' जेव्हा शिवसेना “फारच” वादग्रस्त आहे म्हणून भाजपने साधली होती पवारांशी जवळीक…! – InMarathi

जेव्हा शिवसेना “फारच” वादग्रस्त आहे म्हणून भाजपने साधली होती पवारांशी जवळीक…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युती करून सोबत लढलेल्या भाजप-सेनेच्या २५ वर्षांच्या मैत्रीत सत्तावाटपावरून चालू झालेला  वाद चिघळण्याच्या स्थितीत पोचला होता. सेनेला सत्तेच्या वाटा खुणावत होत्या तरी, सक्षम साथीदाराशिवाय सत्तेचा संसार मांडणे सर्वांसाठीच अशक्य कोटीतील स्वप्न बनले होते.

भाजपचा राष्ट्रवादीसोबत जाणायचा डाव जसा फसला तसा शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर युती करून सत्तेत स्थान पटकविले.

 

shivsena-bjp-marathipizza

 

भाजप नसला तरी, कॉंग्रेस आणि एनसीपीसोबत का असेना पण, सत्तेचा सोपान सर करूच असा आशावाद सेनेच्या मनात पल्लवित झालेला आहे. सेना-भाजपच्या या दरीचा फायदा झालाच तर करून घेण्यास एनसीपी देखील उत्सुक आहे.

आज त्यांच्या चाणक्य नीतीची एक झलक आपणही पाहत असलो तरी, पवारांची ही खेळी किती जुनी आणि कशी मुरलेली आहे, याची प्रचीती तुम्हाला हा लेख वाचल्यावर नक्कीच येईल.

भाजप आणि सेनेच्या युतीची सुरुवात आणि त्यातील कुरबुर देखील तितकीच जुनी असल्याचीही आपल्याला नक्कीच खात्री पटेल.

भाजप-शिवसेनेने युती तोडण्याचा निर्णय म्हणजे, २५ वर्षांच्या जुन्या मैत्रीचा शेवट. अर्थात, त्यांच्या मैत्रीत फुट निर्माण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अगदी ५ च वर्षांपूर्वीची विधानसभा निवडणूक या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली होती. तो पर्यंत तशी सेना आणि भाजप यांच्यामध्ये १९८९ पासून अभेद्य युती होती.

परंतु त्या आधी, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर, १९८४ साली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष पहिल्यांदा एकत्र आले.

१९८४ मध्ये बाळ ठाकरेंनी आपल्या मराठी अस्मितेच्या मुद्द्याला वळसा घालत, हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला. आणि त्याचवर्षी एप्रिल आणि मे मध्ये भिवंडीमध्ये जातीय दंगल झाली ज्यात शिवसेनेचा हात असल्याचे आरोप करण्यात आले.

 

balasaheb thackeray bhiwandi riots inmarathi

हे ही वाचा – शिवसेना स्वतःची ताकद ओळखणार कधी? : राष्ट्रवादीला गळती लागल्यानंतर एका शिवसेनाप्रेमीचा सवाल

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी सेनेशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न सुरु केला. याला त्यांच्याच पक्षातून फार मोठा विरोध होता.

 

balasaheb thackeray pramod mahajan inmarathi

 

भाजपमधील अनेकांची “सेनेसारख्या वादग्रस्त संघटने पासून चार हात लांब राहिलेले उत्तम” अशीच धारणा होती. हा विरोध इतका तीव्र होता, की जनता पक्षाकडून भाजपसोबत येण्यास नकार मिळाल्यानंतरच भाजपने शिवसेनेशी बोलणी करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने शिवसेनेला मुंबईत दोन जागा दिल्या (दक्षिण-मुंबई आणि उत्तर-मध्य मुंबई) बाकी चार जागांवर भाजप स्वतः लढली. भाजपची बाजू घेऊन बाळासाहेब ठाकरेंनी कॉंग्रेसवर निशाणा धरण्यास सुरुवात केली.

 

bjp shivsena bypoll elction campaign 1984 inmarathi

 

इंदिरा गांधीच्या ठिकाणी राजीव गांधीना पंतप्रधान पदाची सूत्रे सोपवली गेली. तेव्हा जाहीर सभेत बाळासाहेबांनी प्रश्न केला होता, “पंतप्रधान पद आहे की, पान-पट्टीचे दुकान? म्हणजे घरातला एक माणूस गेला की, दुसरा गल्ल्यावर बसतो, तसं?”

अर्थात, बाळासाहेब ठाकरेंच्या या “घराणेशाही विरोधाची” ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा उद्धव आणि राज ही शिवसेनेची बछडी अजून राजकारणात उतरली नव्हती.

 

balasaheb thackeray uddhav thackeray raj thackeray inmarathi

 

गमतीची बाब म्हणजे तेव्हा सेनेचं स्वतःचं निवडणूक चिन्हही नव्हतं आणि त्यांनी ही निवडणुक भाजपच्याच म्हणजे ‘कमळ’ चिन्हावर लढली होती.

परंतु, सहानुभूतीच्या लाटेत या भगव्या युतीचा टिकाव लगला नाही. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या महालाटेचा राजीव गांधीना चांगलाच फायदा झाला. काँग्रेस अभूतपूर्व यश मिळवत – ५१४ पैकी ४०४ जागांवर निवडून आली.

महाराष्ट्रात अनेकांनी भाजपच्या अपयशाचे खापर सेनेच्या डोक्यावर फोडले.

निवडणुकीनंतरच्या “आत्मचिंतन बैठकीत” भाजपने अपयशाचा सगळा भार सेनेच्याच डोक्यावर दिला आणि युती तोडण्याचा निर्णय घेतेला. परिणामतः, दोन्ही पक्षांनी १९८५ची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढली.

