' जगाला फाट्यावर मारता आल्याशिवाय स्त्री सक्षमीकरण अशक्य..! : कॅप्टन स्मिता गायकवाड

जगाला फाट्यावर मारता आल्याशिवाय स्त्री सक्षमीकरण अशक्य..! : कॅप्टन स्मिता गायकवाड

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखिका : कॅप्टन स्मिता गायकवाड

===

आमच्या गावी म्हणजे माझ्या सासरी एक महाराज नावाचं प्रस्थ आहे. गावात जो माणूस कर्मकांड करतो त्याला सगळे ‘महाराज’ म्हणतात. डोक्यात गेलेल्या माणसांमध्ये सगळ्यात वरती ह्या महाराजचं नाव सासरी गेल्यावर पहिल्याच दिवशी add झालं. त्याला दोन कारणं होती.

माझे वडील विधुर असूनही त्यांनी माझं कन्यादान केलं आणि लग्नाच्या दिवशी गावी येताना माझी पाळी सुरू झाली.

ह्या दोन गोष्टींचा त्याला खूपच प्रॉब्लेम होता. नुकतीच लग्नं होऊन सासरी गेले होते. त्यामुळे पहिल्याच दिवशी माझी बौद्धिक तलवार बाहेर काढणं टाळलं.

नंतर एकदा गावी गेलो तर पायात जोडवी घातली नाही म्हणून विचारलं आणि ‘घातली पाहिजे’ म्हणून ज्ञान पाजळायला सुरुवात केली. त्याला कारण विचारल्यावर म्हणाला की, ‘नवऱ्याचं आयुष्य वाढतं.’ त्यादिवशी त्याचा व्यवस्थित “class” घ्यायचं ठरवलं.

एक दोन दिवसातच तो परत आला. त्याला कर्मकांड कुठे शिकला विचारलं आणि उच्चार चुकीचे आहेत ते सुधारा हे सांगितलं. संपूर्ण गावाने ज्याला डोक्यावर चढवलं होतं त्याला एक स्त्री असं सांगते म्हटल्यावर तिथे सांस्कृतिक भूकंप झाला.

लग्नानंतर जो पूजा नावाचा प्रकार त्याने  केला होता त्यात अथर्वशीर्ष , प्रणम्य शिरसा देवम्, श्रीसूक्त अशी भेसळ करून त्याच्या बुद्धीला आठवेल तसं तो म्हणत होता. उच्चार पण चुकीचे होते. हे सांगितल्यावर ते प्राकृत भाषेत आहे अशी थाप त्याने मारली.

नंतर ‘सूनबाई, तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या आहात. विदर्भातले आणि इकडचे उच्चार वेगळे असतात ‘ अशी सारवासारव सुरू केली. ‘तुम्हाला संस्कृत माहीत नसेल’ हे पण ठरवून मोकळा झाला. दोन चार संस्कृत सुभाषितं तोंडावर मारल्यावर तो गप्प बसला. ‘संस्कृतचे उच्चार जगात कुठेही सारखेच असतात. टोन थोडाफार बदलू शकेल पण पूर्ण उच्चार कसा काय बदलेल?’ ह्यावर महाराजकडे उत्तर नव्हतं.

TV वर संभाजी महाराजांची मालिका चालू होती. विषय बदलायचा म्हणून त्याने मालिकेचा आधार घेतला.

‘आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात शिवाजी आणि संभाजी ह्यांना आम्ही महाराज म्हणतो. कोणाही पोपटपंची आणि तीही चुकीची करणाऱ्यांना नाही.’ – असा दुसरा वार केल्यावर ‘धर्माच्या बाबतीत मनात संशय किंवा शंका नसावी’ असा defense त्याने सुरू केला.

‘प्रश्न विचारायला आमचा धर्म आम्हाला प्रोत्साहन देतो. केवळ कोणीपण सांगितलं म्हणून ऐकावं आणि बुद्धी गहाण ठेवून ते करावं असं कुठेच सांगितलं नाही. सांगा कुठे सांगितलंय असं?’

महाराजकडे त्याचं पण उत्तर साहजिकच नव्हतं.

मग, महाराज आपला धर्म कसा उच्च आहे हे सांगायला लागला. ‘हो पण काही स्वयंघोषित विद्वानांनी त्याचा कचरा केला आणि कर्मकांडात त्याला अडकवून ठेवलं. त्यामागची कारणं विचारली तर माहीत नसतात.’

‘तुम्हाला माहीत आहेत का प्रत्येक गोष्टी मागची कारणं? कुंकू लावणं फक्तं स्त्रियांसाठी सांगितलं नाही. पुरुषांसाठी पण आहे ते. किती पुरुष लावतात? स्त्रियांनी साडी नेसायची मग पुरुषांनी धोतर घालून का नाही फिरायचं??  तुम्ही गावातल्या पुरुषांना ह्या गोष्टी का नाही शिकवत?’ हे विचारल्यावर महाराज अजूनच वैतागला आणि victim card पुढे करायला लागला.

‘प्रेमानी बोलणं गरजेचं म्हणजे दुसऱ्याच्या भावना दुखावल्या नाही पाहिजेत’ असा अजून एक उपदेशाचा डोस द्यायचा प्रयत्न! ‘तुम्ही का नाही पाळत हे?’ इति मी. महाराज पुन्हा गडबडला.

मग पुन्हा विषय बदलून ‘जन्माने कोणी ब्राह्मण नसतो कर्माने असतो’ अशी ज्ञानगंगा सुरू केली. ‘हो बरोबर. म्हणून अनेक ठिकाणी जातीने ब्राह्मण नसलेले लोकही पूजापाठ करतात. स्त्रियापण करतात. पाळी असताना यज्ञ करायला मनाई आहे असं कुठे लिहिलंय?

