' दत्तजन्म कथा - हिंदूद्वेष्टी लोकांच्या हाती आयतं कोलीत : एक परखड दृष्टिकोन

दत्तजन्म कथा – हिंदूद्वेष्टी लोकांच्या हाती आयतं कोलीत : एक परखड दृष्टिकोन

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – तन्मय केळकर

===

बदलत्या काळानुसार आपल्या पुराणकथांचा परामर्श घेणाऱ्या लेखमालेचा हा तिसरा भाग आहे. पहिले दोन भाग इथे वाचू शकता :

आपण आणि देवी-देवतांच्या पुराणकथा

आपण आणि देवी-देवतांच्या पुराणकथा : गणपती बाप्पाची “गोष्ट”

===

आमचं अख्खं कुटुंब दत्तभक्त आहे. आमचे गुरू रामकृष्ण जांभेकर महाराज नि:सीम दत्तभक्त होते. आमच्या गुरूंची समाधी दादरच्या स्मशानभूमीच्या जवळ आहे.

तिथं जाऊन रोज सेवा अर्चा प्रार्थना करणे हा माझ्या आजोबांचा नित्यनेम होता. त्यांचा मृत्यूसुद्धा रामकृष्ण जांभेकर महाराज समाधी मंदिराच्या आवारात हृदयविकाराचा झटका येऊन झाला.

 

JAMBHEKAR-Maharaj-InMarathi

 

जरा मोठं झाल्यानंतर मला आईबाबा पाळणाघरात पाठवत असत. तिथल्या आजी व त्यांच्या वयाच्या इतर स्त्रियांकडून दत्तभक्त व दत्तसंप्रदायी संतांच्या (स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा, नृसिंह सरस्वती, श्रीपाद वल्लभ इत्यादि) विविध लीला ऐकून मीही तेव्हापासून अत्यंत दत्तभक्त झालो.

 

datta_Sampradaay-InMarathi

 

गजानन विजय, गुरुलीलामृत, गुरुचरित्र, साईसच्चरित, स्वामी समर्थांची बखर इत्यादी अनेक पुस्तकांचं वाचन माझं त्या वयात झालं.

१०-११ वर्षांचा असतानाही तासन् तास जपजाप्य, पोथ्यापुराणांची पारायणं, पूजाअर्चा इत्यादी दिनक्रम बघून हा मुलगा मोठेपणी योगी, संन्यासी वगैरे होतो की काय अशी भीती आई-बाबांना व इतर वडीलधाऱ्यांना लागून राहत असे.

पुढे जसजशी माझी इतरही भक्तिमार्गी संप्रदायांशी ओळख होत गेली तसतसं त्या प्रत्येक संप्रदायाशी माझं वेगळंच खास नातं बनत गेलं. मी विचार करू लागलो की दत्त संप्रदायातून असा कोणता विशिष्ट संदेश दिला जातो,

ज्यामुळे दत्तसंप्रदाय इतर सर्व संप्रदायांपेक्षा वेगळा (श्रेष्ठ नव्हे, वेगळा!) ठरतो? दत्तगुरूंच्या आराधनेसाठी तीन तोंडे, सहा हात असलेल्या प्रतीकात्मक रूपाची निवड करण्यामागे नक्की काय विचार होता? त्यातून सर्वसामान्य जनतेला कोणता संदेश देण्याचा हेतू होता?

 

gurudev-datta-InMarathi

 

दत्त संप्रदायाला पार्श्वभूमी आहे ती त्या काळी शैव व वैष्णवांमध्ये असलेली दरी. आमचाच देव श्रेष्ठ व आमच्याच प्रथा व सवयी योग्य असं दोन्ही संप्रदायांचं मत. कांदा उभा चिरावा की आडवा, गंध उभं लावावं की आडवं, हो किंवा नाही म्हणताना मान उभी डोलवावी की आडवी अशा साध्या साध्या गोष्टींवरुनसुद्धा भांडणं.

