' जेव्हा पक्षी मानवाविरुद्ध जीवघेणं युद्ध पुकारतात…मानवाने ओढवून घेतलेलं अस्मानी संकट! – InMarathi

जेव्हा पक्षी मानवाविरुद्ध जीवघेणं युद्ध पुकारतात…मानवाने ओढवून घेतलेलं अस्मानी संकट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखिका: प्रिया प्रभुदेसाई

===

अनिश्चिततेने भरलेल्या आयुष्यात निश्चित अशी एकच गोष्ट आहे, जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू. अंतिम सत्याचे हे अक्राळविक्राळ दर्शन मानवी जीवनाला ही लागू आहे. प्रश्न आहे, तो कसा येईल, कुठून येईल, कधी येईल?

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्यात वाकबगार असलेल्या मानवी मेंदूला अजूनही याचे ठोस उत्तर माहित नाही. तरीही जी गोष्ट निश्चित आहे ती नाकारण्याकडे मानवाचा कल आहेच.

स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर, जी काही प्रगती त्याने केली आहे, त्यामुळे आपण कशावरही विजय मिळवू शकतो या भ्रमात माणूस जगतो. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचेही जीवन सहज घेतो.

निसर्गाचा विध्वंस करतो. पर्यावरणाचा ऱ्हास करतो. याची कुठेना कुठे प्रतिक्रिया उमटत असतेच. मानवाच्या सर्वभक्षक महत्वाकांक्षेला आवर घालण्याचा निसर्ग प्रयत्न करतो.

तंत्रज्ञानाने समृद्ध झाले तरी एका फटक्यासरशी होत्याचे नव्हते होते आणि निसर्गाच्या प्रचंड कोपापुढे हतबल होऊन शरण जाण्यापलीकडे दुसरा इलाज राहत नाही.

कधी पुराने गावच्या गावे उध्वस्त होतात, कधी एखादी ठिणगी वणव्याचे रूप धारण करते, कधी धरतीच्या कंपनाने शहरे कोसळतात तर कधी कल्पनाही नसताना, अगदी छोटे, दुबळे जीव सुद्धा संतापाने पेटून उठतात. जगाच्या नाशाची ती नांदी असते.

 

end of the world InMarathi
popularmechanics.com

द बर्डस

बोडेगा च्या खाडीजवळील छोटेसे आळसावलेले शहर. या शहराला शोभेलशी लहान शाळा. मुले गाणी म्हणत आहेत. शाळा सुटायला थोडासा अवकाश म्हणून आपल्या पाल्याला नेण्यासाठी आलेली नायिका, बाहेरील आवारात बाकावर टेकलेली.

पाठीमागच्या जंगल जिमवर कावळे जमू लागतात. जणू काही बाहेर त्यांची शाळा भरलेली असावी, तसे, एकापाठोपाठ एक, पंखाची फडफड सुद्धा ऐकू येत नाही.

सहज म्हणून ती मान फिरवते, तेव्हा तिच्या मागचे आकाश काळ्या रंगाने भरून गेले असते. एका अभद्राची चाहूल पुऱ्या आसमंताला लागलेली असते. नंतर जे घडते, ते का कसे याचा अंदाज सुद्धा लावता येत नाही.

Actually I have no idea what draws the birds and turns them bad and it seems that nobody else does either. “I don’t know why,” मेलॅनी डॅनिएल्स बुचकळ्यात पडलेली आहे.

तीच का, शहरातल्या कुणालाच याचे उत्तर माहित नाही. हिचकॉकचा हा सिनेमा उत्तरे सुचवत नाही. खरेतर या अस्मानी संकटापासून कुणाचीही सुटका नाही.

सिनेमाची सुरुवात होते सॅन फ्रान्सिस्को येथील एका पक्ष्यांच्या दुकानात; जिथे नायिका आपल्या मावशीसाठी पक्षी विकत घेण्यासाठी येते.
पण भारतातून ऑर्डर केलेले पक्षी काही वेळेत पोचलेले नसतात. त्याचवेळी दुकानात एक देखणा तरुण येतो.

मेलॅनीला विक्रेती समजून, पक्ष्यांची चौकशी करतो. आपल्या बहिणीसाठी त्याला लव्ह बर्ड्स हवे असतात. बहीण जेमतेम अकरा वर्षाची त्यामुळे फार काळजी घ्यावी लागेल असेही पक्षी नको किंवा अगदी माणूसघाणे सुद्धा नको.

Do you happen to have a pair of birds that are just friendly?

