' डोंबिवली नि कोथरूड, दोन निवडणुका, दोन परिणाम: राजकारण काय असतं याची छोटीशी झलक!

डोंबिवली नि कोथरूड, दोन निवडणुका, दोन परिणाम: राजकारण काय असतं याची छोटीशी झलक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक: सुधन्वा कुलकर्णी

===

शिवसेनेचे प्रकाश परांजपे हे १९९६ पासून २००४ पर्यंत सातत्याने ठाण्यातून खासदार म्हणून निवडून येत होते. मात्र खासदार असतानाच २००८ साली त्यांचं कॅन्सरने दुर्दैवी निधन झालं, आणि तिथे पोटनिवडणूक लागली.

सेनेने त्यांच्या मोठ्या मुलाला, आनंद परांजपे यांना तिकीट दिलं. ते आरामात निवडून आले. त्यानंतर वर्षभराने २००९ च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या.

यावेळी मतदारसंघांची पुनर्रचना झाली होती. मग त्यांना शिवसेनेने कल्याण मतदारसंघातून उभं केलं. इकडे ठाण्याची शिवसेनेची सीट पडली (विजय चौगुले पराभूत वि. संजीव नाईक-राष्ट्रवादी). पण कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंसारख्या तगड्या उमेदवाराचा पराभव करून, आनंद परांजपे पुन्हा खासदार झाले.

मात्र २०१४च्या निवडणुकीच्या जस्ट अगोदर परांजपेंचे ग्रह फिरले. राजकारणाचा स्तर घसरला म्हणून परवा अजितदादांएवढेच अश्रू ढाळणारे जितेंद्र आव्हाड आठवतात का? त्यांनीच परांजपेंना गळ लावला.

 

awhad-and-paranjape Inmarathi
Zee News

एकदम फिल्मी स्टाईलमध्ये शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत दोघांनी एन्ट्री मारली आणि आनंद परांजपे राष्ट्रवादीत घुसले. त्यांना कल्याणचं तिकीट मिळालं. इकडे शिवसेनेने एकनाथ शिंदेंचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना तिकीट दिलं.

झालं…म्हणजे आता डोंबिवलीतली लढाई परांजपे विरुद्ध शिंदे.

ज्यांना कल्पना नसेल त्यांच्यासाठी खुलासा करतो. पूर्वीचा ठाणे लोकसभा असो किंवा आता कल्याण लोकसभा, निवडणुकीचा निकाल फक्त डोंबिवली ठरवते.

मला १९९१ची लोकसभा निवडणूक आठवतेय. ठाणे मतदार संघातून रामभाऊ कापसेंच्या समोर नवी मुंबईचे हरबन्स सिंग नावाचे नवखे उमेदवार कॉंग्रेसने उभे केले होते. लोकांना वाटलं याचं तर नावसुद्धा कुणाला माहीत नाहीये. आणि त्यावेळी रामजन्मभूमी आंदोलन फुल स्विंग मध्ये होतं.

आता रामभाऊ नक्की २ लाखांनी येणार.

प्रत्यक्षात मोजणी सुरु झाली आणि भाजपला बुडबुडे आले. शेवटी रामभाऊ फक्त ३२००० च्या मताधिक्याने कसेबसे निवडून आले.

पण लक्षात घ्या, त्यातला २५००० चा लीड एकट्या डोंबिवलीने दिला होता. म्हणून वर लिहिलंय, की २०१४ ची ‘डोंबिवली’ तली लढाई परांजपे विरुद्ध शिंदे अशी होती.

 

Anand Paranjape vs Shrikant Shinde Inmarathi
Aapla Mahanagar

आता डोंबिवलीच्या लौकिकामुळे परांजपेंना वाटलं इथले मतदार तर ‘आपले’ हक्काचे. त्यांनी रीतसर फिल्डिंग सुद्धा लावली. मग डोंबिवलीच्या एका महाविद्वान ब्राह्मणसंघाने पत्रक काढलं.

“ब्राह्मण समाजाच्या आनंद परांजपेंना निवडून द्या.” झालं…परांजपे हवेत गेले. पण प्रत्यक्षात डोंबिवलीकरांनी त्या पत्रकाची दखलही घेतली नाही.

शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे अडीच लाखांनी विजयी…!

असाच अजून एक किस्सा आठवतोय. वरील किस्सा डोंबिवलीचा होता, हा किस्सा पुण्याचा आहे.

१९९७ च्या नोव्हेंबरमध्ये केंद्रात युनायटेड फ्रंटचा पाठिंबा कॉंग्रेसने काढला आणि पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी राजीनामा दिला. भाजपने सांगितलं आम्ही काही झालं तरी कॉंग्रेसला सरकार स्थापन करू देणार नाही.

या कोंडीतून मार्ग दिसत नसल्याने शेवटी राष्ट्रपती के. आर नारायणन यांनी लोकसभा भंग केली, आणि दीड वर्षात पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या.

