' मोदींनी मिठी मारलेल्या इसरो प्रमुख के शिवन यांची खरी, संपूर्ण ओळख देशाला होणं आवश्यक आहे! – InMarathi

मोदींनी मिठी मारलेल्या इसरो प्रमुख के शिवन यांची खरी, संपूर्ण ओळख देशाला होणं आवश्यक आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

इसरोच्या बहुचर्चित, जगभरात औत्सुक्याचा विषय ठरलेली चांद्रयान २ मोहीम एका उत्कंठावर्धक क्षणावर येऊन – पुढे अनेकांना दुखी करून गेली. विक्रम लॅन्डर, चंद्रावर पोहोचता पोहोचता, अवघ्या २.१ किमी अंतरावर संपर्काबाहेर गेले आणि इसरोसकट अख्खा देश हळहळला.

 

ISRO Chandrayaan 2.Inmarathi00

अर्थात, अजूनही इसरो वा आपला देश निराश झालेला नाहीच. अजूनही प्रयत्न सुरूच आहे – विक्रमशी पुन्हा संपर्क साधला जाऊन पुढील मोहीम यशस्वी होईल असा विश्वास सर्वांनाच आहेच.

आणि आतापर्यंत चांद्रयान २ मोहीम ज्या धडाक्याने विविध यशस्वी टप्पे पार करत केलीये, त्याचा आपणा सर्वांनाच सार्थ अभिमान ही आहे.

आज पहाटेच्या या अनपेक्षित अडचणीमुळे इसरो आणि संपूर्ण देश हळहळत असताना – सर्वाधिक चर्चेत राहिले – इसरोचे अध्यक्ष – के शिवन.

 

SIVAN_ISRO_EPS1221 Inmarathi
New Indian Express

मोदींनी सर्व वैज्ञानिकांना संबोधून बाहेर पडताना दुःखावेगाने रडू कोसळलेल्या के शिवन याना मिठी मारली, त्यांची पाठ थोपटली.

तो व्हिडीओ – ती छायाचित्रं चटकन सर्वत्र पसरली. त्यावर चर्चा सुरु झाल्या.

 

परंतु या सर्वात, के शिवन नेमके कोण आहेत याची कुणाला फारशी कल्पना नाही. ते जाणून घेणं आवश्यक ठरेल.

कैलासावादिवू शिवन हे अंतराळ विभागाचे सचिव आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९५७ ला तामिळनाडू मधील कन्याकुमारी जिल्ह्यात झाला. क्रायोजेनिक इंजिन च्या विकासात शिवन यांचे महत्वपूर्ण योगदान आहे, यामुळे ते ‘रॉकेट मॅन’ म्हणून ओळखले जातात.

शेतकरी आई वडिलांच्या पोटी जन्मलेले शिवन यांचे शिक्षण तमिळ माध्यम असलेल्या सरकारी शाळेत झाले आहेत. ते त्यांच्या कुटुंबातील पहिले पदवीधर आहेत. ते १९८० साली मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून अभियंता झाले. तदनंतर १९८२ मध्ये इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बँगलोर मधून एरोस्पेस इंजीनिअरिंग मधील पदव्युत्तर पदवी प्राप्त करून भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो मध्ये काम करण्यास सुरवात केली.

इस्रो मध्ये नोकरीस सुरवात केल्यावर त्यांनी पोलर सॅटेलाईट लॉंच व्हेईकल प्रकल्पावर काम सुरु केले. २००७ साली इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ बॉम्बे मधून त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये डॉक्टरेट देखील मिळवली.

शिवन यांनी नाविन्यपूर्ण अशी ‘डे-ऑफ लाँच विंड बायसिंग स्ट्रॅटेजी’ विकसित केली आणि अमलात आणली ज्याद्वारे कोणत्याही हवामानात आणि वेगवान वा-यात रॉकेट प्रक्षेपित करता येते. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष या उच्च पदावर जाण्याआधी शिवन तिरुअनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी) चे संचालक होते.

फेब्रुवारी २०१७ मध्ये इस्रोने जे रेकोर्डब्रेक १०४ उपग्रह पाठवले त्यात महत्वपूर्ण योगदान शिवन यांचे होते. इस्रोच्या आजकाल चर्चा होत असलेल्या सर्व महत्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांचे योगदान आहे.

