' ग्लॅमरस जगातील दिखाऊ लोक की गीता फोगट? तरुणींनी रोल मॉडेल ठरवावा...!

ग्लॅमरस जगातील दिखाऊ लोक की गीता फोगट? तरुणींनी रोल मॉडेल ठरवावा…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, अशा सोशल मिडीयाच्या जमान्यात, आजची नुकतीच वयात येत असलेली तरुण मुलं आणि विशेषतः मुली, या डिजिटल मिडियामध्ये जे काही दिसते ते खरे मानुन त्यामागून वाहवत जाण्याची दाट शक्यता आहे.

बॉलीवूडच्या सेलीब्रीटीचे फोटो, व्हिडीओ, त्यांना मिळणारे लाईक्स, हे पाहून प्रसिद्धीच्या शिखरावर नेणाऱ्या या वाटांनी भुरळ घातल्यास आश्चर्य वाटायला नको.

पण, अनेकदा आकर्षित करणाऱ्या, मोहात पडणाऱ्या, या वाटांवर बरेच चकवे असू शकतात जे शिखरावर नेण्याऐवजी अपयशाच्या खाईत सुद्धा लोटू शकतात. अशा चककीत दिखाव्याला भुलून न जाता, कष्ट आणि मेहनतीच्या मार्गानेदेखील आपण हे यशाचे शिखर गाठू शकतो.

 

Tik Tok 7 inmarathi

फक्त आपल्या समोरील आदर्श देखील तसे प्रेरणादायी असायला हवेत. सध्याच्या काळात कुस्तीपट्टू गीता फोगट ही पहिली महिला कुस्तीपट्टू मुलींचा आदर्श असायला हवी. कुस्ती सारख्या पुरुषी समजल्या जाणाऱ्या खेळात स्वतःचे स्थान निर्माण करून तिने देशातील तरुणींसमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.

आज आपण दंगल चित्रपटाच्या माध्यमातून तिच्या या कारकिर्दीबद्दल बरेच काही जाणून आहोत. पण, तिच्या यशाला कारणीभूत ठरलेला तिचा जिद्दी स्वभाव, कष्ट करण्याची तयारी आणि अपयशाने खचून न जाण्याचा उमदेपणा याबद्दलही आपण जाणून घ्यायला हवं. तिच्यातील या दुर्मिळ गुणांमुळेच आज ती देशातील संपूर्ण तरुणाईसाठी एक रोल मॉडेल ठरली आहे.

हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील बलाली या खेड्यात महावीर फोगट आणि दया कौर यांची पहिली मुलगी. कोणत्याही कर्मठ, पारंपारिक आणि जुनाट विचारांच्या घरातील अवस्था असावी तशीच गीताच्या जन्मानंतर तिच्या आईलाही केवळ पहिली मुलगी झाल्याचे दुःख होते.

 

Geeta Phogat InMarathi

 

घराण्याला वंशाचा दिवाच नाव आणि वारसा कमावून देऊ शकतो अशा विचारसरणीच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आपल्याला पहिली मुलगी झाली याचा तेंव्हा त्यांना जरी दुःख झाले असले तरी, आज त्याच मुलीचा त्यांना प्रचंड अभिमान आहे.

म्हणून गीतासारख्या मुली या फक्त एखाद-दुसऱ्या घराचीच मान उंचावत नाही तर, संपूर्ण समाजाला आपल्या दृष्टीकोनात, विचारात आणि आचारात बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देतात.

अर्थात, गीताला कुस्तीसारख्या मर्दानी खेळात उतरवण्याचे धाडस करणारे तिचे वडील आणि वस्ताद महावीर फोगट यांचा देखील यामध्ये तितकाच वाटा आहे.

 

Geeta Fogat InMarathi

मुलींना योग्य प्रशिक्षण आणि सुविधा दिल्यास त्या मुलांपेक्षा कुठेच कमी पडत नाहीत, हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून सिद्ध करून दाखवले. गीता ज्या वयात कुस्ती शिकत होती, त्यावेळी तिच्या सोबत खेळणाऱ्या मुली नसल्याने पुरुष मल्लांविरुद्धच तिला कुस्ती खेळणे भाग होते.

तिला कुस्तीच्या क्षेत्रात आणायचेच असा निश्चय करून जेंव्हा महावीर यांनी तिचा रोजचा दिनक्रम आखला तेंव्हा तो अमलात आणणं तितकस सोपं नव्हतं पण गीताला त्याशिवाय दुसरा पर्याय देखील नव्हता.

