'"आम्ही स्पेस मिशन्स करतो, तुम्ही भ्याड हल्ले" चेतन भगतचा पाक मंत्र्याला सणसणीत दणका!

“आम्ही स्पेस मिशन्स करतो, तुम्ही भ्याड हल्ले” चेतन भगतचा पाक मंत्र्याला सणसणीत दणका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===  

कोटी कोटी भारतीयांच्या आशा आणि शुभेच्छांसह चंद्रयान २ अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले. ६ सप्टेंबर ह्या तारखेकडे सगळ्यांचे डोळे लागलेले होते कारण चंद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते. चंद्रयान २ च्या सॉफ्ट लँडिंगकडे अवघ्या जगाचे लक्ष होते.

हत्ती गेला होता आणि शेपूट राहिले होते. खरं तर चंद्रावर उतरणे हे अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण काम आहे. पण विक्रम लॅन्डरचे काम सुरळीत सुरु होते. शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचण उद्भवली आणि चंद्रयान २ चा संपर्क तुटला.

इस्रोच्या अवकाश संशोधकांनी त्यांना शक्य होतील तितके सगळे प्रयत्न केले पण चंद्रयान २ शी संपर्क पुन्हा प्रस्थापित होऊ शकला नाही.

 

chandrayaan-2-launch-InMarathi

इतक्या वर्षांच्या मेहनतीचे हवे तसे फळ मिळाले नाही त्यामुळे इस्रोच्या संशोधकांना दुःख होणे, त्यांना निराश वाटणे ही अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. पण त्यांच्या पाठीमागे संपूर्ण देश अगदी खंबीरपणे उभा आहे.

अगदी पंतप्रधानांपासून तर सर्वसामान्य मनुष्यापर्यंत सगळ्यांच्या मनात इस्रोतील अवकाश संशोधकांविषयी अपार आदर आणि कौतुक आहे.

खरं तर हे अपयश नाही. पण बोलणाऱ्यांची तोंडे कोण बंद करणार? आपल्या आजूबाजूला अशी अनेक विघ्नसंतोषी माणसे असतात ज्यांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही आणि हे लोक दुसऱ्याच्या दुःखातच आपले सुख शोधतात. आपला पक्का वैरी पाकिस्तान असाच आपल्या दुःखावर डागण्या देण्याची संधीच शोधत असतो.

आपण आनंदात असू तर आपल्या आनंदावर विरजण घालण्यासाठी कायमच ते प्रयत्न करत असतात आणि आपण दुःखात असू तर आपल्या जखमेवर मीठ चोळण्यात त्यांना आनंद वाटतो. ही पाकिस्तानची जुनी सवय आहे.

कुत्र्याचे शेपूट वाकडेच ह्या उक्तीप्रमाणे पाकिस्तानच्या एका मंत्र्याने नेहमीप्रमाणे तोंडातून घाणच बाहेर काढली आहे.

काल चंद्रयान २ चा संपर्क तुटल्यानंतर अश्याच विघ्नसंतोषी लोकांना जणू ऊतच आला आहे. पाकिस्तानच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी मंत्री असलेला फवाद चौधरी ह्याने शनिवारी इस्रोची टिंगल करणारे एक ट्विट केले आहे.

आपला घाणेरडा आणि हलका दर्जा अगदी पुरेपूर राखत आणि आपलीच लायकी दाखवून देत फवाद चौधरीने असे ट्विट केले की ,”ऑSSSS … जो काम आता नही, पंगा नही लेते ना…डियर इंडिया (“Endia”)”

 

Fawad-Chaudhry-recklessly-mocked-InMarathi
Global-Village Pace

हे ट्विट टाकल्यावर त्याला अनेकांनी त्याची जागा दाखवून दिली. अनेक भारतीय आणि अगदी काही पाकिस्तानी लोकांनी सुद्धा त्याला सडेतोड उत्तर दिले. अनेकांनी अशी प्रतिक्रिया दिली की “एखाद्या देशाचा विज्ञानमंत्री इतका “अँटी सायन्स” कसा काय असू शकतो?”

एका पाकिस्तानी युझरने त्याला सुनावले की

“भारताकडे एखाद्या अवकाश मोहिमेवर खर्च करण्यासाठी आज ९०० कोटी रुपये आहेत. पण फवाद चौधरीकडे आज त्याचे ट्विटर अकाउंट सोडले तर दुसरे काहीही नाही.”

एक व्यक्ती म्हणाली की ही तर मोठीच विडंबना आहे की एका विज्ञानमंत्र्याला सॅटेलाईटचे स्पेलिंग देखील नीट येत नाही पण त्याला दुसऱ्याची थट्टा करणे मात्र महत्वाचे वाटते.

Hours TV

प्रसिद्ध लेखक चेतन भगत ह्यालाही फवाद चौधरीचे ट्विट वाचून राग आला. त्याने फवाद चौधरीला त्याच्या ट्विटवर चांगलेच उत्तर दिले आहे.

