' आदिम काळात नष्ट झालेल्या प्राण्यांची साक्ष देणारे "हे" वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आजही पृथ्वीवर टिकून आहेत..

आदिम काळात नष्ट झालेल्या प्राण्यांची साक्ष देणारे “हे” वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आजही पृथ्वीवर टिकून आहेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जैवसृष्टी आजच्या अवस्थेला पोहोचण्यापूर्वी तिच्यात कित्येक बदल झाले आहेत. या बदलाच्या ओघात काही प्राणी स्वतः विकसित होत आजच्या अवस्थेपर्यंत पोचले तर काही पूर्णतः नष्ट झाले.

 पूर्णतः नष्ट झालेल्या प्राण्यांचे अवशेष आज उत्खननात सापडतात. हे प्राणी पूर्णतः नष्ट झाले असले तरी, या प्राण्यांच्या वंशाचा वारसा चालवणारे काही प्राणी आजही पृथ्वीवरती वावरत आहेत.

खरंतर, आजच्या काळात त्यांची वाटचालही हळूहळू संपुष्टात येण्याच्या मार्गावरच आहे. पण, या प्राण्यांच्या काही खास वैशिष्ट्यांमुळे आदिम काळातील प्राणी आजही आपल्या आजूबाजूला आहेत, याची प्रचीती आपल्याला येऊ शकते. या लेखातून आपण अशाच काही प्राण्यांची माहिती घेणार आहोत.

१. घरीयाल

मगर आणि सुसरीच्या प्रजातीतील हा एक दुर्मिळ होत चाललेला प्रकार. मगर, सुसर, कॅमेन यासारख्या इतिहास जमा झालेल्या प्रजातींची सौंदर्य स्पर्धा भारावल्यास निश्चितच त्यात घरीयाल सर्वाना मागे टाकेल.

घरीयालचे तोंड लांब रुंद आणि तलवारीच्या आकाराचे असते. नर घरीयालला शेपटीच्या शेवटी एक नाकासारख्या आकाराचा अवयव असतो, ज्यामुळे हा प्राणी मोठा गमतीशीर वाटतो.

दहा हजार वर्षापूर्वी पासून ही प्रजाती आपल्या अवतीभोवती वावरत आहे. त्यांच्या वंशातील ही शेवटची प्रजाती आहे जी नष्ट होण्याचा मार्गावर आहे.

भारतातील लखनौ मधील कुक्रेल फॉरेस्ट रिझर्व येथील प्रजनन केंद्रात घरीयालच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. नेपाळ मधील चितवन नॅशनल पार्क आणि बार्डिया नॅशनल पार्क येथे काही संवर्धित केलेल्या घरीयाल आहेत, पण ज्यांची संख्या अगदीच नगण्य आहे.

 

Gharial InMarathi

 

२. कोमोडो ड्रॅगन

कोमोडो ड्रॅगन आज आपल्याला इंडोनेशियामध्ये पाहायला मिळतो. पण, हे मुळचे इथले नसावेत असे वाटते. फार पूर्वी ऑस्ट्रेलिया मध्ये संशोधकांना यांचे अवशेष आढळले होते. हे अवशेष सुमारे चार लाख वर्षे इतके जुने होते.

हे अवाढव्य सरडे वजनाला माणसापेक्षाही खूप जड असतात आणि कधी कधी माणसासाठी घातक देखील ठरतात. आकाराने खूपच मोठे असणारे आणि सरपटणारे हे प्राणी विषारी देखील असतात.

 

ancient animals inmarathi
worldatlas.com

 

कोमोडो नॅशनल पार्क मध्ये तुम्हाला हे प्राणी पाहायला मिळतील. स्वतःला फारच शूर समजत असाल तर एकदा या पार्कला भेट द्यायाला हरकत नाही.

 

Komodo Dragon InMarathi

 

३. शुबील सारस

शुबील सारस हा पक्षी नेमका पक्ष्यातील कोणत्या प्रजातीशी संबधित आहे हे खात्रीने सांगता येत नाही. कारण त्याच्या बद्दल गोळा केलेल्या माहितीतून तो वेगवेगळ्या प्रजातींशी साधर्म्य दाखवतो.

परंतु, हा पक्षी खूप जुना असल्याचे सर्व वैज्ञानिकांचे मत आहे. अर्थात एक दुर्मिळ प्रजाती म्हणून याची नोंद करण्यात आली आहे. युगांडाच्या मबाम्बा बे वेटलँड येथे त्यांचे संवर्धन केले जाते. अनेक पक्षी निरीक्षक येथे पक्षी निरीक्षणासाठी भेट देत असतात.

