वाहन क्षेत्रातील मंदी : वस्तुस्थिती आणि कारणमीमांसा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : चेतन जोशी

लेखक चार्टर्ड अकाऊंटंट आहेत.

===

मंदी ही शांत पावलांनी येते आणि बरेच काही घेऊन जाते. बिजनेस सायकल ही त्या व्यवसायाच्या आवाक्यानुसार कमीतकमी तीन वर्षांची असू शकते. प्रत्येक व्यवसायात तीन वर्षे झाल्यावर त्यात योग्य ते बदल केले नाहीत तर तो व्यवसाय बंद पडू शकतो.

म्हणून वेळोवेळी सुयोग्य आणि परिस्थितीनुरूप बदल करीत राहणे आणि बाहेरील स्पर्धेचा आढावा घेत राहणे गरजेचे असते.

 

Recession Inmarathi
punjabkesari.in

जागतिक मंदी ही देखील एखाद्या विशिष्ट कालावधीनंतर अनुभवण्यास मिळते. मंदीला अनेक बाबी जबाबदार असतात. सरकारने मंदीची तीव्रता ओळखून योग्य ते निर्णय घेणेदेखील आवश्यक आहे.

मारुती सुझुकी इंडियाने त्यांच्या गुरूग्राम आणि पानेसर मधील प्लांट दोन दिवसासाठी बंद ठेवला तसेच याआधीच मारुतीने डीझेल गाड्यांची निर्मिती २०२० पासून थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशोक लेल्यांड कंपनीने उत्पादन दोन महिन्यासाठी बंद केले आहे. वाहन विक्री घटली आहे.

परंतु ही मंदी नसून वाहन क्षेत्रात येऊ घातलेल्या तंत्रज्ञान बदलांमुळे निर्माण झालेली शांतता आहे.

cars-inmarathi
Carwow.com

इथून पुढे या क्षेत्रात मोठे बदल घडू शकतात. जुन्या कंपन्या नव्या तंत्रज्ञान घेऊन येणाऱ्या कंपन्यांबरोबर जॉइंट व्हेन्चर करून उत्पादन करू शकतात.

ज्या परदेशी कंपन्या भारतात येऊनही समाधानकारक मार्केट शेयर मिळवू शकलेल्या नाहीत त्या भारतातील त्यांचे उत्पादन बंद करू शकतात. नवीन परदेशी कंपन्या येऊ शकतात. भारतीय कंपन्यां नव्या सेजमेंटमध्ये उतरू शकतात. या वाहन क्षेत्रातील कथित मंदीची विविध कारणे आहेत.

ई-वाहनांची निर्मितीप्रक्रिया आता सुरु झालेली आहे. भारतात अनेक कंपन्यांनी त्यांची इलेक्ट्रिक मॉडेल्स बाजारात आणण्याची तयारी सुरु केलेली आहे. सर्वात मोठा मार्केट शेयर असणाऱ्या मारुतीने देखील अश्याप्रकारच्या वाहनांची निर्मिती करण्याचे जाहीर केलेले आहे.

या वाहन निर्मितीसाठी लागणारे तंत्रज्ञान हे वेगळे असल्याने पुढील काळात वाहन कंपन्यांमध्ये कामगार कपात होऊ शकते तसेच नवीन कामगार भरती देखील होऊ शकते.

कामगार बदल हा वाहन कंपन्यांसाठी अनिवार्य असेल. त्यामुळे बेरोजगारी वाढू शकते. परदेशी कंपन्यांना करात सवलत देऊन किंवा नवीन एसईझेड सारखे प्रकल्प उभारून सरकार बेरोजगारी आटोक्यात आणू शकेल, परंतु भारतीय अर्थव्यवस्था इतक्या आक्रमकपणे या समस्येला सामोरी जाईल असे आजमितीला तरी वाटत नाही.

