' बिझनेस असो वा नोकरी, महाराजांचे, सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरुचे हे गुण अंगी नक्की बाळगा – InMarathi

बिझनेस असो वा नोकरी, महाराजांचे, सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरुचे हे गुण अंगी नक्की बाळगा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“छत्रपती शिवाजी महाराज” हे नुसतं नाव जरी वाचलं तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. ते फक्त जाणते राजे नव्हते तर, मराठी माणसासाठी ते दैवत आहेत.

महाराजांनी ४०० वर्षांपूर्वी जुलमी मुसलमान राजवटीत पिचलेल्या जनतेची सुटका केली व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य स्थापन केले.

हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी योग्य व्यवस्थापन केलं. त्यांचं नेतृत्व, संघटन कौशल्य, युद्धनीती, गनिमी कावा हे फार उंचीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे उभे आयुष्य हा मोठा विषय आहे.

त्यांचे नेतृत्वगुण, दळणवळणाचे व्यवस्थापन, लढाया, तह, स्वराज्य विस्तार करतानाचे नियोजन, रसद पुरवण्याचे तंत्रज्ञान, स्वराज्य स्थापन करताना नियुक्त केलेले मंत्रिमंडळ, सैन्य दलाची उभारणी ह्या अनेक पैलूंतून त्यांचे व्यवस्थापन कौशल्य बघायला मिळते आणि ते आधुनिक व्यवस्थापनाचे गुरु आहेत ह्याची खात्री पटते.

त्यांच्या संपूर्ण आयुष्यातून अगदी बारीक सारीक घटनांतून देखील आपल्याला खूप काही शिकायला मिळते. त्यांनी त्यांचे उभे आयुष्य खर्चून रयतेला सुखी आणि सुरक्षित आयुष्य देण्यासाठी स्वराज्य स्थापन केले.

स्वराज्य म्हणजे काय तर आपले म्हणजेच स्वतःचे राज्य.

थोडक्यात, स्वराज्य म्हणजे स्वतःचा व्यवसाय होय. आता व्यवसाय म्हणा किंवा नोकरी म्हणा, तिथे व्यवस्थापन आपसूकच आलेच. फक्त नोकरी/व्यवसायच कशाला, अगदी वैयक्तिक आयुष्यात सुद्धा व्यवस्थापन चांगले नसेल तर माणूस प्रगती करू शकत नाही.

म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थापन जमणे आवश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराज एक शासक नव्हते तर तर ते उत्तम मॅनेजमेंट गुरु देखील होते. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य अद्वितीय होते. त्यांना प्रचंड दूरदृष्टी होती आणि त्या काळात त्यांनी दूरदृष्टीने भविष्याचा विचार करून विविध योजना आखल्या.

त्यांच्या उत्तम व्यवस्थापन कौशल्याच्या वापर करून त्यांनी यश देखील प्राप्त केले.

shivaji maharaj inmarathi

 

१. अर्थव्यवस्थापन

कुठल्याही व्यवसायासाठी आर्थिक भांडवल अतिशय आवश्यक असते. महाराजांनी त्यांच्या काळात उत्तम आर्थिक व्यवस्थापन करत मोठमोठ्या मोहीम यशस्वी केल्या. त्यांच्या कुठल्याही मोहिमेसाठी ते कमी खर्चात मॅनेज होऊ शकतील अशीच माणसे बरोबर घ्यायचे.

त्यांची स्वतःची राहणी अत्यंत साधी होती. ते फारशी मालमत्ता बरोबर बाळगत नसत आणि त्यांच्या बरोबर असणारी माणसे देखील साधी राहणी असणारे आणि प्रदीर्घ प्रवास करू शकणारे होते. कुठलीही मोहीम आखताना ते भरपूर आधीपासून प्लॅनिंग करत असत.

त्यांचे गुप्तहेर खाते खूप चांगले होते आणि ही गुप्तहेर मंडळी मोहीम आखण्याचा आधी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन, स्पॉट ऍनालिसिस करून सगळी माहिती महाराजांपर्यंत पोहोचवत असत.

मग महाराज त्या मोहिमेची व्यवस्थित आखणी करत आणि योग्य नियोजन करत.

