'"अनलिमिटेड कॉंप्लिमेंटरी ब्रेकफास्ट" : एक चिमुकला पेच...!

“अनलिमिटेड कॉंप्लिमेंटरी ब्रेकफास्ट” : एक चिमुकला पेच…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखिका: प्राजक्ता काणेगावकर

===

द मोस्ट इम्पॉर्टंट मील ऑफ द डे

कॉंप्लिमेंटरी ब्रेकफास्ट हा माझ्यासाठी नेहमीच चिमुकला पेच असतो. नॉर्मली रात्रीचं जेवण हे कमालीचं लाईट असल्याने मला ब्रेकफास्टला खाऊ का गिळू लेव्हलची भूक लागलेली असते. त्यात मग पटकन पोटभरीचं काय होईल जेवेळेत बसेल असले काहीतरी पॅरॅमिटर्स असतात.

त्यामुळे सहसा चहा पोळी हा पहिला पर्याय, दुसरा म्हणजे सरळ दोन पोळ्या जास्तीच्या लाटून डायरेक्ट पोळी भाजी जेवणे.

दुसरा पर्याय बरा पडतो. हाताशीच सगळे असल्याने होऊन पटकन ब्रेकफास्ट होऊन पण जातो. त्यामुळेच कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट हे सहसा मला न झेपणारं प्रकरण असतं. त्यातून मी खाण्यापिण्याच्या बाबतीत बरीचशी देशी असल्याने फारच चिमुकले पेच पडत असतात मला.

दुसऱ्या शहरात रहायला गेले की कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे असे चेक इन करतानाच सांगतात. सकाळी साडेदहा पर्यंतच आहे हां असेही आवर्जून सांगितले जाते. सांगणारी ती असेल तर अगदी सुहास्य वदनाने सांगते. तो असेल तर जरा गंभीर इशारावजा सांगतो.

आपण रूम मध्ये शिरतो. सकाळी उठून स्वयपाक करायचा नाहीये या कल्पनेनेच आपण खूष असतो. शिवाय बाकीचे पण काही घोर नसतात. कपडे साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवा, केराच्या बादल्या बाहेर ठेवा, चहाचे भांडे शोधून रात्री ओट्यावर मांडून ठेवा, भाजी बघा, कणिक भिजवून ठेवा, ईत्यादी ईत्यादी. काही म्हणजे काSSही नसते. अंमळ जास्तच निवांत असतो आपण.

घरात आपण टीव्हीकडे ढुंकून बघत नाही. इकडे मात्र न्यूज पण प्रेमाने ऐकतो. उगाच चॅनल सर्फिंग करतो. एकट्याच्या हातात रिमोट असल्याचा पुरेपूर फायदा घेतो. खरंतर काही काच नसताना निवांत झोप लागणार असते. तशी ती लागते ही. सकाळी अलार्म नसतो. तरी सवयीने एकदा पावणे पाचला जाग येते. इतक्या लवकर उठून काय दिवे लावायचेत म्हणून आपण दामटून झोपून रहातो. मग ताडकन जाग येते.

कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट गं बै. चुकायचं उगाच…!

पटपट आवरून आपण लॉबीमध्ये येतो. सहसा आपले बुचक-ळ्यातले भाव बघून पटकन मॅनेजर पुढे येतो…
ब्रेकफास्ट इन द हॉल मॅडम असं सांगतो.

आपण हॉलचा भलामोठा काचेचा दरवाजा उघडून आत शिरतो.

आतमधली कमाल सोफिस्टिकेटेड जनता आपल्याकडे ये कौन आया अशी लुकते. यातले पटकन ब्रेकफास्ट करुन क्लाएंट व्हिजिटला निघणारे सहसा फॉर्मल स्ट्राईप्स शर्ट, टाय, कड्डक इस्त्री, चकाचक शूज असे असतात. केस एकदम व्यवस्थित विंचरलेले, चष्मा असलाच तर तो एलिगंट फ्रेमचा, मोबाईल डिशच्या डाव्या बाजूला व्यवस्थित ठेवलेला असतो. जरा सिनियर असतील तर बियर बेली व्हायच्या मार्गावर असते.

