' "पानिपत"च नव्हे - या भारतभूमीत एकाहून एक "महायुद्धे" घडली आहेत.. वाचा, भारतीय ऐतिहासिक महायुद्धांबद्दल..!

“पानिपत”च नव्हे – या भारतभूमीत एकाहून एक “महायुद्धे” घडली आहेत.. वाचा, भारतीय ऐतिहासिक महायुद्धांबद्दल..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

भारतीय संस्कृती ही पाच हजार वर्षांपेक्षाही जुनी आहे. प्राचीन काळी भारतीय उपखंड हा प्रदेश सांस्कृतिकदृष्ट्या तसेच भौतिकदृष्ट्या देखील अत्यंत श्रीमंत होता.  प्राचीन काळापासून ते आता कारगिलपर्यंत अनेक युद्धांचा सामना ह्या भूमीने केला आहे.

प्राचीन काळी झालेले महायुद्ध म्हणून आपण महाभारताचे नाव घेतो. पण रामायण आणि महाभारताच्याही आधी भारताच्या भूमीवर दाशराज्ञ नावाचे एक युद्ध लढले गेले होते.

त्यानंतर सुद्धा कलिंगचे युद्ध ,करनालचे युद्ध, तालिकोटाचे युद्ध अशी मोठी युद्धे भारतात लढली गेली ज्याने देशातील राजकारणाचे चित्र बदलले तसेच सत्तांतरण घडवून आणले.  ह्यातील काही युद्धे परकीय आक्रमणापासून बचाव म्हणून लढली गेली तर काही युद्धे आपापसांत लढलेली आहेत. जाणून घेऊया, अशाच काही युद्धांबद्दल..

हे ही वाचा

 

१. दाशराज्ञ युद्ध

 

the-battle-plassey-4-britishbattles_inmarathi
indiatimes.com

 

हे युद्ध महाभारत आणि रामायणाच्याही काही हजार वर्षांपूर्वी घडले असे म्हणतात. ह्या युद्धात भारतातील ऋग्वेद काळातील सर्व लोकांनी सहभाग घेतला होता. भारतात  आर्यांमध्ये हे युद्ध लढले गेले. आजच्या पाकिस्तानात रावी नदीच्या काठावर हे युद्ध झाले. ह्या नदीला त्या काळी परुष्णि असे नाव होते.

ह्याच ठिकाणी  हडप्पा नगराचे अवशेष सापडलेले आहेत. हडप्पा हे अत्यंत प्रगत शहर होते. दाशराज्ञ ह्या महायुद्धामुळे वेद व आर्य ह्यांची इतर जगाला माहिती झाली. आर्यावर्तातील काही राजे व त्यांच्या प्रजेला आर्यावर्तातून बाहेर जाण्यास भाग पाडले गेले. ह्या लोकांनी नंतर पश्चिमेकडे जाऊन त्यांचे  राज्य स्थापन केले.

हा भाग म्हणजे आजचे इराक, इराण आणि इजिप्त होय. दाशराज्ञ हे युद्ध पुरु व तात्सु नावाच्या आर्य समुदायातील लोकांमध्ये लढले गेले.  दोन्ही समुदायांचे भरत नावाच्या आर्य समुदायाशी संबंध होते.

सुदास नावाच्या आर्य राजाविरुद्ध पख्त, शिव, अत्मिन , भत्मान , सिम्यू, विशानिन , पृथू, भृगु, परशु ह्या समुदायातील आर्य लढले. त्यांचे नेतृत्व संवरण नावाच्या राजाने केले होते. पण ह्या सर्वांचा सुदास राजाने पाडाव केला.

 

२. रामायणातील युद्ध

 

ramayana-inmarathi
flickriver.com

 

हे युद्ध साधारणपणे पाच हजार वर्षांपूर्वी लढले गेले असे म्हणतात. अयोध्येचा राजपुत्र श्रीराम, त्याचा भाऊ लक्ष्मण ह्यांनी किष्किंधा नगरीचा राजा सुग्रीव व त्याच्या सेनेच्या मदतीने रावणाच्या लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी दक्षिणेकडील समुद्रात एक सेतू बांधला.