तसेच असा आक्रमकपणा भारतीय अर्थव्यवस्थेने दाखवला तरी भारतात असलेला ‘रेझिस्टन्स टू चेंज’ म्हणजेच बदलाला विरोध करण्याची वृत्ती हा आक्रमकपणा खपवून घेणार नाही.

यावर्षी प्रस्थापित वाहन कंपन्यांची विक्री कमी होण्याचे एक कारण म्हणजे भारतात दक्षिण कोरियाच्या किआ मोटोर्सने आणि ब्रिटीश कंपनी मॉरीस गराजने पाऊल ठेवलेले आहे. याचा परिणाम इतर कंपन्यांच्या विक्रीवर झालेला आहे.

किआसाठी जवळपास ३२,००० ग्राहकांनी आगाऊ नोंदणी केलेली आहे तर एमजीसाठी २१,००० ग्राहकांनी नोंदणी केलेली आहे. हे दोन्ही आकडे मोठे आहेत. ज्यांचा परिणाम हा इतर कंपन्यांच्या विक्रीवर होणार यात शंका नाही.

तसेच या आकड्यांमुळे वाहन क्षेत्रातील मंदी फार मोठी नाही हे देखील अधोरेखित होते.

३२,००० + २१,००० = ५३,००० युनिट्स होतात.

जून अखेरीस विकल्या गेलेल्या एकूण वाहनांची संख्या २,२१,६१०. म्हणजेच बाजारात उतरता क्षणीच या दोन्ही कंपन्यांनी २०-२५ % मार्केट शेयर स्वतःकडे घेतला आहे जो वर्षभरात १० ते ११ % इतका स्थिरावेल आणि त्यापुढे भारतातील स्पर्धेला जर या कंपन्या यशस्वीरित्या सामोऱ्या गेल्या तर कदाचित ५ ते ६ % इतका दरवर्षी असेल.

मारुती सुझुकी कंपनीचा आजचा मार्केट शेयर हा ५३% आहे. एक मोठी कंपनी असल्याकारणाने त्यांचे मार्केटिंग आणि व्यवस्थापन यावरील खर्च हे देखील जास्त आहेत. ज्यावेळी कंपनीच्या विक्रीवर परिणाम होतो तेव्हा हे खर्च त्वरित कमी होत नाहीत.

काही काळ ते सोसावे लागतात आणि त्यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.

Used-Cars-inmarathi
moneymax.ph

मारुती कंपनीने नेक्सा हे एक नवीन सेजमेंट सुरु केले. खरतर अश्या सेजमेंटची सुरुवात करून मारुतीने स्वतःच्या खर्चात आणखी भर टाकली ज्याची गरज नव्हती. या सेजमेंट मधील गाड्याही फार काही लक्झुरिअस नाहीत तर सर्वसाधारण आहेत ज्या अस्तित्वात असलेल्या आउटलेट मधूनही विकता आल्या असत्या.

फोर्ड, ह्युंदाई, होंडा, टाटा यांच्या गाड्या आणि नेक्सा मधून विकल्या जाणाऱ्या गाड्या यांच्या गुणवत्तेत फार फरक नाही तसेच या नेक्सा सेजमेंटमधील मारुतीची आफ्टर सेल्स कॉस्ट ही काही प्रमाणात इतर कंपन्यांपेक्षा जास्त आहे.

याचा परिणाम हा कंपनीच्या आर्थिक परिस्थितीवर होणारच.

मारुती ही गेल्या अनेक वर्षात पुन्हा पुन्हा तीच तीच मॉडेल्स नव्या स्वरूपात आणत आहे. सध्या ग्राहकांचा कल हा एसयूव्ही कडे असताना मारुतीकडे बाकीच्या कंपन्यांना स्पर्धा देईल अशी एसयूव्ही नाही. ह्युंदाई आणि महिंद्रा या कंपन्या मारुतीपेक्षा अधिक वेगाने घोडदौड करीत आहेत.

