' “शास्त्रज्ञांनी भावूक होऊ नये” असं शिकवणाऱ्यांनी, हे वाचायलाच हवं! – InMarathi

“शास्त्रज्ञांनी भावूक होऊ नये” असं शिकवणाऱ्यांनी, हे वाचायलाच हवं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम

===

लेखक: इंद्रनील पोळ

===

वो तिफ़्ल क्या गिरेगा जो घुटनों के बल चले
————————————————
इसरोच्या चंद्रयान २ मोहिमेतील विक्रम नावाचं लँडर काल पहाटे चंद्रावर उतरणार होतं, दुर्दैवाने त्यात अपयश आलं. यानंतर इसरोच्या प्रमुखांना भावनावेग आवरता आला नाही. आणि पंतप्रधानांच्या मिठीत त्यांना रडू कोसळलं.

 

k sivan isro narendra modi hug inmarathi

यावर इसरो प्रमुखांच्या तुलनेत दोन पैश्यांची विश्वासार्हता किंवा कर्तृत्व नसणाऱ्या लोकांनी समाज माध्यमांवर सायंटिफिक टेम्प्रेमेंट वगैरेंच्या गप्पा मारायला सुरुवात केली. एक गृहस्थ म्हणाले

“मिठी मारून रडणे एका वैज्ञानिक संस्थेच्या प्रमुखांना शोभत नाही. नासाच्याही अनेक मोहिमा अपयशी झाल्या पण त्यांच्या प्रमुखांना राष्ट्राध्यक्षांच्या गळ्यात पडून रडताना बघितलं नाही.”

हे वाचून मला थॉमस झुरबुखेन या नासाच्या अंतराळ वैज्ञानिकाने लिहिलेल्या एका लेखाची आठवण झाली.

लेखाची लिंक तर शेवटी देतोच आहे. पण त्याच्या शीर्षकानेच लेखाची कल्पना येते, शीर्षक आहे, Science : A deeply emotional affair.

 

thomas zurbuchen nasa inmarathi

लेख नासाच्या मार्स एक्सप्लोरेशन मिशनबद्दल आहे. सुरुवातीलाच लेखक म्हणतो

“बऱ्याच लोकप्रिय सिनेमांमध्ये वैज्ञानिक हे रुक्ष, थंड डोक्याने, आणि अनेलिटिकली विचार करणारे दाखवले जातात, ज्यांच्या मेंदूचा फक्त डावा भाग काम करत असतो (मेंदूचा डावा भाग विश्लेषणात्मक आणि उजवा भावनिक असतो असं मेडिकल सायन्स म्हणतं).

“मला असं वाटतं की हे चित्रण अतिशय चुकीचं तर आहेच, पण वैज्ञानिकांना हतोत्सहित करणारे पण आहे.”

संपूर्ण लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे. लेखक मार्स एक्सप्लोरेशन टीमबद्दल आणि त्यांच्या अनुभवांबद्दल लिहितो.

मुळात मार्स एक्सप्लोरेशनचा प्रोजेक्ट सलग दोन अपयशानंतर केलेला तिसरा प्रोजेक्ट होता. त्यामुळे ऑपोर्च्युनिटी नावाचं लँडर जेव्हा मंगळावर उतरलं तेव्हा टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याचं वर्णन खूपच हृद्य आहे.

 

nasa-mars-rover-marathipizza04

पुढे लेखक म्हणतो की

“मला जर कुठल्या गोष्टीने आतून हलवलं असेल तर ते म्हणजे ज्या प्रकारे या प्रोजेक्टचा अंत झाला. ऑपोर्च्युनिटी धुळीच्या वादळामुळे आठ महिन्यांपासून संपर्कात नव्हतं.

“माझ्या डोक्यावर एका मोठ्या निर्णयाचं ओझं होतं.

“मला निर्णय घ्यायचा होता की आता हा प्रोजेक्ट थांबवायचा अथवा नाही. मी टीमला मीटिंग रूम मध्ये बोलावलं आणि परिस्थितीची कल्पना दिली. मी त्यांना सांगितलं की आपण संपर्क करायचा अजून एक प्रयत्न करू, जर ते शक्य झालं नाही तर ह्या प्रोजेक्टचा हा अंत असेल.

k sivan isro metting room 1 InMarathi

“हे बोलल्यानंतर त्या खोलीला शोकसभेचे रूप आले. जणू ते सर्व आपल्या एखाद्या प्रिय नातलगाला शेवटचा निरोप देत होते.

लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, आपल्या आठवणी ते एकमेकांबरोबर शेयर करत होते. संध्याकाळी काही लोकांनी कंट्रोल रूममध्ये जाऊन बिली हॉलिडेचं I’ll be seeing you हे गाणं एकत्र गायलं. हा त्यांचा ऑपोर्च्युनिटी रोव्हरला शेवटचा सलाम होता.”

लेखाच्या शेवटी लेखक म्हणतो “ग्रेट, हिस्ट्री मेकिंग सायन्स ऍट नासा इज डीपली इमोशनल अफेअर”.

डीपली इमोशनल अफेयर.

हे असं वाचल्यावर आपल्या विचारांचं, आपल्या स्टीरियोटाईप्सच खुजेपण एकाएकी लक्षात येतं. नासाचा वैज्ञानिक म्हणतो सायन्स इज डीपली इमोशनल अफेयर आणि आम्ही आमच्या वैज्ञानिकांना सांगतो, भावना प्रदर्शित करणे तुम्हाला शोभत नाही”.

k sivan isro metting room InMarathi

मिर्झा अजीम बेगचा शेर आहे –

“शह-ज़ोर अपने ज़ोर में गिरता है मिस्ल-ए-बर्क़,
वो तिफ़्ल क्या गिरेगा जो घुटनों के बल चले”

ही कुठल्याही राष्ट्रीय घटनेवर ओढून ताणून सामान्य माणसाच्या देशभक्तीला टोमणे मारत विनोद निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारी लेखकरावांची जमात असो का सर्वज्ञ असण्याचा आव आणणाऱ्या विचारवंतांची, हे सगळे तिफ़्ल आहेत.

यांना अपयशातले यश, साध्य दिसणार नाहीत.

मूळ लेखाची लिंक: Science: A Deeply Emotional Affair

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?