' जत्रेत २५ पैश्यांसाठी गाणं गाणारा मुलगा जेव्हा प्रचंड मेहनतीने देशाचा सर्वात लाडका आवाज होतो… – InMarathi

जत्रेत २५ पैश्यांसाठी गाणं गाणारा मुलगा जेव्हा प्रचंड मेहनतीने देशाचा सर्वात लाडका आवाज होतो…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

“कयामत से कयामत तक” मधील “ये मेरे हमसफर” आणि “पापा केहते है” ही गाणी आजही अनेकांच्या प्लेलिस्टवर टॉपवर आहेत. आज अगदी ३५ वर्षानंतरही या गाण्यांची आणि त्या सुरील्या आवाजाची जादू तसूभरही ओसरलेली नाही.

उदित नारायण यांच्या आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि त्यांच्या आवाजाची मोहिनी आजही रसिकांच्या मनात रुंजी घालते. निव्वळ हिंदीच नाही तर, तमिळ, तेलगु, कन्नडा, उडिया, नेपाळी, भोजपुरी अशा तब्बल ३६ वेगवेगळ्या भाषांतून त्यांनी २०,००० हूनही जास्त गाणी गायली आहेत.

 

udit narayan inmarathi
Hindustan times

 

त्यांना सलग चारवेळा राष्ट्रीय फिल्म फेअर अवॉर्ड देखील मिळाला आहे. त्यांनी गायलेल्या गाण्यांपैकी बरीच गाणी आजही गुणगुणावीशी वाटतात. रसिकांच्या स्मरणातून ही गाणी कधीच हद्दपार होणार नाहीत.

१९८० साली आलेल्या “उन्नीस-बीस” या चित्रपटात त्यांनी मोहम्मद रफी साहेबांसोबत गाणी गायली आहेत.

‘करीयरच्या अगदी सुरुवातीलाच मला मोहम्मद रफी साहेबांसोबत गाण्याची संधी मिळाली. रफी साहेबांचा आवाज जेव्हा मी पहिल्यांदा रेडीओवर ऐकला तेव्हा त्यांच्या आवाजाने मी अगदी भरवून गेलो होतो. संगीत क्षेत्रातील माझा सगळा प्रवास मी रफी साहेबांना गुरुस्थानी मानूनच केला. आपल्या आवडत्या गायकासोबत गाण्याची संधी मिळणे हा खरोखरच माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण होता.’

असं ते अतीव आदराने सांगतात.

 

udit narayan 1 inmarathi
hindi.sakshi.com

 

हिंदी चित्रपटाची ही त्यांची सुरुवात होती. त्यानंतर १९८० च्या दशकात त्यांनी किशोर कुमार यांच्यासोबत ही काही गाणी गायली आहेत. १९८८ मध्ये आलेल्या “कयामत से कयामत तक” मधील “पापा कहते है”, या गाण्यासाठी त्यांना फिल्म फेअर अवॉर्डदेखील मिळाला आहे. १९८०, १९९० आणि २००० या तीन दशकात फिल्म फेअर अवॉर्ड मिळवणारे ते एकमेव पुरुष गायक होते.

१ डिसेंबर १९५५ साली बिहार मधील एका छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या उदित नारायण यांचे हे यश पाहून निश्चितच आपल्याला हेवा वाटतो. परंतु, या यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तितकासा सुखकर नव्हताच. एका छोट्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या उदित यांच्या घराची परिस्थिती अतिशय बेताची होती.

शेतकरी असलेल्या वडिलांना चार भावंडांचा सांभाळ कारण तितकंस सोपं नव्हतं, त्यात गाण्याच्या शिक्षणावर खर्च करण्याची ऐपत तर बिलकुल नव्हती. उदित यांची आई लोकगीते गायची. आई सोबत जत्रा- यात्रांमध्ये गायला जाऊन जाऊनच उदित यांनाही गाण्याचा छंद जडला.

त्यांची आई कुठेही घरगुती समारंभात किंवा वेगवेगळ्या जत्रांमध्ये गाण्यासाठी जात असे. छोटा उदित देखील तेव्हा तिच्यामागून जायचा. जत्रेत त्याला त्याच्या चांगल्या गाण्याबद्दल कधी कधी २५ पैशांचे बक्षीस मिळत असे.

उदितच्या या आवडीवर त्यांच्या वडिलांचा फारच आक्षेप होता  गाण्याच्या मागे लागून हा पोरगा आपले शैक्षणिक नुकसान करवून घेतोय असं त्यांना वाटायचं. इतरांप्रमाणेच त्यानेही शाळा कॉलेजमध्ये जाऊन चांगलं शिक्षण घ्यावं आणि डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. उदित यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या कुनौली या गावातूनच पूर्ण केले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी ते नेपाळला गेले.

नेपाळ येथे शिकत असतानाच काठमांडू रेडीओ स्टेशनवर त्यांना गाण्याची संधी मिळाली. या कामासाठी त्यांना महिना १०० रुपये पगार देखील मिळत होता. नेपाळच्या श्रोत्यांना उदित यांच्या गायनाने अक्षरश: वेड लावलं. श्रोत्यांकडून मिळणाऱ्या या प्रोत्साहनाच्या जोरावरच नेपाळच्या संगीत क्षेत्रातील त्यांचा वावर वाढत गेला. नेपाळ मधील भारतीय दूतावासाकडून त्यांना गाणं शिकण्यासाठी स्कॉलरशिप दिली जायची. याचवेळी ते गायनाच्या शास्त्रीय पद्धतींशी परिचित झाले. यानंतर ते इंटर पास करून १९७८ साली ते भारतात परत आले.

