पानिपतला इतकी सारी महत्वाची युद्धं घडण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

पानिपत भारताच्या हरियाना राज्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. याचा उल्लेख महाभारतातही आढळतो. इतिहासात पानिपतला रणभूमी समजले जाते याचे कारण आहे, या शहरात झालेली तीन मोठी व ऐतिहासिक युद्धे, महत्वाचे म्हणजे ही तिन्ही युद्धे इतिहास परिवर्तक ठरली.

पानिपतचे पहिले युद्ध १५२६ मध्ये लढले गेले. त्यावेळी हिंदुस्तानवर राज्य करणारे जे राजे होते ते मुसलमान असले तरी त्यात मुघल नव्हते. मोगलांच्या भारतावर होणाऱ्या स्वाऱ्यांना हे सुलतान सतत विरोध करत.

बाबर अफगानिस्तान आणि मध्य आशियात स्थिर होण्याचा प्रयत्न करत होता, त्याचवेळी त्याचे लक्ष संपत्ती आणि धनदौलतीने समृद्ध असलेल्या भारताकडे वळले आणि त्याने भारतावर राज्य स्थापन करण्याचा निश्चय केला.

 

Babar Inmarathi

भारतावर स्वारी करण्यापूर्वी त्याने प्रचंड तयारी केली. त्यावेळी भारतावर इब्राहीम लोदीचे राज्य होते. इब्राहीमखानकडे एक लाख शिपाई होते तर बाबरकडे सुमारे २५ हजार सैन्य होते. पण, स्वतःच्या सैन्याची बाबराने अशी व्यूहरचना केली की इब्राहीमचे अफाट सैन्य गोंधळून गेले.

बाबराने इब्राहीमचा त्याच्या १५,००० सैन्यासह खात्मा केला आणि दिल्लीच्या तख्तावर आपली हुकुमत जाहीर केली. अशा पद्धतीने भारतात मोगल सत्तेची मुहूर्तमेढ रोवली गेली.

बाबरच्या मृत्युनंतर मोगल साम्राज्याचा विस्तार काही अंशी थंडावला. त्यानंतर त्याचा नातू सम्राट अकबर गादीवर आल्यावर त्याने पुन्हा आपल्या राज्याला बाबरकालीन वैभव आणि कीर्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

अकबरच्या सत्तेसमोर सुरी वंशाच्या हेमू नावाच्या एका मातब्बर राजाचे आव्हान निर्माण झाले. ५ नोव्हेंबर १५५६ रोजी पानिपतची दुसरी लढाई अकबर आणि हेमू यांच्यात लढले गेली.

हेमूकडे हत्तीबळ आणि मनुष्यबळ मुबलक प्रमाणात होते. अकबराकडे त्यावेळी फक्त २० हजार सैन्य होते. हेमू आपल्या सैन्याला मार्गदर्शन करीत स्वतः लढाईत उतरला. तो अत्यंत त्वेषाने लढत होता.

अकबराचा पराजय नजरेत आलाच होता. लढता लढता, हेमू आपल्या हत्तीवरून सैन्याला सूचना देत लढत होता.

 

second-battle-of-panipat-InMarathi

 

इतक्यात शत्रूच्या कमानीतून सुटलेल्या एका बाणाने त्याच्या डोळ्याचा वेध घेतला आणि हेमू अकबराच्या हाती सापडला.

आपला राजा कैद झाल्याचे पाहून हिंदू सेनेचे अवसान गळाले आणि ते सैरावैरा पळू लागले.

कैद केलेल्या हेमूचा अकबराने शिरच्छेद केला आणि स्वतः दिल्लीच्या गादीवर विराजमान झाला. हुमायूनच्या काळात मोगलांना दिल्ली गमवावी लागली होती. त्या पराजयाचे शल्य अकबराने भरून काढले.

पानिपतची तिसरी लढाई मराठी पेशवा आणि अफगाण यांच्यात झाले. मुगल बादशहा औरंजेबच्या मृत्यनंतर पेशव्यांनी चलो दिल्ली हे जणू आपले ब्रीदच बनवले होते. त्यानुसार पहिल्या बाजीराव पेशव्यांनी नर्मदा ओलांडून गुजरात, माळवा, बुंदेलखंड पर्यंत मजल मारली होती.

पेशव्यांच्या प्रचंड मोठ्या फौजेचा अफगाण राजा, अहमद शाह दुर्रानी याने धुव्वा उडवला. मुघल साम्राज्याचा पाडाव होत आल्याची लक्षणे दिसताच पेशव्यांनी आपला साम्राज्य विस्तार झपाट्याने सुरु केला ते दिल्ली पर्यंत पोचले तोच दुर्रानीच्या रुपात एक नवे संकट समोर ठाकले.

 

Ahmed shah durrani Inmarathi

सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली पेशव्यांनी मोठी फौज उभी केली. पण अहमदने कुट नीतीने खेळी खेळत अवाढव्य मराठी फौजेची रसद बंद केली.