एखाद्या मोहिमेतून आर्थिक फायदा झाला की ते लगेच गुंतवणूक करत असत. नवीन किल्ला बांधणे व तिथल्या आसपासच्या परिसराचा विकास करणे, मुलुखाचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून तिथे पायाभूत सुविधा उभारणे, शेतीला उत्तेजन देणे तसेच इतर पूरक व्यवसायांना चालना देणे ह्यात ते गुंतवणूक करत असत.

आपल्या स्वराज्यातील मुलुख विकसित झाला की स्वराज्याच्या महसुलात आपसूकच वाढ होणार आहे हे सूत्र त्यांना माहिती होते म्हणून ते योग्य ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करत असत.

 

Shivaji Maharaj`s Economic system InMarathi

 

२. पायाभूत सुविधा उभारणे

कुठलाही उद्योग उभा करताना मूलभूत सुविधा असणे अत्यंत आवश्यक असते. महाराजांनी त्या काळी सुद्धा पायाभूत सुविधा उभारण्याला खूप महत्व दिले. त्या काळी वीज नव्हती तरीही वाऱ्याचा, अग्नीचा, धुराचा योग्य उपयोग करून अनेक पायाभूत सुविधा उभारल्या.

स्वराज्यात अनेक ठिकाणी नद्या व कालवे अडवून धरणे बांधली, वाहतुकीसाठी घाटरस्ते बांधले, शेतीसाठी जमिनीचे सपाटीकरण करवले, शेतीमधून रोजगारनिर्मिती केली.

शेती निर्माण करून गरजू लोकांना ती जमीन कसायला दिली आणि खाजगी जमिनीचे सरकारीकरण केले. ह्या कॉन्सेप्टला आज आपण अंडरटेकिंग अँड पब्लिक कॉर्पोरेशन असे म्हणतो.

 

Shivaji Maharaj InMarathi

 

३. कामासाठी कुशल कार्यबल तयार करणे

चांगले काम करणारे आणि कामासाठी कायम उत्सुक असणारे कर्मचारी तयार करणे हे कुठल्याही टीम लीडरसाठी एक कसब असते. त्याला स्वतःच्या कामातून स्वतःच्या सहकाऱ्यांसाठी आदर्श घालून द्यावा लागतो.

शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांमध्ये स्वराज्य स्थापनेची तीव्र इच्छा निर्माण केली. त्यांच्या मनात मातृभूमीविषयी आदर आणि प्रेम जागृत केले.

मावळ्यांच्या मनात स्वराज्याविषयी इतका जास्त इमान तयार केला की स्वराज्यासाठी प्रसंगी जीव घेण्याची व जीव देण्याची देखील मावळ्यांची तयारी होती.

महाराजांनी त्यांच्या माणसांवर प्रेम केले. त्यांना माया लावली त्यामुळे त्यांनी स्वराज्यातील लोकांचे मन जिंकले. लोक त्यांची अक्षरश: पूजा करीत असत. त्यांनी प्रत्येकाला स्वराज्य मिळवण्यासाठी योगदान देण्याची प्रेरणा दिली.

अनेकदा युद्धात स्वतः रणभूमीवर उतरून त्यांनी सैन्याचे नेतृत्व केले व जे त्यांनी ठरवले ते त्यांनी करून दाखवले. जेव्हा कर्मचारी आपल्या नेत्याला स्वतः झोकून देऊन काम करताना बघतात, तेव्हा त्यांच्या मनात सुद्धा काम करण्याची प्रेरणा निर्माण होते आणि टीम लीडरच्या शब्दाला किंमत राहते.

 

Shivaji Maharaj relations InMarathi

 

४. सतत नव्या गोष्टी शिकण्याची तयारी

कुठल्याही माणसाला जर प्रगती करायची असेल तर त्याने सतत जगाबरोबर चालणे आवश्यक असते. त्यामुळे सतत नवे काहीतरी शिकण्याची इच्छा असणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे ह्यामुळे माणूस प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकतो.

शिवाजी महाराज सुद्धा सतत नव्या युद्धनीतींबद्दल जाणून घेत असत आणि त्या अमलात आणण्याचा प्रयत्न करत असत. ते वेळोवेळी विविध प्रकारच्या शस्त्रांबद्दल जाणून घेत असत आणि त्यांच्या सैनिकांकडे चांगली व योग्य शस्त्रे असावीत ह्यावर त्यांचा कटाक्ष होता.