 

udit narayan 2 inmarathi
pikodo

 

मुंबईत आपल्या कलेची कदर होईल अशी त्यांना आशा वाटत होती. इथे येऊन त्यांनी महिना १०० रुपये वेतनावर काम सुरु केले. याच दरम्यान भारतीय विद्या भवन मध्ये संगीताचे शिक्षण देखील सुरु ठेवलं. जवळजवळ दहा वर्ष त्यांनी बॉलिवूडमध्ये काम आणि नाव मिळवण्यासाठी संघर्ष केला.

दहा वर्षे प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नसल्याने थोडीशी निराशा आली होती. संसाराचा पसारा वाढत होता, कुटुंबात आणखी एका छोट्या सदस्याची भर पडली होती. दोनाचे तीन होण्याची वेळ आली तरी, कुटुंबाचा मासिक खर्च सुरळीत चालवा इतकीही कमाई मिळत नव्हती.

या सगळ्या ओढताणीला वैतागून त्यांनी पुन्हा बिहारमध्ये जाऊन शेती करण्याचाही निर्णय घेतला होता. याच वेळी त्यांना “कयामत से कयामत तक” मध्ये गाण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील सगळी गाणी उदित यांनीच गावीत अशी आनंद-मिलिंद यांची इच्छा होती.

 

papa kehte hai inmarathi
sharechat.com

 

या चित्रपटातील गाण्यांनी तर उदित यांचे नशीबच पालटले. यानंतर त्यांना एकाहून एक चांगल्या संधी मिळत गेल्या. जणू नशिबाचा कायापालट झाला. “कयामत से कयामत तक'” या चित्रपटाच्या यशानंतर उदित यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

या संघर्षाच्या काळात त्यांनी अनेक नेपाळी चित्रपटातून अभिनय देखील केला. त्यांनी केलेले नेपाळी चित्रपट भरपूर हिट ठरले. यानंतर त्यांना नेपाळी आणि भोजपुरी फिल्म्स कडून अनेक संधी मिळाल्या पण, अभिनय करण्यात त्यांना फारसा रस नव्हता. त्यांना गाण्यातूनच जास्त आनंद मिळत असे.

‘लता मंगेशकर, किशोर कुमार, आशा भोसले, मोहम्मद रफी, यांचा आवाज जेव्हा मी रेडीओवर ऐकायचो तेव्हा अक्षरश: मंत्रमुग्ध व्हायचो. माझ्या बालपणी आमच्या घरी रेडीओ नव्हता, मी यांची गाणी शेजाऱ्यांच्या रेडीओवर ऐकायचो. तेव्हापासून या सगळ्यांना मी माझे गुरु मानतो,’ असे उदित नारायण सांगतात.

नारायण यांची पत्नी दीपा नारायण देखील गायिका आहेत. दोघांनी मिळून काही नेपाळी फिल्मसाठी गाणी देखील गायली आहेत. त्यांचा मुलगा आदित्य देखील चांगला गायक आहे. आदित्यने देखील या क्षेत्रात चांगले नाव कमावलं आहे. विशेष म्हणजे, या उंचीवर पोचण्यासाठी आपल्या वडिलांनी कसा संघर्ष केला आहे याची त्याला चांगली जाणीव आहे.

आपल्या वडिलांबद्दल आदर व्यक्त करताना तो म्हणतो, ‘त्यांच्या आवाजात एक सच्चेपणा आहे. गाण्यातील भाव, सूर, ताल यावर ते लगेच पकड घेतात. ज्या भावनेने ते गातात ती खूप आतून येते. म्हणूनच आजही त्यांच्या आवाजाची जादू ओसरलेली नाही’.

उदित नारायण यांना फक्त भारतातच नाही तर नेपाळसह इतर देशांमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने देखील त्यांना २०११ साली महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे. याशिवाय, २००९ मध्ये त्यांना पद्मश्री आणि २०१६ साली पद्मविभूषण या भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले आहे. देश विदेशातील अनेक सन्माननीय पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.

 

udit narayan 3 inmarathi
indiaforums

 

‘मी जे काही मिळवले ते माझ्या कौशल्याच्या जोरावर मिळवले,’ हे सांगताना त्यांची छाती अभिमानाने भरून येते. बिहारच्या खेडेगावात जन्मलेल्या उदित यांना यशाच्या शिखरावर पोहोचून देखील आपल्या गावाचा विसर पडला नाही. आपला गाव, गावाचे लोक आणि गावची माती याबद्दल त्यांना अपार आदर आहे. ‘माझ्या आवाजाला माझ्या मातीचा स्पर्श झाल्यामुळेच त्याला गोडवा मिळाला आहे, माझ्या आवाजात गावातील मातीचा सुगंध आहे, म्हणूनच त्यातला सच्चेपणा रसिकांना भावतो,’ असं ते म्हणतात.

“पापा केहते है..” म्हणत स्वप्नं पाहायला लावणाऱ्या या आवाजाने, अनेकांची स्वप्नं सत्यात उतरवण्याची ताकद स्वतःच्या उदहरणातून दिली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?