तेंव्हाच्या आठवणी सांगताना गीता म्हणते की,

“त्या वयात सगळ्यात जास्त संबंध आमचा ज्याच्याशी आला अशा दोनच गोष्टी होत्या एक म्हणजे आखाडा आणि दुसरे आमचे वडील. त्या वयात आखाडा आणि वडील सोडून आम्ही दुसऱ्या कोणत्याच गोष्टी बघितल्या नव्हत्या.

“पहाटे ३.३० वाजताच गीताचा दिवस सुरु होत असे, इतक्या लवकर उठून तब्बल चार तास तिला आखाड्यात तालीम करावी लागत असे. त्यानंतर शाळा आणि शाळेतून परत आल्यावर पुन्हा दोन ते तीन तासांची तालीम.”

आयुष्यातील ही पाच ते सहा वर्षे तिने प्रचंड कष्ट घेतले. कारण, थकवा किंवा कंटाळा हे शब्दच माझ्या वडिलांच्या डिक्शनरीत नव्हते असे ती सांगते.

२००९ साली पंजाब येथील कॉमनवेल्थ व्रेस्टलिंग चॅम्पियनशिप्स मध्ये तिने ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकल्यानंतर, ती पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडाविश्वात चर्चेचा विषय ठरली. या विजयानंतर तिचा कॉमनवेल्थ गेम्स दिल्ली येथपर्यंत पोचण्याचा रस्ता सुकर झाला.

२०१२ मध्ये ती कझाकिस्तान येथे झालेल्या अस्ताना स्पर्धेत यशस्वी झाली आणि ऑलिम्पिक मध्ये निवड होणारी ती पहिली महिला कुस्तीपट्टू ठरली. ऑलिम्पिक स्पर्धेत तिला सुवर्णपदक जिंकता आले नाही तरी, तिने ब्राँझ पदक पटकावले.

मात्र, देशभरातील अनेक मुलीना कुस्ती या खेळाकडे सकारात्मकतेने आणि करिअर म्हणून पाहता येते याची पहिली प्रेरणा तिने दिली. त्यानंतर अनेक महिला कुस्तीपट्टू भारतातून तयार झाल्या आणि होतही आहेत.

 

Geeta-Phogat-InMarathi

साक्षी मलिकने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून कुस्ती हा मुलींचा खेळ होऊ शकतो आणि त्यामध्ये त्या यश गाठू शकतात हेही ठसवून दिले. पण त्याआधी या मार्गातील पहिलेवहिले सर्व अडथळे गीताने सर केले होते.

यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक सन्माननीय स्पर्धा गीताने जिंकल्या, तेंव्हापासून तिच्या करिअरचा आलेख चढताच राहिला आहे. २०१६ मध्ये ती दिल्लीचा उत्तम कुस्तीपट्टू असलेला पावन कुमार याच्याशी विवाहबद्ध देखील झाली.

गीताची एकूण संपत्ती तब्बल २४ कोटी रुपये आहे, पैकी तिच्या वैयक्तिक नावावर असलेल्या मिळकतीची किंमत ४ कोटी रुपये आहे.

२०१८ च्या ओक्टोंबरमध्ये गीताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला गेला, तो म्हणजे हरियाणा पोलीस विभागात तिची डीएसपीपदी निवड झाली. २०१० पासून सुरुवात झालेल्या तिच्या करिअरमध्ये तिने अनेकदा यश मिळवले.

 

DSP Geeta Phogat InMarathi

२०१७ पासून तिने थोडा खंड पडला असला, तिची मागची कारकीर्द पाहता लवकरच ती पुन्हा नव्या दमाने परत येईल आणि भारताच्या सन्मानात भर घालेल याबद्दल तिळमात्र देखील शंका नाही.

इतकं सगळं वाचल्यावर तुम्हाला देखील असं वाटत नाही का, गीता आपलीही रोल मॉडेल असायला हवी, म्हणून?

उलट कोणत्याही बॉलीवूड हिरोईन पेक्षा निश्चितच गीताचा प्रवास आपल्याला कठोर परिश्रम आणि मेहनतीची प्रेरणा देतो आणि यामार्गाने गेल्यास हमखास यशाची देखील खात्री पटते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?