शिवाजी महाराज वेळोवेळी विविध तज्ञांशी चर्चा करून त्यांच्या मोहिमांची आखणी करत असत आणि स्वराज्य अधिकाधिक सुसज्ज कसे होईल ह्यासाठी प्रयत्न करीत असत.

राजमाता जिजाऊ, दादोजी कोंडदेव ह्यांच्यापासून ते समर्थ रामदास स्वामी ह्यांच्यासारखे गुरु शिवाजी महाराजांच्या आयुष्यात होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य घडवण्यासाठी वेळोवेळी मदत केली.

 

Jija Mata InMarathi

 

५. दूरदृष्टी

जवळजवळ संपूर्ण भारत मुघल आणि इतर मुस्लिम राज्यकर्त्यांच्या तावडीत सापडलेला असताना महाराजांनी भविष्याचा विचार करून स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि अखंड कष्ट करून ते स्वप्न पूर्ण केले. स्वतंत्र भारताचे स्वप्न बघून ते स्वप्न त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात देखील रुजवले.

तसेच त्यांच्या शासनकाळात मोक्याच्या ठिकाणी गड किल्ले बांधणे, परकीय शत्रूवर बारीक नजर ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग ह्यासारखे गड बांधणे, आरमार उभारणे, परकीय लोकांशी डोळ्यात तेल घालून चर्चा आणि व्यवहार करणे ह्यासारखी दूरदृष्टी त्यांच्याकडे होती हे आपण वेळोववेळी त्यांच्या चरित्रात बघितलेच आहे.

कुठलाही व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी व्यावसायिकाला दूरदृष्टी ठेवून काम करणे क्रमप्राप्त असते. तरच त्याचे निर्णय काळाच्या ओघात चुकत नाहीत आणि कालबाह्य ठरत नाहीत.

त्यांची दूरदृष्टी, कौशल्य परकीय शक्तींना थोपवण्याची क्षमता, लोककल्याणकारी धोरणे, मुत्सद्देगिरी, शौर्य ह्या सर्व गोष्टींतून आपल्याला भरपूर शिकायला मिळते.

 

Maharaj InMarathi

 

६. जल व्यवस्थापन

स्वराज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यात पाण्याचा साठा असणे महत्वाचे होते. त्यामुळे पाण्याचे संधारण आणि साठा साधारण वर्षभर पुरेल अशी उपाययोजना महाराजांनी केली होती.

म्हणजे चुकून गडावर हल्ला झाला तरी आणीबाणीच्या परिस्थितीत सुद्धा गडावर आवश्यक तेवढा पाणीसाठा कसा राहील ह्याची काळजी घेतली गेली होती.

तत्कालीन पाथरवट लोकांच्या मदतीने महाराजांनी हे जाणून घेतले होते की जलभेद्य खडकांचे थर आणि पाझरणारे खडक ह्यांच्या मदतीने किल्ल्यात पाणीसाठा करता येऊ शकतो.

ह्या पाथरवाटांकडून महाराजांनी किल्ल्यातच खाणी किंवा हौद किंवा दगडांच्या उतारावर खोल खड्डे तयार करून त्यात सतत पाणी पाझरत राहील ह्याची व्यवस्था करून घेतली हत्तीच्या आणि जलभेद्य खडक तासून त्यातच तलाव तयार करून घेतले. हे जल व्यवस्थापन काळाच्या कितीतरी पुढचे होते.

 

Water System Inmarathi

 

७. पर्यावरण व्यवस्थापन

पर्यावरण आणि माणूस ह्यांचे परस्परांशी असलेले नाते आणि अवलंबित्व महाराजांनी ओळखले होते आणि म्हणूनच स्वराज्यातील पर्यावरणाचा ऱ्हास त्यांनी होऊ दिला नाही. त्यांच्या मुलुखात असलेल्या वनराईची कायम काळजी घेतली गेली.