मारुतीची विक्री जरी घटली असली तरी ह्युंदाई आणि महिंद्रा यांच्या विक्रीत वाढ झालेली आहे. येत्या काळात मारुतीने सकारात्मक बदल घडवून न आणल्यास त्यांचा मार्केट शेयर हा इतर कंपन्यांमध्ये विखुरला जाण्याची शक्यता जास्त वाटते.

जुलै २०१८ ते जून २०१९ या काळात भारतात ३१,६१,६२६ गाड्यांची विक्री झाली. सर्वात जास्त म्हणजेच २,८७,१६६ युनिट्सची विक्री ही मार्च २०१९ मध्ये नोंदवली गेली. तसेच सर्वात कमी २,२१,६१० ही विक्री जून २०१९ मध्ये नोंदवली गेली. याच मे, जून, ऑगस्ट मध्ये किआ आणि एमजी यांच्या बुकिंगला सुरुवात झाली होती.

जुलै २०१७ ते जून २०१८ या काळात एकूण ३३,७९,१०५ गाड्या विकल्या गेल्या. तर जुलै २०१६ ते जून २०१७ या काळात एकूण गाड्यांच्या विक्रीची संख्या होती ३०,१४,०५१ जी जुलै २०१८ ते जून २०१९ वर्षाच्या संख्येपेक्षाही कमी आहे.

परंतु त्या काळात मंदी जाणवली नाही, कारण तेव्हा परिस्थिती वेगळी होती.

कंपन्याना नव्या तंत्रज्ञानासह बाजारात उतरण्याची आवश्यकता नव्हती, नवीन स्पर्धक मार्केटमध्ये येणार नव्हता आणि ई-वाहने नक्की रस्त्यावर कधी धावणार याबाबत ठोस माहिती ग्राहकांकडे नव्हती.

परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे.

अर्थमंत्री म्हणतात ओला उबरमुळे विक्री कमी झाली.

nirmala sitharaman automobile recession inmarathi

परंतु ओला आणि उबर या कंपन्या भारतात अनेक वर्षांपासून आहेत आणि गाड्यांच्या विक्रीत चढउतार हा सुरु आहेच. ओला उबर नव्हती तेव्हाही इतर व्यावसायिक वाहन चालवणारे होतेच. टॅक्सी अनेक वर्षे आहे. आता तर ओला या ब्रांड खाली तीच टॅक्सी चालते. ओला आणि उबर यांच्या असण्या-नसण्यामुळे वाहन विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता शून्य आहे.

परिणाम झालाच असेल तर तो नवीन कंपन्या भारतात येण्यामुळे झाला आहे, नवीन सेल्फ ड्रिव्हन कार हा कन्सेप्ट मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षभरात भारतात रुजला. हा त्याचाही परिणाम असू शकतो किंवा ग्राहक नवीन येणाऱ्या ई-वाहनांची खरेदी करण्यासाठी उत्सुक असावेत. आणखीही काही घटक असू शकतील.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “वाहन क्षेत्रातील मंदी : वस्तुस्थिती आणि कारणमीमांसा

 • September 12, 2019 at 11:33 pm
  Permalink

  लेखकाने CA Intermediate च्या अभ्यासक्रमातील Strategic Management ह्या विषयातील Substitute या संकल्पनेचा सखोल अभ्यास करावा! जरी CA असले तरी कधी कधी जुने module उघडून बघायची तसदी घ्यावी! आणि हो ते वाचून जर लेखकाचे मत बदलत नसेल तर ICAI ला ई-मेल करून अभ्यासक्रम बदलण्यास सांगावा!
  तळटीप :- मी मोदीभक्त नाही फक्त लेखावर आक्षेप आहे तो पण बिगर राजकीय स्वरूपाचा! याचे भान ठेवूनच प्रतिवाद करावा अन्यथा योग्य शब्दात हासडले जाईल!
  धन्यवाद

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?