'कोरडवाहू जमिनीतून या महिला शेतकरी वर्षाला मिळवतात २५ लाख उत्पन्न

कोरडवाहू जमिनीतून या महिला शेतकरी वर्षाला मिळवतात २५ लाख उत्पन्न

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

मनात जिद्द, चिकाटी आणि काम करण्याची तयारी असली कि, माणसाला पर्याय सापडत जातात, परिस्थितीसमोर हतबल न राहता तो संकटाला तोंड देत राहतो. दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला पण या दुष्काळावर मात करत औरंगाबाद येथील योगिता आणि अश्विनी गायकवाड या महिलांनी शेततळ्याच्या माध्यमातून शेतीत नंदनवन फुलविले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील दरेगाव येथे योगीता व अश्विनी गायकवाड या शेतकरी महिला आपल्या एकत्रित कुटुंबात राहत असून, त्यांचे जनजीवन हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे.

मात्र कोरडवाहू जमीन असल्याने अन त्यात दुष्काळ यामुळे त्यांना शेतीत म्हणावे तसे उत्पन्न मिळत नव्हते.

भरपुर शेत जमीन असूनही पाण्याअभावी फायदेशीर शेती करणे शक्य होत नसताना या कोरडवाहू शेतीच्याद्वारे भरघोस उत्पन्न घेणे कसे शक्य होईल, या विचारात गायकवाड कुटुंबिय असतानाच “मागेल त्याला शेततळे” या योजनेच्या बाबतीत त्यांना माहिती मिळाली अन या योजनेच्या माध्यमातून शेततळे बांधून शेती हिरवीगार करायची अशी खूणगाठ मनाशी बांधली.

maagel tyala shettale devendra fadnavis inmarathi

शेतकरी योगीता तुकाराम गायकवाड आणि अश्विनी नामदेव गायकवाड यांना शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेमुळे खुप चांगला फायदा झाला. या योजने अंतर्गत योगीता व अश्विनी गायकवाड यांना त्यांच्या २५ एकर शेतीत ३० बाय ३० मीटर आकाराचे २७ फुट दोन शेततळे बांधुन मिळाल्याने कोरडवाहू शेतीत आज त्यांना पिकांचे बारा महिने उत्पन्न घेणे शक्य झाले आहे.

प्रत्येकी साडे तीन लाख रुपये खर्चातुन बांधलेल्या या शेततळ्यास शासन अनुदानातुन योगीता व अश्विनी गायकवाड यांना प्रत्येकी 1 लाख 75 हजार रु. रकमेचे सहाय्य प्राप्त झाले.

आज बघितले असता त्यांच्या २५ एकरच्या शेतातील दोन्ही शेततळ्यात १ कोटी २० लाख लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. जी कोरडवाहू शेती पावसामुळे कमी उत्पन्न देत होती.

आज त्याच मातीतून शेततळ्याच्या माध्यमातून योगीता व अश्विनी गायकवाड या वर्षाकाठी २५ लाख रु. इतके उत्पन्न् मिळवत आहेत.

गावातील इतर शेतकरी पाणी नसल्याने फेब्रुवारीमध्येच कमी वाढ झालेली अद्रक काढुन विकतात, त्यावेळी अद्रकीची म्हणावी तशी पूर्ण वाढ होत नसल्याने भावही किफायतीशीर मिळत नाही, तसेच उत्पन्न् कमी भरते.

पण आमच्या शेतात शेततळ्यामुळे कायमस्वरुपी पाणी उपलब्ध राहत असून आम्हाला मार्च, एप्रिल, मे पर्यंत पाणी देऊन अद्रकीची पुर्ण वाढ होऊ देणे शक्य होते. परिणामी पिक भरघोस चांगल्या प्रतीचे तयार होते. भाव आणि उत्पन्न सुद्धा वाढवून मिळते, हे सगळं फक्त शेततळ्यामुळे शक्य झालं आहे, अशी माहिती दोघींकडून मिळाली.

पूर्ण शेतीपैकी आठ एकर शेतीत अद्रक, सहा एकरात कापूस तर दोन एकरात पावसाळी कांदा, मूग याचे उत्पन्न घेत बारा महिने भाजीपाला पिकवणे शक्य होत असल्याने शेती करण्याचा उत्साह आणि उत्पन्न चांगलेच वाढले आहे. तसेच शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या शेती व शेतक-यांच्या जगण्याला सुरक्षित करण्या-या योजनेचा विनाविलंब सहजतेने लाभ मिळत असल्याने शेतक-यांच्या आणि आमच्या गावाच्या प्रगतीत त्याचा भरघोस हातभार लागत असल्याची भावना अश्विनी व योगीता गायकवाड या शेतकरी महिलांनी व्यक्त केली.

देरगावंमध्ये गायकवाड कुटुंबियांपासुन प्रेरणा घेत आज गावात १०० पेक्षा अधिक शेततळे तयार होत आहेत. गायकवाड यांच्या शेततळ्याच्या सहाय्याने करत असलेल्या भाजीपाला लागवडीची दखल विविध कृषी व्यासपीठांवर घेण्यात आली. त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार देखील करण्यात आला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?