तो आखाती युद्धात भारतात आला आणि क्रीडा जगतातील झगमगता तारा झाला…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

बिलियर्ड्स किंवा स्नूकर हा खेळ म्हटलं की आपल्या डोळ्यांपुढे पंकज अडवाणीचेच नाव येते. कमी वयात आठ वेळा विश्व अजिंक्यपदे जिंकण्याची कामगिरी करून दाखवणाऱ्या पंकज अडवाणीला आज जग भारतातील सर्वोत्तम बिलियर्ड्स व स्नूकर खेळाडू म्हणून ओळखते.

सर्वसामान्य भारतीय माणसाला क्रिकेट, हॉकी, कबड्डी, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, खो खो हे खेळ जवळचे वाटतात. गोल्फ, बिलियर्ड्स हे खेळ आजही श्रीमंतांचे किंवा लांबचे वाटतात.

कित्येक लोकांना तर स्नूकर आणि बिलियर्ड्स ह्यात नेमका काय फरक आहे हे सुद्धा माहिती नसते. पंकजने त्यात कौशल्य मिळवून आठ वेळा अजिंक्यपद मिळवणे हे एक भारतीय म्हणून आपल्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे.

 

Pankaj Advani Inmarathi

 

२४ जुलै १९८५ रोजी पुण्यात जन्मलेल्या पंकजने त्याचे पहिले अजिंक्यपद २००९ साली मिळवले. ह्या आधी त्याने अमॅच्योर विश्व बिलियर्ड्स आणि स्नूकर चॅम्पियनशिप जिंकला होता. त्याने २००६ साली दोहा येथे आशियाई खेळांमध्ये स्वर्णपदक कमावले होते.

जन्मानंतर पहिली काही वर्षे तो त्याच्या आईवडिलांबरोबर कुवैत येथे होता. कुवैत मध्ये आखाती युद्ध पेटले, आणि लहानगा पंकज त्याच्या कुटुंबासह बेलग्रेड विमानतळावर अडकून पडला होता.

हातात पैसे नाहीत, युद्धाची दहशत आणि डोक्यावर सतत जीव जाण्याची टांगती तलवार अश्या परिस्थितीत पंकज व त्याचे आईवडील कसेबसे भारतात परतले. पण त्यांच्या मागची संकटांची मालिका काही संपली नाही.

 

Kuwait War InMarathi

 

ते भारतात परत आल्यानंतर दोनच वर्षांत पंकजच्या वडिलांचे अकाली निधन झाले. त्यावेळी तो फक्त सहा वर्षांचा होता.

त्यानंतर पंकज व त्याच्या मोठ्या भावाला त्याच्या आईनेच लहानाचे मोठे केले. पंकजने त्याचे पहिले बक्षिस अवघ्या बाराव्या वर्षी पटकावले. त्यानंतर त्याने राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक विक्रम केले. त्याला अत्यंत कमी वयात २००९ साली पद्मश्री पुरस्कार मिळाला.

त्या आधी २००४ साली त्याला अर्जुन पुरस्कार तर २००६ साली राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार मिळाला होता. त्यात्याला त्याच्या मोठ्या भावाने डॉक्टर श्री अडवाणी ह्यानेच स्नूकरची ओळख करून दिली.

पंकजचा मोठा भाऊ डॉक्टर श्री अडवाणी हा एक प्रसिद्ध स्पोर्ट आणि परफॉर्मन्स सायकॉलॉजिस्ट आहे. त्यानेच त्याला स्नूकरचे मार्गदर्शन केले. पंकजने त्याचे पहिले बक्षीस त्याच्या मोठ्या भावाला स्पर्धेत हरवून मिळवले.

 

Pankaj & Shree Advani

 

पंकजचे स्नूकर मधील कौशल्य अरविंद सावूर ह्यांच्या दृष्टीस पडले. अरविंद सावूर हे राष्ट्रीय स्तरावरचे स्नूकर खेळाडू आहेत. त्यांनी पंकजला स्नूकरचे मार्गदर्शन केले. पंकज १० वर्षांचा असताना श्री ने म्हणजेच त्याच्या मोठ्या भावाने सावूर ह्यांची पंकजशी ओळख करून दिली.

पण तेव्हा सावूर ह्यांनी पंकजला मार्गदर्शन करण्यास नकार दिला कारण पंकज तेव्हा लहान होता आणि त्याची उंची कमी होती असे सावूर ह्यांना वाटले. पण नंतर त्यांनी पंकजच्या उंचीच्या मुद्द्याकडे फारसे लक्ष न देता त्याला स्नूकरचे धडे देण्यास सुरुवात केली. वयाच्या १२व्या वर्षी पंकजने पहिली स्पर्धा जिंकली व त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

 

Coach of pankaj inmarathi

 

पंकजने २०००, २००१ आणि २००३ साली इंडियन ज्युनिअर बिलिअर्डस चॅम्पियनशिप जिंकली. २००३ साली त्याने सर्वात लहान राष्ट्रीय स्नूकर चॅम्पियन होण्याचा विक्रम केला.

२००३ साली पंकजने वर्ल्ड अमेच्युर स्नूकर चॅम्पियनशिप जिंकली आणि २००५ साली त्याने आयबीएसएफ वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला आणि एकमेव भारतीय खेळाडू ठरला.