विष्णूचं गंध उभं म्हणून वैष्णव या सर्व गोष्टी उभ्या पद्धतीने करत असत. शंकराचं भस्म आडवं म्हणून शैव या सर्व गोष्टी आडव्या पद्धतीने करत असत.

वैष्णवांना पवित्र असलेल्या एकादशीच्या दिवशी शैव मुद्दाम कांद्याची भाजी करत. शैवांना पवित्र असलेल्या शिवरात्रीच्या दिवशी वैष्णव मुद्दाम शैवांना निषिद्ध असलेल्या गोष्टी करत. (अरबांसारखी रक्तपाताची संस्कृती आपल्याकडे नसल्यामुळे शिया व सुन्नींसारख्या कत्तली व हिंसाचार झाला नाही ही एकच गोष्ट वेगळी.)

 

Shiva Vs Vishnu-Inmarathi

 

अशा निरर्थक भांडणांना पूर्णविराम लावून शैव-वैष्णवांमधली दरी मिटवावी यासाठी ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन स्वयंभू देवतांचे एकरूपत्व अधोरेखित करणारं दत्तगुरूंचे रूप पूजनीय मानलं गेलं.

वेद-उपनिषदांमधून ठिकठिकाणी सांगितल्या गेलेल्या “एकम् सत् विप्रा: बहुधा वदन्ति” या सत्याचं सर्वात प्रभावी visualization म्हणजे दत्तगुरू….

अख्खं जग त्याला गुरू मानतं त्याचेसुद्धा चोवीस गुरू होते – मधमाशी पासून वेश्येपर्यंत. अशी आजन्म विद्यार्थी व्रत अंगीकारण्याची व सतत काही ना काही शिकत राहण्याची शिकवण म्हणजे दत्तगुरू…

सांसारिक जीवनात राहूनसुद्धा मोक्षाची वाट कशी चोखाळावी याची शिकवण म्हणजे दत्तगुरू

इतका उदात्त विचार मूर्त स्वरूपात आणण्यासाठी वापरल्या गेलेल्या दैवताच्या जन्माची कथा मात्र इतकी घाणेरडी व अश्लील का लिहिली गेली असा प्रश्न एक विद्यार्थी व भाविक म्हणून मला नेहमीच पडतो.

चला ही कथा जाणून घेऊ या.

एक महान, सामर्थ्यशाली, तपस्वी ऋषी अत्री व त्यांची सदाचारी, शीलवती,  पतिव्रता, तपस्विनी पत्नी अनसूया प्रेमाने नांदत होते आणि आपला जीवनप्रवास व्यतित करात होते.

अनुसयेचा पुण्यसंचय, तपोबल व पातिव्रत्याची कीर्ति त्रिभुवनामध्ये पसरली होती.सर्वश्रेष्ठ त्रिदेव – ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्या पत्नीच्या मनात अनुसयेबद्दल असूया निर्माण झाली.

त्यांनी अनसूयेचं पातिव्रत्य भंग करण्याच्या mission वर ब्रह्मा, विष्णू व महेश यांना पाठवलं.

हे त्रिदेव अत्रि ऋषी घरी नसताना त्यांच्या घरी गेले व अनसूयेकडे भिक्षा मागितली. दारी आलेल्या याचकाची इच्छा पूर्ण करावी असे उदात्त विचार बाळगणाऱ्या अनसूयेने काय देऊ अशी विचारणा केली. त्यावर आपल्या त्रिदेवांनी आमच्यासमोर नग्न होऊन आम्हांला भोजन दे अशी मागणी केली.

एखादी सर्वसामान्य स्त्री असती तर समोरचा याचक कोण आहे याची पर्वा न करता, मुस्कटात हाणली असती. पण अनसूया एक असामान्य, स्वाभिमानी स्त्री होती. तिने आपल्या तपःसामर्थ्याने तीन देवांना लहान बाळांमध्ये रूपांतरित केलं आणि स्तनपान दिलं. (नग्न झाली, याचना पूर्ण केली, भोजन दिलं, पण पातिव्रत्य भंग नाही केलं)‌.