मेलॅनीला पक्ष्यांची काही फार माहिती नसतेच. पक्षी शोधण्याच्या तिच्या प्रयत्नात ते समजून येते. अर्थात ती काही स्वतःची खरी ओळख देत नाही. श्रीमंत, प्रतिष्ठित कुटुंबातल्या, अतिशय लाडात वाढलेल्या मेलॅनी ला लोकांची मस्करी करायची सवय असते.

प्रिंट मीडिया तही तिच्या वागण्याचे अनेक खरे खोटे किस्से प्रसिद्ध असतात. हा देखणा तरुण, मीच ब्रेनर, वकील असल्याने, तिचे नाटक तो ओळखतोच.

TheBirds-Inmarathi
thehollywoodoutsider.com

अर्थात तिच्याच खेळात सामील होऊन, तोही तिला स्वतःची ओळख देत नाही. उलट पक्ष्यांना तुरुंगात ठेवणे किती वाईट आहे, त्यांचे स्वातंत्र्य हिरावणे किती स्वार्थाचे आहे हे तिला सांगतो .

मेलॅनी च्या हातातून एक पक्षी निसटतो. मीच त्याला पकडतो आणि परत पिंजऱ्यात ठेवतो. “Back in your gilded cage, Melanie Daniels.”

तो पक्षी आणि लाडावलेली मेलॅनी एकच आहे असे दर्शविताना उपहासाने हसणारा त्याचा चेहेरा मेलॅनीच्या नजरेतून सुटत नाही. ह्याला आपले नाव कसे माहित हा प्रश्न तिला पडतो.

नंतर तिच्या लक्षात येते, जो गंडवायचा खेळ ती खेळत असते, तोच खेळ तोही खेळत असतो. ती नक्की कोण आहे, तिची प्रतिमा, तिच्याबद्दलच्या त्याच्या ठोस कल्पना या साऱ्यांचे प्रतिबिंब त्याच्या वागण्यात तिला दिसून येते.

तिला डिवचून तो निघून जातो खरा. पण ती मात्र त्याच्याकडे आकर्षित झालेली असते. पत्ता शोधणे काही फार कठीण नसते. बहिणीसाठी त्याला हवे असलेले लव्ह बर्ड्स घेऊन ती त्याच्या गावाला निघते.

घर सापडते, हलक्या पावलांनी, त्याच्या घरात हळूच शिरून, आणलेले प्रेझेन्ट तिच्या घरात ठेवून परत निघताना, एक समुद्र पक्षी, आकाशातून तिच्या अंगावर झेपावतो आणि तिला जखमी करतो. हे तसे आक्रीत. समुद्र पक्षी तसे शांत असतात.

याचवेळी तिचे आपल्या घरी येणे मीच ब्रेनरला समजते. थोडेसे आकर्षण, थोडी उत्सुकता आणि बरीचशी कृतज्ञता म्हणून तो मेलॅनीला वाढदिवसासाठी थांबायची विनंती करतो.

मीच चे तिच्याविषयी असलेले मत, ठाऊक असल्याने, मेलॅनीला त्याच्याबद्दल वाटणारे आकर्षण व्यक्त करावेसे वाटत नाही. एकतर त्या भावना अजूनही तिलाच समजलेल्या नाहीत. तिला मान्यही करायच्या नाहीत. त्या नाकारायच्या सुद्धा नाहीत.

 

TheBirds_0 Inmarathi
deltafilms.net

मेलॅनी, त्याच गावात राहणाऱ्या ऍनी च्या घरात काही दिवसासाठी राहायचे ठरवते. एकेकाळी ती आणि मीच यात नाजूक नात्याचा बंध असतो.पुढे मार्ग वेगळे होतात पण मैत्री राहते.

हे प्रेमसंबंध तुटण्याची कारण असते लिडिया, मीच ची आई. अचानक वैधव्य आल्याने, आलेला एकाकीपणा, आपल्याला मुलापासून कुणीतरी दूर नेईल ही भीती , त्यातून आपल्या मुलाबद्दल निर्माण होणारी हक्काची भावना, यामुळे मेलॅनी बरोबरही ती तुटक वागते.

या जेवणांनंतर मात्र घटना वेगात घडतात. वाढदिवसाच्या आधीच्या रात्री, मेलॅनी जिथे उतरली असते, तिथे एक समुद्र पक्षी मरून पडतो. तो दरवाज्यातून आत येण्याचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्या दिवशी पार्टीच्या वेळेला, पक्ष्यांचा थवा, लहान मुलांवर आक्रमण करतो.

एक लहान मुलगी त्यात जखमी होते.. त्याच रात्री, मीच च्या घरातील फायर प्लेस च्या वरती असलेल्या चिमणीमधून, लहान पक्ष्यांचे थवेच्या थवे घरात प्रवेश करतात. त्यांचा हेतू असतो या कुटुंबाला घाबरवणे. पोलीस येतात पण पक्षी घाबरवतात या कारणावर कसा विश्वास ठेवणार!