 

Shoebill Saras InMarathi

 

४. बॅक्ट्रियन ऊंट

पाठीवरती एक कुबड असलेला उंट तर आपण पहिला आहेच. मध्य आशियात शक्यतो वाहतुकीसाठी याचा वापर केला जातो.

परंतु हे एक कुबड असणारे उंट दोन कुबड असणाऱ्या उंटापासूनच निर्माण झालेत हे तुम्हाला माहित आहे काय? मंगोलियाच्या गोबी वाळवंटात आजही हे दोन कुबड असणारे उंट पाहायला मिळतात.

दोन दशलक्ष वर्षापूर्वी हे उंट अस्तित्वात आले असावेत. शून्य डिग्री सेल्सियस पेक्षा कमी आणि १०० डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमानात जुळवून घेण्यासाठी हे विकसित झाले.

त्यांच्या पाठीवरचे दोन कुबड हे फॅट साठवण्यासाठी असतात. जेंव्हा अन्न पाणी मिळत नाही तेंव्हा ते या साठवलेल्या फॅटचा वापर करून जिवंत राहतात.

सध्या अशा उंटाची संख्या फक्त १०००वर येऊन ठेपली आहे. मंगोलियन संस्कृतीत हे उंट पाळले जातात. पर्यटकांना या उंटाची महागडी सफारी देखील करवून आणली जाते.

 

bactrian camel InMarathi

 

५. एचीनाड

बॅजर, पोर्क्यूपाईन आणि अँटइटर यांच्यातील क्रॉस प्रमाणे हा प्राणी दिसतो. हे असे सस्तन प्राणी आहेत जे अंडी घालतात. हे प्राणी जंगलात राहत नाहीत. ते एकांतप्रिय आहेत. १७ दशलक्ष किंवा त्यापेक्षाही जास्त वर्षे झाली हे प्राणी पृथ्वीवर आढळतात. पण, आत्ता यांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

न्यूझीलंड, टास्मानिया आणि ऑस्ट्रेलियाच्या प्राणीसंग्रहालयात, हे प्राणी तुम्हाला जवळून पाहायला मिळतील. बोनोरोंगच्यावन्यजीव अभयारण्यात देखील पाहायला मिळतील.

 

echidna InMarathi

 

६. कस्तुरी बैल

विशेषत: यांच्या प्रजनन काळ जवळ आला की हे प्राणी पहायला मिळतात. या काळात मादीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन नरांत जोरात लढाई होते. हे नर जेंव्हा एकमेकांना टक्कर देतात तेंव्हा दूरपर्यंत धरणीकंप जाणवतो.

अर्थात ही प्रजाती इतकी जुनी आहे की, हे आत्तापर्यंत जिवंत कसे राहू शकले हेच एक मोठे आश्चर्य आहे. ही प्रजाती अस्तित्वात येऊन १, ८७, ००० किंवा त्यापेक्षाही खूप वर्षे झाली असतील.

अलास्का, नोम येथील टुंड्रा गावात ते फिरत असतात. या प्राण्याच्या केसापासून मऊ आणि उबदार वस्तू बनवल्या जातात. नोम मधील विकेत्यांकडे त्या मिळू शकतात, ज्या खूपच महागड्या आणि दुर्मिळ असतात.

 

kasturi Ox InMarathi

 

७. विकुवा

अल्पका नावाच्या प्राण्याचा हा खूप जुना पूर्वज आहे. हा प्राणी देखील आपल्या कातडीवरील लोकरीसाठी प्रसिद्ध आहे. अल्पका नि विकुवा दोन्ही प्राण्यांत फारच साम्य आढळते. विकुवाचा रंग थोडा ब्राऊन असतो आणि पोटाचा भाग पांढरा असतो.

शिकारीमुळे ही जमाती अगदी नामशेष होण्याच्या मार्गावर पोचली आहे. परंतु काही संवेदनशील पर्यावरणवादी लोकांच्या प्रयत्नामुळे सध्या काही विकुवा आपल्याला पाहायला मिळतात.

दक्षिण मध्य पेरूच्या ग्रामीण भागात तुम्हाला विकुवा नक्कीच पाहायला मिळतील. पण, लिमाच्या उत्तरेला असलेल्या ह्यूसॅकरन नॅशनल पार्कही एक अत्यंत चांगले ठिकाण आहे, जिथे तुम्हाला विकुवा पाहायला मिळतील.