त्यावेळी शरद पवार हे कॉंग्रेस(एस) चे नेतृत्व करत होते आणि कॉंग्रेसला (आय) विरोध म्हणून “पुरोगामी लोकशाही आघाडी”ची स्थापना केली होती. या आघाडीत त्यांच्यासोबत जनता पक्ष आणि डावे देखील सामील होते.

भाजपने देखील यावेळी पवारांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पवारांच्या पुलोदशी गठबंधन केले.

सेनेने देखील या आघाडीत सामील व्हावे यासाठी प्रमोद महाजनांनी बराच आटापिटा केला. पण, त्यांच्या स्वतःच्याच पक्षाचा विरोध एवढा होता की, त्यांचे हे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. अर्थात, भाजपाचा हा उलटा न्याय बाळासाहेब विसरले नाहीत.

त्यानंतर जेव्हा १९८९ मध्ये पुन्हा भाजपसोबत सेनेची युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी या गोष्टीची आठवण करून देत, अनेकदा भाजपला जाहीरपणे शालूतून जोडे हाणले. त्यांनी भाजपला अनेकदा जाणीव करून दिली की, त्यांनीही कधी काळी शरद पवारांसोबत “घरोबा” केला होता.

१९८५ साली सेनेने मुंबईत एकाच ठिकाणी विजय मिळवलेला होता. तरी, बीएमसीवर त्यांनी पकड मिळवली आणि आक्रमक हिंदुत्वाच्या जोरावर त्यांनी राज्याच्या राजकारणातही मुसंडी मारली.

 

balasaheb thackeray cut outs mumbai inmarathi

हे ही वाचा – “अश्लील मुर्त्या हटाव!” : शिवसेना नगरसेवकाचा सु-संस्कारी आदेश

१९८५ च्या शाह बानो प्रकरणानंतर आणि राम जन्म भूमीच्या आंदोलनानंतर भाजपच्या राजकारणाचा आलेख देखील वेगाने वर सरकत होता. त्यानंतर १९८७च्या विलेपार्लेच्या विधानसभा-पोट निवडणुकीत तर बाळासाहेब उघडपणे हिंदुत्वाच्या नावावर मत मागू लागले.

त्यांच्या या कृत्यावर आक्षेप घेत न्यायालयाने त्यांच्यावर सहा वर्षे मतदान करण्यास बंदी आणली. भाजपने देखील नंतर गांधीवादी समाजवादाबद्दलचा आस्थेवाईक मुखवटा बाजूला सारला आणि हिंदुत्व हाच त्यांच्या राजकारणाचा प्रमुख आधार बनला.

अर्थात, भाजपने देखील १९८९ मध्ये शिवसेनेसोबतच जाणे उचित समजले. कारण – ज्या व्यक्तीवर विसंबून ते सेनेपासून दूर गेले होते – ते पवार – १९८६ मध्ये पुन्हा कॉंग्रेसच्या तंबूत परतले होते.

भाजपला महाराष्ट्रात बस्तान बसवण्यासाठी, आपले घोडे पुढे दामटण्यासाठी कुणाचा तरी आधार हवाच होता. तेव्हा पासून आत्तापर्यंत भाजप-सेनेचा कुरबुरीचा संसार सुरूच होता.

आता मात्र राजकारणामुळे म्हणा वा अहंकारामुळे म्हणा वा सत्तालोलुप वृत्तीमुळे म्हणा – या दोघांत प्रचंड मतभेद निर्माण झाले आहेत. या मतभेदांचा फायदा अर्थातच तिसऱ्याला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आत्ता पुन्हा भाजप-सेनेत दरी निर्माण झाली असताना, एकदा स्वतःचा मजबूत पक्ष असणारे पवार या दरीचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांना “तेल लावलेला पैलवान” म्हटलं जातं. त्यांची “अनप्रेडिक्टेबिलिटी” सर्वत्र चर्चेचा विषय असते. कदाचित हेच कारण असेल ज्यामुळे शरद पवार आजपर्यंत कोणत्याच बाजूला फार काळ टिकून राहिले नाही.

सोनिया गांधींना काँग्रेस च्या राजकारणात आणण्यात काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांना यश मिळाल्यानंतर “आपलं स्थान” धोक्यात आलंय हे ओळखून लगेचच “राष्ट्रवादी काँग्रेस”ची स्थापना करणं हे याच स्वभावाचं उदाहरण.

NCP-inmarathi

 

अनेकांना वाटतं की याच स्वभावामुळे शरद पवार दिल्लीतील राजकारणात फार वरच्या स्थानावर पोहोचू शकले नाही. कारण दीर्घकालीन विश्वासार्हता कमावल्याशिवाय तिथे जम बसवणं अशक्य असतं. परंतु शरद पवारांनी सतत बाजू बदल केलेले असल्याने त्यांची विश्वासार्हता उरलेली नाही.

वरील इतिहास पहाता – केवळ या एका उदाहरणातूनच कल्पना येऊ शकते की काँग्रेस काय वा सेना काय वा भाजप काय – शरद पवारांच्या “राजकारणापासून” कुणीही सुटलेलं नाही…!

तर दुसरीकडे – सोय-गैरसोय बघत हव्या त्या पक्षाला जवळ करणे आणि नकोशा पक्षाला दूर लोटणे – हा भाजपचा इतिहासही समोर येतोय…!

 

sharad pawar laughing

 

माहिती स्रोत : The first time the Sena-BJP split and Sharad Pawar stepped in

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?