गडकोटांच्या परिसरात वड, शिसव, बाभूळ, नारळ, आंबा ह्या वृक्षांची लागवड केली होती. आरमार बांधण्यासाठी साग आणि शिसवीचा वापर केला जात ते आणि संदेश वहन करण्यासाठी स्मोक सिग्नल्सचा ते वापर करत असत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : 

 

त्यासाठी खास काळा व पांढरा धूर सोडणारी झाडे महाराजांनी लावून घेतली होती व तिचा वेळोवेळी वापर केला जात असे. महाराजांनी स्वराज्य हे पर्यावरणपूरक कसे राहील ह्याची सर्वतोपरी काळजी घेतली होती.

 

Shivkalin Enviroment InMarathi

 

८. प्लॅन्ड सिटी रायगड

रायगड ही नुसतीच स्वराज्याची राजधानी नव्हती. तर ती त्या काळात योजनाबद्ध रीतीने बांधण्यात आलेली एक प्लॅन्ड सिटी होती. तसेच त्या ठिकाणचा बाजार म्हणजेच मार्केट देखील खूप मोठे होते व योग्य नियोजन करून बांधण्यात आले होते.

रायगडावर धान्य साठवण्याची उत्कृष्ट व्यवस्था होती. तो बांधतानाच मजबूत बांधला होता. त्यावर ३०० घरे होती आणि अनेक घरे दुमजली आणि तिमजली होती.

रायगडावर ४२ दुकाने होती आणि ती इतकी अचूकपणे बांधली आहेत की विक्रेता व ग्राहक दोघांनाही अजिबात त्रास होणार नाही. त्याकाळी महाराजांनी प्लॅन्ड सिटी आणि मेगा मार्केट बांधून त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची झलक दाखवली आहे.

 

Raigad-Fort InMarathi

 

९. लोकशाही

महाराजांच्या काळात हुकूमशाहीची चलती होती. लोकशाहीचा विचार देखील कुणाच्या डोक्यात आला नव्हता. पण महाराजांनी त्यांचे सरकार जनतेच्या कल्याणासाठी चालवले.

त्यांची धोरणे बघितल्यास सर्वसामान्य जनतेचा त्यांनी खूप विचार करूनच धोरणे आखली होती ह्याची खात्री पटते. शिवाजी महाराज काळाच्या पुढचा आणि आउट ऑफ द बॉक्स विचार करणारे होते. ते एखाद्या राजाप्रमाणे नव्हे तर पित्याप्रमाणे प्रजेचा सांभाळ करीत असत.

प्रजेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये ह्याकडे त्यांनी पूर्ण लक्ष दिले. प्रत्येक व्यवस्थापकाला जर त्याची टीम चांगल्या प्रकारे बांधून ठेवून यश मिळवायचे असेल तर असाच काळाच्या पुढचा विचार करून धोरण आखणे क्रमप्राप्त आहे.

 

Shivaji Maharaj Lokshahi InMarathi

 

१०. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स

महाराजांच्या शासनकाळात करवसुली होत असे आणि कर गोळा करण्यासाठी त्यांनी माणसे नियुक्त केली होती. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कर्ज मिळत असे. त्यांच्या दरबारात अष्टप्रधान मंडळ असे जे राज्यकारभार चालवत असे.

त्यांच्या दरबारात परराष्ट्र धोरण सांभाळण्यासाठी डबीर हे मंत्रिपद होते तसेच त्यांचे स्वतःचे सक्षम गुप्तहेर खाते होते. ह्यातून महाराजांच्या प्रशासकीय व्यवस्थापनाची झलक बघायला मिळते.

 

Swarajya InMarathi

 

११. आरमार

शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजे होते ज्यांनी नौदल किंवा आरमार उभारले. त्यांच्याकडे ३०० शिपयार्ड (जहाजे बांधणे व दुरुस्त करणे यासाठी असलेला कारखाना), अनेक जलदुर्ग, शेकडो लढाऊ नौका (गलबत) होत्या. जवळजवळ ३०० मैल सागरकिनाऱ्यावर त्यांचे बारीक लक्ष होते. म्हणूनच महाराजांना “फादर ऑफ इंडियन नेव्ही” असे म्हटले जाते.

 

Shivaji Maharaj`s Army InMarathi

 

१२. गनिमी कावा

शत्रू जर आपल्यापेक्षा बलाढ्य असेल तर त्याला हरवण्यासाठी महाराजांनी गनिमी कावा शोधून काढला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही उक्ती त्यांनी वारंवार खरी करून दाखवली आणि बेसावध शत्रूला गनिमी काव्याने वारंवार धूळ चाटवली.

