' पळशीची पीटी: एका चॅम्पियन न झालेल्या ‘चॅम्पियन’ची गोष्ट…! – InMarathi

पळशीची पीटी: एका चॅम्पियन न झालेल्या ‘चॅम्पियन’ची गोष्ट…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : वैभव तुपे

===

पीटी म्हटलं की आपल्याला आठवतात त्या “पी टी उषा”…! त्यांच्या रनिंगमधल्या यशाने अख्ख्या जगात भारताचं नाव त्यांनी गाजवलं आहे. ह्या चित्रपटातल्या शीर्षकतली पीटी सुद्धा तीच वेगवान धावणारी पीटी आहे.

किंबहुना तिचं पीटी हे नाव तिच्या धावण्यामुळेच पडलंय.

पळशी नावाच्या गावातून येऊन यशाचं शिखर पादाक्रांत करणाऱ्या सामान्य मुलीची ही असामान्य कथा आहे.

गोष्ट म्हटलेलं असलं तरी चित्रपट एखाद्या माहितीपटासारखाच समोर आला आहे. चित्रपट यशस्वी होणे म्हणजे चित्रपटाने खूप कमाई करणे असा आपल्याकडे चित्रपटाच्या यशाबद्दलचा निकष आहे. तो निकष लावून पहायचा झाला तर कदाचित ह्या चित्रपटाला यशस्वी म्हणता येणार नाही.

पण अनेक चित्रपट लौकिकार्थाने यशस्वी होत नसले तरी ते खूप काही सांगू जातात. “पळशीची पीटी!” हा त्यातलाच एक चित्रपट…!

 

Palshichi-PT
मराठी चित्रपट सूची

 

छोट्याश्या खेडेगावात एका गरीब शेतमजूराची भागी उर्फ भाग्यश्री ही मुलगी..! शाळेत तालुकास्तरीय रनिंग स्पर्धेत कुणीच भाग घ्यायला तयार नसतं तेव्हा नाईलाज म्हणून तिला भाग घ्यायला सांगितलं जातं.

संस्थाचालकाचे नातेवाईक असलेले क्रीडाशिक्षक अर्थातच तिला स्पर्धेसाठी घेऊन जायला नाखूष असतात. मग दुसऱ्या एका दिव्यांग शिक्षकाला तिच्याबरोबर पाठवलं जातं.

अनवाणी पायांनी ती धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होते आणि जिंकते सुद्धा!

तिची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी होते. यावेळी सुद्धा तिला त्याच दिव्यांग शिक्षकासोबत स्पर्धेला पाठवलं जातं. यावेळीही ती जिंकून परत येते आणि तिची निवड राज्यपातळी वरील स्पर्धेसाठी होते.

आतापर्यंत तिचा प्रवास कुठल्याही साधन सामग्रीविना आणि सोयीसुविधांविनाच सुरू असतो. पण राज्यस्तरीय स्पर्धेसाठी किमान एखादा चांगला स्पोर्ट सूट आणि शूज हवेत ही तिची साधी अपेक्षाही शाळा आणि संस्थाचालक पूर्ण करू शकत नाहीत. घरातून मदत मिळण्याचा तर प्रश्नच नाही.

अशा कात्रीत सापडलेल्या भाग्यश्रीला शेवटी दिव्यांग असलेले बिडकर सर पदरमोड करून स्पोर्ट्स सूट आणि बूट घेऊन देतात. स्पर्धेसाठी तिची तयारी सुद्धा तेच करून घेत असतात.

दरम्यान, राज्य स्पर्धेसाठी निवड झाली म्हटल्यावर तिच्याकडून फारशी अपेक्षा नसलेल्या तिच्या क्रीडाशिक्षकांना आणि संस्थाचालकांना तिचा पुळका येतो, दिव्यांग शिक्षकाला बाजूला ठेऊन संस्थाचालकांचे नातेवाईक असलेले क्रीडाशिक्षक तिला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी घेऊन जातात.

मात्र तिथेही ते घोळ घालतातच, स्पर्धेसाठी आवश्यक असणारा तिचा जन्मतारखेचा दाखला ते घरीच विसरतात.

पुढे काय? असं वाटत असतानाच ऐनवेळी बिडकर सर तो दाखला घेऊन येतात आणि तिला स्पर्धेत भाग घ्यायची संधी मिळते. तिथेही ती स्पर्धा ती जिंकते..!

साहजिकच तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होते. दरम्यानच्या काळात तिचं लग्न ठरवलं जातं आणि तिच्या रनिंगला घरातूनच विरोध होऊ लागतो आणि मग शेवटी राज्यस्तरीय मेडल मिळवणाऱ्या भागीच्या आयुष्यात मात्र मेंढरं वळवायचीच वेळ येते!

असं साधारण या चित्रपटाचं कथानक आहे.

कथानक दमदार असलं, विषय चांगला असला तरी ‘सिनेमा’ म्हणून जो एक टच असतो तो कुठेतरी नक्कीच कमी पडलाय असं म्हणावं लागेल. अवघ्या ९५ मिनिटात सिनेमा अक्षरशः गुंडाळलाय असं म्हटलं तरी चालेल इतकी घाई झालीय.

चित्रपट म्हणून डोळ्यांपुढे जे उभं राहायला हवंय ते कुठेतरी राहून गेलंय असंच चित्रपट पाहतांना सारखं वाटत राहतं. त्यातही संगीत वगैरे सुद्धा अगदी माफक प्रमाणात वापरलं गेल्यामुळे फारसं प्रभाव टाकून जात नाही.

संगीत किंवा इतर तांत्रिक बाबीतलं मला फारसं ज्ञान नसलं तरी या चित्रपटात तंत्रज्ञानाचा वापर अगदी मर्यादित आहे हे मी ठामपणे म्हणून शकतो, तसं चित्रपट पाहतांना ते शेवटपर्यंत जाणवत राहतं.

असं असलं तरी ‘साधा सरळ सिनेमा’ म्हणून एकदा बघण्यासारखा नक्कीच हा चित्रपट आहे.

सगळ्याच कलाकारांनी भूमिकेला बऱ्यापैकी न्याय दिला आहे. भाग्यश्री उर्फ भागीची व्यक्तिरेखा किरण ढाणे या अभिनेत्रीने उत्तम साकारली आहे.

भागीबद्दल सहानुभूती असलेल्या बिडकर सरांची म्हणजेच दिव्यांग शिक्षकाची भूमिका राहुल बेलापूरकर यांनी उत्तम साकारली आहे.

‘लागीरं झालं जी’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरातपो हचलेला राहुल मगदूम छोट्याश्याच भूमिकेत दिसत असला तरी भाव खाऊन जातो. भागीचे आईवडील, तिला पाहायला आलेल्या पोलीस मुलाचे कुटुंबीय शाळेतले शिक्षक, संस्थाचालक वगैरे सगळ्याच कलाकारांनी आपापल्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत.

अगदीच मसालेदार जेवण झाल्यानंतर जसं काहीतरी हलकं फुलकं जेवण हवं असतं तसं सध्याचे अगदी मसालेदार चित्रपट पाहून त्यातली भव्यदिव्यता पाहून पाहून डोळ्यांनाही काहीतरी साधं हवं असं वाटत असतं.

असं साधंसं काहीतरी हवं असेल तर त्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा. अगदी एका शब्दात सांगायचं झालं तर ‘भाबडा सिनेमा’ असंच या चित्रपटाबद्दल म्हणावं लागेल..!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?