर्भ देताना ते त्यांना शंकर स्लो किंवा नारायण फास्ट असे म्हणतील”.

 

kasara inmarathi
Indian rail info

 

नवीन प्रवासी गोंधळतात म्हणून इंडिकेटर वर कोड असले तरी लोकल च्या दोन्ही टोकांना स्टेशनचा कोड आणि नाव दिलेले असते. मात्र, फलाटावर मर्यादित जागा असल्याने फक्त कोड वापरले जातात. अर्थात हे जसं रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी आहे तसेच प्रवाशांसाठी सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे योग्य माहिती कमी शब्दात आणि गैरसमज न होता पोहचवण्याचा हेतू असतो.

काळ बदलत गेला तसे इंडिकेटरचे स्वरूप सुद्धा बदलत गेले. आता एलईडी इंडिकेटर्स आले असून प्रवाशांना अधिक सुविधा मिळावी म्हणून रेल्वे प्रशासन अनेक उपाययोजना करतांना दिसते आहे.काही स्टेशन्स वर आलेले ग्राफिकल इंडिकेटर्स हे त्याचेच पुढचे पाऊल आहे.

याठिकाणी स्टेशनचे पूर्ण नाव आणि कोड दिलेले असतात. आता अजून एक उदाहरण द्यायचं तर वसई रोड स्टेशनचा कोड आहे ‘BS’. वसईचं जुनं नाव म्हणजेच ब्रिटिश काळात ‘बॅसिन’ असं होतं, म्हणून हा कोड BS आहे.

 

Mumbai-Local-1234 inmarathi
thebetterindia.com

 

तेव्हा स्टेशन कोड मागे असलेली ही “कोड कथा” रंजक आहेच पण शोधलं तर अजून बरीच माहिती यातून आपल्याला मिळेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “लोकल इंडिकेटरवर कर्जतसाठी ‘S’ आणि कसाऱ्यासाठी ‘N’ लिहिण्यामागे असलेली रंजक कथा आवर्जून वाचण्यासारखी आहे..!

  • January 6, 2020 at 8:41 am
    Permalink

    Khupach chan mahiti dilyabaddal dhanyawad

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?