 

Narayanan Inmarathi
News18.com

अगोदरच्या १३ दिवसीय सरकारच्या अनुभवाने पोळलेल्या भाजपने यावेळी फेरगणिते मांडायला सुरुवात केली. सेटिंग मास्टर प्रमोद महाजन जबरदस्त फॉर्ममध्ये. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात धमाल होती.

१९९६ साली कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार सुरेश कलमाडी यांना पक्षाने तिकीट नाकारलं. आणि शरद पवारांचे चेले विठ्ठल तुपे यांना उमेदवारी मिळाली.

कलमाडी हुशार, ते लगेच तुपेंच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे राहिले. मित्र गोळा करण्याच्या मोहिमेवर असलेल्या भाजपने हा मौका साधून, स्वतःचा उमेदवार उभा न करता अपक्ष सुरेश कलमाडींना पाठिंबा देऊ केला.

त्यावेळी भाजपवाले आजच्यासारखे निर्लज्ज झाले नसल्याने कलमाडींना थेट पक्षात प्रवेश दिला नाही, हे बाकी खरं.

 

kalmadi Inmarathi
NDTV.com

मात्र या बातमीने पुण्यातल्या पेठांमध्ये आणि त्या काळात उच्चभ्रू होण्याच्या मार्गावर असलेल्या, कोथरुड मध्ये, खळबळीची जबरदस्त लाट उसळली.

मग चाणक्य मंडळचे क्लासेस चालवणारे, अभ्यासू आणि सोज्वळ चेहऱ्याचे अविनाश धर्माधिकारी या प्रचंड लाटेवर स्वार होवून कलमाडींच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे राहिले.

आता कलमाडींना विरोध म्हणजे पर्यायाने भाजपलाच विरोध. पण धर्माधिकारी एकतर रा. स्व. संघाच्या मुशीत तयार झालेले आणि शिवाय आयएएस अधिकारी असताना राजीनामा देऊन विशिष्ट ध्येयासाठी बाहेर पडलेले.

अर्थात पुण्यात त्यांची सॉलिड क्रेझ होती. त्यांच्या पाठीशी चळवळ्या तरुणांचा एक मोठा गट कार्यरत होता.

 

dharmadhikari-inmarathi

त्यामुळे त्यांनी प्रचारात दृश्य आघाडी घेतली. पैशाअभावी कुठलंही शो-शाईन नसलेला, लो प्रोफ़ाईल आणि वन टू वन प्रचार त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरु केला. सगळीकडे एकच हवा.

भाजपने कलमाडींना पाठिंबा दिल्याने दुखावलेला ‘हक्काचा’ मतदार अविनाश धर्माधिकारींच्या मागे एकवटणार असं वातावरण उभं झालं.

पण भाजपच्या साधनशुचितेचे मेरुमणी, आणि राजधर्म पाळण्यात तरबेज असलेले अटलबिहारी वाजपेयी, यांनी महात्मा सुरेश कलमाडी यांच्यासाठी पुण्यात जाहीर सभा घेतली, आणि विषय संपला.

atalji-inmarathi
deccan-chronicle.com

अंतिम निकाल असा होता. विठ्ठल तुपे विजयी ४. ३४ लाख, सुरेश कलमाडी ३.४१ लाख आणि अविनाश धर्माधिकारी फक्त ३४ हजार.

 

Vitthal Tupe Inmarathi
YouTube

सांगायचा मुद्दा असा की…

या दोन किश्श्यांमधून ज्याने त्याने तात्पर्य शोधावे. मी काही सांगण्याची आवश्यकताच नाहीये.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “डोंबिवली नि कोथरूड, दोन निवडणुका, दोन परिणाम: राजकारण काय असतं याची छोटीशी झलक!

  • December 19, 2019 at 6:02 pm
    Permalink

    आदरणीय लेखक कुलकर्णी ताई अतिशय सुंदर लेखन करता आपण त्याचप्रमाणे आपला राजकीय अभ्यासही खुप छान आहे, असे या लेखातून दिसते आहे. असेच आपले नवनवीन लेख वाचायला मिळावेत हिच सदिच्छा. आपण लेखक आहात आपणास आपले विचार मांडण्याचे पुर्णपणे स्वातंत्र्य आहे. पण या लेखात आपण शरद पवारांचे चेले विठ्ठल तुपे असे लिहिले आहे आणि विठ्ठल तुपे पाटील हे आमचे श्रद्धास्थान आहेत त्यामुळे याठिकाणी कुठेतरी आमच्या भावना दुखावल्या आहेत तरी माझी आपणांस विनंती आहे की याठिकाणी चेले याऐवजी दुसरा कोणताही शब्द प्रयोग करावा अशी छोटीशी विनंती मी आपणांस करतो आहे. धन्यवाद.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?