हे सहसा पटकन दोन इडल्या, एखादा मेदूवडा असं पोटात टाकणारे असतात. एकटे असतील तर इकनॉमिक टाईम्स (खरा उच्चार हाच आहे. तुम्ही इकॉनॉमिक म्हणता का?) वाचता वाचता किंवा तिथे लावलेल्या भल्यामोठ्या स्क्रीनवर बातम्या बघत बघत खातात.

दुकटे म्हणजे कलिगबरोबर असले तर गव्हर्नमेंट पॉलिसीज आर अबसॉल्यूट बि एस वगैरे बोलतात. बहुतेक आदल्या रात्री अबसॉल्यूट अबसॉल्यूटली नीट झालेली असते. अगदीच वाटलं तर टोस्टरपाशी उभं राहून दोन टोस्ट घेतात आणि बटरने लादर करुन घेतात. आपण पन्नास वेळा बोलावलं तरी न येणारे खानसामे यांना तत्परतेने चहा ओतून देतात आणि शुगर फ्री स्वीटनरचा पाऊच देतात. यू शुड बी केअरफुल विथ व्हाईट शुगर असं बटर्ड टोस्ट खाता खाता सांगत असतात. पण एकूण अध्यात न मध्यात असतात.

यात जर बिझनेसवूमन असली तर ती हटकून पँटसूट किंवा शर्ट ट्राऊझर्स मध्ये असते. मग ती ब्रेकफास्ट सिरियल्स बोलमध्ये घेते. त्यावर दूध घालायच्या ऐवजी एका दुसऱ्या बोलमध्ये मिल्क घेते. ते ठेवून येते आणि एका प्लेटमध्ये फ्रेशली चॉप्ड फ्रूट्स घेते. ती चहा कॉफी घेत नाही. फ्रेश ज्यूस घेते. तिचं एकूणच चिमणीगत खाणं बघून आपल्याला साधारण बकासूर फिलिंग आलेलंच असतं.

तिसरा प्रकार असतो तो म्हणजे अंघोळीला जायच्या आधी ब्रेकफास्ट करुन घेऊ असे खाली उतरलेले लोक. हे सहसा शॉर्ट्स, कॅप्टन अमेरिका किंवा सुपरमॅनचा लोगो असलेला टी शर्ट अशा अवतारात असतात. पायात चटईची चप्पल असते किंवा फ्लोटर असतात.

हे सरळ आलू पराठ्यांकडे जातात. मग ते पराठे गरम नाहीत म्हणून आरडाओरडा करतात. बिझनेस शर्ट आणि सूट वाले लोक यांच्याकडे काय शिंची कटकट आहे याची सौम्य आवृत्ती भाव ठेवून बघतात. हे जनरली जोरजोरात गप्पा मारणारे असतात. आज प्रोग्रॅम काय आहे यांचा ते एरवीच सगळ्यांना कळते.

मग येतात आमच्यासारखे. बिझनेस व्हिजिटवर असलो तरी साडी नेसलेली असते. एक टेबल पकडून आधी फोन वगैरे ठेवतात. मग हातात भली मोठी प्लेट घेऊन मैदानाच्या दिशेने कूच करतात.

Complimentary breakfast inmarathi

कॉर्न फ्लेक्स इत्यादीचे टॉवर ओलांडून डायरेक्ट देशी ब्रेकफास्ट कडे येतात. तो ही स्टॅंडर्ड मेनू असतो. एक घमेल्यात चार त्रिकोणी तुकडे केलेले आलू पराठे असतात. त्याच्यासमोर स्वच्छ इंग्रजीत आलू परांठा असं लिहिलेलं असतं…”बाहेर एकच परांठा म्हणलंय आणि आत तर खूप दिसतायत” वगैरे पांचटपणा आपण मनाशी करतच असतो.