जरी ते पीएसएलव्ही(पोलर सॅटेलाईट लॉंच व्हेईकल) कार्यक्रमात इस्रोमध्ये सामील झाले असले, तरी त्यांनी जीएसएलव्ही (जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लॉंच व्हेईकल) बरोबर जे काम केले, ज्याला नॉटी बॉय असं देखील म्हटलं जात होतं – आता त्याने त्याची किंमत सिद्ध केली आहे.

शिवनने पुन्हा वापरण्यायोग्य लाँच वाहनवर(रीयुझेबल लाँच व्हेईकल) काम केले. हे तंत्रज्ञान आज इस्त्रो विकसित करीत आहे आणि चाचणी करीत आहे. मार्स ऑर्बीटर मिशन(मॉम) अर्थात मंगलयान मोहीम त्यांनी पीएसएलव्ही (पोलर सॅटेलाईट लॉंच व्हेईकल) द्वारे यशस्वी करून दाखवली.

हे पीएसएलव्ही म्हणजे त्याकाळात कमी इंधन व कमी भार वाहन क्षमता असलेले परंतू अतिशय भरवश्याचे भारतचे एकमेव रॉकेट होते. आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळापर्यंत पोहचलेला भारत हा एकमेव देश बनला.

 

के शिवन हे इंटिग्रेटेड डिझाईन फॉर स्पेस ट्रान्सपोर्टेशन पुस्तकाचे ते सहलेखक देखील आहेत.

एक संपूर्ण रॉकेट सायंटीस्ट असलेले शिवन हे मितभाषी आहेत. परंतु असे असले तरी रॉकेट प्रक्षेपानापुर्वी आज रॉकेट उड्डाण करेल असा मासेसशी पटकन संवाद साधणे हे त्यांना ठावूक आहे. शिवन यांच्या मते अत्यंत कमी पैशात रॉकेट उड्डाणे आणि अंतराळ प्रकल्प करण्याची क्षमता असल्याने इस्रोचे भवितव्य अत्यंत उज्वल आहे.

शिवन हे वर्कहोलिक आहेत. विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी) मध्ये अविरत काम करताना त्यांना “स्लीपलेस सायंटिस्ट” म्हटलं जायचं.

अडचणींचे प्रसंग

शिवन यांचा कार्यकाळ फारसा सोपा नव्हता आणि अनेक यश-अपयश त्यांनी पहिले आहेत. इस्रोचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे पहिले उड्डाण अपयशी ठरले. उपग्रहाचं उष्णता कवच उघडण्यात अपयशी ठरलं आणि लॉन्च अपयशी झालं. २४ वर्षांत हे पहिले अपयशी पीएसएलव्ही उड्डाण ठरले. शिवन यांनी हे अपयश खुल्या दिलाने मान्य करून पुढील कामास सुरवात केली.

२७ मार्च २०१९ ला जेव्हा डी आर डी ओ (Defence Research and Development Organisation) मार्फत जेव्हा उपग्रह भेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली, तेव्हा शिवन यांच्यावर इस्रोचे सैनिकीकरण करण्यात येत असल्याच्या प्रश्नांचा भडीमार करण्यात आला होता. तेव्हा शिवनने शांतपणे पण बाणेदार उत्तर दिले की –

“उपग्रह भेदी क्षेपणास्त्राच्या चाचणीमध्ये इस्रोचा सहभाग केवळ उपग्रह पुरवणे एवढाच होता. आणि मी एक व्यावसायिक आहे. जर कुणी आमच्याकडून उपग्रह विकत घेत असेल, तर मी नाही का म्हणावे?”

पुरस्कार आणि सन्मान

शिवनना आपल्या संपूर्ण कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

१९९९ साली श्री हरि ओम आश्रम प्रेरित डॉ विक्रम साराभाई रिसर्च अवॉर्ड

एप्रिल २०१४ मध्ये चेन्नईच्या सत्यबामा विद्यापीठातून डॉक्टर ऑफ सायन्स (Honoris Causa)

इतर पुरस्कारः

इस्रो मेरिट पुरस्कार, २००७

डॉ बीरेन रॉय अवकाश विज्ञान आणि डिझाईन पुरस्कार, २०११

एमआयटी माजी विद्यार्थी असोसिएशन कडून प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार, २०१३

आयआयटी-बॉम्बे मधील प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार, २०१७

चांद्रयान -२ बद्दल :

चांद्रयान -२ हा भारताच्या दृष्टीने अभिमानाचा आणि अत्यंत महात्वाकांशी प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये सुरवाती पासून अनेक अडचणी आल्या. चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग अर्थात अलगदपने उतरण्याची किमया करणे केवळ रशिया, अमेरिका आणि चीन यांनाच जमले होते.