 

Vekuna Inmarathi

 

८. चेंबर्ड नॉटिलस

खोल समुद्राच्या तळाशी राहणारा हा एक जलचर प्राणी आहे. कॅलिफोर्नियाच्या प्रसिद्ध मॉंन्टेरे बे अॅक्वेरियम मध्ये हा प्राणी पाहायला मिळेल. कॉर्कस्क्रू-आकाराचा हा जगातील सर्वात जुना प्राणी आहे.

या प्राण्याचे ५०० दशलक्ष वर्षापूर्वीचे अवशेष आढळून आले आहेत. या प्राण्यांना पकडून ठेवून यांचे जतन करता येत नाहीत.

अॅक्वेरियम मध्ये यांचे प्रजनन करण्यास अपयश येत असल्याने यांची प्रजाती अगदीच नष्ट होण्याच्या मार्गावर पोचली आहे.

 

Nautilus InMarathi

 

९. बाबीरुसा

बाबीरुसा म्हणजे दररोज दिसणाऱ्या डुकराचाच मोठा भाऊ. अपवाद म्हणजे यातील नराला एक मोठे शिंग असते. जे सरळ त्याच्या नाकावरून वरच्या दिशेला वाढते आणि थोडेसे डोक्याच्या बाजूला झुकते.

इंडोनेशिया मध्ये केलेल्या गुहेतील चित्रांमध्ये हे बाबीरुसाचे चित्र पाहायला मिळतील. इंडोनेशियातील नांटू फॉरेस्ट आणि टांगकोको नैसर्गिक अभयारण्यात हे बाबीरुसा पाहायला मिळतील.

 

babirusa-InMarathi

 

१०. तापीर 

बाबीरुसा प्रमाणेच तापीर ही देखील डुकराशी साधर्म्य असणारा प्राणी आहे, त्याचे एकच वेगळेपण म्हणजे, त्याला हत्तीप्रमाणे छोटीशी सोंड असते ज्याने तो आपले अन्न तोंडात ढकलतो.

तापीर २३ दशलक्ष वर्षापूर्वी विकसित झाले. आशिया, मध्य आणि दक्षिण अमेरिकेत यांच्या आता फक्त पाचच प्रजाती शिल्लक आहेत.

अमेरिकेच्या कोर्कोवाडो नॅशनल पार्क मध्ये जंगली तापीर पाहायला मिळतील. याव्यतिरिक्त अमेझॉनच्या रेनफॉरेस्ट मध्ये देखील त्यांची थोडी बहुत संख्या आढळते.

 

tapir InMarathi

 

११. पांढरा गेंडा

हा आदिम कालीन प्राणी इतर दोन आदिम कालीन, उत्तरी पांढरा गेंडा आणि दक्षिणी पांढरा गेंडा या प्राण्यांचे संकर आहे. दुर्दैवाने उत्तरी पांढरा गेंडा हा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

यांच्यातील अगदी मोजक्या मादी शिल्लक आहेत, म्हणजे येत्या काही वर्षात ही जमत पूर्णतः नष्ट होऊन जाईल. आजही गेंड्याची शिकार केली जाते. त्यांच्या शिंगाचा वापर पारंपारिक आशियायी औषधांमध्ये केला जातो.

दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्क मध्ये हा पांढरा गेंडा पाहायला मिळेल. क्रुगर नॅशनल पार्क हे जंगल सफारी करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे जिथे, तुम्हाला इतरही काही दुर्मिळ प्रजातीतील प्राण्यांचे नमुने पहायाला मिळतील.

 

White genda InMarathi

 

१२. वोबेगॉंग शार्क 

हे शार्क सुमारे ११ दशलक्ष वर्षापूर्वी अस्तित्वात आले, आजही यातील अनेक जाती अस्तित्वात आहेत. यातल्या काहीचा आकारही इतका छोटा आहे की, त्यापासून माणसाला काही इजा होणे शक्य नाही.

सिडनी अॅक्वरीयम ऑस्ट्रेलिया मध्ये यांना जवळून पाहता येईल, जिथे तुम्हाला शार्क स्विम देखील करता येईल.

 

Shark InMarathi

 

या प्राण्यांच्या संवर्धनासाठी जगभरातून प्रयत्न केले जात आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?