२००९ साली पंकजने माईक रसेलचा पराभव करून WPBA वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियन प्रो चे टायटल मिळवले.

२०१२ साली त्याने वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप ही स्पर्धा जिंकली. त्यावेळी तो केवळ २७ वर्षांचा होता आणि इंग्लिश बिलियर्ड्सचे सगळे वर्ल्ड टायटल्स जिंकणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला.

२०१२ साली पंकज हा ५ एशियन चॅम्पियनशिप टायटल्स जिंकणारा पहिला खेळाडू ठरला. पंकजने १० वर्ल्ड चॅम्पियनशिप टायटल्स जिंकले. त्याने ग्लासगो येथे टीम चॅम्पियनशिप सुद्धा जिंकली. जागतिक स्तरावर, आशियाई आणि इंडियन बिलियर्ड्स टायटल्सची हॅट-ट्रिक एकाच वेळी हॅट-ट्रिक केली आहे.

 

pankaj-advani-championships-InMareathi

 

इतके सगळे विक्रम आपल्या नावावर असून देखील पंकज अत्यंत नम्र आणि साधा आहे. लहान वयात इतक्या स्पर्धा जिंकत असताना तो अभ्यासात देखील हुशार होता. त्याने ICSE आणि ISC ह्या बोर्डाच्या परीक्षेत तो डिस्टिंक्शन मिळवून उत्तीर्ण झाला.

अभ्यास सांभाळून त्याने ह्या सगळ्या परीक्षा दिल्या व त्यात तो चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. त्याचे शालेय शिक्षण बंगळुरूच्या फ्रॅंक अँथनी पब्लिक स्कुल येथे झाले आणि त्याने श्री भगवान महावीर जैन कॉलेजमधून त्याचे पदवीचे शिक्षण घेतले.

पण हे सगळे मिळवणे पंकज आणि त्याच्या कुटुंबियांसाठी अजिबात सोपे नव्हते. एक तर स्नूकर आणि बिलियर्ड्स हे खेळ भारतात अजिबात प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाहीत.

त्यामुळे ह्या खेळासाठी आर्थिक मदत तर लांबच राहिली, पण मॉरल सपोर्ट सुद्धा मिळणे जवळजवळ अशक्य असते. पंकजच्या बाबतीत सुद्धा तेच घडले. तो जेव्हा पहिल्यांदा इंग्लंडच्या वर्ल्ड बिलियर्ड्स स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेला तेव्हा त्याला भारत सरकारकडून कुठलीही आर्थिक मदत मिळाली नाही.

त्याला त्या स्पर्धेत भाग घेता यावा म्हणून त्याच्या आईने फिक्स डिपॉझिट मोडले होते. त्याचे वडील १९९२ साली गेले आणि त्यानंतरची सात आठ वर्षे त्याच्या कुटुंबासाठी खूप कठीण गेली. मुलांना एकटीने वाढवायचे म्हणून त्याच्या आईला नोकरी सोडावी लागली. पण पंकजने खूप मेहनत घेऊन २००३ पंकज विश्वविजेता झाला तेव्हा परिस्थिती पालटली आणि त्याच्या आयुष्यातील संघर्ष कमी झाला.

 

Pankaj with Family InMarathi

 

सुरुवातीला तो जेव्हा स्पर्धेसाठी इतर देशांत जात असे तेव्हा सुरुवातीला लोक “हा कुठला खेळ आहे” वगैरे अशी संशयाने चौकशी करत असत. पण आता मात्र तो जिथे जातो तिथे लोक त्याला “स्नूकर आणि बिलियर्ड्स चॅम्पियन” म्हणून ओळखतात.

त्याची स्वाक्षरी घेतात, त्याच्याबरोबर फोटो काढून घेण्याची विनंती करतात. पंकज म्हणतो की , “जेव्हा तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळते,तेव्हा ती खुप सुंदर आणि समाधानाची भावना असते. तुम्हाला तुमच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते.”

लहान असताना पंकज शाळेतून परत येताना त्याचा भाऊ आणि त्याच्या मित्रांबरोबर स्नूकर पार्लर मध्ये जायचा. सुरुवातीला तो फक्त त्याचा भाऊ आणि इतर मुले कशी खेळतात हे एका कोपऱ्यात शांतपणे बसून बघत बसायचा.

पहिले तीन आठवडे त्याला क्यूला हात सुद्धा लावता आला नाही कारण तो लहान होता आणि त्याची उंची सुद्धा कमी होती. त्यामुळे त्याने तेव्हा निरीक्षण करून खेळ समजून घेतला आणि नंतर खेळायला सुरुवात करताना त्याने सगळे ज्ञान वापरले.

 

Snooker-Pankaj Advani- 2InMarathi

 

पंकज अडवाणी ह्याने मळलेल्या पायवाटेवरून न जाता नवीनच वाट निवडली आणि त्यात त्याने असाधारण यश मिळवले. त्याच्या ह्या दैदिप्यमान कारकिर्दीचा आणि त्याचा संपूर्ण भारताला अभिमान आहे.

 

pankaj advani narendra modi inmarathi

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?