श्रीरामाची पत्नी सीता हिचे रावणाने अपहरण करून तिला कैदेत ठेवले होते. सुग्रीवाच्या सेनेतील हनुमानाने लंकेत जाऊन सीतेचा शोध घेतला आणि श्रीरामाला माहिती दिली. मग सुग्रीवाच्या सेनेतील अभियंते नल व नील ह्यांनी एक सेतू बांधला व श्रीरामाचे सैन्य लंकेला पोहोचले.

तिथे त्यांची रावणाचा भाऊ “विभीषण” ह्याच्याशी भेट झाली. विभीषण हा श्रीरामाच्या बाजूने येऊन मिळाला. तह करण्याच्या असफल प्रयत्नांनंतर अखेर युद्धास सुरुवात झाली .

श्रीराम व  रावणाच्या सैन्यात घनघोर युद्ध झाले. या युद्धात रावणाचे दोन्ही पुत्र, त्याचा धाकटा भाऊ कुंभकर्ण हे मारले गेले. अखेरीस श्रीरामाने रावणाचा वध केला आणि युद्ध संपले. त्यानंतर विभीषणावर लंकेच्या सत्तेची जबाबदारी सोपवण्यात आली.

 

३. कुरुक्षेत्रावरील युद्ध

 

mahabharat-inmarathi

 

हे युद्ध तीन हजार वर्षांपूर्वी झाले असे म्हणतात.  हे आपल्याला माहित असलेले प्राचीन काळातील सर्वात मोठे युद्ध आहे. ह्याच युद्धाला आपण महाभारताचे युद्ध असे म्हणतो. कौरव व पांडव ह्यांच्यात हे युद्ध लढले गेले. पांडवांना सुईच्या अग्रावर मावेल इतकीही भूमी न देण्याच्या दुर्योधनाच्या अट्टहासामुळे पांडवांना त्यांच्या हक्कासाठी हे युद्ध लढावे लागले.

श्रीकृष्णाने अखेरपर्यंत हे युद्ध होऊ नये म्हणून अनेकदा तह करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही, दुर्योधनाच्या सत्तालालसेमुळे आणि दुराग्रहामुळे हे महायुद्ध झाले. ह्या युद्धात देशविदेशातील अनेक राजांनी कौरव व पांडवांच्या बाजूने भाग घेतला होता.

ज्या ठिकाणी हे युद्ध झाले ते कुरुक्षेत्र आज हरियाणा राज्यात आहे. पांडवांनी हे युद्ध जिंकले पण, ह्या युद्धात दोन्ही सैन्यांची अपिरिमित हानी झाली.

 

४. नंद साम्राज्यावर विजय

 

Chanakya-Niti-marathipizza03
daily.bhaskar.com

 

इसवी सनपूर्व चवथ्या शतकात हे युद्ध झाले. चंद्रगुप्त मौर्याने धनानंदस पराभूत करून सत्ता मिळवली. सम्राट महापद्मनंद हा  नंद साम्राज्याचा शासक होता. मगध साम्राज्याचा तो अधिपती होता. त्याला दहा मुले होती.

धनानंद व चंद्र नंद हे दोघेही महापद्मनंद ह्याचे अनुक्रमे नववे व दहावे अपत्य होते. पण धनानंद व चंद्र नंद हे सावत्र बंधू होते. चंद्र नंद ह्याच्या मातेचे नाव मुरा असे होते. ती महापद्मनंद ह्याची दुसरी पत्नी होती. महापद्मनंदानंतर ह्याच्यानंतर धनानंद हा राज्याचा उत्तराधिकारी झाला. धनानंद हा वाईट शासक होता.

चंद्रानंदाला कौटिल्य उर्फ विष्णुगुप्त उर्फ आर्य चाणक्य यांनी युद्धनीतीचे धडे दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा वर्षे चंद्रनंदाने लढा दिला व गनिमी काव्याचा वेळोवेळी वापर करून नंद साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र ताब्यात घेतले.