त्यांच्या ह्या गनिमी काव्याचा युद्धनीती म्हणून आजही जगभरातील सैन्यांद्वारे अभ्यास केला जातो.

 

Ganim Kava Inmarathi

 

 

१३. बदलीचे धोरण

महाराजांच्या शासनकाळात किल्लेदार किंवा हवालदार ह्यांची दर तीन वर्षांनी, सरनौबत ह्यांची चार वर्षांनी , कारखानीस ह्यांची पाच वर्षांनी तसेच सबनीस ह्यांची चार वर्षांनी बदली होत असे. ह्यामुळे भ्रष्टाचार आणिइतर गैर कृत्यांना आळा बसत असावा असे तज्ज्ञ मंडळी सांगतात.

तसेच देशमुख, पाटील , देशपांडे, कुलकर्णी, चौघुले ह्यांना जवळच्या किल्ल्यावर न ठेवता लांबच्या गावची वतनदारी दिली जात असे. हा सुद्धा त्यांच्या मॅनेजमेंटचाच एक भाग आहे.

 

Badliche Dhoran Inmarathi

 

१४. कामाचा मोबदला देण्याची पद्धत

मॅनेजमेंटमध्ये कामाचा मोबदला ही खूप महत्वाची गोष्ट आहे. महाराजांची कामाचा मोबदला देण्याची पद्धत सुद्धा विशिष्ट होती. सेवकांची वेतने ठरवल्याप्रमाणे होत असत.

पण एखाद्याने बक्षीस मिळवण्यालायक काही महत्त्वाचे किंवा चांगले काम केले तर त्याला वेतनवाढ न दिली जाता, काही रक्कम बक्षीस म्हणून दिली जात असे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ह्याचे कारण असे की एकालाच वेतनवाढ देणे व इतरांना न देणे ह्यामुळे सेवकांमध्ये असंतोष पसरू शकत होता. ह्याउलट चांगले काम केल्यास भरघोस बक्षीस मिळते म्हणून सेवक चांगले काम करण्यासाठी उत्सुक असत. त्यांची अशी परफॉर्मन्स अप्रेझलची पद्धत होती म्हणजे सगळेच चांगले काम करून इंसेण्टिव मिळवण्याचा प्रयत्न करत असत.

 

Shivaji Maharaj`s Gving Gift Inmarathi

 

१५. स्वच्छता व्यवस्थापन

महाराजांनी किल्ले बांधताना त्या काळात शौचकुपांची व्यवस्था केली होती. त्या काळी बांधलेली ड्रेनेज सिस्टीम बघून आश्चर्य वाटते. पहाऱ्यावर असणाऱ्या सैनिकांना नैसर्गिक विधींसाठी लांब जायला लागू नये ,त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी चोख व्यवथा करून घेतली होती.

ड्रेनेज सिस्टीम द्वारे मलमूत्र हे गडाच्या बाहेर तटबंदीच्या बाहेर खोल दरीत पडावे अशी ती ड्रेनेज सिस्टीम बघून थक्क व्हायला होते व महाराज काळाच्या किती पुढचा विचार करत होते ह्याची खात्रीच पटते.

कचऱ्याचे नैसर्गिक पद्धतीनेच विघटन होऊन नंतर त्यावर भाज्या पिकवण्यात येत असत. त्या काळात किल्ल्यात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,कंपोस्ट खतासाठी व्यवस्था, सोनखताचा आग्रह, शोषखड्ड्याची व्यवस्था, गडाची, पाणीसाठ्याची स्वच्छता ह्याविषयी महाराज खूप आग्रही होते.

 

clineliness Inmarathi

 

 

ह्या सगळ्यातून हेच लक्षात येते की, महाराजांच्या आयुष्यातली ध्येय, धोरणे, समाजनिती, राजनीती, युद्धनीती, अर्थकारण, व्यवस्थापन तंत्र,मानवतावाद, पर्यावरण संवर्धन यातून आजदेखील भरपूर काही शिकता येते.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श व्यवस्थापन गुरु होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?