 

the bird attack InMarathi
Blu-ray.com

दुसऱ्या दिवशी, लिडिया जेव्हा काही कामासाठी डॅन कडे, शेजारी जाते, तेव्हा तीला, डॅन चे प्रेत दिसते. खोलीत पक्ष्यांची पिसे आणि त्याने मारून टाकलेल्या, डोळे फोडलेल्या डॅन चे प्रेत. परिस्थिती आता मात्र झपाट्याने हाताबाहेर जात असते. एकच चांगली गोष्ट होते की लिडिया आणि मेलॅनी एकत्र येतात.

कॅथी, मीच च्या बहिणीला, शाळेतून आणताना पक्ष्यांचा परत हल्ला होतो. हा हल्ला आधीपेक्षाही हिंसक असतो. एक मुलगी जखमी होते. पेट्रोल पंपाला आग लावण्यातही पक्ष्यांचा हात असतो, एक माणूस यात मारतो.

आता मात्र चर्चा सुरु होतात, कारणे दिली जातात. पक्षीतज्ञ् मिसेस बर्डी पक्ष्यांची बाजू घेताना म्हणतात,

Their brain pans are not big enough. Birds are not aggressive creatures, Miss. They bring beauty into the world. It is mankind, rather… who insists upon making it difficult for life to exist on this planet. Now if it were not for birds…
मधेच तिला थांबवून सांगितले जाते, Mrs. Bundy, you don’t seem to understand. This young lady said there was an attack on the school.
पण मिसेस बर्डीला यातली गंभीरता अजून समजली नाही.

Birds have been on this planet, Miss Daniels, since Archaeopteryx, a hundred and forty million years ago. Doesn’t it seem odd that they’d wait all that time to start a, a war against humanity.

पण हे युद्धच असते. त्याचा शेवट काय होणार याचा अंदाज सुद्धा माणसांना नसतो. सिनेमाच्या शेवटाला, बोडेगो गाव सोडणे हे माणसांचे प्राक्तन ठरते.

मीच घरात प्रवेश होऊ शकेल अशा सर्व जागा, लाकडाच्या साहाय्याने बंद करतो. रात्रीच्या निरव शांततेत, घराच्या दारावर, खिडक्यांवर पक्ष्यांच्या धडका बसू लागतात.

कोणत्या क्षणी चिमुकला जीव काळ बनून उभा राहील ह्या चिंतेत घरातली माणसे कशीतरी जीव मुठीत धरून बसतात. रात्री मेलॅनी ला कसलीतरी खुडबुड ऐकू येते.

वरच्या मजल्यावर त्याचा शोध घेत असतानाच, पक्ष्यांचा हल्ला होतो. मीच, लिडिया तिला वाचवतात पण सुरुवातीची मेलॅनी मात्र बदलते. एक लाडावलेली वात्रट मुलगी, जो पुरुष आवडला त्याला स्वतःहून वश करण्याचा प्रयत्न करणारी बोल्ड मुलगी, पक्ष्यांचा हल्ला होताच ती बदलते.

न घाबरता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, मुलांसाठी उभी राहिलेली धीट मुलगी अशी अनेक रूपे या सिनेमात आधी येतात. या हल्ल्यानंतर मात्र तिची लढायची उर्मी संपते. तिचे मानसिक संतुलन ढळते. सिनेमाच्या शेवटी, मीच, त्याची बहीण, लिडिया आणि मेलॅनी घरातून बाहेर पडून बसतात.

 

Hitchcock`s Birds Inmarathi
sfchronicle.com

अंगणात, झाडावर, कठड्यावर, कार च्या आजूबाजूला पक्ष्यांच्या झुंडी असतात. निःशब्द, फक्त पाहत. त्यांचा विजय निश्चित असतो.. माणसांना हुसकावून लावण्यात यश मिळालेले असते. गाडी सुखरूप सॅनफ्रान्सिस्को ला पोचते? याबाबतीत निर्मात्याचे मौन आहे.

निसर्ग कठोर असतो. त्याचा अंदाज लावता येत नाही. त्याला कह्यात आणले आहे हा सुद्धा आभास असतो आणि त्याची प्रतिक्रिया अतिशय तीव्र, उग्र स्वरूपात येऊ शकते.

पक्षी तर चिमुकला जीव. माणूस आपल्या करमणुकीसाठी त्यांना पिंजऱ्यात ठेवतो. त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतो. त्यांची घरे उध्वस्त करतो. हे असे काही होऊ शकेल, ही अशक्य वाटणारी कल्पना हिचकॉक पडद्यावर सत्यात उतरवतो.