त्यानंतर, चंद्रनंदाने स्वतःचे नाव बदलून आईच्या व गुरूंच्या नावावरून चंद्रगुप्त मौर्य असे ठेवले. चंद्रगुप्त मौर्य हा महान सम्राट म्हणून ओळखला जातो.

हे ही वाचा

 

५. कलिंगचे युद्ध

 

battle 1 inmarathi
History discussion

 

हे युद्ध इसवी सनपूर्व २६१ साली झाल्याची नोंद आहे. हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. सम्राट अशोकाने भारताच्या भूमीतील बराचसा भाग मौर्य अधिपत्याखाली आणला होता. तरीही कलिंग  ह्या राज्यावर मात्र त्याची सत्ता स्थापित झालेली नव्हती.

कलिंग हा प्रदेश म्हणजे आजचे छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंड ह्यातील काही भाग होय. कलिंग युद्धाचे नेमके कारण स्पष्ट नाही पण, सामाजिक तसेच साम्राज्यविस्तार हे एक कारण असू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. कलिंग हे एक प्रबळ राज्य होते.

सम्राट अशोकाला साम्राज्यविस्तार आणि व्यापारवृद्धीसाठी समुद्र किनारा त्याच्या ताब्यात हवा होता. हा समुद्रकिनारा कलिंग राज्यात होता. तसेच कलिंग राज्यात खनिजसंपत्ती विपुल प्रमाणात होती. त्यामुळे ह्या प्रदेशावर सत्ता काबीज करण्यासाठी हे युद्ध झाले असावे असे सांगितले जाते.

सुरुवातीला कलिंगच्या सेनापतींनी सम्राट अशोकाच्या सैन्याला कडवे प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चवताळून सम्राट अशोकाने मोठ्या सैन्यासह कलिंगवर आक्रमण केले. कलिंग सैन्याने मोठ्या धैर्याने ह्या आक्रमणास तोंड दिले पण अशोकाच्या मोठ्या सैन्यापुढे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

सम्राट अशोकाच्या सैन्याने संपूर्ण कलिंग प्रदेशात मोठी दहशत माजवली. प्रचंड प्रमाणात रक्तपात झाला. १ लाखांहून जास्त लोक ह्यात बळी गेले. हा रक्तपात बघूनच  सम्राट अशोकाचे हृदयपरिवर्तन झाले व त्याला ह्या युद्धाचा पश्चाताप झाला. त्याने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेऊन बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी पुढील सर्व आयुष्य वाहून घेतले.

 

६. पानिपतचे पहिले युद्ध

 

battle-of-panipat-InMarathi
alchetron.com

 

पानिपतचे पहिले युद्ध हे १५२६ साली दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि अफगाण मुघल सम्राट बाबर ह्यांच्यात झाले.  युद्धानंतर भारतात मुघल सत्तेची सुरुवात झाली.

काबुलचा तैमुरी शासक जहिरउद्दीन  मोहम्मद बाबर ह्याने दिल्ली काबीज करण्याचे ठरवले आणि त्याने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधीच्या ताब्यात असलेल्या पानिपत ह्या गावात तळ ठोकला. २१ एप्रिल १५२६ रोजी बाबरच्या २०-२५ हजारांच्या सैन्याने लोधीच्या लाख-दीड लाख सैन्याला धूळ चारली.

या युद्धात इब्राहिम लोधी मारला गेला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया रचला गेला.

 

७. पानिपतचे दुसरे युद्ध 

 

Battel-of-Panipat-inmarathi
http://yugaparivartan.com/

 

पानिपतचे दुसरे युद्ध उत्तर भारतातील हेमचंद्र विक्रमादित्य आणि अकबराच्या सैन्यात ५ नोव्हेंबर १५५६ रोजी पानिपत येथे झाले. अकबराचे सेनापती खान जमान आणि बैरम खान ह्यांनी ह्या युद्धात योग्य डावपेच खेळत विजय मिळवला. ह्या युद्धामुळे दिल्लीवर मुघलांचे वर्चस्व स्थापित झाले.