धर्म काम करत नाही हे लक्षात आल्यावर fear psychosis चा आधार घेण्याचा अजून एक निष्फळ प्रयत्न महाराजनी सुरू केला.

‘मी भविष्य सांगतो. माझं भविष्य चुकत नाही’ इति महाराज! ‘माझा भविष्यावर विश्वास नाही. कारण कर्मानी आणि विचारांनी तुम्ही भविष्य बदलू शकता असं धर्म सांगतो.’ इति मी.

असह्य होऊन तो निघाला. ‘चला येतो. वाईट वाटून घेऊ नका.’ इति महाराज ! ‘तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. मला बौद्धिक चर्चा करायची आणि प्रश्न विचारायची आवड आहे.’ असं म्हटल्यावर खोटं खोटं हसून महाराज गेला. पुन्हा मी काय घालायचं आणि काय करायचं हे सांगण्याची हिंमत नाही करणार.

 

solapursocialfoundation

 

दुसरा अनुभव म्हणजे मी गावी गेल्यावर कधी कधी साडी नेसायचे. त्याला कारण मला साडी आवडते आणि गावात तेवढा निवांतपणा आणि वेळ मिळतो म्हणून. It was by choice.

काही दिवसांनी मला लक्षात आलं की तिथल्या स्त्रियांना हे सांगितलं जातं की कार्यक्रमांना साडीच नेसायला पाहिजे. ड्रेस घातलेला चालत नाही. सुरुवातीला ‘Be a Roman in Rome’ ह्या विचारांनी अशा गोष्टी पाळायला काय हरकत आहे असं वाटायचं. पण नंतर विचार बदलले.

जर त्या गावात पुरुषांनी जीन्स आणि western trouser घातलेल्या चालतात तर स्त्रियांनी पण घातलेल्या चालल्या पाहिजेत.

गावात साडी नेसायची नाही हे ठरवलं. पुन्हा एकदा जगाला फाट्यावर मारून ड्रेस आणि जीन्स घालायला सुरुवात केल्यावर उपदेशाचे डोस सुरू झाले. कारण विचारल्यावर ‘लोक नावं ठेवतात’ हे universal कारण! ‘मला सवय आहे लोकांनी नावं ठेवण्याची. मला चालतं.’ असा प्रतिसाद दिल्यावर गंभीर शांतता आणि helplessness !!

बांगड्या आणि जोडवी घालायची असे अनावश्यक उपदेश मिळायला लागल्यावर कुंकू लावणं बंद केलं. (तसंही तिकडे गेल्यावरच लावायचे.) कारण विचारल्यावर ‘जास्त उपदेश मिळाल्यावर मी त्याच्या विरोधात वागते’ हे सर्व प्रॉब्लेम वर universal कारण ठरवलं.

 

bollywoodcat

 

माणूस म्हणून कोणते कपडे घालायचे हे ठरवण्याचा हक्क प्रत्येक स्त्रीला असलाच पाहिजे. ज्यांना हा विचार पटत नाही त्यांनी मनस्ताप करत बसावा. ‘लोक काय म्हणतील’ आणि ‘आपल्याकडे चालत नाही’ म्हणून पिढ्यानपिढ्या कर्तृत्वशून्य लोकांनी जी मुजोरी चालवली आहे ती मोडीत काढण्यासाठी अशा लोकांना आणि अशा विचारांना फाट्यावर मारणे हा एकमेव उपाय आहे. 

स्त्रियांना कराटे वगैरे नाटकं शिकवायची, स्त्री सक्षमीकरणाच्या गप्पा हाणायच्याआणि दुसरीकडे त्यांनी काय घालायचं ह्याचा निर्णयही त्यांनां घेऊ द्यायचा नाही आणि स्वतःच्या हातात ठेवायचा हा निव्वळ दुटप्पीपणा आहे. कुंकू आणि जोडव्यानी कोणतंही धर्म किंवा संस्कृतीरक्षण होत नाही. ज्यांना तसं वाटत नाही आणि धर्म/संस्कृती रक्षणाची खुमखुमी आहे त्यांनी आधी रोज धोतर-नऊवारी नेसायला सुरुवात करावी आणि कपाळावर कुंकू पण लावावं.

शिक्षण घेऊन, स्वावलंबी होऊन जर स्त्रियांना समाजात वैचारिक स्वातंत्र्य अनुभवता येत नसेल तर असं शिक्षण आणि असं स्वावलंबन व्यर्थ आहे. त्याला स्त्रिया स्वतः सुद्धा जबाबदार आहेत. समाजानी आपल्याला चांगलं पण म्हटलं पाहिजे आणि वैचारिक स्वातंत्र्य पण मिळालं पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी शक्य नाहीत. कारण वेगवेगळ्या बंधनात स्त्रियांना अडकवणारा आणि त्याला संस्कृती म्हणून मिरावणारा हा समाज आहे.

जगाला फाट्यावर मारता येत नसेल तर स्वतःला सक्षम म्हणू नका. वैचारिक गुलामी संस्कृती म्हणून मिरवणाऱ्या स्त्रिया ह्या स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला आणि दुय्यम वागणुकीला तितक्याच कारणीभूत आहेत.

कायम समाजावर आणि पुरुषांवर खापर फोडून उपयोग नाही. स्वतःच्या लढाया तुमच्यासाठी इतर कोणी येऊन लढाव्या असं आजही वाटत असेल तर जन्मात समानता अनुभवता येणार नाही आणि त्या समानतेस तुम्ही पात्र नाही. पात्र असाल तर अधीनता (submissiveness) सोडा. स्त्री म्हणून जगा.

 

 

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?