चेतन भगतने उत्तरादाखल असे ट्विट केले की,”आम्ही चंद्र मोहिमा आखतो. तुमचे सरकार मात्र दहशतवादी हल्ल्यांची मोहीम आखतं. आम्ही बहुतांश वेळेला विजयी होतो आणि तुम्ही बहुतेक वेळेला हरता..आम्ही प्रयत्नांचा आदर करतो,आणि तुम्हाला साधे बोलायचे कसे हे ही कळत नाही. त्यामुळे कृपा करून तुमच्याशी आमची तुलना करण्याची कल्पना देखील करू नका आणि तुमचे विचार तुमच्यापाशीच ठेवा. बाय द वे, पंगा हमसे बिलकुल मत लेना.”

chetan_bhagat_InMarathi
Chtan Bhagat FanPage

चेतन भगतप्रमाणेच इतर लोकांनी सुद्धा फवाद चौधरीला भरपूर ज्ञानाचे कण दिले. पण त्याला ते कितपत कळले हे तोच जाणे!

संशोधकांचे असे मत आहे की जे ऑर्बिटर आपण पाठवले आहे त्याचे तांत्रिक आयुष्य एक वर्षाचे आहे. आणि हे ऑर्बिटर चंद्राची छायाचित्रे आणि माहिती इस्रोला पाठवेल ज्यामुळे आपल्या माहितीत आणि ज्ञानात मोलाची भर पडेल. हे ऑर्बिटर आपल्याला (इस्रोला) विक्रम लॅन्डरचे काय झाले आणि सद्यस्थितीत ते कुठे आहे व कश्या परिस्थितीत आहे ह्याची माहिती देखील पाठवू शकेल. ह्यामुळे आपल्याला हे कळू शकेल की विक्रमचे चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश लँडिंग झाल्याने त्याच्याशी आपला संपर्क तुटला की फक्त काही तांत्रिक अडचणींमुळे संपर्क तुटला आहे.

काही वेळापूर्वी इस्रोचे माजी संचालक डी शशिकुमार ह्यांनी सुद्धा अशी शक्यता वर्तवली आहे की “विक्रम लॅन्डर” शी आपला संपर्क तुटला त्याचे कारण क्रॅश लँडिंग असेलच असे आपण खात्रीपूर्वक म्हणू शकत नाही.

chetan_bhagat_InMarathi
स्रोत – ANI

अनेक परदेशी लोकांनी देखील इस्रोचे कौतुक केले आहे व त्यांना धीर सोडू नका, हे अपयश नक्कीच नाही, आपल्याकडे आता नवा ल्यूनार ऑर्बिटर आहे,लहान लहान मुले कक्षा, एस्केप व्हिलॉसिटी, पेरीजी, रॉकेट फ्युएल हे नवे शब्द शिकली, त्यांना नवे ज्ञान मिळाले, त्यांच्यात अवकाश आणि अवकाश संशोधन ह्याविषयी उत्सुकता निर्माण झाली, हे कितीतरी मोठे यश आहे, असा संदेश दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी देखील इस्रोमधील सर्व अवकाश संशोधकांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी झालेल्या भाषणात म्हणाले की आज संपूर्ण देश इस्रोच्या मागे खंबीरपणे उभा आहे. संपूर्ण देशाला आपल्या अवकाश संशोधकांच्या क्षमतांवर संपूर्ण विश्वास आहे आणि त्यांना खात्री आहे की ते नक्कीच मोहीम यशस्वी करून दाखवतील.

इस्रोमधील अवकाश संशोधकांशी संवाद साधताना ते म्हणाले की,

“मित्रांनो , आज तुमची मनस्थिती काय आहे हे मला समजते आहे. तुमच्या डोळ्यांतून तुमच्या मनातील भावना पोहोचत आहेत. तुमच्या चेहेऱ्यावरूनच तुमचे दुःख मला कळते आहे. तुम्ही रात्रीचा दिवस करून ह्या मोहिमेसाठी मेहनत घेतली होती. जेव्हा यानाशी संपर्क तुटला तेव्हा ह्या मोहिमेत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मनस्थिती वेगळी होती. त्यांच्या मनात खूप प्रश्न होते. तुमच्या बरोबर मी तो क्षण जगलो आहे. प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की नेमके काय झाले आणि यानाशी संपर्क तुटला?”

 

Modi Sivan- InMarathi

माजी अवकाश संशोधक पी सी घोष आणि शास्त्रज्ञ अमिताभ पांडे ह्यांनीही असेच सांगितले की संपर्क तुटण्याचे कारण अजूनही समोर आलेले नाही.

ऑर्बिटर मात्र व्यवस्थितपणे काम करते आहे आणि त्याद्वारे आपल्याला लॅन्डरची माहिती नक्कीच मिळवता येईल.

सॉफ्ट लँडिंगचे आव्हान आपल्याला पार पाडणे शक्य झाले नाही. हे संपूर्ण अपयश नसून ऑर्बिटर काम करते आहे हे आपले आंशिक यशच आहे. घोष ह्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इस्रोच्या संशोधकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल कौतुक केले आहे. आणि त्यांना इस्रोचे बजेट वाढवण्याची विनंती देखील केली आहे. ”

 

Scientists Chandrayaan-InMarathi

चंद्रयान २ द्वारे आपली तांत्रिक क्षमता तपासली जाणार होती. जरी आपल्याला सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आलेले असले तरी भविष्यात ऑर्बिटरद्वारे मिळालेल्या माहितीचा आपल्याला पुढील अभ्यासासाठी आणि मोहिमांसाठी फायदाच होणार आहे.

त्यामुळे फवाद चौधरी आणि त्याच्यासारख्या इतर विघ्नसंतोषी लोकांकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. त्याला वेळीच सणसणीत उत्तर देऊन गप्प करणे आणि परत आपल्या कामाला लागणे हेच उत्तम आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?