“दिल्ली कुणाची?” ह्यासाठी मुघल आणि अफगाण ह्यांच्यात सुरु असलेला संघर्ष ह्या युद्धानंतर संपला आणि दिल्ली मुघलांच्या ताब्यात आली. १५५६ साली दिल्लीच्या लढाईत अकबराच्या सैन्याला पराजित करून हेमचंद्र विक्रमादित्य उत्तर भारताचा शासक झाला. ह्या आधी त्याने आदिलशहाच्या दरबारात प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

१५५३ ते १५५६ या काळात त्याच्या सैन्याने प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून पंजाब आणि बंगाल प्रदेशातील २२ युद्धे जिंकली होती. जानेवारी १५५६ मध्ये हुमाँयूचा मृत्यू झाला आणि अकबर हा उत्तराधिकारी झाला. त्यावेळी तो फक्त १३ वर्षांचा होता. हेमचंद्र विक्रमादित्याला हुमाँयूच्या मृत्यूबद्दल माहिती मिळताच त्याने दिल्लीकडे मोर्चा वळवला.

त्यावेळी मुघल साम्राज्य हे केवळ काबुल, कंधार आणि दिल्ली व पंजाबचा काही प्रदेश इतकेच मर्यादित होते. मुघल सेनापती बैरम खान ह्याने हेमचंद्र विक्रमादित्याशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि पानिपत येथे हे युद्ध झाले.

या युद्धात अकबराने भाग घेतला नाही कारण तो खूप लहान होता. पण त्याच्या सैन्याने हेमचंद्राच्या सैन्याचा पराभव करत दिल्ली राखली. हेमचंद्राला अटक करून मृत्युदंड देण्यात आला.

 

८. पानिपतचे तिसरे युद्ध

 

Panipat-inmarathi

 

 

पानिपतचे तिसरे युद्ध १४ जानेवारी १७६१ रोजी मराठा साम्राज्य व अफगाणिस्तानचा अहमद शाह अब्दाली किंवा अहमद शाह दुर्रानी ह्यांच्यात झाले. यात मराठ्यांचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ पेशवे ह्यांनी केले होते. त्यावेळी मराठा साम्राज्य हे उत्तरेपर्यंत विस्तारले होते.

अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठा साम्राज्याचा पराभव केला. ह्या युद्धानंतर उत्तरेकडील प्रदेश सरदारांनी आपापसात वाटून घेतला मात्र, महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडेच राहिली. सदाशिवराव भाऊ हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याची शक्ती कमी झाली आणि मराठ्यांनी उत्तरेत सत्ता विस्तारित केली.

गेली सात ते आठ शतके भारतावर सत्ता गाजवणाऱ्या इस्लामी सत्तेला त्यांनी आव्हान दिले होते. भारताच्या सीमा ओलांडून मराठे आता आपल्यावर सत्ता काबीज करू बघत आहेत हे बघून वायव्येकडील इस्लामी शासकांना ह्याची धास्ती वाटून त्यांना मराठ्यांवर अंकुश लावणे गरजेचे वाटू लागले. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्ली देखील काबीज केली आणि अब्दालीचा मुलगा तैमूर शाह दुराणीला हाकलून लावले.

मुस्लिम धर्मगुरूंना हे त्यांच्या धर्मावर आलेले संकट वाटले आणि त्यांनी मराठ्यांविरुद्ध आघाडी उघडण्याचे आवाहन केले. अब्दालीने हे आव्हान स्वीकारले आणि त्याने बलूच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली. मराठ्यांशी त्याने उघड उघड वैर पत्करले. त्यांनी मराठा सेनापती दत्ताजी शिंदे ह्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

मराठ्यांनी अब्दालीला धडा शिकवण्यासाठी एक लाखांची फौज उभारली आणि पानिपतकडे कूच केली. सदाशिवभाऊंच्या नेतृत्वाखाली हे सैन्य एकत्रित आले. त्यांना होळकर, शिंदे, बुंदेल व गायकवाड, भरतपूरचे जाट राजा सुरजमल ह्यांचेही सैन्य येऊन मिळाले.