अन्नपाण्यावाचून मराठ्या फौजेची अवस्था अत्यंत दयनीय झाली.

सदाभाऊंचा घात झाल्याचे समजून मराठा सैन्याचा धीर खचला आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या सैन्यावर हल्ला चढवून दुर्रानीने त्यांचा पार धुव्वा उडवला आणि मराठी साम्राज्याच्या एकतेलाच सुरुंग लावला.

संपूर्ण भारतावर राज्य करण्यासाठी दिल्ली ताब्यात घेणे महत्वाचे होते, कारण दिल्लीतून संपूर्ण भारताची सूत्रे हाताळणे सोपे होते. पानिपत हे दिल्लीपासून जवळ असणारे एक विस्तृत शहर होते.

अनेक आक्रमक हे उत्तरेच्या दिशेनेच आले, त्यांच्यासाठी पानिपत हा दिल्लीच्या जवळ जाण्याचा सुकर मार्ग होता. इतिहासातील महत्वाची आणि मोठमोठी युद्धे याच शहरात लढली गेली यामागे, पानिपतचे हे भौगोलिक वैशिष्ट्य अत्यंत महत्वाचे कारण होते.

विशेषतः युद्धं अशा ठिकाणी होतात जिथे मनुष्य वस्ती विरळ असेल, पानिपत या कसोटीवर अगदी खरे उतरत होते. शिवाय पानिपतची भौगोलिक रचना युद्धासाठी अनुकूल आहे.

सपाट आणि उताराचा प्रदेश असल्याने योद्ध्यांना अनेक कौशल्यांचा आणि तंत्रांचा योग्य रीतीने वापर करता येत होता. अवाढव्य सैन्याला एकमेकांवर चाल करण्यासाठी, हालचाल करण्यासाठी, मोठ्या आणि सपाट मैदानाची गरज असते.

युद्धसाठी सर्वात जास्त महत्वाची बाब असते ती, युध्दभूमी. घोडदळ, हत्तीदळ अशा जनावरांसोबतच तोफा डागण्यासाठी देखील विस्तृत मैदानाची आवश्यकता असते.

 

The_Third_battle_of_Panipat_Inmarathi

 

अशा या प्रदेशात कित्येक वर्षे भरभराट होती त्यामुळे याठिकाणी उत्तम संसाधने, अधिक विकसित होते. त्यामुळे सैन्यदल नर्माण करण्यास चांगला वाव होता.

या प्रदेशात अनेक नद्या असल्याने सुपीकता होती ज्यामुळे मुबलक अन्नधान्याचा साठा करता येत असे.

अवाढव्य सैन्यासाठी राहुट्या उभ्या करणे, जनावरांना विश्रांतीसाठी छावण्या उभ्या करणे यासाठी फार मोठ्या विस्तृत मैदानाची गरज असते, जे येथे उपलब्ध होते.

या प्रदेशात मान्सून फार काळ राहत नसे, त्यामुळे लढाईत व्यत्यय येत नसे.

पहिली लढाई, एप्रिल १५२६ मध्ये, दुसरी लढाई नोव्हेंबर १५५६ मध्ये आणि तिसरी लढाई जानेवारी १७६१ मध्ये बारकाईने पाहिल्यास तीनही लढाईचा काळ हा मान्सूनचा काळ आहे, तरीही या लढाईत पावसामुळे व्यत्यय आला नाही. पावसाळ्याचे दिवस असूनही या लढायांच्या काळात पाऊस झाल्याचे दिसत नाही.

या प्रदेशातील लोहार आपल्या कौशल्यात अत्यंत पारंगत होते, त्यामुळे सैन्याच्या हत्यारांना धार लावून देणे, त्याची दुरुस्ती करणे, नवी हत्यारे पाडणे अशी कामे कुशलतेने आणि सहज होत होती.

 

Weapons for Panipat War InMarathi

आजूबाजूच्या प्रदेशांपेक्षा या प्रदेशातील तापमान सैन्य आणि सैन्यातील जनावरांसाठी पोषक होते. भारताच्या इतर भागात मोठे सैन्य घेऊन जाणे तितकेसे सोपे नव्हते, राजस्थानच्या वाळवंटात किंवा दक्षिणेकडील घनदाट जंगलातून सैन्याला युद्ध सोडाच प्रवास करणे देखील जिकीरीचे झाले असते.

अगदी सुरुवातीपासून या प्रदेशात अनेक युद्धे झाली होती. या प्रदेशातील लोक युद्धाच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात सराईत होते.

हा प्रदेश जसा दिल्लीपासून जवळ होता तसाच तो खैबरपासून देखील जवळ होता. त्यामुळे माघार घ्यायची वेळ आली तरी, सैन्याला परत पोचणे सुलभ झाले असते.

अशी अनेक करणे आहेत ज्यामुळे युद्धासाठी याच प्रदेशाची निवड केली जात असे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?