शेजारच्या घमेल्यात मिठाच्या बरणीच्या झाकणाएव्हढे उत्तप्पे असतात. कांदा टंचाई नसेल तर भरपूर कांदा टॉपिंग म्हणून घातलेला असतो, असेल तर तीट लावण्यापुरता कांदा आणि बाकीचा बराचसा टॅन झालेला गोरा उत्तप्पा असतो.

त्याच्या शेजारच्या घमेल्यात इडल्या आणि वडे सुखाने नांदत असतात. समोर एक मोठ्ठा चटणीचा बोल असतो. त्याच्या शेजारी सांभर असते.

पलीकडे आलू सब्जी असते आणि त्यापलीकडे टम्म फुगलेल्या पुऱ्या असतात. मुळातच आपल्या फेवरिट असतात त्या पुऱ्या. मग आपण अतीव आनंदाने चार पुऱ्या आणि आलू सब्जी घेतो. (अण्णा असेल तर डोसाभाजी करतो राव पुरीबरोबर…. गर्रर्रर्रर्रर्रर्र) आणि डोशाची चटणी. वेटरबुवा अदबीने मॅडम बिसलेरी ऑर आरो वॉटर करतो. आरो चलेगा असे म्हणल्यावर तो ग्लास भरून देतो.

आता गंमत सुरु होते. आपण आजूबाजूला बघतो. लोक लैच मन लावून फोर्क, नाईव्ज आणि स्पून करत असतात. समोरचा बाबा तर मेदूवडा जSSन्टली फोर्कने कट करुन खात असतो.

फ्रूटप्लेटवाल्या तै मोबाईलवर कॅच अप करता करता एक एक फोड नाजूकपणे फोर्कने उचलून खात असतात. आली का पंचैत च्यामारी.

आपण इकडे तिकडे बघतो आणि सरळ पुरीचं पोट बोटाने फोडतो. हाताने पुरीचा तुकडा मोडून भाजीच्या रश्शात बुडवतो. पहिल्याच घासाला चवीला दाद जाते. बाजूच्या टेबलवर एका हातात पुरीचा रोल धरुन चमच्याने भाजी खाणारा बाबा हसतो.

आपण त्याला उडतं स्माईल टाकतो आणि आता बोटं चाटून खात असतो.

पुऱ्या आणायला उठणार एव्हढ्यात वेटर समोर येतो. मॅडम पुरी चाहीये? असं विचारुन प्लेटमध्ये गरम गरम पुऱ्या घेऊन येतो. आपण मान वर करून त्याच्याकडे बघतो. त्याच्या चेहऱ्यावर एकंदरीतच समंजस प्रसन्न हास्य असतं. आपणही हसतो.

एक कप चाय मिलेगी?

हांजी मिलेगी. कौनसी वाली चाहिये? इंग्लिश ब्रेकफास्ट?

नाSS..अलगसे बनाओगे?

हांजी.

तो एक कप मसाला चाय चाहिये.

तो अदृश्य होतो आणि थोड्या वेळाने गरम वाफाळता स्पेशल चहा घेऊन येतो. आपण चहाचा रंग बघूनच खूष होतो. तो परत गायब होतो आणि एका छोट्या किटलीत एक कप चहा अजून घेऊन येतो.

और कुछ चाहिये जी?

नही जी

एव्हाना आपण चाटून पुसून भरपेट खाऊन घेतलेलं असतं. नॅपकिनला हात पुसण्याच्या ऐवजी आपण जाऊन हात धुवून येतो. शांत बसून परत एक कप चहा घेतो.

टेबलवरून उठताना वेटर महाशय परत उगवतात. आपल्याला एक झकास जाणतं स्माईल मिळतं.

मॅडम जी

हां जी

हॅव अ नाईस डे.

थँक्यू अँड यू टू.

आपणही हसतो. दिवसाची सुरुवात मस्त झालेली असते.

ब्रेकफास्ट ईज द मोस्ट इम्पॉर्टंट मील ऑफ द डे म्हणतात ते काय उगाच?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?