सकाळच्या नाश्त्यामध्ये हे पदार्थ टाळलेत तर आरोग्याची चिंता करावी लागणार नाही
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सकाळी उठल्यानंतर जे पहिले अन्न आपण खातो त्याला म्हणतात न्याहारी. ही प्रत्येकासाठी खूप गरजेची आहे, कारण यामधूनच संपूर्ण दिवसभराची ऊर्जा तुमच्या शरीराला मिळून तुमचे शरीर दिवसभर ताजेतवाने राहू शकते.
सकाळी ऑफिसला किंवा कोठेही कामासाठी बाहेर निघताना चांगला नाश्ता करावा, ज्यामुळे दिवसभर शरीर संतुलित राहतं असा सल्ला अनेकदा दिला जातो. हा सल्ला योग्यचं आहे म्हणा. सकाळी जर पोटभर नाश्ता केला तर दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत थकवा जाणवत नाही.
तसेच शरीरावर देखील त्याचा वाईट परिणाम होत नाही. परंतु नाश्त्यामध्ये नेमकं काय खावं हे कुणीच सांगत नाही. त्यामुळे सकाळी जे काही समोर येईल ते खाऊन आपण नाश्ता झाला असं म्हणतो.
पण तुम्हाला माहित आहे का – असे काही पदार्थ आहेत जे सकाळी नाश्त्यामध्ये खाल्ल्याने त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो.
आज आम्ही तुम्हाला अश्याच काही खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही नाश्त्यामध्ये घेत असाल तर त्वरित थांबवा.
==
हे ही वाचा : सकाळचा नाश्ता नक्की कसा करावा? कोणते पदार्थ हवेत? वाचा
==
१. भाज्यांसोबत केलेला पराठा खरं तर पौष्टिकच असतो. तळण्याऐवजी भाजलेला असल्यामुळे उत्तर भारतातील हा पदार्थ खाण्याकडे अनेकांचा भर असतो.
मात्र सॉस, बटर, तूप, लोणचं यासोबत पराठा खाऊ नये, नाहीतर तुमचा नाश्ता अनहेल्दी झालाच म्हणून समजा.
२. उपवासाच्या दिवशी प्रत्येकाची पहिली पसंती असते ती साबुदाणा वड्याला. उपवासही होतो आणि चमचमीत खाण्याची हौसही भागते. मात्र बटाटा, साबुदाणा, कॉर्नस्टार्च आणि तेल असे सगळे पदार्थ मिळून तयार झालेला साबुदाणा वडा नाश्त्याला टाळलेला बरा.
कारण शक्यतो उपासच्या पदार्थाने पित्त होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे साबूदाणा किंवा शेंगदाणे आणि तत्सम पदार्थ खाण्याचे टाळावे.
वरीचे तांदूळ किंवा राजगीरा किंवा फळे खाणे योग्य ठरते, त्यामुळे पित्तासारखे त्रास होत नाही आणि तेलकटगोष्टी पोटात जात नाहीत!
३. मिसळ हा अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ. मिसळीवर तर्री घेतली की तिची चव ‘भारी’ लागते. मात्र याच नादात तिचं पौष्टिक मूल्य कमी होतं आणि तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.
लोकांचा आणखीन एक गैरसमज आहे की झणझणीत मिसळ खाल्ली तर सर्दी बाहेर पडते तसे काही नसून हा निव्वळ एक बहाणा आहे मिसळ खाण्याचा.
कारण सर्दी खोकला ही असं झणझणीत खाऊन बाहेर पडायला लागलं तर डॉक्टरांना त्यांचे दवाखाने बंद करावे लागतील!
४. पावातून कॅन्सरजन्य घटक शरीरात जात असल्याचा अहवाल काहीच दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यामुळे ब्रेड टोस्टवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
व्हाईट ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड खाल्ल्यास अधिक पौष्टिक ठरतं. शिवाय बटर टाळल्यास कॅलरीजही कमी होतील.
==
हे ही वाचा: ब्रेकफास्टमध्ये हे पदार्थ खाल्लेत तर तुमच्या पचनसंस्थेला होईल जबरदस्त फायदा
==
५. सामोसा हा नाश्त्याला खाणं सोडायला हवं.
सकाळच्या वेळी हलका आहार घेण्याकडे प्रत्येकाचा कल असावा. मात्र मैद्यापासून बनलेला, बटाट्याचं मिश्रण असलेला, तळलेला सामोसा खाल्लात तर तुमची सकाळ आणि पर्यायाने अख्खा दिवसच अनहेल्दी होतो.
६. बटाटा आणि मैद्याचा पाव असलेल्या वडापावमध्ये २८६ कॅलरीज असतात. त्यामुळे सकाळी नाश्त्याला वडापाव खाताना किमान दोनदा तरी विचार करा.
७. सकाळच्या वेळेत बटाट्याचे सेवन न करणं आरोग्यासाठी हितकारक असतं. तेलकट पुरी आणि बटाट्याच्या भाजीचं कॉम्बिनेशनही तितकंसं चांगलं नाही.
८. सिरीअल फूडच्या आकर्षक जाहिरातींना भुलून पॅकेज फूडचे डबे घरी आणणाऱ्यांनी सावध रहावं.
पॅक्ड केलेलं कॉर्नफ्लेक्स किंवा तत्सम पदार्थ तुमच्या आरोग्याला अपायकारक ठरतात. चोकोस, ओट्स किंवा कॉर्न ओट्स अशा गोष्टी आकर्षक वाटत असल्या तरी त्यांचा उपयोग शून्य असतो!
त्यामुळे अशा जाहिरातींना न भुळता नियमित पोळी भाजी किंवा पोहे उपमा असा नाश्ता केल्यास अपाय अजिबात होत नाही उलट त्याने फायदाच आहे!
==
हे ही वाचा : जर तुम्ही पोह्यातील हे गुण जाणून घेतले कधीही पोह्यांना ‘नाही’ म्हणणार नाही
==
९. मेदूवडा पचायला जड मानला जातो. चटणी-सांबार वगळले तरी ३३४ कॅलरीज् या मेदूवड्यात असतात.
त्यामुळे नाश्त्याऐवजी हा तेलकट दाक्षिणात्य मेंदूवडा दुपारच्या जेवणात खाल्लात तर बरं.
मुळात या आंबावलेल्या पदार्थांमध्ये यीस्ट नावाचा पदार्थ घालतात जो शरीरासाठी प्रचंड घातक असतो आणि असे पदार्थ वरचेवर खाल्ल्याने स्कीन अलर्जी तसेच पोटाचे विकार होण्याची शक्यता दाट असते!
हे वाचून तुम्ही म्हणत असालं, “आता उरलं तरी काय खाण्यासारखं?” हे पदार्थ जरी जीभेसाठी चमचमीत वाटत असले तरी ते शरीरासाठी अपायकारक आहेत म्हणून ते नाश्त्यासाठी योग्य नाहीत.
यापेक्षा नाश्त्यामध्ये अंडी, दही, फळे, सुकामेवा, यांसारखे पौष्टिक पदार्थ खाल्लेले उत्तम!
नाश्ता चविष्ट असावा पण तो पौष्टिक देखील असला पाहिजे नाही का?
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
काय खाऊ नका हे सांगितलेत,
आता काय खायचे ते पण सांगा !