जर चांद्रयान २ मधील विक्रम लँडर यशस्वीरित्या उतरला असता तर ही किमया करणारा भारत हा चौथा व त्यातही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला असता. या प्रकल्पामध्ये सुरवातीपासूनच अडचणी आल्या. मात्र सर्व अडचणींना तोंड देत शास्त्रज्ञांनी प्रकल्प पूर्ण केला.

१२ नोव्हेंबर २००७ रोजी रशियन सांघिक अवकाश संस्थेच्या व इस्रोच्या प्रतिनिधींनी चांद्रयान २ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर एकत्र कार्य करण्याचा करार केला होता. या प्रकल्पात इस्रोने रोव्हर तर रशियन सांघिक अवकाश संस्थेने लँडर तयार करण्याची मुख्य जबाबदारी स्वीकारली होती.

ह्या यानाचा आराखडा दोन्ही देशांतील वैज्ञानिकांच्या एकत्रित बैठकीने ऑगस्ट २००९ मध्ये पूर्ण करण्यात आला. रशियन सांघिक अवकाश संस्थेला लँडर वेळेत पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे ही मोहीम जानेवारी २०१३पर्यंत स्थगित करून पुन्हा २०१६ साली करण्याचे ठरवले.

मग मात्र भारताच्या इस्रो संस्थेने ही चांद्रमोहीम स्वतंत्रपणे पार पाडायचे निश्चित केले. या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर मार्च २०१८ला चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्याचे नक्की करण्यात आले.

मात्र सुरुवातीला एप्रिलपर्यंत आणि नंतर ऑक्टोबरपर्यंत काही अन्य अंतराळ वाहनांची चाचणी करण्याकरिता ही मोहीम स्थगित करण्यात आली. फेब्रुवारी २०१९च्या चाचणीत लँडरच्या दोन पायांना अल्पप्रमाणात हानी पोहोचली होती. ती दुरुस्ती झाल्यावर चांद्रयान २ चे प्रक्षेपण १५ जुलै २०१९ला ठरवण्यात आले.

मात्र पुन्हा काही तांत्रिक अडचणीमुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले. शेवटी २२ जुलै २०१९ हा दिवस चांद्रयानाच्या प्रक्षेपणासाठी जाहीर केला.

अशाप्रकारे चांद्रयान २ GSLV MK lll ह्या प्रक्षेपकाद्वारे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे २२ जुलै २०१९ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २:४३ (जागतिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ९:१३) वाजता अखेरीस प्रक्षेपित झाले. २० ऑगस्ट २०१९ रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि ७ सप्टेंबर २०१९ रोजी पहाटे विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया सुरु झाली.

ही १५ मिनिटांची प्रक्रिया प्रचंड कठीण असणार आहे हे शिवन यांनी आधीच स्पष्ट केले होते. कारण या १५ मिनिटांच्या लँडिंग प्रक्रियेत कंट्रोल सेंटरचे कोणतेही नियंत्रण असणार नव्हते.

विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ २.१ किमी वरती असताना इसरोचा लँडरशी असलेला संपर्क तुटला आणि शिवन यांच्यासह सर्व शास्त्रज्ञांचा काळजाचा ठोका चुकला.

संपूर्ण देश आणि जग हे प्रक्षेपण लाईव्ह पाहत होते.

शिवन यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या वेळी इस्रो मध्ये उपस्थित असलेले पंतप्रधान मोदी यांनी मिठी मारून आणि पाठ थोपटून त्यांना धीर दिला.

शेतक-याचा मुलगा, सरकारी शाळेत तमिळ माध्यमात शिकलेला, घरातील पहिला पदवीधर ते इस्रो चा अध्यक्ष हा शिवन यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?