 

Anusaya-mata-InMarathi

 

मग त्या तिघींनी अनसूयेची विनवणी केल्यानंतर त्या तिन्ही बाळांना एकत्रित एका शरीरात तीन तोंडे सहा हात असं शरीर देऊन नवीन रूप दिलं. आणि हा झाला दत्तावतार…

अशी घाणेरडी कथा आपल्या पुढच्या पिढीला सांगायला कोणते सभ्य पालक धजतील? दत्तजयंती निमित्ताने होणाऱ्या कीर्तनांमध्ये मात्र ही कथा सर्रास सांगितली जाते. या भाकड कथेतून ब्रह्मा, विष्णू, महेश या सर्वश्रेष्ठ त्रिदेवांबद्दल कोणताही चांगला संदेश श्रोत्यांपर्यंत पोचत नाही.

कोणताही बोध मिळत नाही ज्याचं अनुकरण करून जीवन उन्नत करता येईल. उलट त्या देवतांची बदनामीच होते. आणि त्यामुळेच हिंदू-द्वेष्ट्यांना असं म्हणायला आयतंच कोलीत मिळतं की!

 

Great Hindu Religion-InMarathi

 

हिंदूंचे सर्वात पूजनीय व श्रेष्ठ तीन देव – कोणी क्षुल्लक इंद्र बिंद्र नाही – जे समस्त सृष्टीच्या निर्मिती, स्थिती व विनाशाचे नियंत्रक मानले जातात तेही इतके असभ्य, अश्लील व गर्विष्ठ की एका सुशील स्त्रीकडे – त्यातही ऋषिपत्नीकडे – त्यांनी इतकी घाणेरडी मागणी केली की एक सभ्य सुसंस्कारित हिंदू पुरुष सार्वजनिक ठिकाणी ते बोलण्यासदेखील धजणार नाही.

हिंदूंच्या देवी इतक्या मत्सरी की एक ऋषिपत्नी आपल्यापेक्षा अधिक पुण्यशाली होऊ इच्छिते या भीतीने त्यांनी स्वतः पुढे जाण्याऐवजी तिचे पाय मागे ओढण्याचा प्रयत्न केला.

जे देव भक्ताचेसुद्धा पाय भीतीने मागे ओढू शकतात त्यांची भक्ती करण्यात काय अर्थ आहे?

“जातस्य हि ध्रुवो मृत्यु: ध्रुवं जन्म मृतस्य च” (ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे) असं भगवद्गीता सांगते.

 

krishna_geeta-InMarathi

 

मग दत्तगुरूंसारख्या अनादि अनंत तत्त्वाला जन्म (तोसुद्धा इतक्या घाणेरड्या कारणाने) किंवा मृत्यूही कसा असू शकतो इतका साधा विचारसुद्धा कथा लेखकाने केलेला दिसत नाही.

त्यामुळेच एक दत्तभक्त म्हणून माझी सर्व हिंदूंना विनंती आहे की दत्तगुरूंकडून योग्य तो बोध घ्यावा.

===

हे पण वाचा :

भोळ्या भाबड्या हिंदूंमध्ये अंधश्रद्धा पसरवून ख्रिश्चन धर्म परिवर्तन: धक्कादायक स्वानुभव

चर्चमध्ये ननवर बारा वेळा बलात्कार! “I am ashamed” म्हणणारे आता कुठे आहेत?

===

दत्तगुरूंकडून योग्य तो बोध घेतला तर इतर भाकडकथांची गरज नाही. आणि भाकडकथांना कवटाळून बसलं तर बोध घेता येणार नाही. म्हणूनच बोध घ्या, भाकडकथा टाळा…

।। बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त…।।

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?