ह्या युद्धात मराठा सैन्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विश्वासराव व सदाशिवराव भाऊ ह्यांच्या मृत्यूनंतर मराठा सैन्याने हाय खाल्ली आणि मराठे युद्ध हरले. १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठ्यांच्या दृष्टीने महाप्रलय ठरला.

पानिपतचे तिसरे युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे ठरले. सदाशिवरावभाऊ, विश्वासराव, इब्राहीमखान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे ही मातब्बर मंडळी मारली गेली. मराठ्यांची कर्ती पिढीच या लढाईत पूर्णपणे नष्ट झाली त्यामुळे मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला.

 

९. प्लासीची लढाई

 

plasi battle inmarathi
hindinotes.org

 

प्लासीची लढाई ही २३ जून १७५७ रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब यांच्यात झाली होती. या लढाईत बंगालच्या नवाबाला फ्रेंच लोकांनी मदत केली होती. ही लढाई ब्रिटिशांनी जिंकली.

ब्रिटिशांनी जिंकलेली ही पहिली प्रमुख लढाई होय. ही लढाई जिंकल्यामुळे बंगालचा मोठा प्रदेश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आला आणि अधिकृतपणे इंग्रजांचे भारतावर राज्य आले.  प्लासीची लढाई ही कोलकातापासून १५० किमी लांब भागीरथी नदीच्या किनारी पलाशी नावाच्या गावाच्या जवळ झाली.

ही लढाई खरंतर फ्रेंच विरुद्ध ब्रिटिश अशी होती. दोघांमध्येही  भारतावर राज्य मिळवण्यासाठी चढाओढ होती. त्यासाठी फ्रेंचांनी सिराज उद दौला ह्याची मदत घेतली कारण, त्याची फौज इंग्रजांपेक्षा मोठी होती.

इंग्रजांनी सुद्धा धूर्त चाल खेळत नवाब सिराज उद दौलाच्या विरोधकांना आपल्या बाजूने वळवून घेत त्यांची मदत घेतली.  सिराज उद दौलाचा पराभव झाला आणि संपूर्ण बंगाल प्रांत इंग्रजांच्या ताब्यात गेला.

 

१०. तालिकोटचे युद्ध

 

battle inmarathi

 

तालिकोटाचे युद्ध हे २६ जानेवारी १५६५ रोजी दख्खनचे साम्राज्य आणि विजयनगरचे साम्राज्य ह्यांच्यात लढले गेले. हे युद्ध राक्षस-तांगडी नामक गावाच्या जवळ तालिकोटी येथे झाले. ह्या युद्धात विजयनगरच्या साम्राज्याला पराभवाचा सामना करावा लागला.

ह्यावेळी सदाशिवराय हा विजयनगर साम्राज्याचा शासक होता. त्याचे सगळे निर्णय तो त्याचा मंत्री रामराय ह्याच्या सल्ल्याने घेत असे. दख्खनमधील पाच  मुस्लिम सुलतानांनी एकत्र येऊन विजयनगर साम्राज्याचा पाडाव केला. ह्या युद्धात खरंतर विजयनगरचे सैन्य जिंकण्याच्या बेतात होते पण अखेरच्या क्षणी गिलानी बंधू, जे विजयनगर सैन्याचे सेनापती होते त्यांनी विश्वासघात केला आणि ते  मुस्लिम सैन्याच्या बाजूने आले.

त्यांनी विजयनगरच्या सैन्यावर मोठा हल्ला चढवला. आलिया रामराया ह्याला त्यांनी पकडले आणि त्याचा तिथल्या तिथे शिरच्छेद केला.  त्यानंतर त्यांनी विजयनगर साम्राज्यात लुटालूट करून साम्राज्य जवळजवळ नष्ट करून टाकले. हंपीमध्ये त्यांनी प्रचंड नासधूस केली.

ह्या सर्व लढाया भारतभूमीवर झाल्या आणि त्यांनी तत्कालीन राजकीय चित्रच पालटून टाकले. ह्या युद्धांमुळे इतिहासाला वेळोवेळी मोठी कलाटणी मिळाली.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?