ह्या सिनेमात हिंसा आहे. डोळे बाहेर आलेला माणूस, रक्तबंबाळ झालेली माणसे, भर दिवसा केलेले हल्ले…! पण या सर्वात भयानक आहे ते, या सगळ्यासाठी जे एक ठोस कारण लागते, ते कारण इथे नाही.

अतिशय बुद्धिमान, आणि शक्तिमान माणूस आणि त्याच्या विरुद्ध ठाकलेला दुबळा, केवळ करमणुकीचे साधन मानला गेलेला पक्षीसमुदाय हा विषम सामना आहे. तरीही हा जिंकायला त्यांना फार वेळ लागत नाही .

आकाशातून तुमच्यावर जे झुंडीने कोसळते, त्याला का हा प्रश्न विचारता येत नाही आणि म्हणून त्यावर काहीही उत्तर नाही. हे फार भयानक आहे.

हा दबलेला आक्रोश बाहेर पडतो आहे का? या प्रश्नाचे उत्तर मिळाले तरी फार आशादायक नाही. हे भयानक आहे. अर्थात हा तर्क.. हिचकॉकने सिनेमाची थीम, त्याला निश्चित काय सांगायचे आहे या सर्वच बाबतीत मौन बाळगलंय .

 

voilence the birds InMarathi
ultimosegundo.ig.com.br

ह्या सिनेमाची सुरुवात होते लव्ह बर्ड्सने. मीच आणि मेलॅनी यांना एकत्र आणण्यास कारणीभूत झालेले पक्षी. सुरुवातीचा जो त्यांचा फ्लर्टींग सीन आहे तो सुद्धा त्यांच्या साक्षीने आणि त्यांना वापरून दिग्दर्शित केला आहे.

त्यामुळे, अजून एक थीम प्रकर्षाने दिसते, ती, मेलॅनी चे वर्तन, सामाजिक चौकटीच्या बाहेर आहे. तिचे मोकळे वागणे, मीच बरोबर उघड फ्लर्ट करणे, याच्या आधीही, सोसायटीत तिला लोकनिंदेला तोंड द्यावे लागले आहे, पक्षी म्हणजे सर्वसामान्य समाज, जो तिच्या वर्तनासाठी तिला शिक्षा करतो..

झुंडीचे मानसशास्त्र इथे पाहायला मिळते. समाजातील बहुसंख्य घटकांना, पैसे आणि सत्ता याच्या जोरावर नमविले जाते. पण जेव्हा ते एकत्र येतात, तेव्हा संघर्ष, कोणत्याही बाकीच्या मुद्द्यांवर लढला न जाता, केवळ बलशाली आणि पीडित या दोहोत लढला जातो. अशावेळी संख्याबळ महत्वाचे ठरते. पक्षी, खरेतर जाती, गटाने राहतात.. पण इथे जेव्हा हल्ला होतो, तेव्हा सर्व पक्षी एकत्र येतात.

हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा अमेरिका आणि रशियात राजकीय व लष्करी तणावाचे वातावरण होते. त्यांच्यातील वाढते मतभेद हे शीतयुद्धाचे मोठे कारण मानले जाते.

साम्यवादाशी ज्यांना सहानुभूती आहे किंवा त्या लोकांशी ज्यांचा संबंध आहे, अशा अनेकांना, केवळ संशयाने हॉलिवूड ने व्यवसायातून उठवले, बाहेर केले. अनेक कलावंतांना याचा फटका बसला.. १९६२ च्या क्युबा मिसाईलने जगापुढे अण्वस्त्र युद्धाचे प्रश्नचिन्ह उभे केले.

विनाशाच्या उंबरठ्यावर आणून सोडले. सिनेमातील पक्ष्यांचा हल्ला याचे सूचक होता असेही म्हंटले जाते.

russiaamerica InMarathi
katehon.com

याचवेळी व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने भाग घेतला.

प्रचंड प्राणहानी आणि आर्थिक अपयश सोसून अमेरिकेचा शेवटी पराभव झाला. एका बलाढ्य राष्ट्राची नामुष्की पत्करून हार झाली. जनतेकडून सुद्धा याची निंदा केली गेली. याचेही प्रतिबिंब या सिनेमात असावे असे मला वाटते.

This is the war between Significant few v/s trivial many Few elite operators can not overturn the will of insignificant masses. Might of the many can drive out or overpower an empowered segment of society.

थिअरीज ना हिचकॉकने मान्यता दिली नाही तरीही, आजही द बर्ड्स या गोष्टींचा विचार करायला भाग पाडतो. द्रष्टा यालाच म्हणतात.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?